मराठी साहित्याची डिजिटल रडकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 07:12 PM2018-02-10T19:12:06+5:302018-02-11T07:14:30+5:30

येत्या शुक्रवारपासून बडोदे येथे आयोजित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...

Marathi literature | मराठी साहित्याची डिजिटल रडकथा

मराठी साहित्याची डिजिटल रडकथा

Next

- राम जगताप

नव्या गोष्टींना सतत नाकं मुरडणारे, बदलांना विरोध-त्यांचं स्वागत करणारे, त्रयस्थपणे पाहणारे, अजिबात पर्वा न करणारे लोक सगळ्याच समाजात असतात. मात्र यातला कुठला गट संख्येनं जास्त आहे, प्रभावशाली आहे. यावर त्या समाजाचा प्रवास ठरत असतो.
महाराष्ट्र ही सतत नाकं मुरडणा-या कर्मदरिद्री लोकांचीच छावणी असेल तर त्यातलं साहित्यही तसंच असणार यात काही शंका नाही.


उदारीकरणाच्या गेल्या दोन दशकांमध्ये शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, चित्रपट, संगीत, साहित्य या क्षेत्रांमध्ये झपाट्यानं अनेक स्थित्यंतरं झाली. यातल्या काही क्षेत्रांचा तर नव्या तंत्रज्ञानानं अगदी कायापालट करून टाकला आहे. यात मराठी प्रकाशन व्यवहाराचाही उल्लेख करावा लागेल.
एकेकाळी पुस्तक विकत घेणं ही खास मध्यमवर्गाची चैन होती. पण गेल्या पंचवीस-सत्तावीस वर्षांच्या काळात मध्यमवर्गाचे उच्च, मध्यम आणि निम्न असे तीन वर्ग झाले असून, त्यात फार मोठ्या समाजसमूहाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता पुस्तक विकत घेण्याविषयीची अनुकूलता कितीतरी पटींनी वाढली आहे. पूर्वी आवडही कमी आणि अनुकूलताही कमी होती. आता सेवासुविधांच्या साधनांमुळे, माहितीच्या प्रचंड स्फोटामुळे आणि पैशाच्या खुळखुळण्यामुळे आवड आणि अनुकूलता या दोन्हींबाबत परिस्थिती खूपच सुधारली आहे.
कारण जागतिकीकरणानंतर ‘ज्ञान’ हे ‘पॉवर फिनॉमिनन’ झालं, पण आज माहिती-तंत्रज्ञान हे ‘पॉवर फिनॉमिनन’ झालं आहे. विशेषत: गेल्या सात-आठ वर्षांत. हे घडून येतंय ते जगभरात झपाट्यानं वाढत असलेल्या तरु णांच्या संख्येमुळे. ‘कोलंबिया जर्नालिझम रिव्ह्यू’मधल्या ताज्या लेखानुसार २०२१ पर्यंत भारतातील जवळपास ६४ टक्के लोकसंख्या ही २० ते ३५ या वयोगटादरम्यानची असेल. म्हणजे भारत हा पूर्णपणे तरुणांचा देश होत आहे. या तरुणांची माध्यमं नवी आहेत. त्याच्या हातात स्मार्ट फोन, टॅब, फॅब आहे, किंडल आहे. त्याचा कामाच्या निमित्तानं जास्तीत जास्त वेळ डेस्कटॉप, लॅपटॉप यावर जातो.
या भारतीय तरु ण वर्गाला आकर्षून घेण्याची कितीतरी मोठी संधी मराठी साहित्याला, मराठी प्रकाशन व्यवसायाला आहे. पण हे दोघेही यात काळाच्या खूप मागे आहेत असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं. काळ बदलतो तशी वाचकांची अभिरु ची बदलते. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, संशोधक, शास्त्रज्ञ अशा बुद्धिजीवी लोकांपुरतीच पुस्तकं ही नडीव गोष्ट होती. आता ती तशी राहिलेली नाही. तिचा परीघ कितीतरी पटींनी विस्तारला आहे. मात्र, त्या आसुसलेल्या, पुस्तकांची वाट पाहणाºया वाचकांपर्यंत पोहोचण्यात मराठी प्रकाशकच कमी पडत आहेत. याचं कारण आॅनलाइन माध्यमांचा वापर करून घेण्यात, आजच्या माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात ते कमी पडत आहेत. किंबहुना त्याचं त्यांना अजून पुरेसं भानच आलेलं नाही. इंग्रजी वा हिंदीतील प्रकाशक व्यवसायाची आॅनलाइन उपलब्धता पाहिली तर स्तिमित व्हायला होतं. इंग्रजीतलं एक उदाहरण पाहू. २०१५ मध्ये चिकी सरकार या तरुणीनं पेंग्विन रँडम हाउस या विख्यात प्रकाशन संस्थेच्या भारतातील प्रमुखपदाचा राजीनामा दिला. आणि ‘जगरनॉट’ या भारतातील पहिल्या मोबाइल पब्लिशिंगचा घाट घातला. ही संस्था छापील, ई-बुक आणि फोन बुक अशा तिन्ही माध्यमांत एकच पुस्तक उपलब्ध करून देते. पुस्तकं विकत घेण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप सुरू केलं. प्रकाशन संस्थेच्या नवनव्या पुस्तकांची माहिती देण्यासाठी आणि साहित्यातील इतर घडामोडींची माहिती देण्यासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू केली. परिणामी अवघ्या दोन वर्षांत चिकीची प्रकाशन संस्था इंग्रजीतल्या आघाडीच्या प्रकाशन संस्थेच्या रांगेत जाऊन बसली आहे.
