चित्रात हरवलेला माणूस

By admin | Published: May 24, 2014 01:05 PM2014-05-24T13:05:22+5:302014-05-24T13:05:22+5:30

कोल्हापूर संस्थान-राजदरबाराचे चित्रकार दत्तोबा दळवी यांचे जयसिंगराव हे ज्येष्ठ चिरंजीव. आई, वडील, पाच बहिणी व दोन भाऊ अशी ही कुटुंबव्यवस्था होती. जयसिंगरावांचे शालेय शिक्षण राजाराम हायस्कूल (कोल्हापूर) येथे झाले.

The lost guy in the picture | चित्रात हरवलेला माणूस

चित्रात हरवलेला माणूस

Next

- अस्मिता जगताप

कोल्हापूर संस्थान-राजदरबाराचे चित्रकार दत्तोबा दळवी यांचे जयसिंगराव हे ज्येष्ठ चिरंजीव. आई, वडील, पाच बहिणी व दोन भाऊ अशी ही कुटुंबव्यवस्था होती. जयसिंगरावांचे शालेय शिक्षण राजाराम हायस्कूल (कोल्हापूर) येथे झाले. ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी त्या वेळी त्यांना कदम मास्तरांचे मार्गदर्शन लाभले. दत्तोबांकडून कलेचा वारसा मिळालाच होता. त्यांनी (दत्तोबांनी) ‘दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट’ ही कलाशिक्षण देणारी संस्था काढली होती. तेथेच सुरुवातीची चार वर्षे पेंटिंगचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर मात्र डिप्लोमासाठी ते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे गेले, त्या वेळी जे. जे. स्कूलचा नावलौकिक आशियात झाला होता.

