खोपा

By Admin | Updated: September 20, 2014 19:04 IST2014-09-20T19:04:14+5:302014-09-20T19:04:14+5:30

माणसाला काय किंवा प्राणी-पक्ष्यांना काय, घर सगळ्यांनाच प्रिय असतं. चार भिंती आणि त्यावर छप्पर एवढीच घराची कल्पना र्मयादित नाही. त्यात असावा लागतो विश्‍वास, त्यावर मायेची पाखर लागते, प्रेमाचं शिंपण असावं लागतं. विटा, सिमेंट असूनही माणसांची घरं पत्त्यासारखी कोसळतात व पक्ष्यांची काड्या-काटक्यांची असूनही टिकतात, याचे कारण बहुधा हेच असावं.

Khopa | खोपा

खोपा

 प्रा. डॉ. वर्षा गंगणे 

 
 
पावसाळ्यापूर्वी जीवसृष्टीतील जवळ-जवळ सगळेच जीव आपल्या निवासाची व्यवस्था करतात. माणूस आपल्या घरांची डागडुजी करतो. प्राणी आपल्या आश्रयाची जागा निश्‍चित करतात. एवढेच कशाला, अगदी लहानातला  लहान जीव म्हणजे मुंग्यादेखील आपले वारुळ बांधतात. त्यात अन्नाची बेगमी करतात. मग.. पक्षीही त्याला अपवाद कसे असणार? मार्च ते मे हे बहुसंख्य पक्ष्यांच्या विणीचे दिवस असतात. झाडांवरील सुरक्षित जागा बघून पाखरे आपली घरटी अधिक सुरक्षित कशी राहतील, याचा अंदाज घेत घरटी तयार करतात. आपल्या दृष्टीने ती अतिशय कमकुवत, नाजूक वाटणारी घरटी त्यांच्या दृष्टीने मात्र अत्यंत सुरक्षित व मजबूत असतात. कारण त्यात त्यांचे उद्याचे स्वप्न फुलणार असते. भविष्याची साक्षीदार असणारी भावी पिढी घडणार असते.
संध्याकाळ कलली की पाखरांचे थवे आकाशात उडताना बघून एक वेगळाच आनंद होतो. अनेकदा आपणही यांच्यातील एक पक्षी व्हावे व स्वैर विहार करून यावे, अशा कल्पनाही, मनात भिरभिरतात आणि मनाला सुखावून जातात. बघता बघता पावसाचे वेध लागतात. पाखरांची कुजबुज जराशी वाढलेली असते. वार्‍यालाही एक दिशा गवसलेली असते. संध्येचे रंग लोभसवाणे वाटू लागतात. आभाळात ढगांची ये-जा सुरू होणे. दिवसभराच्या उष्णतेला पहाटवारा एक शीतल-सुखद अनुभूती देऊन जाते आणि मनाला खात्री वाटू लागते की.. मृग येणार सागरतीरी समुद्रजीवांची रेलचेल वाढते. इवलाले शंख-शिंपले-कवड्या पाण्यातून काठाकडे तुरतुरू चालू लागतात. हे दृश्य म्हणजे एक अद्वितीय रंगोत्सव व चैतन्याचा, उत्साहाचा महोत्सवच असतो. सगळी धडपड, सागरतीरी वाळूच्या खाली आपापली जागा सुरक्षित करण्यासाठी. कारण त्यात आपली अंडी सुरक्षित ठेवून त्यातून उद्याची पिढी घडवायची असते. एकूणच काय प्रत्येकाला आपल्यासाठी एक सुरक्षित आसरा असावा, असे वाटते.
