शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

‘कथक’वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:05 IST

रोहिणीताईच्या जवळ जवळ  सर्वच शिष्यांचे फोटोसेशन मी केले.  त्या स्वत: मात्र त्यासाठी अनिच्छुक असत.  खूपच आग्रह झाल्यानंतर त्यांनी होकार दिला.  त्या दिवशी माझ्या स्टुडिओत  जणू सारी ‘नृत्यभारती’ अवतरली होती.  पुढचे पाच-सहा तास माझ्या स्टुडिओने  कथकचे सर्व विभ्रम अनुभवले. त्या दिवशी ‘रोहिणी भाटे’ या असामान्य कलावंताचा  एकमेव असा पहिलाच दीर्घ फोटोसेशन पार पडला.

ठळक मुद्देनृत्यगुरु रोहिणी भाटे यांची 10 ऑक्टोबर ही पुण्यतिथी. त्यानिमित्त.

- सतीश पाकणीकर

1986च्या जून महिन्यातली 12 तारीख. स्थळ : ‘बालगंधर्व रंगमंदिराचे कलादालन’. उद्यापासून म्हणजेच 13 जून 1986 पासून ते 16 जून 1986 पर्यंतच्या काळात माझे पहिलेच स्वतंत्न प्रकाशचित्न प्रदर्शन. प्रदर्शनाचे नाव ‘स्वरचित्नांच्या काठावरती ..’ अर्थातच भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या मी टिपलेल्या भावमुद्रांचे सादरीकरण. उद्घाटनाचा कार्यक्रमही प्रदर्शनाच्या विषयाला साजेसा. माझा मित्न विजय कोपरकर याचं गाणं, साथीला दुसरा मित्न रामदास पळसुले आणि नुकतेच पुण्याला परिचित झालेले सतारवादक शाहीद परवेझ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन. गद्य भाषणाला पूर्णपणे चाट. अशा प्रकारे प्रदर्शनाचे उद्घाटन होण्याची ‘बालगंधर्व’ मधील ही पहिलीच वेळ. कलादालन रसिकांच्या उपस्थितीने पूर्ण भरून गेलेले. कलादालनाच्या चार भिंतींवर अभिजात संगीतातील मोगुबाई कुर्डीकर, भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकीबुआ, किशोरीताई, रविशंकर, विलायत खाँ, अमजदअली खाँ, झाकीर हुसैन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा अन विजयच्या सुरेल स्वरांचा दरवळ. मैफल एकदम जमून गेली. भारतीय बैठकीवर बसलेले रसिक. त्यातील काही जणांना मी ओळखत होतो. पण त्यात उंच, गोरीपान, अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची असलेली एक व्यक्ती उस्ताद सईदउद्दिन डागर यांच्या शेजारी बसलेली. पाहताक्षणीच ही व्यक्ती वेगळी आणि खास आहे याची खूण पटत होती. मैफल संपली. रसिक प्रदर्शित प्रकाशचित्ने पाहण्यात रंगले. ती व्यक्ती उस्ताद सईदउद्दिन डागर यांच्याशी बातचीत करीत होती. मी त्या दोघांच्याजवळ गेलो. नमस्कार केला. डागर गुरु जींनी माझं कौतुक केलं, माझी पाठ थोपटली. त्या व्यक्तीने आपणहून स्वत:ची ओळख करून दिली. ‘‘नमस्कार, मी रोहिणी भाटे.’’ इतक्या मोठय़ा कलाकार, इतक्या मोठय़ा गुरु अन इतका साधेपणा. मी त्यांचं नाव ऐकलं होतं. पण त्यांना भेटण्याचा योग आला नव्हता. तो असा अचानक येईल असे वाटलेही नव्हते. त्यामुळे मी अवाक् झालो होतो. मी त्या धक्क्यात असतानाच त्यांनी माझं भरपूर कौतुक केलं. परत एकदा हिंडून त्यांनी प्रदर्शन बघितले आणि अभिप्राय लिहिला- ‘‘फार सुंदर असं हे प्रदर्शन मनाला स्मृतिविश्वात घेऊन गेलं. तिथून परतले ती या कलावंतांच्या स्मृतिगंधाचा दरवळ बरोबर घेऊनच. सतीश यांचे आम्हा सर्वांवर फार फार उपकार आहेत- या प्रदर्शनाद्वारे थोर कलावंतांचे ‘भाव’ साक्षात प्रकाशचित्नात पकडून ठेवल्यानं !’’ इतक्या मोठय़ा कलावतीकडून लिहिला गेलेला अभिप्राय माझ्यालेखी फक्त कौतुकच नव्हते तर एक मौलिक आशीर्वादाच होता.माझ्या छंदाबरोबरच मी औद्योगिक प्रकाशचित्नणात व्यस्त झालो. कधी कधी शास्रीय संगीताच्या कार्यक्र मात रोहिणीताई भेटत. ‘‘नवीन काय करताय?’’ हा त्यांचा प्रश्न ठरलेला असे. ‘नृत्यं गीतं तथा वाद्यं त्नयं संगीतमुच्यते’ अशी संगीतशास्राची व्याख्या केली असली तरी माझा ओढा हा गायक-वादकांच्या भावमुद्रांकडे असल्याने मी नृत्याचे प्रकाशचित्नण करीत नसे. मी नवीन कोणाचे फोटो काढले हे त्यांना अशावेळी सांगत असे. मी चांगले संगीत ऐकतो व त्याबरोबरच त्या कलाकारांचे फोटोही काढतो याबद्दल त्या प्रत्येकवेळी माझं कौतुक करीत. त्यातच एकदा मला एका नर्तिकेकडून तिच्या ‘फोटोसेशन’विषयी विचारणा झाली. तिला अनेक नृत्यमुद्रा असलेले व वेगवेगळ्या रंगांच्या नृत्य-पोषाखात तिचे फोटो काढून हवे होते. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. वेळ व तारीख ठरली. ठरलेल्या दिवशी ती नर्तिका व तिच्या दोन मैत्रिणी माझ्या स्टुडिओत पोहोचल्या. मेकअप आर्टिस्टही आले. फोटोसेशनसाठी काय प्रकारचा मेकअप हवा आहे हे मी त्यांना सांगितले. मी माझे स्टुडिओ लाइट्स व पार्श्वभूमीच्या तयारीला लागलो. यात तासभर गेला. आधी ठरल्याप्रमाणे कोणकोणत्या नृत्यमुद्रा घ्यायच्या आहेत यावर त्या नर्तिकेने बराच अभ्यासही केला होता. पण ती शरीरमुद्रा, तो भाव अगदी अचूक आहे का नाही हे कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने सांगणे गरजेचे होते. कारण मला त्यातले ओ का ठो माहीत नव्हते. म्हणून मी त्या नर्तिकेला त्याबद्दल बोललो. त्यावर ती म्हणाली- ‘‘माझ्या गुरु बेबीताई स्वत:च येणार आहेत. येतीलच त्या इतक्यात.’’ आमची सर्व तयारी होत असतानाच त्या गुरु आल्या आणि परत एकदा मी आश्चर्यचकित ! कारण बेबीताई म्हणजे दुसरं कोणी नसून स्वत: रोहिणीताई भाटेच होत्या. त्यांच्या सर्वच लहान-मोठय़ा शिष्या त्यांना बेबीताई म्हणतात हे मला कुठे माहीत असणार? आम्ही त्यांना नमस्कार करून फोटोसेशनला सुरु वात केली. रंगीत व कृष्ण-धवल अशा दोन्ही फिल्मवर मी दोन कॅमेर्‍यांनी फोटो काढत होतो. मी जेथून फोटो टिपत होतो त्याच्या बरोबर मागे एका खुर्चीत एकदम ताठ कण्याने बसलेल्या रोहिणीताई सूचना करीत होत्या. प्रत्येक फ्रेमगणिक, प्रत्येक नृत्यमुद्रेला त्या स्वत: अचूक करीत होत्या. कधी अचूक असलेली मुद्रा मी दोन्ही फोटो टिपेपर्यंत बदले. पण त्यांचे इतके बारकाईने लक्ष असे की त्या लगेच थांबवत. ‘‘हो, फिल्मचा तो तुकडाही उगाच वाया जायला नको.’’ हे त्यांचे त्यावरचे आग्रही म्हणणे. अचूकतेचा असा ध्यास असणार्‍या व्यक्तीबरोबर काम करणे ही आपल्यात सुधारणा करून घेण्याची अनोखी संधीच असते. पुढच्या काळात त्यांच्या जवळ जवळ सर्वच शिष्यांचे फोटोसेशन मी केले. प्रत्येक वेळी त्या येत. त्यांचा तो उत्साह अन अचूकतेचा ध्यास कणभरही कमी नव्हता. त्यांच्या नुसत्या उपस्थितीने स्टुडिओत उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण होई.