स्वप्नांचा प्रवास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 06:01 AM2020-05-31T06:01:00+5:302020-05-31T06:05:01+5:30

माझी आई सुंदर होती. चांगली गायिका होती. आणि मी तिची मुलगी? काहीही नाही!. त्या अडनिड्या माझा एकच ध्यास होता. निरोगी आणि सुंदर होण्यासाठी नाच शिकायचा! रशियाच्या घट्ट मुठीत आवळलेल्या कझाकस्तानला  जेव्हा नृत्य-संगीताची भाषाही ठाऊक आणि मान्य नव्हती  तेव्हा पुस्तकांमधून मला शोध लागला भरतनाट्यमचा.  मग भारतात येण्यासाठी मी ताश्कंद, उझबेकिस्तानच्या  वकिलातीच्या दारांवर धडका मारू लागले. पण नाहीच जमलं. शेवटी मी मासिकं, फोटोंमधून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. अचानक कझाकस्तान रशियाच्या पोलादी पकडीतून सुटला.  भारतात जाण्याचे माझे स्वप्न नव्याने जागे झाले आणि  वकिलातीचे कार्यालय सुरू होताच तिथे सर्वांत पहिल्यांदा मी पोचले!

The journey of dreams .. Bharatnatyam dancer Akmaral Kainazarova narrates her story of dreams.. | स्वप्नांचा प्रवास..

स्वप्नांचा प्रवास..

googlenewsNext
ठळक मुद्देअभिजात भारतीय संगीतासाठी  जीव वेचणार्‍या  परदेशी साधकांच्या दुनियेत

