चलते चलते यूॅँही कोई.

By Admin | Updated: April 4, 2015 18:30 IST2015-04-04T18:30:24+5:302015-04-04T18:30:24+5:30

आँप के पाँव देखे.. बहोत हसीं है. इन्हे जमींपर मत उतारिएगा, मैले हो जाएगें. - इतका सन्मान, आदबशीर विनंती, तीही कोठय़ातल्या स्त्रीला? त्याच क्षणी ती मनोमन त्याची होते, पण या जन्मी ते शक्य नाही,हेही तिला माहीत आहे. म्हणूनच ती म्हणते.

Let's go | चलते चलते यूॅँही कोई.

चलते चलते यूॅँही कोई.

>विश्राम ढोले
 
ताजमहाल असीम सौंदर्याचे प्रतीक का मानला जातो? हे खरंय की त्यात भव्यता जशी आहे तशीच बारकाव्यांची नजाकतही आहे. त्याच्या रचनेमध्ये संतुलन जसे आहे तसेच विभ्रमकारी लालित्यही. त्याला संगमरवराची शुभ्र शालिनता जशी अंगभूत लाभली आहे तशीच श्यामरंगी यमुनातटाची मोहक पार्श्‍वभूमीही. पण फक्त एवढेच असते तर ताजमहाल नुसतीच एक सुंदर वास्तू होऊन राहिली असती. ते सौंदर्याचे प्रतीक किंवा प्रेमाची दंतकथा म्हणून बनले नसते. प्रतीकात्मकतेचे हे माहात्म्य, मिथकरूप बनण्याची ही ऊर्जा ताजमहालाला त्याची जन्मकथा, त्यातील मानवी संदर्भ आणि भव्य कारुण्य मिळवून देते. सौंदर्य आणि भव्यता अंगभूत ल्यायलेली रचना जेव्हा मानवी भावनांच्या तितक्याच उत्कट आणि गहिर्‍या कोंदणात बनून समोर येते तेव्हा ती फक्त रचना रहात नाही. त्याची दंतकथा होते. मिथक होते. 
कमाल अमरोही- मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे. कोठा आणि तवायफ हा हिंदी चित्रपटांमध्ये तसा खूप वेळा येणारा विषय. केवळ याच विषयाला वाहिलेले चित्रपटही बरेच आहेत. पण भव्यतेचे आणि परिपूर्णतेचे कमालीचे आकर्षण असणार्‍या कमाल अमरोहींच्या दिग्दर्शनाने एरवी घिस्या-पिट्या विषयावरील या चित्रपटाला सौंदर्याचे एक वेगळेच मूल्य मिळवून दिले आहे. खरंतर चित्रपटाचे कथासूत्र नेहमीचेच. कथानक आणि प्रसंगांची रचनाही अवास्तव वा अतिरंजित. आणि शैलीही टिपिकल भावव्याकुळ रोमॅण्टिक उर्दू शायरीसारखी. एरवी या सार्‍या गोष्टी वैगुण्यही ठरू शकल्या असत्या; पण अमरोहींनी भव्यता, नजाकत, संतुलन, लालित्य, शालिनता आणि रंगाची मोहकता त्यात अशी काही भरली आहे की संपूर्ण चित्रपटाला शुद्ध शालिन श्रीमंतीचेच एक सौंदर्यमूल्य लाभले आहे. चित्रपटभर त्याचा प्रत्यय येत राहतो. गाण्यांमध्ये जास्तच. आणि त्यातही ‘चलते चलते यॅँूही कोई मिल गया था’ मध्ये तर सर्वाधिक. सार्‍या चित्रपटातील भव्यता, परिपूर्णता, सौंदर्य आणि प्रेमव्याकुळ शोकात्मकतेचा ‘चलते चलते’ हा सूत्रबद्ध आविष्कार. कथेत रुतलेले, पण कथेपेक्षा अधिकचे सांगणारे, अधिक अवकाश व्यापणारे आणि मनात अधिक काळ रेंगाळणारे गाणे. हिंदी चित्रपटगीतातील जणू ताजमहाल.
‘चलते चलते’ हे खरंतर कोठय़ावरचे गाणे. उत्तर हिंदुस्थानातील सरंजामी व्यवस्थेने प्रस्थापित श्रीमंत पुरुषी नजरेच्या आणि देहाच्या भोग-विलासासाठी केलेली एक सोय म्हणजे कोठा. सरंजामी सत्तेतून स्त्रीदेहावर आणि मनावर स्वामित्व सांगू पाहणार्‍या एकाधिकारवादी पुरुषी नजरेसमोर हे गाणे उलगडते. साहिबजान (मीनाकुमारी) ते गाते. कथक शैलीत त्याच्यावर अतिशय नजाकतदार पदन्यास करते. नखशिखान्त दागिन्याने मढलेली आणि सौंदर्यवती साहिबजान हे सारे एका सवयीतून सादर करते खरे, पण ना तिच्या शब्दात कोठय़ामध्ये अपेक्षित असलेले कामूक आवाहन आहे, ना तिच्या देहबोलीमध्ये. हे गाणे त्या सरंजामी पुरुषासाठी नाहीच. रेल्वेप्रवासात अचानक भेटलेल्या, तिची फक्त पावलेच पाहून लुब्ध झालेल्या आणि ‘आँप के पाँव देखे.. बहोत हसीं है. इन्हे जमींपर मत उतारिएगा, मैले हो जाएगें.’ अशी अतिशय अदबशीर विनंती करणार्‍या, तिचा सन्मान करू पाहणार्‍या आधुनिक पुरुषासाठी तिचे गाणे आहे. सरंजामी व्यवस्थेने शोषण करतानाच प्रतिष्ठाही नाकारलेल्या साहिबजानसारख्या स्त्रीच्या वाट्याला असा अदबशीर, आधुनिक आणि देखणा पुरुष आणि त्याची इतकी रोमॅण्टिक विनंती कधीच वाट्याला येऊ शकली नसती. म्हणूनच तिने त्याला मनोमन हृदय देऊन टाकले. तो पुन्हा भेटावा याची तिला आस तर आहे, पण कोठय़ाची पार्श्‍वभूमी लाभलेल्या आपल्यासारख्या स्त्रीच्या नशिबात असा दैवी योगायोग आणि असा पुरु ष पुन्हा वाट्याला येण्याची शक्यता नाही याचीही एक खिन्न करणारी जाणीव तिला आहे. या खिन्न स्वीकृतीतून ती सतत म्हणत राहते. ‘चलते चलते यॅँूही कोई मिल गया था सरे राह चलते चलते.’ 
परिस्थिती आणि र्मयादांच्या पाशात गच्च बांधले असताना मनात मात्र एक अपार आस सतत तडफडत असावी आणि त्यातून एक विवशता, निराशा दाटून यावी असे तिचे झाले आहे. रेल्वेतील योगायोगामुळे प्रेम, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याचे स्वप्न जागविणारे क्षण तिच्या वाट्याला आले होते. आणि कदाचित ती रेल्वेच तो दैवी योगायोग पुन्हा घडवून आणेल, त्या गाडीतून तो उतरेल आणि आपली या किडक्या, शोषक व्यवस्थेतून सुटका करेल अशी तिच्या पाक मनात एक वेडी आशा असते. म्हणूनच गाडीच्या जाण्यायेण्यावर तिच्या आशा-निराशेचा खेळ अवलंबून आहे. रात्र सरत आली. दिवे विझत आले. आणि मनातल्या आशेचे दिवेही विझू लागले आहेत. पण प्रतीक्षेची ही रात्र काही संपत नाहीये. ती संपणारी नाही याची खिन्न जाणीव तिला आहे. म्हणूनच गाण्याच्या अखेरीस येणार्‍या ‘ये चिराग बुझ रहे है मेरे साथ जलते जलते’ नंतर येणारी ती वाफेच्या इंजिनाची शिटीही काळीज पिळवटून टाकते. एका अजस्त्र यंत्राच्या कर्कश ध्वनीलाही हे गाणे इतका गहिरा मानवी अर्थ मिळवून देते. ती फक्त एक यांत्रिक शिटी राहत नाही. सरंजामी व्यवस्थेत खितपत पडलेल्या प्रतिष्ठाहीन स्त्रीला ती आधुनिकतेने घातलेली साद बनते. 
एकेक तपशील हळुवार टिपत, एका विशिष्ट लयीत चित्रचौकटी बदलत आणि ओळींच्या अर्थाला दृश्यातून, प्रतीकांतून अधोरेखित करत गाणे उलगडत जाते. ‘ये चिराग बुझ रहे है’ या ओळींच्या जोडीने भव्य पडद्यावर येणारे साहिबजानच्या व्याकूळ डोळ्यांचे आणि जमीनदाराच्या जरबी डोळ्यांचे एक्स्ट्रीम क्लोजअप्स तर मनाच्या पटलावरून दीर्घकाळ जातच नाही. त्याच्या सोबतीला येतात सतारीचे सुरेख बोल, तबल्याचा अंगात भिनणारा, परंतु संयत ठेका आणि घुंगरांचा लयबद्ध नाद. या सर्वांवर कडी करतो तो लताचा विलक्षण उत्कट अर्थगर्भ स्वर. शब्दांच्या चिमटींमध्ये न सामावणारे असे सारे दृक आणि श्राव्य नाट्य. श्रीमंत प्रतीकांच्या शांत-संयत वापरातून समृद्ध करणारा, झपाटून टाकणारा अनुभव. दिग्दर्शक कमाल अमरोही, संगीतकार गुलाम मोहम्मद, गीतकार कैफी आझमी, छायाचित्रकार जोसेफ विर्शचिंग आणि कलादिग्दर्शक एन. बी. कुलकर्णी यांच्या एकात्म कामगिरीतून उभी राहिलेली ऐतिहासिक आणि परिपूर्ण कलाकृती. म्हणूनच कोठय़ावर घडत असूनही हे कोठय़ाचे गाणे राहत नाही. परिचयाचीच प्रतीके वापरलेली असूनही अर्थ गुळगुळीत होत नाही. सारा श्रीमंती जामानिमा असूनही त्याचा भपका होत नाही. प्रेमातून स्वसन्मानाची जाणीव झालेल्या, किडलेल्या जगातून सुटून नव्या आधुनिक जगात येऊ पाहणार्‍या एका स्त्रीच्या आशा-निराशेचे एक भव्य-उत्कट नाट्य म्हणून ते मनावर गारुड करते. भव्यता, नजाकत, सौंदर्य आणि कारु ण्य यांचा एकाचवेळी अनुभव देत राहते. थेट अगदी ताजमहालासारखा.. 
 
