शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

जगण्या जगविण्याचं संमेलन:-साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांच्या गावातला सुन्न करणारा फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 6:45 AM

सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात यवतमाळचं नाव घेतलं जातं. याच यवतमाळमध्ये नुकत्याच झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीला देऊन नवीन पायंडा पाडण्यात आला. उद्घाटक म्हणून वैशाली येडे यांनीही छाप पाडली, त्याच वेळी ठरवलं, त्यांच्या राजूर गावाला भेट द्यायची. तिथे जे दिसलं, त्यानं मन अजूनच सुन्न झालं.

-स्नेहा मोरे

यवतमाळमध्ये भरलेल्या सारस्वतांच्या मेळ्याला राज्याच्या कानाकोप-यातून साहित्यिक आलेले आणि त्यांच्या जोडीला साहित्यावर जीव                                असणा-या यवतमाळकरांनीही आवर्जून हजेरी लावलेली. विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांची पत्नी वैशाली येडे यांना संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळणं ही गोष्ट तशी अगदीच दुर्मीळ. मात्र  त्या विसेक हजार गर्दीच्या समोर वैशाली मोठय़ा जिद्दीने उभी राहिली, अन् याच शिकलेल्या-पुस्तकं वाचलेल्या माणसांसमोर आयुष्याशी झगडलेल्या संघर्षाचा पाढा तिनं वाचला. अवघ्या काही वेळातच तिनं संमेलनात उपस्थित असणा-या अन् तिला ऐकलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यांत आसवं, डोक्यात विचारांचा भुंगा सोडला..‘बहिणाबाईची लेक हाय, म्हणून ज्योतिषाले हात नाही दाखवत, जो कोणी अंगावर हात टाकाले आला, त्याले हात दाखवतो’, ‘मानसं पुस्तक वाचून नाही समजत, त्याच्यासाठी मानसायतच जाव लागतं’, ‘माहा याच जलमावर विश्वास हाय, म्हून मी याच जन्मी लढीन, वायद्याची शेती फायद्यात आणीन’. या तिच्या शब्दांनी अंगावर शहारा आणला, काही क्षण नि:शब्द केलं..

तिच्या याच बोलण्यातून तिचं यवतमाळ जिल्ह्यापासून कोसो दूर असलेलं राजूर गाव गाठायचं पक्क केलं, या गावात जाऊन सारस्वतांच्या केवळ साहित्यात              उमटणा-या मात्र ते भयाण वास्तव रोजच्या रोज जगणार्‍या, त्या वास्तवाचे चटके सहन करणा-या शेतक-याच्या जगण्यात डोकावण्यासाठी राजूरचा रस्ता धरला.

यवतमाळपासून कळंब गाठायचं आणि मग तिथून आडवळणाच्या, खाच-खाचखळग्याच्या वाटेने जंगलानं वेढलेलं राजूर गाठायचं. यवतमाळपासून राजूरचा रस्ता 60-70 किलोमीटर. सूर्य डोक्यावर असताना प्रवास सुरू झाला. जसजसा रस्ता कापत होतो, दोन्ही बाजूला सुकलेल्या अवस्थेत निपचित पडलेली शेती दिसत होती. दूर नजर जाइस्तोवर कुठेही हिरव्यागार शेताचा कणभरही मागमूस नव्हता..

