लडिवाळ मुक्तबाई
By Admin | Updated: September 20, 2014 19:42 IST2014-09-20T19:42:33+5:302014-09-20T19:42:33+5:30
नवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांची धाकटी बहीण एवढीच मुक्ताबाईंची ओळख नाही. योगीराज चांगदेवाला कोराच राहिलाच, असे सांगण्याएवढे आध्यात्मिक सार्मथ्य लहान वयातच त्यांनी मिळवले होते. २५ सप्टेंबर रोजी मुक्ताबाईंची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या अभंग रचनांविषयी..

लडिवाळ मुक्तबाई
प्रतिभा औटी-पंडित
इवलीशी मुक्ता. झोपेतून उठलेली अन् आई-बाबांना नजरेने शोधणारी. मला उचलून घ्यायला कोणीच कसे येत नाही, म्हणून बावरलेली. धावतच ज्ञानदादापाशी गेली अन् विचारू लागली, ‘‘दादा आई कुठेय?’’ ज्ञानदादाच तो! त्याला बरोबर कळले काय सांगावे या चिमुकल्या मुक्ताला. म्हणाला अगदी हळूवारपणे, ‘‘आई ना, सांगून गेलीय की रडायचे नाही!’’ एवढेच वाक्य पुरेसे झाले. मुक्ताच्या मनात दाटून आलेलं कढ, डोळ्यांत उतरून आलेले अश्रू सारे जागच्या जागीच जिरले. तिचे बालपण, तिचे आवखळपण माहिती नाही कुठे गेले, पण क्षणात समंजस झाली मुक्ता.
काहीच न कळण्याचे वय अशी अजाण मुक्ता. तिला कसे कळणार आई-बाबांनी या उघड्या आकाशाखाली आपल्याला सोडून देहांत प्रायश्चित्त घेतले. धर्म मार्तंडांचा दांभिक निर्णय तिला कसा उमजणार? ज्ञानदादाच्या वाक्याने तिला एकच कळले, की आता कडेवर उचलून घेऊन लाड करायला बाबा येणार नाही, की कुशीत घ्यायला आईदेखील नाही येणार. ती नि:शब्द होऊन बघत राहिली. बाबांची कामे नवृत्तीदादा करू लागलाय अन् ज्ञानदादा आईसारखे रांधून वाढून प्रेमाने खाऊ घालतोय सगळ्यांना. माऊलीच झालाय तो सर्वांची. आता मलादेखील मोठे व्हायला हवे, असा विचार मनात येण्याआधीच मोठी झाली मुक्ता.
खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन नवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे. पण, हे दिव्यत्व जगाला सर्मपित करून या माता-पित्यास निरोप घ्यावा लागला विश्वाचा! अन् लहान वयात प्रौढत्व, समंजसता आली चारही लेकरांना. चौघांमध्ये सर्वांत लहान मुक्ताच. नवृत्तीची घनदाट ममता अन् डोक्यावर मऊपणे थोपटणारा ज्ञानदेवांचा हात मुक्ताला मोठेपणा देऊन गेला.
कालक्रमण केले ते हरीच्या, परमेश्वराच्या योगाने! तक्रार नाही केली कशाचीच. कोरान्नाचे अन्न खाऊन मोठे होणे सोपे नव्हते मुळीच. आळंदीमध्ये माधुकरीच्या भिक्षेसाठी जात नवृत्ती, ज्ञानदेव. एकदा असेच घडले. ज्ञानदेव गेले होते भिक्षेला. त्यांना सवय झाली होती अपशब्द ऐकून घेण्याची. सहन करणे अन् क्षमा करणे मनाचा स्थायिभाव झाला होता. कधी कुणाला उलट उत्तर देत नसत. पण, एकदा कोणी तरी आईबद्दल वाईट-साईट बोलले अन् ज्ञानोबाच्या जिव्हारी लागले. तडक आपल्या ताटीत परतले अन् ‘आता मी प्राणत्याग करतो’ अशा टोकाला जाऊन पोहोचले. ताटीचे दार घट्ट लावून घेतले. अशा वेळी समजूत घालायला धजावली ती मुक्ता. मोठी झाली ज्ञानदादापेक्षा अन् कळवळ्याच्या स्वराने विनवू लागली. आदिनाथांपासून गहिनीनाथांकडे अन् त्यांच्याकडून नवृत्ती ज्ञानदेवांकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे ‘योगी’पणाचे स्मरण दिले. मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले, तेच ताटीचे अभंग.
योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा
विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
एवढीशी मुक्ता सांगतेय! खरे तर आदिमाताच ती. मुक्तपणे या अवनीवर अवतरली. म्हणून सांगू शकत होती साक्षात ज्ञानदेवाला. ज्याच्या अंगी दया, क्षमा असते तो संत. एवढे अगाध ज्ञान सांगतानाही मुक्ताच्या शब्दातून लडिवाळपण ओसंडते. समजावताना म्हणते अरे दादा, आपलाच हात आपल्याला लागला, तर त्याचे दु:ख करू नये. आपलीच जीभ आपल्या दाताखाली सापडली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, अपेष्टा सहन कराव्या लागतात. मन शुद्ध झाले की देव भेटतो, हे तूच शिकविलेस ना आम्हाला? मग आम्ही तुला काय सांगावे नि शिकवावे.
मुक्ता तिच्या गोड आवाजात अनेक परींनी समजावत होती ज्ञानदादाला. मन शुद्ध झाले की देव भेटतो, हे तूच शिकविलेस ना आम्हाला? मग आम्ही तुला काय सांगावे नि शिकवावे. नवृत्तीदादा अन् सोपानदादादेखील एकदा मुक्ताकडे अन् एकदा कुटीकडे पाहत होते. ज्ञानदेवांची अपेक्षित प्रतिक्रिया येत नव्हती. ताटीचे दार उघडत नव्हते. मुक्ताईचा स्वर आर्त झाला होता. त्या आवाजात आता कंपने भरली होती. खरे तर रडवेली झाली होती ती, पण डोळ्यांत पाणी आणायचे नव्हते. ज्ञानदादाने सांगितलेला आईचा निरोप तिच्या मनाला व्यापून होता. काही तरी करून ज्ञानदादाचा राग शांत करायला हवा. त्यांच्या हातून रागाच्या भरात कोणतीही आगळीक होऊ नये, म्हणून परोपरीने विनवितेय मुक्ता. ज्ञानदेवांच्या उपदेशाने जगाचा उद्धार व्हावा अन् ते स्वत: सुखाचे सागर व्हावे, या उत्कट इच्छेने विनवित आहे. जे घडते ते परमेश्वरी इच्छेने घडते, याची जाणीव ज्ञानदेवांना देऊन
‘पुन: शुद्ध मार्ग धरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ सांगतेय.
मोठय़ा भावाचा राग शांत करताना कधी जणू त्याच्यापेक्षा मोठी होऊन मुक्ता उपदेश करतेय, असेही वाटते ताटीच्या अभंगात. समजावण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते,
लडिवाळ मुक्ताबाई। जीव मुद्दल ठायीचे ठायी
तुम्ही तरुन विश्वतारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा
बोलणे लडिवाळ, पण ध्येयाची जाणीव देणारे. ज्ञानेश्वरांचा अवतार विश्वाला तारण्यासाठी आहे, याचे भान डोकावले शब्दांतून अन् हवे होते ते घडले. ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले शांतपणे! त्यानंतर आयुष्यात अलौकिक कार्य घडले त्यांच्या हातून. कृपा गुरुवर्य नवृत्तिनाथांची अन् ध्येयस्वप्नाची जाणीव मुक्ताची होती ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला.
मुक्ताईच्या हातूनही विश्व उद्धाराचेच कार्य घडले. जप-तपाच्या सार्मथ्याचे चौदाशे वर्ष आयुष्य लाभलेल्या चांगदेवांची गुरुमाऊली झाली मुक्ताई. तिचे वय १0/१२ वर्षांचे असले, तरी अलौकिक संतत्व होते तिच्यात. मुक्ताईच्या अनुग्रहाने आत्मरूपाची प्राप्ती झाली चांगदेवांना, तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षांचे आयुष्य धन्य झाले.
अशी मुक्ताई मोठी धीराची. सोपानदादाच्या समाधीनंतर मात्र आपलेही जीवित कार्य संपल्याची प्रगल्भ जाणीव झाली तिला. आकाशातून कोसळणार्या विजेसह क्षणार्धात लुप्त झाली मुक्ता. पण मागे ठेवून गेली घनघोर पाऊस तिच्या आठवणींचा, अभंगांचा. तिच्या मनातल्या ध्येय-स्वप्नाची पूर्तता झाल्याचा लख्ख उजेडही मागे उरलाय. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ अशी ग्वाही देत हा प्रकाश आपलीही मने तेजस्वी करोत. हीच आज आश्विनशुद्ध प्रतिपदेला संत मुक्ताईच्या जन्मदिनी प्रार्थना-संत मुक्ताईच्याच चरणांपाशी!
(लेखिका प्राध्यापिका आहेत.)