इराण

By Admin | Updated: January 14, 2017 13:58 IST2017-01-14T13:58:45+5:302017-01-14T13:58:45+5:30

भारतीयांना इतर देशांबद्दल माहिती घेण्याची खूप उत्सुकता असते. पण आपण आपली मतं पाश्चात्त्य माध्यमांचे कार्यक्रम, सिनेमे पाहून, पुस्तकं वाचून ठरवतो. आणि हे चित्रण पक्षपाती असू शकतं, याचा साधा विचारही करत नाही. थोडक्यात त्यांना हवं तसं जनमत बनवण्याचा प्रयत्न ही युरोप-अमेरिकेतली माध्यमं करतात आणि त्यांच्या डावाला बळी पडणाऱ्यांमध्ये भारतीयांचा नंबर फार वरचा आहे. - ही गोष्ट मला एकदम पटली, कारण ‘इराण’!!

Iran | इराण

इराण

- स्नेहा केतकर


इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली १९७९ साली. तेव्हा मी कॉलेजला होते. तेव्हाच्या वर्तमानपत्रात पाहिलेला खोमेनीचा उग्र चेहरा मी कधी विसरले नाही. पुढेही इराणविषयी जे जे वाचनात आलं, ते त्या देशाविषयी एक विचित्रशी भीती वाटायला लावणारं होतं. सलमान रश्दींविरुद्धचा फतवा. नंतर वाचलेलं बेट्टी मेहमुदीचं ‘नॉट विदाउट माय डॉटर’ हे सुन्न करणारं आत्मकथन. आधी पुस्तक वाचलं, मग तो सिनेमाही पाहिला. सगळंच भीषण होतं. माझ्या मनातल्या इराणच्या प्रतिमेवर हे असले वळसे चढत गेले. हाच देश माझ्या नवऱ्याला कामासाठी तिकडे बोलावणार आहे आणि त्याच्यामागोमाग मीही तिकडे जाणार आहे; हे मी अगदी स्वप्नातसुद्धा कधी पाहिलं नसतं. 
- पण ते प्रत्यक्षात घडलं.
२०१२ मध्ये माझा नवरा संजय ‘इराण सेल’ या टेलिकॉम कंपनीमधल्या कामानिमित्त त्या देशात जा-ये करायला लागला. तो दरवेळी परत येई त्यावेळी त्या देशाविषयी काहीतरी छान सांगे. त्याला तो देश आवडायला लागला होता. इराणी सभ्यता, तिथली सुंदर शहरं यांचं वर्णन करताना संजय थकत नसे. 
हळूहळू माझ्या मनातल्या इराणच्या चित्रावरचे नकोसे वळसे पुसट व्हायला लागले आणि मलाही उत्सुकता वाटायला लागली. खरंतर इराण आपला तसा शेजारीच. तेहरानला जायचं तर आधी दुबई गाठायची की पलीकडेच इराण!
- त्या दिशेचा पहिला प्रवास अजून आठवतो.
दुबईहून विमान उडालं, तेव्हा उत्सुकता होती मनात. खोटं कशाला सांगू, भीतीही होती! की आता काय बघायला, अनुभवायला मिळतंय कोण जाणे! मला धीर देणारी माणसं दोन होती! एक माझा नवरा आणि दुसऱ्या मीना प्रभू! इराणला जायचं ठरल्यावर त्यांच्या ‘गाथा इराणी’ची पारायणं करून झाली होती. त्या पुस्तकात मीनाताई सांगत होत्या, की शहरं सुंदर आहेत. माणसं फार प्रेमळ आहेत. जीव लावतात. दुबईहून पुढे जाणाऱ्या विमानात सगळी गर्दी गोऱ्यापान, नाकेल्या, अतीव देखण्या पुरुषांची... आणि नजर खिळून राहावी इतक्या सुंदर स्त्रियांची. सगळ्यांचे पोशाख पाश्चात्त्य. कुणाच्याही डोक्याला हिजाब नाही. बुरख्याआड लपलेले चेहरे होते पण अगदीच मोजके!