कोल्हापुरात परत आल्यानंतर ‘यथार्थ दर्शना’ या विषयात काम करून अधिक माहिती मिळविली. चित्रकार आबालाल यांचे पुतणे फरुद्दीन शेख ‘जे. जे.’मध्ये शिकले होते. त्यांच्याकडून विविध प्रकारे त्याचा चित्रात उपयोग करण्याची कला त्यांनी आत्मसात केली. वेगळा विचार करून तो यथार्थ दर्शनाद्वारे चित्रात मांडायचा. उदा. एखादे उंच शिखर रस्त्यावर कलले अथवा तुटून पडले अथवा त्यानंतर ते रस्त्यावर टांगले गेले तर ते कसे दिसेल? अतिउंचीवरून एखाद्या जमिनीवर असलेल्या वस्तूकडे पाहिल्यास ती कशी दिसेल? यालाच ‘बर्ड्स आय व्ह्यू’ असे म्हटले जाते. अशा चित्रात विविधता आणणं त्यांना भावत असे. या त्यांच्या विषयातील अभ्यासामुळे त्या वेळी प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ आर्किबेरी यांच्याकडे यथार्थ दर्शनाची कामे त्यांनी केली.
स्वभावात धडाडी आणि नवीन आव्हाने स्वीकारून ती परिपूर्ण करण्याची वृत्ती असल्याने ‘ड्राफ्ट्समन पाहिजे’ या टाईम्समधील जाहिरातीमुळे ते तडक दिल्लीला गेले. बरोबर केलेले काम नेले होते. ते दाखविल्याबरोबर ताबडतोब कामावर रुजू होण्याचा आदेश मिळाला; परंतु येथे माझ्याकडून काही प्रात्यक्षिक करून घेतले नाही, याची खंत त्यांनी बोलून दाखविली. मग त्यांना एका टेबलाचे ड्रॉईंग करण्यास सांगितले. ते केलेले पाहिल्याबरोबर लगेचच त्यांना frinze von Drigeburg या ‘इंटिरियर डेकोरेशन’ फर्ममध्ये सामावून घेण्यात आले आणि राहण्याची व्यवस्था करोल बाग या भागात करण्यात आली. त्यांचे हे ऑफिस मेडर्नस् हॉटेलमध्ये होते. एक वर्ष त्यांनी या फर्ममध्ये जयपूर, उदयपूर, पतियाळा, ग्वाल्हेर राजांसाठी कामे केली. इंपिरियल मेडन्स् या हॉटेलमध्ये प्लास्टरची पॅनल्स तयार केली. पद्मपत सिंघानिया यांचेही काम केले.
ही फर्म नंतर कोलकात्याला गेल्यामुळे कोल्हापूरला ते परत आले. १९५0मध्ये त्यांचे लग्न झाले. पुण्यात त्यांनी ड्रॉईंग टिचर ट्रेनिंग घेतले होते. त्याही परीक्षेत त्यांचा तिसरा नंबर आला होता. त्यानंतर ‘बॉईज टाऊन’ शाळेत त्रिंबक रोड नाशिक येथे ‘डायरेक्टर ऑफ आर्ट’ म्हणून नेमणूक झाली. तेथे १९५१ ते १९६0 पर्यंत काम केले. शाळेत पेंटिंग, मॉडेलिंग व गार्डनिंग मुलांना शिकवत होते.
त्यानंतर पुन्हा दिल्लीला ‘असि. ले आऊट आर्टिस्ट’ म्हणून काम मिळाले. मूळ डिझाईनमध्ये उत्सुकता कायम असल्याने कोणत्याही प्रकारचे वेगळे काम करण्याची त्यांची तयारी असे. एक वर्ष येथेही काम केल्यानंतर नाशिक येथील गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस, गांधीनगर येथे ‘ले आऊट आर्टिस्ट’ म्हणून नेमणूक झाली. ‘सी जेम्स’ हा अंग्लो इंडियन मॅनेजर होता. त्यांचा विशेष लोभ सरांवर जडला. त्याचे कारणही तसेच होते. क्लिष्ट व अवघड काम करण्यात सर अधिक आनंद घेत, त्यामुळे अशा विशेष प्रसंगी सरांकडूनच काम करून घेतले जाई. प्रेसमधील इतर लोकांना काम समजावण्यासाठी काही चार्ट्स बनवत, यासाठीही सरांची मदत घेत. अत्यंत समाधानी वृत्ती असलेले हे गृहस्थ कायम सरांबरोबर काम करण्यास तयार असत. एकदा ‘युनो’तर्फे एक इंग्रजी मासिक हिंदीत छापावयाचे होते. वेळ कमी होता; परंतु वेळेचे आव्हान स्वीकारून ते वेळेतच पूर्ण केले व शाबासकीही मिळविली.