याउलट स्थिती मराठीमध्ये आहे. नाही म्हणायला गेल्या वर्षीच्या डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात ज्योत्स्ना, रोहन, राजहंस, मौज प्रकाशन गृह, पॉप्युलर प्रकाशन आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशन या सहा प्रकाशन संस्थांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर’ हे अ‍ॅप सुरू केलं. मराठी ई-बुकची विक्री करण्यासाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आलं. आता या अ‍ॅपला वर्ष झालं, पण ते अजून किमान पाच हजार लोकांनीही डाउनलोड केलेलं नाही. कारण काय? तर बहुतेक प्रकाशकांची उदासीनता. या अ‍ॅपसाठी आपली पुस्तकं ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देणं, मुख्य म्हणजे त्याच्या प्रमोशन्ससाठी कल्पक योजना राबवणं, त्यांची अंमलबजावणी करणं, त्यासाठी वेळ देणं हे ज्योत्स्ना प्रकाशनाच्या मिलिंद परांजपे आणि रोहन प्रकाशनाच्या मिलिंद चंपानेरकर यांच्याशिवाय फारसं कुणी करताना दिसत नाही. जिथं उर्वरित प्रकाशक स्वत:ची पुस्तकं ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून द्यायला तयार नाहीत, तिथं या अ‍ॅपच्या आॅनलाइन आणि आॅफलाइन प्रमोशन्सची जबाबदारी कोण घेणार? परिणामी हा अतिशय स्तुत्य किंबहुना क्र ांतिकारी ठरू शकणारा मराठीतला प्रयोग ‘क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे’ या अवस्थेच्या पुढे जायला तयार नाही. कुठलंही नवं माध्यम आलं की, त्याचे फायदे आणि तोटे सांगणारे लोक पुढे येत असतात. म्हणजे स्वागत करणारे आणि विरोध करणारे. ते मराठी प्रकाशन व्यवहारातही आहेत. ई-बुक रीडरमुळे छापील पुस्तकांचं भवितव्यच धोक्यात येणार असल्याची हाकाटी अनेक साहित्यिकांनी-प्रकाशकांनी सुरुवातीला सुरू केली होती. पण तसं काही झालं नाही. उलट त्यामुळे पुस्तकं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नवनवी माध्यमं निर्माण झाली. मग हळूहळू मराठी प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांच्या प्रमोशन्स वेबसाइट सुरू केल्या. सोशल मीडियाचा वापर सुरू केला. ई-बुकही काढायला सुरुवात केली.
पण उदारीकरणाचा काळ हा अधिक चांगल्या प्रकारे व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे, याचं भान त्यांना अजूनही नीट आलेलं दिसत नाही. ई-बुक काढली की आपलं काम संपलं किंवा सोशल मीडियावर नव्या पुस्तकांची माहिती शेअर केली की झालं, असा त्यांचा होरा दिसतो. आॅनलाइन माध्यमाचा सजगपणे आणि कल्पकतेनं वापर करून घेण्यात ते कमालीचे मागे आहेत. कारण या माध्यमांद्वारे पुस्तकांची विक्र ी, जाहिरात, वितरण, प्रसिद्धी यांबाबत ते गाफील म्हणावे इतके मागे तरी आहेत किंवा रडके तरी आहेत. शिवाय जुनी नीतिमूल्यं उराशी कवटाळून बसलेले आहेत.
ई-बुक म्हणजे छापील पुस्तकाची स्कॅन केलेली पीडीएफ हा शोध मराठीमध्ये लावला गेला. साहित्याचं डिजिटलायझेशन म्हणजे आपल्याकडची पुस्तकं स्कॅन करून ती आॅनलाइन उपलब्ध करून देणं असा प्रकार काही शासकीय-निमशासकीय संस्थांनी सुरू केला. त्यांचा दर्जा हा यथातथा म्हणावा असा आहे. कारण त्यात शॉर्टकट मारण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो आहे. त्यात सफाई कमी आणि दूरदृष्टी तर त्याहून कमी दिसते.
याचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे मराठी विश्वकोशाचं अ‍ॅप. आधी या विश्वकोशाचे सर्व खंड वेबसाइटवर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. आणि नुकतंच त्याचं अ‍ॅपही तयार करण्यात आलं. पहिल्या आठवड्यात किती हजार लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या! मात्र हा मराठी विश्वकोश जवळपास कालबाह्य झालेला आहे. त्याच्या अद्ययावतीकरणाची नितांत गरज आहे, याविषयी कुणीही बोलायला तयार नाही. अशा प्रकारे मराठी साहित्य डिजिटल होत असेल तर ते फारसं स्पृहणीय नाही. पण हाच मराठी साहित्य व्यवहाराच्या डिजिटलायझेशनचा एकंदरीत खाक्या दिसतो आहे.
मराठी प्रकाशकांनाही असं वाटतं की, वेबसाइट सुरू केली, त्यावरून छापील पुस्तकं विकत घेण्याची सोय उपलब्ध करून दिली की, झालं!