दीडेक तासातच विमान तेहरान विमानतळावर उतरलं. रात्र झालेली. हवेत चांगलच गारठा. विमानातून बाहेर पडण्याआधीच सगळ्या बायकांनी पटापट डोक्याला रुमाल बांधले. मीही बांधला. म्हटलं, चला, आलो इराणमध्ये!
विमानतळापासून तेहरान हे मुख्य शहर बरंच दूर आहे. आम्ही इमिग्रेशनपाशी आलो, तेव्हा लक्षात आलं ‘फॉरीन’ लिहिलेल्या खिडकीसमोरच्या रांगेत आम्हा दोघांबरोबर अगदीच मोजकी माणसं होती. म्हणजे आमच्याबरोबर आलेल्या प्रवाशांमधले बहुतेक स्थानिक इराणी नागरिकच होते. सगळ्या बायकांचे चेहरे झाकलेले. एकही कुणी दिसेना.
...आणि बाहेर पडताना प्रत्येकाचं अक्षरश: ओसंडून वाहणारं सामान! पंचवीसेक वर्षांपूवी आपण भारतीय नाही का दुबई आणि सिंगापूरहून येताना भरभरून प्रचंड सामान आणायचो, तस्संच!
- पहिल्यांदा तेहरान दिसलं ते रात्रीच्या अंधारात गुडूप झालेलं. सुनसान. पण नंतर मग या शहराशी मैत्री जुळायला वेळ लागला नाही. पुढली तीन वर्षं - म्हणजे २०१२, २०१३, २०१४ या दरम्यान संजयच्या कामानिमित्त आम्ही इराणला जाऊन-येऊन राहिलो. भाषेचा अडसर मोठा होता, त्यामुळे संभाषणाची गाडी सतत अडखळत चाले. ‘ओळख’ ‘मैत्री’पर्यंत पोचायची, तर भाषेचा पूल हवा. तो बांधताना फार अडचणी आल्या; तरीही या इराणने माझ्या मनात जागा केली ती केलीच!
आता वाटतं, इराणविषयी इतकी भीती का होती आपल्या मनात?मध्यंतरी एका लेखात वाचलं होतं की भारतीयांना इतर देशांबद्दल माहिती घेण्याची खूप उत्सुकता असते. आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण, इतर देशांतील घडामोडी, त्या राष्ट्रांशी असलेले भारताचे संबंध हे वाचायला, जाणून घ्यायला आवडतं. पण आपण आपली मतं पाश्चात्त्य माध्यमांचे कार्यक्रम, सिनेमे पाहून, पुस्तकं वाचून ठरवतो. आणि हे चित्रण पक्षपाती असू शकतं, याचा साधा विचारही करत नाही. थोडक्यात त्यांना हवं तसं जनमत बनवण्याचा प्रयत्न ही माध्यमं करतात आणि त्यांच्या डावाला बळी पडणाऱ्यांमध्ये भारतीयांचा नंबर फार वरचा आहे. - ही गोष्ट मला एकदम पटली, कारण ‘इराण’!!
१९७८ पर्यंत अमेरिकेचा जवळचा मित्र असणारा इराण त्यांचा शत्रू झाला. मग इराणबद्दल अतिशय नकारात्मक माहिती या पाश्चात्त्य माध्यमांनी सर्वच जगात हेतुपुरस्सर पसरवली. अर्थात खोमेनींचे भीतीप्रद फोटो आणि त्यांनी काढलेले फतवे यांनी हे काम अधिकच सोपं केलं. पण कसा आहे खरा इराण आणि इराणी माणूस? २०१२ ते २०१४ या दरम्यानचा इराण मी पाहिला. त्यावेळेस खरं तर इराणची परिस्थिती कठीण होती. पश्चिमी देशांनी घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे व्यापारावर, देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर ताण आला होता. तेहरान हे प्रगत वाटावं असं शहर आहे, पण एक प्रकारचा जुनेपणा या सर्वांवर साचून राहिला होता. आम्ही सुरुवातीला हॉटेलमध्ये राहत होतो. 