काही किस्से त्यांच्या कामाची साक्ष देणारे आहेत. राणी मदन आमर सेंट्रल स्कूलसाठी लागणार्‍या या पुस्तकासाठी केलेली इलस्ट्रेशन कुणाला भावत नव्हती. शेवटी ते काम सरांकडे आले. ३/४ इलस्ट्रेशन्स त्यांच्याकडे करावयास आली. ती पाहून संपूर्ण पुस्तकाचे कामच सरांकडून करून घेण्यात आले. १९८२ मध्ये सर नवृत्त झाले. ते एकटे जे काम तेथे करीत होते, त्याकरिता आता चार-पाचजणांची नेमणूक करावी लागली.
नाशिकमध्ये त्यांनी पुतळेही तयार केले. त्या वेळी कॅमल कंपनीचे व्यवस्थापक चित्रकार वाड यांनी सरांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘ओयासिस’ या आर्ट गॅलरीत भरविले होते. ते त्यांचे पहिले प्रदर्शन होय.
कोल्हापुरात परत आले. शांत बसणे स्वभावात नव्हतेच. सज्जनराव माने (कलाशिक्षक), हळदीकर, सरिता माने यांच्यासह ‘आर्टिस्ट गिल्ड’ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेतर्फे चित्रकार शिवाजी तुपे, प्रताप मुळीक यांच्यासारख्या नामवंत कलाकारांची चित्रप्रदर्शने कोल्हापुरात भरविली. शिवाय पुतळे करण्याचे कामही त्यांनी घरी सुरू केले. त्या वेळी बापूजी साळुंखे, इंदूमती राणीसाहेब, इंदिरा गांधी, आमदार बराले, राष्ट्रपती जत्ती यांचे पुतळे केले. कर्नाटकातही प्रत्यक्ष बसून व्यक्तींचे पुतळे बनविले.
त्यांना पोट्रेटमध्ये विशेष रस होता. नागोजीराव पाटणकर यांचे फूल साईज पोट्रेट, बापूजी साळुंखे यांचे पोट्रेट व तीन बस्ट केले. ते विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, जत व उस्मानाबाद येथे पाहावयास मिळतात. जयसिंगराव दत्ताेबा दळवी चित्रकार व शिल्पकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे एक मनस्वी कलावंत ठरतात.
नाशिकहून नवृत्त झाल्यानंतरचे वास्तव्य कोल्हापुरात आल्यावर ‘दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ये त्यांचे येणे-जाणे सुरू झाले. त्या वेळी या व्यक्तिमत्त्वाची माझी हळूहळू ओळख होत गेली. त्यांच्याकडे पाहिल्यावरच एक वेगळेपण नेहमी जाणवायचे. गोरी-गुलाबी छटा असलेली तजेलदार कांती, नेहमी कोट घालून डोक्यावर अगदी स्टायलिश कॅप घातलेले सर अगदी रुबाबदार दिसायचे. त्यांनी घातलेल्या कपड्यांच्या निवडीबाबत मला नेहमी कुतूहल वाटायचे. शर्टचे वेगवेगळे रंग, कोटाच्या कापडाचे पोत, त्याला मॅचिंग अशी हॅट, पांढरे केस व पांढरी दाढी अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने ठेवलेली. एकंदरीतच काही खास असे व्यक्तिमत्त्व जाणवायचे. त्यांच्या वर्तनातही एक खानदानी सौजन्य व सृजनता यांचा मिलाफ होता. प्रत्येक गोष्टीकडे कलेच्या नजरेतून पाहण्याची वृत्ती, त्यांच्याशी सहज होणार्‍या संवादाने खूप काही शिकवून जायची.
एकदा फाउंडेशन वर्गावर मी शिकवत असताना सर सहज वर्गात आले. समोर मांडलेल्या नेचरविषयी विद्यार्थ्यांशी बोलू लागले. त्याचाच फायदा घेऊन मी त्यांना विनंती केली, ‘सर थोडे करून दाखविता का?’ तत्काळ ते त्या मुलाच्या डेस्कवर बसले आणि कामाला सुरुवात केली. त्यांची पेन्सिल धरण्याची पद्धत, ती कागदावर टेकवून रेषा मारण्याची पद्धत, अगदी थोडक्या रेषात तयार झालेल्या आकारात पूर्णपणे सामावलेला समोरचा आकार, माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांना अचंबित करून खूप काही शिकवून गेला. मग आले ते रंग. अगदी नेमकेपणाने, जिथल्या तिथे! तयार झालेली ती छोटीशी कलाकृती आश्‍चर्याबरोबर आनंद देऊन गेली.
