‘लाइव्हहेल्थ’

By Admin | Updated: January 23, 2016 15:16 IST2016-01-23T15:16:15+5:302016-01-23T15:16:15+5:30

आजारी पडलात? कोणत्या तपासण्या केल्यात? काय आहे रिपोर्ट? क्षणात तुमच्या मोबाइलवर हजर!

'LiveHealth' | ‘लाइव्हहेल्थ’

‘लाइव्हहेल्थ’

पुण्याच्या तरुणांनी उभं केलंय अभिनव स्टार्टअप.
 
 
किती रुग्ण आणि किती आजार.
बरं, या आजारांची नावं तरी आपल्याला माहीत असतात का? 
आपण चक्रावतोच. पण आजार कोणता का असेना, काही गोष्टी मात्र त्याच त्या आणि सारख्याच असतात. ब्लड, युरिन. इत्यादि तपासण्या. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या आजारांचं स्वरूप लक्षात घेतलं तर डॉक्टरकडील फे:यांमध्येही वाढ झाल्याचं लक्षात येतं. अनेक तपासण्या आपल्याला वेळोवेळी कराव्या लागतात. या तपासण्यांचे अहवाल चाचणीनंतर डॉक्टरकडून तपासल्यावर ते तुमच्या मोबाइलवर तत्काळ उपलब्ध झाले तर?
पुण्याच्या अभिमन्यू भोसलेनं हाच विचार केला. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यानं पुण्यातील अनेक रुग्णालयांमध्ये प्रोजेक्टसाठी काम सुरू केलं होतं. त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं, तपासण्यांचा अहवाल आणि रुग्ण यांच्यात अधिक सुलभता येण्याबरोबरच वैद्यकीय रेकॉर्ड जपणंही महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी तपासण्यांचे अहवाल पीडीएफ, ईमेल किंवा एसएमएसद्वारे मोबाइलवर पाठविण्याची पद्धत होती, पण अभिमन्यू आणि त्याचा सहकारी मुकुंद मालानी यांनी ही माहिती डिजिट (आकडय़ांच्या) स्वरूपात मोबाइलवर रुग्णाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. अनंत प्रयोग आणि खटपटीनंतर हवं तसं सॉफ्टवेअर आणि अॅप त्यांनी तयार केलं. या अॅपमुळे एखादी तपासणी रुग्णानं केली की ती ‘रिअल टाइम’ रुग्णाच्या मोबाइलवर दिसते. त्यानुसार रुग्णाला पुढील तपासण्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. या प्रवासात त्यांना पुण्यातील नामवंत डॉक्टरांची तसेच प्रयोगशाळांचीही मदत झाली.
या कल्पनेचं स्वागत झाल्यानंतर त्याचं उद्योगात रूपांतर करायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी निधीची गरज होतीच. त्यांच्या कल्पनेत नावीन्य तर होतंच आणि भविष्यकालीन संधीही. त्यामुळे त्यात बीजभांडवल गुंतवण्यास अनेक गुंतवणूकदार लगेचच तयार झाले आणि उभं राहिलं एक नवं स्टार्टअप. ‘लाइव्हहेल्थ’! 
शिक्षण सुरू असतानाच अभिमन्यू आणि मुकुंद यांच्या मनामध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. या आवडीचं रूपांतर त्यांनी सुवर्णसंधीत केलं आणि आज ते एका यशस्वी स्टार्टअपचे भागीदार आहेत. अभिमन्यूच्या मते स्टार्टअपची ‘वेळ’ फार महत्त्वाची. योग्य वेळ ओळखून त्याचवेळेस प्रयत्न करणं हेच यशाचं गमक. अडथळ्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. समस्यांना टाळायला गेलात तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती पुढे येतेच. त्यामुळे असा लपंडाव खेळण्याऐवजी प्रश्नांना सामोरे जा, असं अभिमन्यू सांगतो. आज त्यांचं काम पुणो, मुंबई, हैदराबाद इतकंच नव्हे तर सुदानमधील खाटरुमसारख्या शहरांतही चालतं. त्यांनी केलेल्या कामामुळे अनेक रोगांची तारीखवार, रुग्णवार तसंच प्रदेशानुसार प्रचंड माहितीचा साठा निर्माण झाला आहे. एखाद्या सामाजिक-वैद्यकीय प्रश्नावर काम करण्यासाठी हा डाटा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
 
स्टार्टअप म्हणजे काय?
स्टार्टअप म्हणजे खरंतर अशी एखादी तरुण नवीकोरी कंपनी, व्यवसायकल्पना जिनं वाढायला, मूळ धरायला नुकती सुरुवात केली आहे आणि मोठा उद्योग होण्याची शक्यता त्या कल्पनेत आहे. दोन-चार उत्साही उद्योगी माणसांनी किंवा अगदी एकटय़ानंही स्वत:चा पैसा गुंतवून सुरू केलेला हा छोटासा नवउद्योग. सध्याच्या बाजारपेठेत उपलब्धच नसलेल्या एखाद्या वस्तूचं उत्पादन किंवा सेवा अशा दोन्ही स्वरूपात हे नवउद्योग काम करू शकतात. मात्र ज्यांना अशा कल्पना सुचतात त्यांच्याकडे त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पैसा असतोच असं नाही. आणि पैसा उभा केला तरी ती वस्तू बाजारपेठेत विकण्याचं कौशल्य असतं असंही नाही.
त्यामुळे बाजारपेठेत तग धरू शकतील अशा उत्तमोत्तम कल्पना, उद्योगात पैसा गुंतवला जाणं आणि त्यातून भांडवलाचा ओघ या स्टार्टअप उद्योगात येणं हे महत्त्वाचं असतं. गेली काही वर्षे आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्था स्टार्टअपसाठी इनक्युबेटरसारख्या सुविधा देऊन तरुण मुलांना बीजभांडवल तर देत आहेतच; पण हा व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक सल्ला, मार्गदर्शनही करत आहेत. बडय़ा बाजारपेठेत टिकाव धरू शकतील अशा वेगळ्या उद्यमी कल्पना आणि त्यातून साकारलेले उद्योग म्हणजे हे 
स्टार्टअप.

Web Title: 'LiveHealth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.