कॅथरीन दनेव्ह सादर करीत आहे..
By Admin | Updated: May 16, 2015 14:32 IST2015-05-16T14:32:42+5:302015-05-16T14:32:42+5:30
जगभरातून आलेले सिनेमाचे वारकरी फ्रान्सच्या या छोटय़ा गावात जमले आहेत. मी त्यांच्यातलाच एक. इतकी र्वष येतो इथे, पण उत्सुकता तेवढीच आहे अजून! आता पुढले काही दिवस निळं, निरभ्र कान आणि ज्यासाठी इथे आलो, ते सिनेमे! - आणखी काय हवं?

कॅथरीन दनेव्ह सादर करीत आहे..
>
कान डायरी : 2
- अशोक राणो
काय ही ट्रॅफिक? कशी चालवणार गाडी?’’
माझा टॅक्सी ड्रायव्हर पार कावला होता. निस एअरपोर्टहून तासाभराचा प्रवास करून आल्यावर मी कानच्या बसस्टँडवरून टॅक्सी करून माङया हॉटेलवर चाललो होतो. रस्त्यावर वाहनं होती बरीच आणि धीम्या गतीनेही चालली होती. परंतु मुंबईचं ट्रॅफिक मी पाहिलेलं असल्यानं ‘‘कसलं हे कानचं ट्रॅफिक?’’ असं म्हणताच फ्रेंच टॅक्सीचालक म्हणाला,
‘‘मुंबई खूप मोठ्ठं शहर आहे, पण या टीचभर गावाची काय ही अवस्था? शीùù वैताग नुसता.’’ भाऊसाहेब जामच वैतागले होते.
‘‘फिल्म फेस्टिव्हल सुरू होतोय, ट्रॅफिक..’’
‘‘हे फेस्टिव्हलचं नाही, नेहमीचीच रडकथा आहे ही.’’ - मला मध्येच थांबवत व्हीलवर जोराचा दणका देत तो म्हणाला, ‘‘गाव केवढं, गाडय़ा केवढय़ा. हल्ली काय कुणीही सोम्यागोम्या गाडी घेतो. त्यात उद्यापासून लाँग हॉलिडे. सलग चार दिवस सुट्टी. मग काय बघायलाच नको.’’
एका वळणाशी खूप वेळ थांबावं लागलं. पुढे गाडय़ाच गाडय़ा. यानं दोनतीनदा हॉर्न वाजवला. इथे सहसा कुणी हॉर्न वाजवित नाहीत. काही उपयोग झाला नाही. मग त्याने गाडी पुढे काढली.
‘‘सॉरी, आता थोडं पुढचं वळणं घेऊन जावं लागणार.’’
मी ‘ठीक आहे’ म्हणण्यापलीकडे काय करू शकत होतो. आठेक युरोला पडणारा प्रवास मला चौदा युरोला पडला. तर कानने माझं स्वागत हे असं केलं. तरीही या ट्रॅफिक ज्ॉममध्ये मला दोन गोष्टी आठवल्याच. एक सिनेमातली, तर दुसरी प्रत्यक्षातली.
‘हॅपी अॅनिव्हर्सरी’ नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. तिचा लेखक-दिग्दर्शक हा आताचे जगप्रसिद्ध नाटककार आणि पटकथाकार ज्याँ क्लॉद कॅरिए आहेत. दहा मिनिटांच्या या फिल्ममध्ये एक जोडपं आपल्या लगAाचा वाढदिवस साजरा करणार आहे. ती घरी वेगळी तयारी करून त्याची वाट पाहते आहे आणि तो तिच्यासाठी गिफ्ट, फुलं आणि सेलिब्रेशनसाठी वाइन घेत फिरतो आहे आणि शहरात तुफान ट्रॅफिक ज्ॉम आहे. तो त्यात सापडल्यामुळे घरी लवकर पोहचू शकत नाही. तोच नाही तर आणखीही खूप लोक या ट्रॅफिक ज्ॉममुळे कुठे कुठे अडकून पडले आहेत. अतिशय खेळकर शैलीत याचं चित्रण केलं आहे. इकडे वाट पाहून कंटाळलेली पत्नी खाऊन-पिऊन टेबलावरच गाढ झोपी जाते. एकदाचा नवरा घरी येतो आणि मग तिला डिस्टर्ब न करता एकटाच सँडविच खातो. त्यांच्या सगळ्या आनंदावर विरजण टाकणारा व्हिलन आहे. ट्रॅफिक ज्ॉम! ही फिल्म आहे 1961 ची.