एक चित्रपट. १४ वर्षे!
पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला.
 
वय आणि व्याधींची
‘तीर ए नजर’.
प्रदीर्घ खंडानंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली, तोपर्यंत मीनाकुमारीला व्याधींनी घेरले होते. पण त्याची पर्वा न करता तिने चित्रीकरण पूर्ण केले. मात्र तिच्या आजारपणाची आणि वाढलेल्या वयाची छाया चित्रपटातील काही मोजक्या दृश्यांत आणि ‘तीर ए नजर’सारख्या गाण्यात दिसते.
 
आयुष्याची सोबत. 
दु:ख आणि वंचना!
१९७२ साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुर्दैवाने काही दिवसांतच मीनाकुमारीचे निधन झाले. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट फार चालला नव्हता. नंतर  चित्रपट हिट झाला. पडद्यावरच्या आणि प्रत्यक्षातल्या अशा दोन्ही भूमिकांमध्ये मीनाकुमारीच्या वाट्याला दु:ख आणि वंचनाच आली.
 
‘खलनायका’चा ‘न्याय’!
पाकिजाचे संगीत गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्‍वसंगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता. (या चित्रपटाच्या कलादिग्दर्शनासाठी एन. बी. कुलकर्णी यांना १९७३ चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.)
 
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Let's go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.