कोटा किनाबालू

By Admin | Updated: March 14, 2015 18:05 IST2015-03-14T18:05:03+5:302015-03-14T18:05:03+5:30

तळ समुद्रकिनारा.. घनदाट जंगल अन् उंच पर्वत... निसर्गरम्य बेटं. पर्वतांमधून वाहणार्‍या नद्यांचा खळखळाट... असं सारं काही अनुभवायचं तर मलेशियाच्या कोटा किनाबालूची सफर करावी!

Kota Kinabalu | कोटा किनाबालू

कोटा किनाबालू

 धर्मराज हल्लाळे

 

तळ समुद्रकिनारा.. घनदाट जंगल अन् उंच पर्वत... निसर्गरम्य बेटं. पर्वतांमधून वाहणार्‍या नद्यांचा खळखळाट... असं सारं काही अनुभवायचं तर मलेशियाच्या कोटा किनाबालूची सफर करावी!   क्वालालंपूरपासून पुढं अडीच तासांच्या हवाई अंतरावर हे कोटा किनाबालू आहे.  

पर्यटकांची सर्वाधिक संख्या असलेल्या जगातील पहिल्या दहा देशांमध्ये मलेशियाचा समावेश होतो. सौहार्द व मैत्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या जगातल्या टॉपटेनमध्येही मलेशिया आहे. या सार्‍या गुणवैशिष्ट्यांमुळे इथलं निसर्ग पर्यटन बहरलं आहे. आशियाई देशातील संस्कृतीचा मिलाफही मलेशियात दिसतो. मुस्लीमबहुल असलेल्या या देशात बौद्ध, ख्रिश्‍चन अन् हिंदू अल्पसंख्य असले तरी सर्व समुदाय गुण्यागोविंदाने नांदतात. कृषी, सेवा तसेच पर्यटन व्यवसायातील मलेशियन महिलांचा सहभाग दांडगा आहे. विनम्रता व सुहास्यवदने होणारं पर्यटकांचं स्वागत मलेशियाच्या पर्यटनवृद्धीचे गमक आहे. 
मलेशियातील क्वालालुंपूर, इपो, तेलुक इन्तान, पुत्रजया या भागातील गगनचुंबी इमारती, टष्‍द्वीन टॉवर, 
के. एल. टॉवर, ऐतिहासिक इमारती, विशेषत: मस्जिद, मंदिर व बौद्ध धर्मस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. मलेशियाच्या पेरा, लिटल इंडिया असणार्‍या ब्रीक फिल्ड्स भागातील पर्यटन आटोपून कोटाकिनाबालूची सफर काही औरच आनंद देणारी आहे.
 
जगातील सर्वात मोठं फूल राफ्लेसिया 
१५ सेंटीमीटर ते १ मीटर व्यास असलेलं भव्य आकाराचं मनमोहक रंगाचं जगातील सर्वात मोठं फूल अशी नोंद असणारं कोटाकिनाबालूच्या जंगलातील राफ्लेसिया जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे. घनदाट जंगलातील संरक्षित उद्यानात बहरणारं राफ्लेसिया हे फूल उगवण्यासाठी वर्ष ते दीड वर्षे कालावधी लोटतो. त्याचं आयुष्य मात्र अवघ्या चार-सहा दिवसांचं असतं. राफ्लेसियाच्या केथी, प्रिसाय व टेंगक्यू अँडलिनी या तीन प्रजाती आहेत. फुलाला जोडून फांदी वा पानं नाहीत. झाडांच्या मुळाशी येणारं हे फुल सुरुवातीला कोबीच्या फुलासारखं दिसतं. त्यानंतर त्याची वर्षभरात वाढ होते. राफ्लेसियाचा मोहक गंध कीटकांना आकर्षित करतो. मार्चच्या पहिल्या आठवड्यात उद्यानात पोहचलेल्या अभ्यासक, पर्यटकांना या दुर्मीळ फुलाचं दर्शन घडलं., त्यात मी होतो. 
 
दोरखंडाचा रस्ता 
किनाबालूच्या जंगलातील ४१ मीटर उंच आणि सुमारे १५८ मीटर लांब पल्ल्याचा दोरखंडाचा रस्ता (हवाई झुला) ओलांडताना बच्चेकंपनी खूश असते, तर बड्यांचा श्‍वास रोखला जातो. सभोवताली घनदाट जंगल, खोल दरी अन् त्यात पाण्याचा खळखळाट, मध्येच जंगलातील किर्र्र आवाजाचा ध्वनी-प्रतिध्वनी असं सारं काही मनमोहक असतं.
 
गरम पाण्याचे झरे
किनाबालूच्या पर्वतांमधून वाहणार्‍या नद्यांचा खळखळाट, तर दुसरीकडे याच पर्वतांमधून वाहणार्‍या गरम पाण्याच्या झर्‍यांची ठिकाणं पर्यटकांसाठी विरंगुळा ठरतात. जंगल भ्रमण करणारे पर्यटक दमलेल्या पायांना थोडा विसावा देण्यासाठी गरम पाण्याचे झरे गाठतात. औषधी गुण असणारं गरम पाणी जागोजागी पोहण्याच्या तलावात साठवलं आहे. स्नायूंना लाभदायक आणि त्वचाविकाराला पळविणारं हे गरम पाणी परदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. काही ठिकाणी तर पाणी १00 डिग्रीपेक्षाही अधिक उष्ण आहे.
 
सी वॉक... झीप लाइन...
किनाबालूपासून २५ किलोमीटर दूर समुद्रात वसलेलं सापी अन् गया बेट. हिरव्यागर्द झाडांनी नटलेल्या या दोन्ही बेटांवर स्वच्छ समुद्रकिनार्‍यावर पोहण्याचा आनंद घेतानाच काही धाडसी पर्यटक सी वॉक, झीप लाइनचा थरार अनुभवतात. झीप लाइनमध्ये दोन्ही बेटांना जोडणार्‍या लोखंडी तारेवरून घसरताना गती, वारा, सभोवतालचा अथांग समुद्र हे वेगळं विश्‍व अनुभवता येतं.
 
पर्वतारोहण
किनाबालूच्या जंगलात व पर्वताच्या पायथ्याशी भ्रमण करणार्‍या पर्यटकांपैकी निव्वळ दहा टक्के पर्यटक किनाबालू पर्वतारोहण करतात. समुद्रसपाटीपासून ४ हजार ९५ मीटर उंचीवर असलेलं किनाबालू पर्वत जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ आहे. जवळपास साडेआठ किलोमीटर पर्वतारोहण करताना सुमारे तीन दिवस लागतात. त्यासाठी सात थांबण्याची ठिकाणं आहेत.
 
 
(लेखक ‘लोकमत’च्या नांदेड आवृत्तीचे ..
असलेले लेखक मलेशिया टूरिझम बोर्डाच्या विशेष निमंत्रणावरून मलेशियाच्या दौर्‍यात सहभागी झाले होते. )
 

Web Title: Kota Kinabalu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.