यवतमाळमध्ये शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. त्यातल्याच एका       शेतक -याच्या घराची वाट धरली. दीडेक तासानंतर गावात पोहोचलो. नीरव शांतता, डोक्यावर तापलेला सूर्य, गावात माणसं कमीच होती. बरीच माणसं रोजंदारीला गेल्याचं गावक-यानी सांगितलं. गावाच्या पायवाटा मागे सारत चालत होतो. शेणाने सारवलेल्या काहीशा पडीक अवस्थेत असणा-या  त्यांच्या घराजवळ आलो; पण घराला कुलूप होतं. दरवाजावर जान्हवी-सुधाकर लिहिलेलं. घर पाहिल्यानंतर गावचा फेरफटका मारला.आपल्या गावातली बाई एवढय़ा मोठय़ा संमेलनाला पाहुणी, उद्घाटक म्हणून गेल्याचं कोणतंच चिन्ह गावात दिसतं नव्हतं. अगदी वैशाली येडे यांच्या घराकडेही कुणी आठवड्याभरापासून फिरकलं नसल्याचं गावकरी सांगत होते. गावात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे साधारण साडेचार वाजले होते. गावातल्या प्रत्येक घराबाहेर बाई घरची धुणी-भांडी, पाणी भरणं, शेंगा सोलणं, शेण-सारवण अशी कामं आटपत बसलेल्या.पायवाटेतून फिरताना एका कोप-यावर ऐंशीच्या घरातली म्हातारी नाकावर ओझं झालेला भिंगाचा चष्मा कसाबसा सावरत छप्पराची भिंत नसलेल्या घराला मायेने शेणाने सारवत होती. तिच्या जवळ गेल्यानंतर त्या म्हातारीने व्यथा मांडली, ‘मले कोण नाय, दात-डोळं आत गेलं तरी माझं मह्याच धडपडायला लागत दोन घासासाठी.’ 

तिच्या या वाक्याने काळजाचा ठोका अक्षरश: चुकला. जगण्याशी झगडणं काय असतं तेही झटक्यात लक्षात आलं.

घराच्या कोप-यावर चुलीतल्या राखेने भांडी घासत बसलेल्या बायकांच्या गप्पात सामील झाले, रोजच्या तेल-पाणी, काटकसरीचा विषय सुरू होता. मी तिथे गेल्यावर आपापल्या घरचं चेह-यावरचं दारिद्रय़ त्यांनी पुसलं अन मग हट्टाने शेजारी बसून मायेने सगळ्यांनी विचारपूस केली, त्यावेळी माझ्यासाठी त्यांच्याइतकं श्रीमंत कुणीच नव्हतं. त्यातल्या काहींना वैशालीबद्दल विचारलं, त्याही उत्साहात सांगू लागल्या.. सायब आलेले तिला न्यायले गाडीतून, लोकं बी जमलेली ..ती मोठी झाली. आमच्या गावाचं नावबी खूप मोठं केलंय. तिच्या निमित्ताने गाव बदललं असं प्रत्येकालाच वाटत होतं. भेगा पडलेल्या मातीतनं कधीतरी अंकुर फुटण्याची स्वप्नं या सगळ्यांच्याच डोळ्यांत होती. मुंबईहून आले असं सांगितल्यावर परदेशाहून आल्यागत आश्चर्य व्यक्त         करणा-या ‘आमी बी शहरात जातोय, कधीतरी कळंबला बाजारात जावं लागते आमाले’,  असं सांगताना आजही प्रगत म्हणणार्‍या आपल्या देशात सत्तरी ओलांडलेल्या माणसांना गावाएवढाच परीघ असणारे कळंब हे शहर वाटते, तेव्हा आपण प्रगती करतोय यावर काहीसा विश्वास ठेवणं कठीण जातं.

आयुष्यभर रोजंदारीवर राबून भेगाळलेल्या जमिनीसारखे हात, प्राक्तनाला कायमच दूषणं देत ढकलेला दिवस, लेकरांचं पोट भरावं म्हणून रात्नंदिवस घाम गाळणा-या माय-बापांना लेकरांच्या भविष्याची चिंता लागून राहिलीय..

आपल्या गावाचं कुणीतरी मोठय़ा कार्यक्र मात गेलं या पलीकडे संमेलनाविषयी काहीही माहिती नसणार्‍या प्रत्येकाच्याच जगण्यात भीषण वास्तविकता होती.. दूर कुठेतरी यवतमाळच्या कोण्या एका मैदानावर सुरू  असलेल्या साहित्याचं खरंखुरं वास्तव गावातल्या प्रत्येकाच्या जगण्यातून प्रतिबिंबित होताना दिसलं. 