काही भेटीनंतर संकोच दूर झाला व मोकळेपणाने विविध विषयांवर चर्चा होऊ लागली. सुरुवातीला असलेली नवचित्रकलेबद्दलची मनातली अढी दूर होऊन सर हुसेन व त्यांच्या चित्राबद्दल तारीफ करू लागले. नवचित्रकला जाणून घेऊन, त्यातले नेमके र्मम ओळखून त्यातून आनंद घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नवीन गोष्ट समजून घेण्याची धडपड कायम असे.
कॉलेजात आल्यावर वेळ असेल तेव्हा सर कॉलेजच्या लायब्ररीतील पुस्तकांबरोबर रमू लागले. खास असे काही रंग कसे वापरले, रंगलेपनात काय फरक केला, चित्रांच्या मांडणीतील वैशिष्ट्य कसे आहे, अशा बारकाव्यांसह त्यांच्याबरोबर चित्रे पाहिली की, मलाही त्या चित्रात लपलेले बारकावे दिसू लागून त्यातील गंमत अनुभवायास मिळू लागली.
थोडेसे तापट व हट्टी असा त्यांच्याविषयी बोलबाला होता; परंतु असे असण्यालाही कारणे असावयाची आणि ती कारणे कळाली, की मग त्यातील सत्यता तपासल्यावर त्यांचा विशिष्ट बाबतीतील खोल विचार समजायचा. युरोपियन लोकांबरोबर दिल्लीत काम करण्यामुळे शिस्तीला धरून काटेकोरपणाने काम करण्याबाबत सर आग्रही असायचे. काही जणांना त्याचाच त्रास व्हायचा.
कोणत्याही अडचणींवर त्यांच्याकडे योग्य उपाय असायचा. मग ती अडचण फर्निचरच्या डिझाईनबाबत असो, पुतळ्यांबाबत असो वा चित्रांबाबत असो. अत्यंत मोकळेपणाने मार्गदर्शन व्हायचे. अगदी रोज चित्र अथवा शिल्प या प्रकारात काम केल्याशिवाय त्यांचा दिवस संपायचा नाही. सध्याच्या अँक्रेलिक प्रकारातही त्यांनी भरपूर काम केले. त्या रंगाचा तेजस्वीपणा व लवकर वाळण्याची स्थिती भावली असल्याने त्या माध्यमात काम करावयास वयाच्या अगदी नव्वदीतही उत्सुक असत.
पोट्रेट हाही आवडीचा विषय होता. कॉलेजातील सुटीतील वर्गात अनेक प्रकारांनी त्यांनी पोट्रेट्स करून दाखविली. ती अगदी विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या पद्धतीने. विद्यार्थ्यांनाही मग वेगळा हुरूप यायचा. सकाळी ९ वाजता आलेले सर दुपारचे दोन वाजले तरी काम करीत राहायचे. ‘सर, आता जेवायला घरी जा’ असे सांगायला लागायचे. चित्रकलेत रमणारा माणूस चित्रात हरवून जायचा तो असा.
संध्याकाळी समवयीन मित्रांबरोबर अंबाबाईच्या देवळात अगर इतर ठिकाणी फिरावयास गेले असता एखादा लक्ष वेधून घेणारा चेहरा दिसला, की त्याच्याबरोबर गप्पा मारून, इन्स्टिट्यूट व चित्रकलेच्या अभ्यासक्रमाची त्यास माहिती देऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळी मॉडेल्स अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनापासून प्रयत्न असायचा. स्वत:ही येऊन काम करावयाचे. एकदा तर नव्वदीच्या एका व्यक्तीला घेऊन आले. 
एक ते दीड तासात त्यांचे व्यक्तिचित्र तयारही झाले. ड्रॉईंगसाठी आखलेल्या रेषा तशाच ठेवून काही ठिकाणी रंग भरून केलेले ते चित्र आज ‘दळवीज’मध्ये लावले आहे. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच खूप गंमत आणि कौतुक वाटले होते. चित्रकलेबाबतचे त्यांचे एक झपाटलेपण होते, ते पाहावयास व अनुभवयास मिळाले होते.
