शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

लव्ह लॉक ब्रीज

By admin | Updated: June 13, 2015 13:36 IST

प्रेमातल्या जोडप्यांनी यावं, आपली नावं लिहिलेलं एक कुलूप पुलाच्या कमानीला अडकवावं, आणि किल्ली खाली वाहत्या नदीच्या पात्रत भिरकावून द्यावी! - अशा सुमारे दहा लाख कुलपांच्या पंचेचाळीस टनांच्या ओझ्याने एखादा पूल चक्क वाकला तर? पॅरिसमध्ये हेच तर झालं..

- विनिता आपटे
 
मी आणि कोस्ता सहा वर्षापूर्वी आलो होतो इथे. तेव्हा आम्ही आमची नावं लिहून या पुलाच्या कठडय़ावर एक लॉक लावलं होतं. आज खूप शोधलं मी, पण नाही मिळालं.  आमचं नातं  हरवून  दोन र्वषे झाली. आता ते कुलूपही गेलं. कदाचित वितळवलं जाईल म्हणतात ते कुलूप. कोण जाणो!! दोन माणसांमधलं नातं बघताबघता वितळून जातं, कुलपाचं काय एवढं?’’
- गेल्या मंगळवारी सकाळी पॅरिसच्या एका स्थानिक रेडिओ स्टेशनवरच्या कार्यक्रमात मिमो सांगत होती. मिमो पॅरिसच्या उपनगरात राहाते. ती कोस्ताच्या प्रेमात पडली, तेव्हा दोघांनी मिळून सिन नदीवरल्या त्या जगप्रसिद्ध  ‘लव्ह लॉक ब्रिज’वर येऊन दोघांची नावं लिहिलेलं एक कुलूप पुलाच्या कठडय़ावर लावलं होतं आणि प्रथेप्रमाणो चावी पुलाखालून संथ वाहणा:या सिन नदीत भिरकावली होती.
. या आशेने की दोघांचं नातं अतूट राहील. कधी न उघडता येणा:या त्या कुलपासारखंच!
- पण ते नातं सरलं. आणि मिमो-कोस्तासारख्याच अनेकांच्या सफल/विफल प्रेमाचं तब्बल पंचेचाळीस टन ओझं वागवून जेरीला आलेल्या त्या पुलावरली काही लाख कुलपांची ती अवजड माळही आता उतरवली गेली आहे. पॅरिस नावाच्या रंगीन शहरात आकर्षणांना काय कमी? जगभरातून येणारे पर्यटक रात्रंदिवस या देखण्या शहरात पाय तुटेतो आणि नजर निवेतो भटकत असतात. जो इथे येतो, तो या शहराचा एक तुकडा आपल्याबरोबर जन्मभरासाठी घेऊन जातो, असं म्हणतात. मी तर या शहरात काही वर्षे राहिले होते.
- परत येताना ते अख्खं शहरच आलं माङयाबरोबर आयुष्यभरासाठी, म्हणूनच गेल्या आठवडय़ात प्रेमाच्या पुलावरली ती दहा-एक लाख कुलूपं कमानीच्या कमानी उचलून काढली गेल्याची बातमी वाचली आणि पाहिली, तेव्हा मनात थोडं काही हललंच!
काय होतं हे प्रकरण?
प्रणयाची राजधानी असलेल्या पॅरिसमधलं हे  ‘प्रकरण’ होतंच तसं रंगीन! शहरातून वाहणारी सिन नदी. त्यावरला पूल. पण तो नुसता पूल नव्हता! - तर जगभरातल्या अनेक प्रणयी युगुलांनी मोठय़ा विश्वासाने लावलेली बंद कुलूपं वागवत उभा असलेला तो एक आर्त सखाच होता!
या पुलाचं नाव पॉ द आर्त.
‘मिठीत तुङया मला बंद  करून घे,
प्रेमाच्या कुलपाने मला कैद करून घे’ 
अशा अर्थाच्या ओळी लिहून, दोघा जोडीदारांची नावं कोरलेलं एक देखणं कुलूप या पुलाच्या कठडय़ावरल्या कमानीवर अडकवून त्या बंद कुलपाची चावी खालून वाहात असलेल्या सिन नदीच्या पात्रत भिरकावली, की आपलं प्रेम त्या बंद कुलपासारखंच अभंग रहातं अशी एक श्रद्धा ( तिला अंध कसं म्हणावं?) कोण जाणो कशी- पण पसरत गेली. आणि पर्यटकांपासून स्थानिकांर्पयत सगळ्यांच्याच प्रेमाची दास्तान या पुलावर कैद होऊ लागली.
बघताबघता या कुलपांच्या भाराने हा प्राचीन पूल ढासळून पडेल की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली. 1800 साली बांधला गेलेला हा देखणा पूल म्हणजे पॅरिसच्या स्थापत्यशास्त्रचा मोठा साक्षीदार आणि फ्रेंच लोक सौंदर्याचे मोठे भोक्ते. त्यामुळे पुलाच्या प्राचीन कमानींचं सौंदर्य झाकून टाकणारी ही गंजलेल्या कुलपांची  ‘अग्ली’ कमान तातडीने हटवावी यासाठी शहरात चर्चा सुरू झाली. अर्थात या प्रस्तावाला विरोध करणारेही होतेच.  त्यांच्या मते प्रेमाची, प्रणयाची पूजा करणा:या शहरातला हा आधुनिक  ‘माईलस्टोन’ आहे, तो का हटवायचा?