- अकमारल कैनाझारोव्हा

सुंदर दिसायचं होतं मला.! रवींद्रनाथ टागोरांच्या कथांमधील नायिकांसारखे. टागोरांच्या कथा ऐकतच तर लहानाची मोठी झाले मी. भारतापासून काही हजार मैल दूर असलेल्या रशियातील कझाकस्तान नावाच्या प्रांतात राहणारी मी आणि आजी करीमा. आमचे जगच मुळी तेव्हा रवींद्रनाथांच्या कविता आणि कथांनी सजलेले होते. त्यातील लांब केसांच्या, टपोर्‍या डोळ्यांच्या कथानायिका, बंगालमधील हिरवी शेतं, बाराही महिने तुडुंब वाहणार्‍या नद्यांच्या काठाने राहणारी मोठाली एकत्र कुटुंबं आणि त्यांची सुख-दु:खं. या कथांनीच मला, माझ्या दृष्टीच्या पल्याड असलेल्या भारत नावाच्या एका सुंदर देशात जाण्याचे स्वप्न दिले. पण वाढत्या वयाबरोबर मला जाणीव होऊ लागली ती माझ्या किरकिर्‍या शरीराची आणि त्यावर असलेल्या तशाच नीरस चेहेर्‍याची. 
कझाकस्तानचे लोकसंगीत उंच, टोकदार आवाजात गाणारी माझी सुंदर आई, साझिदा, तेव्हा अनेकांच्या चर्चेचा (आणि कदाचित हेव्याचासुद्धा!) विषय होती. आणि मी तिची मुलगी? कोणाचे लक्षसुद्धा जाऊ नये इतकी किरकोळ! त्या अडनिड्या वयात मला एकच ध्यास लागला होता, निरोगी आणि सुंदर होण्यासाठी नाच शिकण्याचा. सुदृढ होण्यासाठी मैदानी खेळासारखे अन्य कितीतरी पर्याय होते की, पण मला ते अजिबात मंजूर नव्हते. मग हातात पुस्तके घेऊन भारत नावाच्या रवींद्रनाथांच्या सुंदर देशाचा अभ्यास सुरू केला. तिथेच मला नक्की माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल हा माझा विश्वास  होता. 
हा काल 80 च्या दशकातील. रशियाच्या घट्ट मुठीत आवळलेल्या कझाकस्तानला जेव्हा नृत्य-संगीत याची भाषा ठाऊक नव्हती आणि अजिबात मान्य नव्हती तेव्हा मी वाचत असलेल्या पुस्तकांमधून मला शोध लागला भारतातील भरतनाट्यम नावाच्या एका विलक्षण सुंदर नृत्याचा. डौलदार हालचाली, शरीराचे रेखीवपण खुलवणारी वेशभूषा, अभिनय आणि नृत्य याचे चोख संतुलन आणि नृत्यातून निसर्गाशी असलेले माणसाचे नाते शोधण्याचा प्रयत्न. 
किती संपन्न होते ते सारे.! मला अशाच, नव्हे ह्याच नृत्याचा शोध होता. मग मी ताश्कंद, उझबेकिस्तान इथल्या वकिलातीच्या दारावर धडका मारू लागले. ते निर्थक आहे हे ठाऊक असूनसुद्धा. माझे एकच मागणे होते, नृत्य शिकायला मला भारतात जाऊ द्या! अपेक्षेप्रमाणे, माझ्या एकाही पत्नाचे उत्तर आले नाही. मग मी माझ्या परीने या प्रश्नावर एक अभिनव तोडगा काढला. त्यावेळी मिळणार्‍या भारतीय मासिकात बघायला मिळणारे, भारतातून येणार्‍या चहाच्या डब्यांवर दिसणारे नृत्याचे विविध फोटो बघून मी कझाक लोकनृत्य आणि भरतनाट्यम याची सांगड घालून नृत्य शिकवणारे वर्ग सुरू केले. तेव्हा मी वडिलांनी आग्रह केल्यामुळे पत्रकारितेचा मास्टर्सचा अभ्यास करीत होते. 
दुसरे महायुद्ध लढलेल्या आणि त्यानंतर लष्करात, पोलीस दलात अतिशय महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडता-पाडता माझ्या वडिलांनी, येलेयुसीन यांनी अनेक पुस्तके लिहिली होती. मी त्याच वाटेने पुढे जावे असे ते मला सुचवत होते. शिक्षण, मग नोकरी, लग्न आणि हौसेपुरते नृत्य असे अगदी सरधोपट मार्गाने कोमट आयुष्य ढकलावे लागणार असे वाटत असतानाच कझाकस्तान रशियाच्या पोलादी पकडीतून सुटला. स्वातंत्र्य! कोणाचेही भय न बाळगता मुक्तपणे गाण्याचे आणि कदाचित नृत्य शिकण्याचे सुद्धा..! 
भारतात जाण्याचे माझे स्वप्न नव्याने जागे झाले आणि वकिलातीचे कार्यालय सुरू होताच तिथे सर्वात पहिल्यांदा मी पोचले..!  त्या अधिकार्‍यांना मी बसवलेली नृत्यं बघण्यासाठी आमंत्रित केले. भारतात पाऊल न ठेवता तेथील नृत्य शिकू आणि शिकवू बघणार्‍या माझ्या वेडाकडे बघतच त्यांनी मला मदतीचा हात दिला..
भारतीय शिष्यवृत्ती (आयसीसीआर) मिळून चेन्नईच्या कलाक्षेत्र संस्थेत भरतनाट्यम शिकण्यासाठी आलेली मी पहिली कझाक शिष्य. चेन्नई विमानतळावर उतरले तेव्हा समोर दिसणारा माणसांचा हलणारा समुद्र पाहून मी गांगरूनच गेले. एवढी माणसे राहतात या देशात? 
कझाकस्तानच्या ऐसपैस भूमीवर चिमूटभर माणसे बघण्याची डोळ्यांना सवय, इथे वितभर जागेत शेकडो माणसे दिसत होती! आणि ती सगळी अगम्य अशा वेगाने माझीच, कझाक भाषा कशी बोलत होती? 
तमिळ भाषा शिकायला लागल्यावर समजले, तमिळ आणि कझाक यांचे व्याकरण अगदी सारखे आहे! शिक्षण सुरू झाले. स्वप्नाच्या वाटेवर पोचायला आधीच खूप उशीर झाला होता, त्यामुळे आता मला अजिबात वेळ दवडून चालणार नव्हता. 
कलाक्षेत्रामध्ये दाखल झाल्यापासून पुढील पाच वर्षं मी फक्त अभ्यास करीत होते. दिवसा नृत्याचे धडे, सराव आणि रात्री तमिळ-संस्कृत भाषांचा अभ्यास. हॉटेलिंग, सिनेमा, मित्र-मैत्रिणींबरोबरची भटकंती या तरु ण वयातील स्वच्छंद जगण्याच्या सगळ्या वाटा निग्रहाने नाकारून मी फक्त अभ्यास करीत होते. 