पावसाच्या धारा बरसल्या, की वातावरणात एक मधाळ गारवा पसरतो. आसमंत कुस बदलतो आणि मृदगंध कणा-कणांत भरून राहतो. निसर्गाचे लावण्य न्याहाळण्यासाठी आपोआप पाय बाहेर पडतात. डोळे पूर्वीपेक्षा अधिक रसिक होऊन परिसर न्याहाळतात. अगदी कीटकांपासून पाखरांपर्यंत सगळे जीव अत्यंत सावधपणे आपल्या घरट्यांचे रक्षण करीत असतात. काही घर बांधण्यात व्यस्त असतात. आपली थोडीशीही चाहूल लागताच किडे-मुंग्या बिळात तर पाखरे भुर्रकन उडून जरा अंतरावर जाऊन बसतात. थोडक्यात, घर जपण्याचे प्रयत्न सर्वतोपरी केले जातात. ही घरटी पाहिलीत की वाटते-
घर आपुले छान गोजिरे
महाल माड्या फिकेच सारे
या घरट्यातून फुलतील
भावी स्वप्नांचे फुलोरे
असे भाव सगळ्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट वाचायला मिळतात. निसर्गातील या सगळ्या कलाकृती बघताना सृष्टीची कल्पकता व रम्यता कल्पनातीत असते. पण.. यातील एक कलाकुसर मात्र बघतच राहावी अशीच आणि ती म्हणजे सुगरणीचे खोपे! बयेचे घरटे. यांना घरटे म्हणावे, की घरट्यांची वसाहत की झाडांना लावलेली झुंबरे, की बयेने तिच्या पिलांसाठी बांधलेले झोके, की ऋतूंच्या स्वागतासाठी बांधलेले लामणदिवे काय म्हणजे? शब्द सूचत नाहीत इतकी विलोभनीय, सुबक, सुंदर रचना व मांडणी! पाय तिथेच थबकतात. तेवढय़ात एक सुगरण चोचीत काडी घेऊन आपले घर बांधण्यात अत्यंत व्यस्त असते. तिला जगाशी काही देणे-घेणे नाही. तिचा खोपा कसा अधिक सुंदर, सुरक्षित आणि मजबूत असेल, याचा ती मधूनच उडून-उडून अंदाज घेत असते. मधूनच ती घरट्याच्या आत जाऊन बघते सगळं आलबेल आहे की नाही, याचा जणू अंदाज घेण्यासाठी! झाडाखालून वाहणार्‍या खळखळत्या पाण्यावर काठाशी असलेल्या झाडाच्या एका फांदीला जवळ-जवळ २५-३0 खोपे वार्‍याच्या तालावर झुलत असतात. अंड्यातून पिले बाहेर येण्याची वाट बघत. ते दृश्य बघून बहिणाबाईच्या ओळी कशा बरं आठवणार नाहीत!
अरे खोप्यामंदी खोपा 
सुगरणीचा चांगला
देख पिलांसाठी तिने 
जीव झाडाले टांगला.
अगदी सार्थ आणि खर्‍या ठरणार्‍या वाटतात या ओळी. झाडाच्या फांदीला घट्ट बिलगलेला, पण.. तेवढाच अधांतरी वाटणारा, खळाळत्या पाण्यात प्रतिबिंब पाहणारा खोपा, खरंच सुरक्षित असेल का? मनात सहज असा प्रश्न येऊन जातो. पण.. दुसर्‍याच क्षणी मनाला हे पटते, की सुगरण इतकी ईमाने-ईतबारे घरट्याची वीण बांधते, की तिच्या दृष्टीने यापेक्षा अधिक मजबूत, पक्के आणि सुरक्षित घर असूच शकत नाही. ज्यात तिची पिलं निवांत झोपतील व झोके घेतील. जीव धोक्यात घालून तिने ते बांधलेले असते. म्हणून.. बहिणाबाई म्हणतात,
पिलं झोपली खोप्यात जसा झुलता बंगला
देख पिलांसाठी तिने जीव झाडाले टांगला.
किती यथार्थ आहेत या ओळी. सुगरणींचे खोपे बघून तिच्यातील आत्मविश्‍वास बघून माणसांची घरटी आठवली. अगदी काल-परवा बांधलेल्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे कोसळतानाचे चित्र डोळ्यांसमोर आले आणि वाटले, माणसांपेक्षा पाखरे बरी! त्यांची घरटी अत्यंत अल्पकाळासाठी बांधली जाणारी असली, तरी त्यात ईमान, माया, प्रेम, दूरदृष्टी माणसांपेक्षा अधिक असते. माणूस तर पिढय़ान्पिढय़ा त्यात राहतील, या हेतूने घरे बांधतो; पण ती इतकी कमकुवत, पोकळ वाशांची! या क्षणी तर माणसापेक्षा पक्ष्यांची नैतिकता अधिक श्रेष्ठ वाटते व तेवढीच खरीदेखील.