- पण स्थानिक प्रशासनाने पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा काढल्यावर मात्र  ‘प्रणयी’ विरोधकांच्या विरोधाची अस्त्रं एकेक करून म्यान होऊ लागली.
दरम्यान, आपली नावं लिहून दिसेल त्या पुलाच्या कमानीला, झाडाच्या फांदीला कुलूपं अडकवण्याचं हे वेड पॅरिसच्या इतर भागातही पसरू लागलं. एक नवीच अंधश्रद्धा तयार होऊ लागली. पॅरिसमध्ये कुठेही हे असं  ‘कुलूप’ लावलं, की ‘आपलं नातं अभंग राहातं’ या भावनेतून हे कुलूप प्रकरण भलतंच फोफावलं. स्मार्टफोनच्या  ‘सेल्फी’ प्रसारानंतर तर हे आणखीच वाढत गेलं.
या प्रकाराला विटलेल्या पॅरिसमधल्या स्थानिक नागरिकांनी चक्क  ‘नो लव्ह लॉक्स’ नावाची एक चळवळच सुरू केली. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या या भलत्या चाळ्यांना प्रोत्साहन देऊ नये यासाठी आग्रह धरला जाऊ लागला.
- आणि गेल्या वर्षीच्या जून महिन्यात या पुलाची एक कमान वरच्या ओङयाचा भार न पेलवून चक्क कोसळली. त्यानंतर मात्र हालचाली अधिक गतिमान झाल्या. पुलाच्या कमानीचे तुकडे कोसळणं खाली नदीपात्रतून जाणा:या बोटींसाठी फारच धोकादायक होतं.
शेवटी स्थानिक प्रशासनाने जाळी असलेल्या कमानी काढून त्याजागी ग्लास पैनेल्स लावायचा निर्णय घेतला, म्हणजे कुलूपं अडकवायचा प्रश्नच नाही!
- अखेरीस  गेल्या आठवडय़ात कुलपांच्या भाराने वाकलेल्या या कमानी काढून घेण्यात आल्या आणि पॅरिसमधल्या एका रंगीन अध्यायाची इतिश्री झाली.
पॅरिसमध्ये राहत असतान कितीदातरी या पुलावरून मी सिन नदी ओलांडली असेन. तिथे कायम जोडपी दिसत. प्रेमातली. एकमेकांच्या मिठीतून क्षणभरही दूर न होणारी. हातात हात घालून पुलाच्या कमानीमध्ये आपलं कुलूप ओवतानाचे त्यांचे चेहरे बघत राहावेसे वाटत.
कधीकधी वाटे का असेल ही धडपड?
हातून कधीही सुटू शकेल अशा कोवळ्या नात्याला बांधून घालणं?
पृथ्वीच्या या भागात जन्मोजन्मीचे ‘वादे’ करणं आणि निभावणं तसं क्वचितच!
- त्यामुळे ज्यांची नावं लिहिलेली कुलूपं लटकताना दिसतात, ते कुणा दुस:याबरोबरच संसारात रमलेले असण्याची शक्यता अधिक!
- तरीही ते नातं आहे तोवर घट्ट धरण्याची असोशी मात्र अधिक. कदाचित म्हणूनच अधिक!
आपण कधीकाळी लावलेलं कुलूप सापडतं का, ते शोधायला येणारी जोडपीही भेटत. मग छान वाटे. काहीजण अभिमानाने सांगत की अमुक इतकी वर्षे आम्ही इथे येतो पण आम्हाला आमचं कुलूप काही सापडत नाहीये. आम्ही एकत्र आहोत अजूनही!
आपल्याकडच्या प्रेमकथा बहुतांशी वेळा सुफळ संपूर्ण होतात  कारण आपल्याकडे क्षणीक भावनेपेक्षा ते नातं स्वीकारण्याकडे जास्त कल असतो. म्हणूनच बहुतेक अजून हे कुलूप-किल्ली प्रकरण आपल्याकडे एवढं फोफावलं नसावं. पाश्चात्त्य देशातली नात्यांमधली अधिकची अनिश्चितता फार नाजूक त्यामुळे त्या असुरक्षिततेचे हे असले आविष्कारही!
.. आता पॉ द आर्त वर कुलूपं लावायला बंदी केली आहे पण पॅरिस नावाचं ते देखणं शहर प्रणयी युगुलांना नाराज नाही करणार हे नक्की! शहरातल्या अशाच कुठल्यातरी सुंदर जागी पुन्हा एकदा  पर्यटकांना कुलूपं लावण्यासाठी जागा करून दिली जाईल. सुमारे दहा लाख कुलूपं काढली आहेत, त्यांचंही एक सुंदर म्युङिाअम होईल कदाचित,
आणि पुढल्या पॅरिस भेटीत तुम्ही-मी ते बघायला जाऊ.
- तिथेही पुन्हा ती प्रेमातली जोडपी भेटतीलच.
कदाचित मिमोही असेल.
आणि सोबत तिचा नवा मित्र
 