भारतीय नृत्याला न्याय द्यायचा तर त्यातील पद्याची भाषा, त्यातील कथा आणि पात्रे यांची नीट ओळख आणि संदर्भ ठाऊक हवेत. रामायण-महाभारतातील असंख्य घटना आणि पात्रे, शिव-पार्वतीचे नाते, देवीची असंख्य रूपे, कालिदासाच्या रचना आणि जयदेवाची अष्टपदी हे समजून घेतले नाही तर माझा अभिनय कसा अस्सल होईल? 
या पाच वर्षात मी हे सगळे काही समजून घेत होते. ज्या नृत्याला दोन हजार वर्षांची परंपरा आहे त्याच्या साधनेसाठी पाच वर्षं हे गणित अगदीच चुकीचे आहे, पण माझ्या हातात (तेव्हा) तेवढाच वेळ होता..! 
93 ते 98 ह्या पाच वर्षांच्या मुक्कामानंतर मी माझ्या देशात परत गेले. पण आणखी शिकण्याच्या वेडापायी पुन्हा-पुन्हा भारतात येत राहिले. माझ्या देशातील नृत्य शिकू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मला अधिक पर्याय देता यावे म्हणून कथक शिकण्यासाठी परत आले. 
दरम्यान कर्नाटक शैलीचे गायन शिकले. त्यानंतर भरतनाट्यममध्ये मास्टर्सचा अभ्यासक्र म पूर्ण करण्यासाठी आले आणि योग थेरपीची पदव्युत्तर पदविका घेण्यासाठी. एक परिपूर्ण कलाकार आणि गुरु  होण्यासाठी एवढे प्रयत्न तर हवेतच ना! भारतात मनापासून रमत असताना मला नेहमी वाटत होते मी नक्की गेल्या जन्मी भिक्कू असणार.. 
आता, सेंटर फॉर इंडियन क्लासिकल डान्स या अलमाटीमधील माझ्या नृत्यशाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना नृत्याबरोबर त्या नृत्यामागे असलेला विचार, तत्त्व समजावे असा माझा प्रयत्न असतो. 
नृत्य म्हणजे फक्त दृष्टीला सुख की त्यापलीकडे आणखी काही? मला वाटते, ते तुम्हाला अधिक चांगला माणूस होण्याची दृष्टी देते. भरतनाट्यममधील श्लोक आणि कथा, दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करीत उन्नत होत जाणार्‍या माणसाला आपल्यासमोर आणतात. या उन्नतीच्या वाटेवर जाण्यासाठी आणि एका टप्प्यावर फक्त माणूस म्हणून सगळ्या जगातील माणसांनी एक होऊन जगावे यासाठी मी नृत्य शिकवते.! 
त्यामुळे या नृत्यात गणपती आणि देवीच्या गोष्टी आहेत पण त्याच्या बरोबरीने आहेत आजच्या जगाचे अनेक गंभीर होत जाणारे प्रश्न मांडणार्‍या गोष्टी. मी त्या आवर्जून मांडते आहे. 
माणसांमधील तुटत चालेलेले नातेसंबंध, लोभी माणसाकडून होत असलेली निसर्गाची क्रूर, अमानुष कत्तल, परिणामी कमालीचा एकाकी होत चाललेला माणूस आता नृत्य-संगीतातून वारंवार मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. 
पारंपरिक रामायण आणि महाभारताच्या कथांच्या बरोबरीने या माणसाकडे आणि त्याच्या जगातील प्रश्नांकडे बघण्याचा प्रयत्न मी करते आहे. कझाक समाजजीवन आणि भारतीय समाजजीवन यांच्यामध्ये असलेले आंतरिक नाते मला भारतात आल्या-आल्या जाणवले होते. कुटुंब आणि त्यातील मूल्य हा त्यातील महत्त्वाचा समान दुवा आहे. हे नाते अधिक दृढ करण्यासाठी मी या दोन्ही देशांच्या नृत्याला, कझाक लोकनृत्य आणि भारतीय भरतनाट्यम यांना एकत्र गुंफते आहे! 
शास्त्रीय नृत्य आणि त्याचे कधीच कालबाह्य न होणारे महत्त्व याविषयी सतत तरु ण पिढीशी बोलते आहे. आणि लिहिते आहे एक महत्त्वाचे पुस्तक. भरतनाट्यम नृत्यामधील विविध हस्तमुद्रा आणि आपले आरोग्य यामध्ये असलेले नाते सांगणारे हे पुस्तक आहे. माझी नृत्यशाळा ही जशी कझाकस्तानमधील पहिली नृत्यशाळा; तसे हे पुस्तक नृत्यावरचे पहिले पुस्तक असेल. 
सगळ्या जगाला हतबल करून टाकणार्‍या कोविडची चाहूल मला आधीच लागली होती का? ठाऊक नाही. पण निसर्गातील पंचमहाभूते मला सतत खुणावत होती. आता गेली दोन वर्षं मी आणि अना डोनेतस ही माझी उझबेक चित्रकार मैत्रीण, आम्ही दोघीजणी पंचमहाभूते या विषयावर काम करतोय. 
तिची चित्रं आणि माझे नृत्य याच्या द्वारे आम्ही माणसाला जगण्यासाठी सगळे काही देणार्‍या या अदृश्य अशा शक्तींकडे जगाचे लक्ष वेधू इच्छितोय..! 
जगण्याला आता नव्याने काही उद्दिष्ट मिळाले आहे. 

अकमारल कैनाझारोव्हा
अकमारल कैनोझारोव्हा ही कझाकस्तान आणि मध्य आशियामध्ये भारतीय नृत्य शिकवणारी पहिली आणि एकमेव गुरु . भरतनाट्यम आणि कथक या दोन्ही शैलींचे शिक्षण तिने भारतात घेतले आणि त्यानंतर योगशास्त्रात पदव्युत्तर पदविका मिळवली. भारतीय नृत्याला असलेली आध्यात्मिक बैठक आणि नृत्याचे निसर्गाशी असलेले नाते याबद्दल भरभरून बोलणारी अकमारल ‘भरतनाट्यममधील हस्तमुद्रा’ यावर एक पुस्तक लिहिते आहे. 

मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे 
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)

Web Title: The journey of dreams .. Bharatnatyam dancer Akmaral Kainazarova narrates her story of dreams..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.