किंवा मग अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या आॅनलाइन पुस्तकविक्री करणा-या साइटवर आपली छापील पुस्तकं उपलब्ध करून दिली की, आपण झालो डिजिटल! मराठी प्रकाशक अजूनही आपलं प्रत्येक पुस्तक एकाच वेळी छापील आणि इलेक्ट्रॉनिक (ई-बुक) या दोन्ही माध्यमांत उपलब्ध होईल आणि त्याच वेळी त्याचा इंग्रजी अनुवादही उपलब्ध असेल, याबाबत सजग नाहीत. ते पुस्तक छापतात आणि त्याची सोशल मीडियाद्वारे जाहिरात करतात. म्हणजे आॅनलाइन माध्यमाचा केवळ पुस्तकविक्रीचं साधन म्हणून वापर करण्यापलीकडे ते त्याचा अधिक गांभीर्यानं विचार करताना दिसत नाहीत.

एखाद्या पुस्तकाचा केवळ इंग्रजीमध्ये अनुवाद झाल्यानं ते जसं जागतिक साहित्याचा भाग होत नाही, तसंच केवळ एखाद्या पुस्तकाचं ई-बुक उपलब्ध केल्यानं ते डिजिटल होत नाही. एका मर्यादेनंतर पुस्तक छापील असो वा इलेक्ट्रॉनिक; त्याचा खप हा जाहिरात, वितरण, प्रसिद्धी यांवरच अवलंबून असतो. फ्लिपकार्टला दहा-अकरा वर्षं झाली, अ‍ॅमेझॉन भारतात येऊन चार-पाच वर्षं होत आली. या आॅनलाइन मेगा स्टोअर्सनी इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांतील पुस्तकांच्या बाजारपेठेवर प्रभाव टाकायला, ती काबीज करायला सुरुवात केली. पण हे आव्हान मराठी प्रकाशक अजूनही धडपणे स्वीकारताना दिसत नाहीत. अमेझॉनवर मराठी ई-बुक्स गेल्या वर्षापासून दिसू लागली आहेत. ते प्रादेशिक भाषेतील पुस्तकांचंही प्रमोशन करत आहेत. त्यामुळे तिथं चांगला प्रतिसादही मिळतो आहे. मेहता, डायमंड, साकेत, उत्कर्ष यांसारख्या काही निवडक प्रकाशकांचीच ई-बुक दिसतात.

बहुतांशी मराठी प्रकाशक ई-बुकच्या बाबतीतच उदासीन असल्यानं मोबाइल बुक, आॅडिओ बुक, मोबाइल नॉव्हेल, मोबाइल कॉमिक्स, मल्टिमीडिया कादंबरी या प्रकाराविषयी तर त्यांना निदान ऐकून तरी माहिती आहे की नाही, माहीत नाही.
(त्याबद्दल स्वतंत्र चौकटीत वाचा)
थोडक्यात मराठी प्रकाशन व साहित्यविश्वाला डिजिटल माध्यमांची ताकद समजलेली नाही असंच म्हणावं लागेल. नव्या गोष्टींना सतत नाकं मुरडणारे, बदलांना विरोध करणारे, त्यांचं स्वागत करणारे, त्याकडे त्रयस्थपणे पाहणारे आणि त्याची अजिबात पर्वा न करणारे लोक सगळ्याच समाजात असतात. मात्र यातला कुठला गट संख्येनं जास्त आहे, प्रभावशाली आहे यावर त्या समाजाचा प्रवास ठरत असतो. महाराष्ट्र ही सतत नाकं मुरडणाºया कर्मदरिद्री लोकांचीच छावणी असेल तर त्यातलं साहित्यही तसंच असणार यात काही शंका नाही.