दरम्यानच्या काळात मी त्यांच्या ‘नृत्यभारती’ या संस्थेच्या अनेक कार्यक्र मांना उपस्थित राहू लागलो. रोहिणीताईंनी संरचना केलेल्या ‘मौन’, ‘कठपुतली’, ‘होरी’, ‘तन्मात्न’, ‘रूपकथक’, ‘नृत्तविशेष’ अशा अनेक कार्यक्र मांचे प्रकाशचित्नण मला करता आले. त्यावेळी त्यांच्या स्टेजवरील सादरीकरणाचा अनुभव घेता आला. तो दृश्य अनुभव म्हणजे एवढय़ा मोठय़ा स्टेजचा व त्यामागील भव्य अवकाशाचा अप्रतिम वापर करत दृश्यात्म व काव्यात्म असा नृत्यरचनेच्या अनोख्या आविष्कारचा अनुभव ! चित्नकलेत, शिल्पकलेत, वास्तुकलेत व प्रकाशचित्नणातही अवकाशाचं अनन्य महत्त्व आहेच; पण नृत्यकलेत तर अवकाशाचं भान हा स्थायीभाव आहे. रोहिणीताईंचं हे भान व नर्तनातील अप्रतिम कौशल्य, तादात्म्य, नृत्यकलेच्या रूपसौंदर्याची त्यांची मांडणी व त्यातील सहजता हे तज्ज्ञांप्रमाणेच अज्ञानाही विस्मित करायला लावील असेच असे.एकदा अशाच सुरू असलेल्या फोटोसेशनमध्ये मी त्यांचाच फोटोसेशन करण्याविषयी त्यांना विचारले. त्यांची ज्येष्ठ, संवेदनशील व आवडती शिष्या नीलिमा अध्येने माझे म्हणणे लगेच उचलून धरले. खास फोटोसेशनमध्ये अशी काढलेली त्यांची प्रकाशचित्ने उपलब्ध नव्हतीच. होती ती त्यांची स्टेजवर सादरीकरण करताना असलेली प्रकाशचित्ने. याचं कारण त्या स्वत:चा फोटोसेशन करण्यात अनिच्छुक असत. पण मग खूपच आग्रह झाल्यानंतर मात्न त्यांनी होकार दिला. 25 मार्च 1993 रोजी माझ्या स्टुडिओत जणू सारी ‘नृत्यभारती’ अवतरली होती. दोन वेगळ्या रंगाचे नृत्य-पोषाख घेऊन बेबीताई (हो, नंतर मीपण त्यांना त्यांच्या शिष्यांप्रमाणे बेबीताई म्हणायला लागलो) आल्या. तिथून पुढचे पाच-सहा तास माझ्या स्टुडिओने कथकचे सर्व विभ्रम अनुभवले. त्या दिवशी ‘रोहिणी भाटे’ या असामान्य अशा कलावंताचा एकमेव असा पहिलाच दीर्घ फोटोसेशन पार पडला. आधीच्या नर्तिकांच्या फोटोसेशनच्या वेळी बेबीताईंच्या तोंडून ‘नृत्त’ व ‘नृत्य’ यातला फरक ऐकला होता, कळायला लागला होता. त्याचं आज प्रत्यक्ष सादरीकरण होतं. अथक रियाजातून त्यांना स्वत:च्या मनाच्या दर्पणात जाणीवपूर्वक स्वत:चं प्रतिबिंब पाहण्याची सिद्धी प्राप्त झाली असणार. त्यामुळेच कदाचित त्यांची प्रत्येक हालचाल व मुद्रा ही अचूकच उमलून येत होती. माझं काम सोपं झालं होतं. सगळ्या फिल्म्स प्रोसेस झाल्या. ‘फिल्मचा एकही तुकडा वाया गेला नव्हता.’ प्रिंट्स आल्यावर मी नृत्यभारतीत पोहोचलो. त्यांना प्रकाशचित्ने खूपच भावली. या त्यांच्या रंगीत व कृष्ण-धवल प्रकाशचित्नातून त्यांनी अनेक प्रकाशचित्ने निवडली. पुढे प्रत्येकवेळी कार्यक्र माच्या प्रसिद्धीसाठी ती प्रकाशचित्ने वापरात येऊ लागली. त्यांच्या सारख्या ‘परफेक्शनिस्ट’ कलाकाराने मी टिपलेल्या प्रकाशचित्नांचा असा वापर करणं हीच माझ्यासाठी मोठी पावती होती. त्यांच्याकडच्या प्रकाशचित्नांच्या प्रति संपत आल्या की त्या मला फोन करीत. त्यावर नंबर टाकलेले असल्याने फक्त प्रत्येकाच्या किती प्रति हव्या एवढाच प्रश्न असे. प्रिंट्स तयार झाल्यावर मी डेक्कन जिमखान्यावरील नृत्यभारतीच्या क्लासवर जात असे. तेथे ‘नृत्य-यज्ञ’ सतत फुललेलाच असे. कधी बेबीताई भेटत तर कधी त्या नसत. अशावेळी मी प्रिंट्स तेथे ठेवून येत असे. लगेचच संध्याकाळी त्यांचा फोन ठरलेला. ‘‘तुम्ही येऊन गेलात. मी नव्हते. मी तुमचे पैसे काढून ठेवले आहेत. कधी येताय न्यायला?’’ आणि मी तेथे जाऊन ते पैसे घेईपर्यंत जर उशीर झाला तर त्यांचा परत फोन ठरलेला. व्यवहाराबाबत कायमच चोख असलेल्या अशा कलाकार व्यक्ती विरळच !बेबीताईंचा माझ्या कामावर विश्वास आहे हे कळल्यामुळे काय होऊ शकते याचा एक अनुभव मला आला. त्यांच्याच एका ज्येष्ठ शिष्येचा फोटोसेशन मी करीत होतो. बेबीताई बाहेरगावी गेल्या असल्याने त्यांची दुसरी शिष्या शरीरमुद्रा व भाव अचूक करण्यासाठी आली होती. दरम्यान, ज्यांचा फोटोसेशन मी करीत होतो त्यांनी मला प्रिंट्स त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणून देण्यास सांगितले. मी कसले हॉस्पिटल आहे याची चौकशी केल्यावर कळले की, ते डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. त्यांचे यजमान हे पुण्यातील अतिशय नामवंत असे नेत्नतज्ज्ञ. मला आय प्रेशरचा त्नास होतो असे मी सांगताच त्या म्हणाल्या, ‘‘मी तुमच्यासाठी वेळ घेऊन ठेवते. पण आमच्या इथे भरपूर वेळ लागतो. त्यामुळे वेळ ठेवून या.’’ मी हॉस्पिटलमध्ये गेलो. भरपूर गर्दी. माझे नाव टाकून एक कार्ड बनवले गेले. आधी दोन ज्युनिअर डॉक्टर तपासणार. मग सर्वात शेवटी मोठय़ा सरांकडे रवानगी. सरांचा दरारा मोठा. ते एकदम कमी बोलतात असे मी ऐकलेले. मी त्यांच्या केबिनमध्ये पोहोचलो. डोळे तपासणीच्या अत्याधुनिक यंत्नासमोर बसलो. कार्डावर माझं नाव बघून पलीकडच्या आयपीसला स्वत:चा डोळा लावत सर म्हणाले- ‘‘बेबीताई नेहमी तुमचं खूप कौतुक करीत असतात. ही मोठी गोष्ट आहे.’’ मला आधी कळेच ना की ते कुणाशी बोलत आहेत. मग मी भानावर आलो. डॉक्टरांनी मग मला आयड्रॉप्स लिहून दिले. माझ्या कार्डावर त्यांनी मार्कर पेनने एक तिरकी रेघ मारली. मी बाहेर आलो. बिलिंग काउंटरवर गेलो. तेथील मुलीने कार्डावरील ती रेघ पाहून मला ‘आता तुम्ही जाऊ शकता’ असे सांगितले. मी फी विचारल्यावर तिने त्या तिरप्या रेघेचा खुलासा केला की ही रेघ म्हणजे तुमच्याकडून काही फी घ्यायची नाहीय. मी विस्मयचकित!संगीताचे कार्यक्र म, नृत्यभारतीचे कार्यक्र म, वर्कशॉप्स यातून बेबीताई नेहमी भेटत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा स्निग्ध स्वभाव अनुभवत गेलो. 2005 सालच्या ‘आनंदयात्नी पु.ल.’ या माझ्या कॅलेंडरचं प्रकाशन पुलंच्या जन्मदिनी बेबीताईंच्या व कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या 81 वर्षांच्या होत्या. पण त्यांचं ते देखणेपण, तो डौल, ती सजगता मी प्रदर्शनात, पहिल्या भेटीत अनुभवली तशीच होती. ‘जाणिजे यज्ञकर्म’ हे ब्रीदवाक्य असलेली ‘नृत्यभारती’ व ‘कथक’ हेच जीवन जगलेल्या या कलावतीबद्दल तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर ‘‘नृत्यकला अशी तरल! तिच्या रंगमंचावरच्या त्या नित्य नव्या निर्मितीप्रक्रि येची किमया प्रत्यक्ष अनुभवताना मला कित्येकदा भास होतात. नृत्य करता करताच मन त्नयस्थ होत जातं नि म्हणतं, ‘‘तुझा हा थिरकता देह मी नव्हे. तुझ्या नृत्याविष्काराचं साधनही नव्हे मी- ना माध्यम! मी आहे प्रत्यक्ष नृत्याविष्कार. नृत्याचा दृश्य आशय. आशयाची सुभग प्रतीती. आशयाचं संपूर्ण नि स्वार्थी भान आहे मी!’’ sapaknikar@gmail.com                                  (लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)