जट्रोफाची चर्चा पहिल्यांदा झाली होती तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 07:00 IST2018-09-02T07:00:00+5:302018-09-02T07:00:00+5:30
जैवइंधनावर विमान चालवण्याचा भारतातला पहिला प्रयोग नुकताच यशस्वी झाला. यात इंधन म्हणून जट्रोफा तेलाचा काही प्रमाणात वापर करण्यात आला होता. मात्र जट्रोफा चर्चेची भारतातली ही दुसरी लाट आहे. पहिली लाट आली होती 1990च्या सुमारास. त्याकाळी भारतात खाद्यतेलाचा तुटवडा असल्याने औद्योगिक उत्पादनांसाठी अखाद्य तेलच वापरण्याचे बंधन घातले गेले. जट्रोफामध्ये ते गुण असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आल्यानंतर प्रयोगशाळेतील जट्रोफा पीक म्हणून शेतक-याच्या शेतात आले. ते साल होते 1986 ! त्याआधी जट्रोफा दुर्लक्षित अवस्थेत भारतात सगळीकडेच होता!

जट्रोफाची चर्चा पहिल्यांदा झाली होती तेव्हा..
-विनायक पाटील
जैवइंधनावर विमान उडवण्याचा भारतातला पहिला प्रयोग नुकताच यशस्वी झाला. या उड्डाणासाठी 75 टक्के विमानाचे नेहमीचे इंधन आणि 25 टक्के जैवइंधन वापरले गेले.
स्पाइस जेट विमान कंपनीने काही प्रमाणात जट्रोफा तेलापासून तयार केलेल्या इंधनाचा वापर करून दि. 27 ऑगस्ट 2018 रोजी डेहराडून ते दिल्ली असे उड्डाण प्रवाशांना घेऊन केले. त्यामुळे सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी जैवइंधन आणि जट्रोफाची चर्चा सुरू केली आहे.
जट्रोफा चर्चेची ही भारतातील दुसरी लाट आहे. पहिली लाट आली होती 1990 साली. ती लाट बरीच टिकली व मोठय़ा प्रमाणात जट्रोफाच्या लागवडी भारतभर झाल्या. महाराष्ट्र वगळता इतर प्रांतातील लागवडी प्रयोगात्मक होत्या. काही संस्था आणि कृषी विद्यापीठे यांनी केलेल्या त्या लागवडी होत्या. त्यात महाराष्ट्रातील लागवडी शेतक-यानी व्यापारी तत्त्वावर केल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य सहकारी वृक्ष उत्पादक संस्थेमार्फत केलेल्या लागवडी होत्या बारा हजार एकरांपेक्षा अधिक जमिनीवर. या लागवडीमागील गरजा आणि उपयुक्तता समजून घेणे आवश्यक आहे.
इतिहास असा आहे, नाशिक जिल्हा सहकारी निलगिरी उत्पादक संघ या संस्थेची स्थापना 1983 साली झाली. या संस्थेच्या 2173 उत्पादक सभासदांनी चार वर्षांत निलगिरीच्या लागवडी केल्या दहा हजार एकरांवर.
उसानंतर एखाद्या पीक केंद्रित संस्थेत अशा लागवडी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच होत होत्या. पाच वर्षांत दीड कोटी निलगिरी वृक्ष लावले गेले. निलगिरी लागवडीचा फॉर्म्युला साखर कारखानदारीसारखाच होता. लागवडीपासून ते तोड, विक्रीपर्यंत संघ ही कामे करीत असे. 1988 साली तोडणीसाठी तयार असलेल्या तीनशे एकरावरील तोड आणि विक्री संघाने सुरूकेली. विक्रीव्यवस्थाही काटेकोर होती.
या चळवळीने जगाचे लक्ष वेधून घेतले. प्रगत आणि प्रगतशील अशा अनेक देशांतील प्रतिनिधींनी ही व्यवस्था पाहिली. एफ.ए.ओ. (फूड अँण्ड अँग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स) या शेतीत पायाभूत काम करणा-या जागतिक संघटनेने दखल घेऊन वृक्ष टंचाई असलेल्या देशांनी या पद्धतीने काम करावे असे मार्गदर्शनही केले.
मूळ मुद्दा असा आहे की, एखादी संस्था एखाद्या अप्रचलित पिकाची लागवड करा असे सांगते आणि हजारो एकरांवर अशा लागवडी खासगी शेत जमिनीत केल्या जातात, असा विषय विकासित होत होता.
कृषी आधारित कच्चा माल वापरणार्या संस्थांना ज्या मालाचा बाजारात तुटवडा आहे तो या संस्थेच्या सभासदांकडून तयार करून घ्यावा, म्हणजे शेतकर्यांनाही तयार बाजारपेठ मिळेल आणि कंपनीलाही कच्चा माल विनासायास उपलब्ध होईल अशी योजना होती.
त्याकाळी भारतात खाद्यतेलाचा तुटवडा होता म्हणून काही औद्योगिक उत्पादनात खाद्यतेल न वापरता अखाद्य तेल वापरावे असे बंधन घातले गेले. त्यात अंगाला लावण्याच्या साबणाच्या उत्पादनांचाही समावेश होता.
गोदरेज सोप्स ही साबण उत्पादनातली अग्रेसर कंपनी, ती अखाद्य परंतु सोप मेकिंगसाठी सोईच्या अशा तेलाच्या शोधात होती. सर्व बाबींचा विचार करून गोदरेज सोप्स लिमिटेडचे शास्त्रज्ञ जट्रोफा तेलावर पोहोचले.
जट्रोफा भारतात दुर्लक्षित अवस्थेत सगळीकडेच होता. प्रश्न होता या अपरिचित पिकाचे उत्पादन करण्यासाठी शेतक-याना उद्युक्त कसे करायचे?
आमची संस्था असे करू शकते अशी त्यांना खात्री होती. त्यांनी निलगिरी संघाशी संपर्क साधला आणि विचारणा केली, आपण जट्रोफाच्या लागवडी गोदरेज सोप्स लिमिटेडसाठी कराल काय?
संघाचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना होकार भरला आणि विनंती केली की हे पीक काय आहे हे मी आधी समजून घेतो आणि मग लोकांना सांगतो. असे सांगणे जास्त प्रभावी राहील.
मी अडीच एकरावर लागवड करायचे ठरविले. गोदरेज सोप्सने या आधी काही वर्षे डॉ. अशोक रैना या कृषी शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली जट्रोफाच्या निवडक बियाण्यांपासून केलेली रोपे तयार करून ठेवली होती. विक्रोळी (मुंबई) येथील त्यांच्या प्रयोगशाळेत ती रोपे अडीच एकरांना पुरतील एवढीच होती.
प्रयोगशाळेतील जट्रोफा पीक म्हणून शेतक-याच्या शेतीत आला. पीक म्हणून प्रथमच. हे साल होते 1986. या पिकाचा पुढील प्रवास पाहूया पुढच्या भागात.
(साहित्य-कला आणि शेतीसह अनेक विषयांमध्ये सखोल जाण असलेले लेखक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.)
vinayakpatilnsk@gmail.com