दुसरा अनुभव आपल्या कोलकात्याचा. विसेक वर्षे तरी झाली असतील. मी टॅक्सीला हात दाखवित उभा होतो. ब:याच वेळाने एक रिकामी टॅक्सी आली. थांबली. मी चौरंघी म्हणताच ड्रायव्हर एकदम गयावया करीत म्हणाला,
‘‘साब, कही और चलना है तो बोलो. आपको अमरिका भी लेके चल सकता हूँ, मगर चौरंघी नही.’’ मला ट्रॅफिकची रडकथा माहीत होती. मी म्हटलं,
‘‘अरे भाई, ट्रॅफिक तो बडे शहरों में होगा ही, और तुमको क्या भाडा ज्यादा मिलेगा. हमारी मंझील आयेगी नही और तुम्हारा मीटर रुकेगा नही.’’
तो अधिकच कळवळून म्हणाला,
‘‘साब नही चाहिए ऐसे पैसे जो हमको पागल कर देंगे.’’
मी हे माङया टॅक्सीचालकाला सांगितलं नाही, कारण त्याचं उत्तर मला माहीत होतं,
‘‘बट धीस इज अ स्मॉल टाऊन..’’
पण फ्रान्समधलं कान हे छोटंसं गाव 68 व्या महोत्सवासाठी सज्ज झालंय. म्युनिकहून निससाठी निघालेल्या विमानापासूनच त्याची चाहूल लागत चालली होती. तिथेच काही ओळखीचे, बीन ओळखीचे वारकरी भेटले आणि आमच्यासाठी औपचारिक उद्घाटनाआधीच कान महोत्सव सुरू झाला. बोलता बोलताच गेल्या वर्षीच्या आणि त्या आधीच्या आठवणी निघाल्या. गेल्या वर्षीच्या ‘व्हाइट गॉड’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या कुत्र्यालाच कसा दिग्दर्शक प्रेङोन्टेशनच्या वेळी व्यासपीठावर घेऊन आला आणि तेही त्याला बो टाय बांधून आणि उडालेली धम्माल वगैरे वगैरे.. क्षणाक्षणाला लखलखत्या कॅमे:याला पोजेस देताना जत्रेत हरवलेल्या छोटय़ा मुलासारखा वावरणारा जगप्रसिद्ध वयोवृद्ध अवलिया दिग्दर्शक ज्याँ लूक गोदार.. असं बरंच काही. निसपासून कान बसने एक तासाच्या अंतरावर आहे. तेवढय़ा प्रवासात जागोजागी महोत्सवाचे पोस्टर्स! त्यावर असलेलं इन्ग्रिड बर्गमनचं छायाचित्र! तिच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने कानचं अभिवादन!
हॉटेलवर सगळं आवरल्यानंतर मी प्रथम गाठलं ते महोत्सवाचं प्रमुख ठिकाण पॅलेस द फेस्टिव्हल! अतिशय भव्य आणि दिमाखदार अशा या संकुलात थिएटर्स, अवाढव्य फिल्म मार्केट, प्रेस कॉन्फरन्स, चर्चासत्र आदिंसाठीचे मोठमोठे हॉल्स आणि कितीतरी गोष्टी.. अंडर वन रुफ म्हणतात तसं! माझं प्रेसकार्ड, प्रेसकीट घेऊन मी पत्रकार कक्षात जाऊन बसलो आणि अभ्यासाला लागलो. इथे पहिल्या दिवसापासून गृहपाठ. रोज किती, कोणते आणि कुठल्या थिएटरमध्ये पहायचे आणि याचबरोबर इतर कोणकोणत्या कार्यक्रमांना हजेरी लावायची याची नीट आखणी करून एक टाइमटेबल बनवावं लागतं. पोटपाणी अधल्या मधल्या वेळी आणि संधी मिळेल त्याप्रमाणो. नेहमीच्या सवयीप्रमाणो मी माझं टाइमटेबल बनवायला बसलो. दरम्यान कुणी तरी येऊन. ‘हेù व्हेन डीड यू अरायव्ह.. गूड टू सी यू अगेन.. एन्जॉय द फेस्टिव्हल.. लेट्स कीप मीटिंग..’ असं बोलून, भेटून जात होतंच.