लव्ह लॉकजागतिक प्रसार असलेली माध्यमं आणि फेसबुक-सेल्फीच्या जमान्यात पॅरिसमधल्या या  ‘लव्ह लॉक ब्रिज’ची मोठी चर्चा होणं यात फार काही नवीन नाही. 
खरंतर या प्रेमाच्या कुलूप किल्लीला खूप मोठा इतिहास आहे . साधारणपणो शंभर वर्षांपूर्वी ही प्रथा सर्बियामध्ये सुरू झाली, असं म्हणतात. व्रन्ज्का बंजा या सर्बियातल्या गावामध्ये नदा या शिक्षिकेची ही लोककथा आहे. ही नदा एका लष्करी अधिका:याच्या प्रेमात पडली. गावातल्या नदीवरल्या पुलावर दोघे भेटत. अचानक पहिल्या महायुद्धाचे बिगुल वाजू लागले आणि नदाच्या प्रियकराला- रेलजाला युद्धावर हजर व्हायचा हुकूम आला. त्याला सर्बियाहून ग्रीसला जावं लागणार होतं. त्यांच्या नेहमीच्याच पुलावर नदाने रेलजाला आश्रू नयनांनी निरोप दिला, आणि ती त्याची वाट पाहात झुरत राहिली. युद्ध संपलं, तरी रेलजा परत आलाच नाही. आली ती नदाला कोसळवून टाकणारी बातमीच - तिचा रेलजा कोर्फूमधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे आणि आता तो कधीच परत येणार नाही. विरहाने घायाळ झालेल्या नदाने त्या पुलावरच अखेर प्राण सोडला. सर्बियातल्या तरुणींनी मग आपला प्रियकर आपल्यापासून कधीच दुरावू नये, म्हणून त्या पुलाच्या कठडय़ांवर एक कुलूप लावून किल्ली नदीत फेकून द्यायला सुरुवात केली.
- असं म्हणतात, की तेच पहीलं ‘लव्ह लॉक’
 
हा कसला ‘प्रेमळ’ वैताग?
 
पॅरिसमधल्या कुलपांनी वाकलेल्या पुलाची ही कहाणी वाचायला मोठी रोमेण्टिक वाटत असली, तरी जगभरात जिथेकुठे ही असली  ‘प्रेमाची कुलूपं’ लावण्याची प्रथा बोकाळली आहे, तिथले स्थानिक नागरिक आणि प्रशासन मात्र या प्रकाराने त्रस्त असतात.
युरोपात गेल्या दहा-पंधरा वर्षात हे प्रकरण जास्तच फोफावल्याचं सांगतात. 2क्क्6 साली प्रसिद्ध झालेल्या ‘आय वॉण्ट यू’ नावाच्या कादंबरीतले नायक-नायिका रोममधल्या कुठल्याशा पुलावर हे प्रेमाचं कुलूप लावतात असा कथाभाग होता. नंतर त्या बेस्ट सेलर कादंबरीवर सिनेमाही आला आणि वेडे प्रेमवीर युरोपभर ही कुलूपं लावत सुटले.
नंतर मग उत्तर अमेरिकेतही हे लोण पोचलं.
न्यूयॉर्कमधला (करण जोहर फेम) ब्रुकलीन ब्रीजही आता या कुलपांच्या भाराने वाकायला आल्याचं सांगतात.
युरोपातले जवळपास सगळे देश, अमेरिका, अगदी रशिया, दक्षिण कोरियामध्येही हल्ली ही कुलूपं लागताहेत. काही ठिकाणी पुलांच्या कठडय़ांना, तर कुठे एका विशिष्ट बागेतल्या झाडांच्या फांद्यांना!
- म्हणजे आपल्याकडे जसं जुने गडकिल्ले, राजवाडे आणि इमारतींवर आपली नावं कोरण्याचा उद्दामपणा केला जातो, तसंच हे!
- देश कोणताही असो, शहर कोणाचंही असो, असं कुणीही उठून आपली नावं लिहून कुलूपं टांगणं आणि वर कहर म्हणजे किल्ली फेकून देणं हा सरळ उद्दामपणा आहे आणि निदान जबाबदार पर्यटकांनी तरी तो करू नये, अशी मतं मोठय़ा प्रमाणावर व्यक्त होताना दिसतात.!
( लेखिका पुणे येथील तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष आहेत.)