२/3 आठवड्यांसाठी जायचो आणि परत यायचो. या काळात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी खूप मदत केली. इथे फारसी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. या भाषेतच शिक्षण घेतलं पाहिजे अशी सक्तीच येथे आहे. महाविद्यालयात गेल्यावर इंग्रजी भाषा सगळे शिकतातच. पण फारसी भाषेचं प्राबल्य सगळीकडेच!
इराणी माणूस फारसी भाषेवर अपरंपार प्रेम करतो. पण दुर्दैवाने झोराष्ट्रीयन धर्म त्याला पाळता येत नाही. काही ठिकाणी प्राचीन अग्निमंदिरं आहेत. एक ऐतिहासिक ठेवा म्हणून ती दाखवतात. इराणी माणूस वर्षाचं कॅलेंडर मात्र प्राचीन झोराष्ट्रीयन धर्माचंच पाळतो. त्यांचं नववर्ष २१ मार्चला सुरू होतं. महिनेही जुन्या कॅलेंडरप्रमाणे पाळले जातात. आपण पर्शियन आहोत, मुस्लीम असलो तरी अरबी नाही याची जाणीव त्यांना कायम असते. अरबांपेक्षा आपण वेगळे आहोत, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहोत ही भावना त्यांच्या मनात सतत जागती असते. कुराणचं त्यांनी फारसी भाषेत भाषांतर केलं आहे. धर्म इस्लाम असला, तरी आजही नोरुझ, मेहेरगन, याल्डा हे पर्शियन सण इराणी माणूस उत्साहात साजरे करताना दिसतो. 
मुस्लीम जगात इराण हाच एक शिया मुसलमानांचा देश आहे, हे ते जाणतात. सौदी अरेबियामध्ये सुन्नीपंथीय मुसलमान आहेत. बाकीच्या येमेन, बहारिन, आखाती देश, इराक, सीरिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथे शिया-सुन्नी दोन्ही पंथ राहतात. शिया मुसलमानांचे नेतेपण त्यांच्याकडे आहे हे ते समजून आहेत. इराणमध्ये हिजाब घालणं बंधनकारक आहे. पण स्त्रियांवर शिक्षण, नोकरी, गाडी चालवणं याबाबतीत बंधनं नाहीत. इराणी स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात. नोकरी करतात. पण कायद्याने त्यांना कमी अधिकार आहेत. या सगळ्याचा गोंधळ त्यांच्या मनात दिसून येतो. 
आम्ही इराणमध्ये असताना आर्थिक निर्बंधांमुळे एक साचलेपणा तिथे जाणवत असे. इराणी चलन रियाल घसरलं होतं. असं असूनही इराणमध्ये दारिद्र्य मात्र कधी दिसलं नाही. 
सामाजिक बंधनं आणि आर्थिक कोंडीमुळे एक प्रकारची निराशा मात्र लोकांमध्ये दिसत असे. इराण सोडून बाहेरच्या देशांत स्थायिक होण्याचा मार्गही काहीजण स्वीकारताना दिसत होते. तिथे राहत असताना इराणी माणूस कसा आहे याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. भाषा हा मुख्य अडसर. शिवाय पटकन संवादात येणारे अडथळे. थोडासा बिचकलेपणाही! 
दिसायला अतिशय देखणी असणारी ही इराणी माणसं, यांच्या अंतरंगात काय दडलंय हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांचा इतिहास थोडा तपासावा लागतो.
त्याबद्दल पुढच्या रविवारी...

(लेखिका बंगलोरमध्ये वास्तव्याला आहेत)

snehasanjayketkar@gmail.com

Web Title: Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.