मोबाइल कॉमिक्स
याला ‘मोमिक्स’ (momics) असंही म्हणतात. ही कॉमिक बुकचीच एकप्रकारे संक्षिप्त आवृत्ती मानली जाते. फक्त ती खास मोबाइलसाठी बनवलेली असते. साधारणपणे ४० पानांचं कॉमिक पुस्तक १५ स्लाइडमध्ये बसवून त्याचं ‘मोमिक्स’ बनवलं जातं. ते एमएमएस (multimedia message)  च्या माध्यमातून ग्राहक-वाचकांना पाठवलं जातं. मोबाइल कादंबरीप्रमाणे चीनमध्येच पहिल्यांदा मोमिक्स सुरू झालं असून, ते तिथे मोठ्या प्रमाणावर यशस्वीही झालं आहे. भारतात मोमिक्सचा पहिला प्रयोग ‘अमर चित्रकथे’ने केला आणि तो यशस्वीही झाला आहे. मात्र, सध्या तरी यामध्ये इंग्रजी कॉमिक्सच पाहायला मिळत आहेत. पण लवकरच त्यात हिंदी, बंगाली, पंजाबी, गुजराथी, तेलुगु, मराठी या प्रादेशिक भाषांचाही समावेश होईल.


मराठी साहित्य व्यवहाराच्या जगातल्या ‘डिजिटल’ समजुती
ई-बुक म्हणजे?
छापील पुस्तकाची स्कॅन केलेली पीडीएफ!...

डिजिटल होणं म्हणजे?
अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या आॅनलाइन विक्री करणा-या साइटवर आपली छापील पुस्तकं उपलब्ध करून देणं...

आॅडिओ बुक, मल्टीमीडिया कादंबरी ते मोबाइल कॉमिक्स आणि खास मोबाइलवर वाचण्यासाठीच लिहिलेली मोबाइल नॉव्हेल हे प्रकार मराठी वाचकांच्या वाचन-व्यवहारात अजून पुरेसे रूळलेले नसले, तरी जगभरात हे प्रयोग अत्यंत वेगाने विकसित आणि लोकप्रियही होत आहेत.

आॅडिओ बुक
आॅडिओ बुक म्हणजे बोलके पुस्तक. इंग्रजीमध्ये अ‍ॅमेझॉन हे आॅनलाइन बुक स्टोअर अ४्िरु’ी या अ‍ॅपच्या माध्यमातून बोलकी पुस्तके विकते. अर्थात भारतीय कंपन्याही ‘आॅडिओ बुक’ बनविण्यात आघाडी घेऊ लागल्या आहेत. काही लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि संगीतकार यांनी एकत्र येऊन १९९६ मध्ये ‘कराडी टेल्स’ (ङं१ं्िर ळं’ी२) ही मुलांसाठी आॅडिओ बुक्स बनवणारी कंपनी चेन्नईमध्ये सुरू केली. ‘कराडी’चा अर्थ ‘अस्वल’ असा आहे. प्रसिद्ध चरित्र अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या आवाजात यातील कथा ध्वनिमुद्रित केल्या गेल्या आहेत. ही पुस्तकंही मल्टिमीडिया प्रकारची आहेत. पुस्तकांच्या दुकानांतून विकत घेता येतात किंवा कराडी टेल्सच्या संकेतस्थळावर जाऊन आॅर्डर नोंदवून घरपोच मिळवता येतात. २००९ साली ‘स्नॉवेल’ या कंपनीने मराठी आॅडिओ बुक काढायला सुरुवात केली.

मल्टिमीडिया कादंबरी
मराठीतील पहिली मल्टिमीडिया कादंबरी २०११ मध्ये प्रकाशित झाली. प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांनी ‘ब्र’, ‘भिन्न’ या दोन बहुचर्चित कादंबºया लिहिल्यानंतर आॅडिओ, व्हिडीओ, कॅलिग्राफी, पेंटिंग्ज, छायाचित्रं, अ‍ॅनिमेशन यांचा वापर करत ‘कुहू’ ही पहिली मल्टिमीडिया कादंबरी तयार केली. ती डीव्हीडी आणि छापील स्वरूप अशा दोन्ही माध्यमांत उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी तिच्या स्वतंत्र आवृत्त्या आहेत. त्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ही केवळ मराठीमधीलच नव्हे, तर भारतीय भाषांमधील पहिली मल्टिमीडिया कादंबरी म्हटली जाते.