नव्वदी पार केलेल्या या सारस्वतांच्या मेळ्याने अशा गाव-खेड्यांतील मूठभर माणसांचं जगण बदललं तर ख-या अर्थाने आपण अशी संमेलनं सार्थकी लागताहेत असं मानू.. नाहीतर मग केवळ जिल्हे बदलतील, शहर बदलेल, उद्घाटक बदलतील, संमेलनाध्यक्ष अन् वक्तेही बदलतील मात्न आयुष्याशी झगडणार्‍या, मातीत राबणा-या, दोन घासांसाठी रात्नंदिवस रक्त आटविणा-याच्या जगण्याचं ‘संमेलन’ कदाचित कधीच शक्य होणार नाही..!!!

 

----------------------------------------------------------------------------

‘बाईच्या रक्तात हिंमत असते!’संमेलनाला येणं अचानक घडून आलं, ही एवढी मोठी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासारख्या शेतकर्‍याच्या पोरीसाठी हे सगळं नवं होतं. पण संमेलनात बोलल्यानंतर सगळ्यांनी भेटून सांगितलं, की खणखणीत बोललीस, सगळ्यांले आवडलं. संमेलनाच्या तीन दिवसांनंतर गावाले आले, आल्यानंतर सर्वांच्या घरात मले चहाला बोलावले, मी नाय म्हणत व्हते सर्वांनाच; पण कुणी ऐकलं नायं, गाव जमा झाला व्हता. सर्वजण म्हणत होते की आपल्या गावाचं नाव मोठं केलं, तेव्हा मनात समाधान वाटलं व्हतं, खूप बरं वाटलं शब्द ऐकून. कारण याच गावात मी माझ्या हक्कासाठी, अधिकारासाठी झगडले व्हते. दोन  ऑक्टोबर 2011ला नव-याने आत्महत्या केली, त्यानंतर पार कोसळून गेले. पदरात छोटं लेकरू व्हतं. मग कसं पोट भरणार ? या चिंतेने बाबाने घरीच ठेवलं. स्वत:च्या पायावर उभं राहीस्तोवर इथेच थांब म्हणाले, एक-दीड वर्ष बाबाकडे राहिले. राजूरपासून 20-25 किलोमीटर अंतरावर डोंगरखर्डा गावात माहेर आहे. मी बारावी शिकलेय, मग माहेरी राहून शिवणकाम शिकले, त्यानंतर मुलगी 12 महिन्यांची झाल्यानंतर पुन्हा राजूरला सासरी राहायला आले.

नवरा गेल्यानंतर येडे कुटुंबीयांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. तिकडच्या घरच्यांनी पाठिंबा नाय केला, घरातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले; पण स्वत:च्या हक्कासाठी भांडले. बाईच्या रक्तात हिंमत असते त्यामुळे मीच झगडून उभी राहिलेय, इलाज नव्हता माझ्याकडे, दोन लेकरं व्हती काय करणार होते एकटी.. शेवटी झगडून तिथेच राहायला लागले. पतीच्या आत्महत्येनंतर येडे कुटुंबीयांनी शेती करू दिली नाय, त्यामुळे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करू लागले. कपडे शिवण्याचंही काम करते, त्यातून दोन घासाचे पैसे सुटतात. महिन्याला साडेतीन हजार रु पये मिळतात; पण राशनपाणी करण्यात पैसा जातो. लेकरांसाठी खूप मोठी स्वप्ने पाहिली आहेत, ती सारी पूर्ण होणार नाही, हेपण माहितीय. पण तरी स्वत:साठी नव्हे लेकरांच्या शिक्षणासाठी आणखी पैसे पायजे असं वाटतं, लेकरांच्या शिक्षणासाठी कुणी मदत केली तर बरं होईल, दोनी लेकरांनी खूप शिकावं, मोठं व्हावं ही इच्छा आहे. संमेलन संपल्यानंतर कुणी मदतीसाठी अजून विचारपूस केली नाय; पण संमेलनात आलेल्या बड्या लोकांनी मले सांगितले, ‘मदत लागली तर मागा’; पण स्वत:हून केली तर ठीक, कुणाकडे मदत कशी मागायची? मला ते नाय जमत.

- वैशाली येडे (92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक)

(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहेत.)

moresneha305@gmail.com