आई, कोविड आणि स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 06:01 AM2020-09-20T06:01:00+5:302020-09-20T06:05:02+5:30

आईला हॉटेलमध्ये विलग करण्याचा  निर्णय झाला,पण डॉक्टर म्हणाले, अहो, हे शक्य नाही! त्या स्मार्टफोन वापरू शकतात का?

To know basic technology is an essential skill in covid.. | आई, कोविड आणि स्मार्टफोन

आई, कोविड आणि स्मार्टफोन

Next
ठळक मुद्देजखमेला हळद नि नाकाला कांदा लावण्यापलीकडे प्रथमोपचारअसतो आणि मोबाईल फोन, बोलून निरोप देण्याघेण्यापलीकडे व्यापक आवाक्याचा असतो याचं शिक्षण नव्या साधनांकडे तुच्छतेनं बघणार्‍यांना द्यावं लागणार, नाहीतर काही खरं नाही.

- सोनाली नवांगुळ

चैनीचं नि नंतर कामासाठी अनिवार्य ठरलेलं एखादं गॅजेट कोविडकाळात ‘लाईफस्किल्स’ या सदरात मोडेल हे कुठं ठाऊक होतं! पण तसं झालं खरं.
मला ठाऊक होतंच की कधीतरी आईबाबा कोरोना पॉझिटिव्ह असण्याची बातमी येणार! तशी वेळ आलीच. तब्येत जास्तच कुरकुरू लागली तेव्हा 32 शिराळ्यातून त्या दोघांना संपूर्ण काळजी घेऊन खासगी गाडीनं कोल्हापूरला थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचा असं कळवलं. 
योगायोगानं एक बेड रिकामा झाला नि बाबांवर तातडीनं उपचार सुरू झाले. ऑक्सिजन लावला गेला. हॉस्पिटलच्या कोविड विभागातले सहकारी माझ्याशी वेळोवेळी फोनवरून बोलत होते. त्याप्रमाणे ठरलं की आईची लक्षणं त्रासदायक नसल्यामुळं ती एखाद्या हॉटेलमध्ये विलग राहिल. ऑक्सिमीटर, तापमापक, आवश्यक औषधं ते देतील नि तिच्या संपर्कात राहातील. 
सकाळी उठल्यापासून आलेला ताण व्यवस्था लागल्यामुळं जरा सैल झाला नि इतक्यात संध्याकाळी डॉक्टरांचा फोन आला, ‘अहो, साठीच्यावर असणार्‍यांना एकटं ठेवण्याचा तसाही धोका असतो आणि तुमच्या आईंच्याबाबतीत तर जास्तच. तुम्हाला नवी व्यवस्था पाहावी लागणार!’ मी चक्रावलेच की आता काय झालं? 
व्यवस्थापनाला भेडसावणाऱ्या अडचणीत तथ्य होतं. माझी आई जरी सुशिक्षित, पांढरपेशा असली तरी तिनं स्मार्ट मोबाईल नि टॅब्ज वगैरेसारखं तिच्या मते असणारं ‘खूळ’ आत्मसात केलं नव्हतं. आलेला फोन घेणं या पलीकडं तिनं मोबाईलचा वापर केला नव्हता. 
हॉस्पिटलच्या मते विलगीकरणाची व्यवस्थाच मुळात इंटरनेच्या आधारे होणार्‍या व्हिडीओ कॉल्सवर आधारलेली आहे. व्हिडिओकॉल्सद्वारे पेशंटशी बोलता येणं, त्याचे हावभाव, डोळे, उच्चार यातून संबंधित डॉक्टर्सना प्रकृतीच्या गांभीर्याचा कल समजणं, पेशंटचा एकटेपणा व भीती व्हच्यरुअल दिसण्यातून कमी होणं, त्याला धीर देऊन मानसिक स्वास्थ्यासाठी प्रय} करणं या सगळ्यासाठी स्मार्ट फोन नीट वापरता येणं ही गोष्ट अत्यावश्यक होती. व्हिडीओ कॉल नि व्हॉट्सअँपच्या माध्यमातून आपल्या ऑक्सिजनचा स्तर, ताप व अन्य लक्षणं संबंधित डॉक्टर्सना पाठवणं ही त्यातलीच एक गोष्ट. 
ताप बघणं, ऑक्सिजन तपासणं याचाही आईला अनुभव नाही, ना शिकून घेण्याची इच्छा त्यामुळं तेही व्हॉट्सअँपच्या माध्यमातून कळवणं यावर काटच! म्हणून हॉटेल विलगीकरणाचा मुद्दाच निकालात निघाला नि शहरातील महापालिकेच्या प्रत्यक्ष डॉक्टर्स उपस्थित असणार्‍या व्यवस्था शोधून तिथं तिची सोय लावणं भाग पडलं.
असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहानं तंत्रज्ञानाच्या नव्या गोष्टी शिकून घेतल्या, पण असंख्य अजूनही सुरूवातीपासून सुरूवात करण्याच्या रेषेअलीकडे आहेत.
 जखमेला हळद नि नाकाला कांदा लावण्यापलीकडे प्रथमोपचारअसतो आणि मोबाईल फोन, बोलून निरोप देण्याघेण्यापलीकडे व्यापक आवाक्याचा असतो याचं शिक्षण नव्या साधनांकडे तुच्छतेनं बघणार्‍यांना द्यावं लागणार, नाहीतर काही खरं नाही. हे जगण्याच्या प्रवासातलं अत्यावश्यक कौशल्यच मानून शिकून घ्यावं लागेल.
बाकी एक बेष्ट झालं, आई म्हणाली, ‘इथनं बाहेर आल्यावर मला सगळं शिकवून टाका लगेच’ - म्हटलं, कोविड पावला!!
sonali.navangul@gmail.com
(लेखक आणि अनुवादक )

Web Title: To know basic technology is an essential skill in covid..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.