लँडस्केप (निसर्गचित्र)मध्येही त्यांना विशेष आवड होती. समोर दिसते तसे निसर्गचित्र काढण्यापुरते ते र्मयादित नव्हते. काही वेळा व्हिज्युअलाईज करून (अंत:प्रेरणेने स्वत: रचून) लँडस्केप करावयाचे. परस्पेक्टिव्हचा अभ्यास असल्याने चित्रात प्रामुख्याने वेगवेगळे परस्पेक्टिव्ह वापरून चित्राला गंमत आणत. सकाळची वेळ चित्र काढण्याकरिता खास आवडे. सकाळी छायाप्रकाशाचा खेळ प्रामुख्याने असल्याने तो वेळ विशेष भावतो. डोंगर, खोल दर्‍या यांमध्ये रमतात. हे विषय पुन्हा-पुन्हा हाताळून त्या आधारे क्रिएटिव्ह काम करण्यात विशेष रस. चित्रांत निळ्या रंगाचा मुक्त वापर. कोबाल्ट व अल्टामरिन रंग चित्रांचा जिवंतपणा वाढवितात. सातवळेकरांची चित्रं म्हणूनच आवडत असावीत, कारण त्यांचे चित्र निळ्या रंगाच्या आऊटलाईनमधून सुरू व्हायचे. शिवाय त्यांच्या चित्रांमधील व्यवस्थित वापरलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्णतेने सोडलेल्या भावातून तयार झालेले चित्र मनापासून आवडायचे. क्षितिजरेषा आधी निश्‍चित करून मग तपशिलांची मांडणी असे. चित्रांत फोटोग्राफिक पद्धतीचे इफेक्ट कमी करून उत्स्फूर्तता आणायला आवडायचे. जलरंग (ऑईल), तैलरंग, अँक्रेलिक सर्व माध्यमांत काम असे.
सर सहजपणे अनेक सुरेख कल्पना मांडत. शहर आणि शहराबाहेर जाऊन अस्तित्वात असलेल्या खडकांमध्ये शिल्पे तयार करावीत. अशाप्रकारे सर्वसामान्य लोकांना थोडे कल्पक होण्यास आणि कलेतील आनंद घेण्यास प्रवृत्त होण्यास शिकवावे आणि आपणच ते करायला हवे, ही तळमळ त्यांच्यात होती. दुर्दैवाने आपल्याकडे कलाकाराला असा वाव मिळतच नाही. सध्या समाजात प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मिती होत आहे आणि भीषणताही तितकीच व क्रौर्यही तितकेच वाढते आहे. शांतता हरवत चालली आहे. छोट्या-छोट्या गोष्टीत दडलेला मोठा आनंद मिळविण्यात माणसे कमी पडताहेत, म्हणूनच कोणत्याही कलेत मनुष्याने थोडेसे रमल्यास त्याचे माणूसपण टिकेल, असा त्यांचा भाव होता.
तब्येतीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे नेहमीप्रमाणे सहज घराबाहेर पडणे कमी झाल्यावरही ओळखीच्या मित्र-मंडळींना घरी बोलावून त्यांची व्यक्तिचित्रे काढून त्यांनाच भेट देण्याची त्यांची कृतीही संवेदनशील आहे. सतत कलेत रममाण होत राहणे हाच त्यांचा स्थायीभाव, त्यांच्या कृत्यामुळे संपूर्णपणे जाणवतो.
निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, रचनाचित्र, शिल्पचित्र या कोणत्याही विषयांत सर तितक्याच आत्मीयतेने काम करत. विषयाबाबत कायम जिज्ञासा असे. निसर्गचित्र करताना ते रचना वास्तववादी करतात. रंगाचा वापर मात्र अभिव्यक्तिवादातील रंगाप्रमाणे व्हायचा. मातकट, निष्प्रभ रंग क्वचितच त्यांच्या चित्रात आढळतात. अशा प्रकारच्या चित्रनिर्मितीतून त्यांची अशी स्वतंत्र ओळख होते. कलेबाबत जे-जे काही चांगले आहे, ते सर्व आपल्याला करता आले पाहिजे, अशी तळमळ आहे, म्हणूनच इतर सर्व बाबतीत समाधानी असणारे सर कलेबाबत अस्वस्थ असत.
चित्रकाराच्या कामाचे श्रेष्ठत्व त्यांना पटले होते. देवदेवतांची तयार झालेली अनेकविध रूपे ही कलाकाराचीच निर्मिती आहे. दुसरे काही नाही, असा विश्‍वास आहे म्हणूनच चित्रकार म्हणून ते रुबाबातच राहिले.

Web Title: The lost guy in the picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.