‘ऐकण्याची’ पुस्तके भारताच्या वाटेवर
युरोप-अमेरिकेत आॅडिओ बुकची वार्षिक उलाढाल नऊ हजार कोटींवर पोहचली असली आणि त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असला, तरी भारतात आणि मराठीमध्ये मात्र आॅडिओ बुक या संकल्पनेला अजून फारसं स्थान मिळालेलं नाही. मराठीमधील आॅडिओ बुक्सचे प्रयत्न अजून अपवादात्मक आणि प्रयोगाच्या पातळीवरच असले तरी भविष्यात त्यात भर पडत जाणार हे नक्की. आॅडिओ बुक ई-बुकसारखे आॅनलाइन डाउनलोड करून विकत घेतले जाण्याचे किंवा आय-ट्यूनच्या माध्यमातून त्यांची विक्र ी होण्याचे दिवस फार लांब राहिलेले नाहीत.


मोबाइल नॉव्हेल
मोबाइल नॉव्हेल म्हणजे थेट मोबाइल फोनवर लिहिली जाणारी आणि वाचली जाणारी कादंबरी. या कादंबरी प्रकाराचा जन्म जपानमध्ये झाला. जपानी भाषेत त्याला ‘केताई शोसेत्सी’ असं म्हणतात. केताई म्हणजे मोबाइल आणि शोसेत्सी म्हणजे कादंबरी. २००३ साली जपानमध्ये पहिली मोबाइल कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीचं नाव होतं, ‘डीप लव्ह’. ती टोकियोमधील योशी (Yoshi)) या तिशीतील युवकाने लिहिली होती. ती प्रचंड लोकप्रिय ठरली. नंतर ती पुस्तकरूपानेही प्रकाशित झाली. तिच्या २५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या. तिच्यावर टीव्ही मालिका आणि चित्रपटही बनवले गेले.

या कादंबरी प्रकारामध्ये जपानी तरुण लेखिकांचा मोठा सहभाग आहे. तरुणींचाच साहित्यप्रकार म्हणून ‘मोबाइल कादंबरी’ ओळखली जाऊ लागली आहे. नातेसंबंध, प्रेम, बलात्कार, प्रेमिक, गर्भधारणा हे विषय या कादंबºयांमधून हाताळले जाऊ लागले. नंतर त्या छापील स्वरूपातही प्रकाशित होऊ लागल्या. ही कादंबरी थेट वाचकांना ई-मेल वा मोबाइल मेसेजद्वारे पाठवली जाते. किंवा आॅनलाइन पैसे भरून ती प्रकरणनिहाय वाचता येते. २००७ मध्ये जपानमधील सर्वाधिक खपाच्या दहा पुस्तकांमध्ये पाच मोबाइल कादंबºया होत्या. २००७ मध्ये ९८ टक्के मोबाइल कादंबºया पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या होत्या.

तैवान, चीन आणि दक्षिण कोरियामधील तरुणांमध्ये मौखिक प्रचारातून मोबाइल कादंबºयांचा प्रसार झाला. या मोबाइल कादंबºया युरोप, दक्षिण आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेमध्येही लोकप्रिय झाल्या आहेत. हे लोण भारतातही पसरत चाललं असून, २००६ मध्ये मल्याळम भाषेत ‘निलकन्नुकल’ (निळे डोळे) या नावाने पहिली मोबाइल कादंबरी लिहिली गेली. केरळमधील माहिती तंत्रज्ञान विषयातील एक तज्ज्ञ प्रा. पी. आर. हरिकुमार यांनी ही कादंबरी लिहिली. ती पहिल्या ६०० मोबाइलधारकांना मोफत देण्यात आली. ही कादंबरी सहा भागांत असून, तिच्या एका भागाचा आकार ७० केबी इतका कमी आहे. जावा प्रोग्राम असलेल्या कुठल्याही मोबाइलवर ही कादंबरी वाचता येते. ती मोबाइलवर डाउनलोड करता येते किंवा एसएमएसमार्फतही मिळवता येते.


(लेखक ‘अक्षरनामा’ या डिजिटल डेली पोर्टलचे संपादक आहेत.  jagtap.ram@gmail.com)

Web Title: Marathi literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.