कानमध्ये अखंड लगबग आहे. वारक:यांबरोबर टुरिस्टही एखादं पर्यटनस्थळ पाहावं तसं जत्थ्याजत्थ्याने महोत्सवाच्या आवारात वावरत आहेत. सुप्रसिद्ध रेड कार्पेटवर सिक्युरिटीला गयावया करीत सेल्फी काढून घेताना साध्या पोझमध्ये नव्हे, तर जगभरच्या तारेतारकांच्या पोझमध्ये काढणं चाललं आहे. आपापली समज आणि आवडीनुसार प्रत्येकाला कानचं आकर्षण आहे हेच यातून दिसून येतं.. बाकीच्यांचं माहीत नाही, मी तरी अगदी उतावीळ होऊन प्रतीक्षा करतोय अडुसष्टाव्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ओपनिंग फिल्मची! तो आहे फ्रान्सचा ‘स्टँडिंग टॉल’! इम्येन्युल बार्कोचा हा नवाकोरा चित्रपट पाहायची माझी ती उत्सुकता शिगेला पोचलीय. (अर्थात हा लेख प्रसिद्ध होईर्पयत महोत्सवाचे चार दिवस उलटलेले असतील.)
‘स्टँडिंग टॉल’मध्ये आहे माझी आवडती अभिनेत्री कॅथरीन दनेव्ह!.. आणखी एक वहिदा रेहमान! तिचा आजवर मी एकही चित्रपट चुकविलेला नाही. तिच्या अभिजात अभिनयाचा दरवर्षी नवा साक्षात्कार पहायला मिळतो.. सो अॅट एनी मोमेंट द कर्टन ऑफ सिक्स्टीएट्थ कान फिल्म फेस्टिव्हल विल गो अप.. आणि मी ऐकीन, ‘कॅथरीन दनेव्ह सादर करत आहे..’
अवघी पंचक्रोशी भारावलेली!
कान हा जगातला क्रमांक एकचा महोत्सव आणि जगभरच्या महोत्सवाच्या वारक:यांसाठी पंढरी म्हणून जसा प्रसिद्ध आहे, तसंच त्याचं समर रुपडं प्रचंड आकर्षित करणारं आहे.
दहा अकरा अंश तपमान, आकाशात निळं, निरभ्र आणि सगळा परिसर उन्हात न्हाऊन निघालेला. युरोपियन लोकांना उन्हाचं कौतुक! आपल्याला ऊन म्हणजे अक्षरश: ताप! परंतु इथल्या उन्हात आपल्यालाही बरं वाटतं. ऊन अंगावर घेणं किंवा ऊन खाणं याचा छानसा अनुभव. गेले काही दिवस मुंबईच्या प्रचंड घामेजल्या वातावरणाला कंटाळलेला मी कानची यासाठीही वाट पाहत होतो. घामाघुम होत दिवस मोजत होतो आणि आज इथलं ऊन, सौम्यसं बोचरं वारं अनुभवतो आहे. अवघं वातावरणच छानसं प्रसन्न आणि उबदार झालंय. महोत्सवाचा छान मूड तयार झालाय आणि पुढच्या दहाबारा दिवसांची सारी धावपळ ङोलायला सज्ज झालाय. महोत्सवाचा परिसर, खरं तर अवघा गाव, नव्हे अवघी पंचक्रोशी याच वातावरणाने भारावलेली आहे. रस्ता, दुकानं, समुद्र कुठेही जा. हेच चित्र!
(सध्या कान महोत्सवासाठी उपस्थित असलेले लेखक ख्यातनाम चित्रपट समीक्षक आणि जगभरच्या चित्रपट-संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)