सुगरणींच्या खोप्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळे खोपे सारख्या आकाराचे, बांधणीचे, देखणे, तेवढेच सुबक. यातून एकोपा, समानता, एकता माणसापेक्षा अधिक जपलेली. क्षणभर वाटतं किती हुशार, हुन्नरी आहेत ही पाखरं! जणू एखादं प्रशिक्षण घेऊन घरटी बांधतात, एखाद्या इंजिनिअर प्रमाणे! पण, छे..! तसे काहीच नाही. निसर्गच त्यांचा प्रशिक्षक आणि गुरूही. खोप्यांची बांधणी करताना कोणत्या झाडांची निवड करावी, याचा अभ्यास ही पाखरं बर्‍याच दिवसांपूर्वीपासून करीत असतात. जणू एखादे संशोधनच! आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अशा झाडांची खोपे बांधण्यासाठी निवड केली जाते, ज्या झाडांवर काजव्यांची वस्ती अधिक असेल. त्यामुळे जेथे काजवे अधिक तेथे सुगरणींचे खोपे अधिक, हे जणू ठरलेले समीकरण! म्हणूनच की काय, खोप्यांचे सौंदर्य खलते ते दिवसापेक्षा रात्री अधिक. 
रात्रीच्या प्रहरी खोपे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. जणू बयेच्या घरात दिवाळीची रोषणाई, जेजुरीच्या, तिरुमलाच्या मंदिरातील उंच दीपमाळ, किर्र्र अंधाराला चांदण्याचे तोरण, की खोप्यांवरील पाचूची कुसर! इतके अप्रतिम लावण्य की डोळे दीपून जावेत.
घराची संकल्पना सगळ्यांनाच आपलीशी वाटणारी म्हणून मला वाटतं.
‘‘घर म्हणजे घरच असतं
ते अधिक चांगलं किंवा वाईट नसतं
मायेच्या पंखात घेणारं
ते एक हक्काचं ठिकाण असतं.’’
या ओळी आपल्या सगळ्यांना सारख्याच लागू होणार्‍या! आपल्यालाही आपल्यासाठी एक हक्काचा निवारा आवश्यक असतो. आयुष्यात एक तरी घर बांधण्याचे स्वप्न सगळेच उराशी बाळगून असतात, त्यात उद्याची स्वप्न फुलवायची असतात. म्हणूनच की काय संसाराची सुरुवात करताना 
तुझ्या-माझ्या संसाराला आणिक काय हवं!
तुझ्या-माझ्या लेकराला घरकुल नवं!
या ओळी सगळ्यांच्याच मनात घोळत असतात. नव्या घरासंगे सारं नवीन होईल.. या आशेनेच प्रेमाच्या विटेला वीट जोडत, त्यात मायेचा रंग भरत, विश्‍वासाच्या पायावर एक सुंदर खोपटे तयार होते. जे, ताजमहालापेक्षा अधिक सुंदर, चारमिनारहून अधिक उंच, राजस्थानच्या राजवाड्यांपेक्षा अधिक भव्य व प्रशस्त तर मंदिराप्रमाणे पवित्र व निसर्गाइतकेच आपले.. हक्काचे वाटणारे अगदी सुगरणीच्या खोप्यासारखे. 
(लेखिका प्राध्यापिका आहेत.)

Web Title: Khopa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.