जिव्हाळ्याची मैफल
By Admin | Updated: May 2, 2015 17:52 IST2015-05-02T17:52:01+5:302015-05-02T17:52:01+5:30
कुसुमाग्रज, विंदा, कानेटकर, ग्रेेस, श्रीपु, तारा वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, गंगाधर गाडगीळ, दुर्गा भागवत. अशा प्रतिभावंतांच्या आयुष्याबद्दल सामान्यांना नेहमीच कुतूहल असतं. रामदास भटकळ यांना या सा:यांचा ‘जिव्हाळा’ लाभला. त्यातूनच एकाआगळ्यावेगळ्या नात्याचं अलवार रुप समोर उलगडत जातं.

जिव्हाळ्याची मैफल
>राग-लोभासह व्यक्त होणारे प्रतिभावंतांचे गूज.
- स्वानंद बेदरकर
ज्यांची पुस्तके वाचून आपण स्वस्थ किंवा अस्वस्थतेच्या हिंदोळ्यावर झुलत राहतो, त्या प्रतिभावंतांचे जीवन जाणून घेण्याचे कुतूहल असते. जेव्हा तिथे जशी जागा मिळेल, त्या वेळेस अगदी दरवाजा किलकिला करून का होईना पण पाहण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतो. त्यामागची कारणमीमांसा व्यक्तिपरत्वे बदलत गेली तरी ती ‘कुतूहल’ या शब्दाखाली मोडतेच मोडते. म्हणूनच चरित्र, आत्मचरित्र आणि व्यक्तिचित्रण वाचणा:यांचे प्रमाण मोठे असते. माणूस आणि तद्नुषंगाने जगणो समजून घेण्याचा तो प्रयत्न असतो.
तारा वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, श्री. पु. भागवत, गंगाधर गाडगीळ, वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर, ग्रेेस ही मराठी साहित्यातील श्रेष्ठ माणसे. यातील दोघांना तर ज्ञानपीठ मिळालं, उर्वरित सगळेच ज्ञानपीठाच्या तोडीचे होते. मराठी वाचकांमध्ये या सर्वाबद्दलच अपार आदर आहे. श्रीपु सोडता या सगळ्यांमधील एक समान धागा म्हणजे ही मंडळी पॉप्युलर प्रकाशनाचे लेखक आहेत. प्रकाशक रामदास भटकळ यांना या सर्वाचे मैत्र लाभले. खूप जवळून ही सगळी माणसं त्यांना पाहता आली, किंबहुना त्या सर्वाच्या मनात स्वतंत्र स्थान मिळण्याचे भाग्यही रामदासांना लाभले. त्याच स्नेहाद्र्रतेची मैफल म्हणजे ‘जिव्हाळा’ हे पुस्तक होय. लेखक रामदास भटकळ यांचे प्रकाशक दिलीप माजगावकर यांनी प्रसिद्ध केलेले हे दुसरे पुस्तक ‘जिगसाँ’ नंतरचे जिव्हाळा.
संगीताच्या भाषेत सांगायचे तर एकूण दहा लेखांची ही रागमाला आहे. प्रत्येक रागाला त्याचे म्हणून एक सौंदर्य असते. नजाकत असते. भावव्याकूळ करणारी स्वरांची ठेवण असते. गायक त्याची मांडामांड कशी करतो यावर दाद अवलंबून असते. जिव्हाळ्याचे लेखक रामदास भटकळ हे आता लेखनातील उत्कृष्ट गायक म्हणून जिगसॉँपासून परिचित आहेतच; पण ते शास्त्रीय संगीतातील चांगले गायक असल्याचेही अनेकांना ज्ञात आहे. त्यामुळे जिव्हाळ्याची मैफल वाचकाला तृप्तीचा मार्ग दाखवत-दाखवत आनंदाच्या ठिकाणी आणून सोडते. ती केवळ या पुस्तकातील युग प्रवर्तक व्यक्तींच्या रामदासांना लाभलेल्या जिव्हाळ्यामुळे, असामान्य यश लाभलेल्या व्यक्ती माणूस म्हणून या पुस्तकातील शब्दांना रेलून उभ्या असलेल्या दिसतात. रेलून उभे असण्यात एक प्रकारचा विश्वास आणि आस्थेवाईकपणा असतो. तो विश्वास भटकळांबद्दल यातील प्रत्येक लेखकाला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ अशी यातील लेखकांची अवस्था होत असे. त्या-त्यावेळी त्यांनी रामदासांना पोटातून हाक मारल्याचे आणि भटकळांनीही तिला तत्परतेने ओ दिल्याचे जाणवते. अशा नात्यामुळे या सर्वच लेखकांचे गूज त्यांच्या राग-लोभासह या पुस्तकात येते.
तारा वनारसे यांच्यावरील पहिल्याच लेखासाठी रामदास पत्र हा वा्मयप्रकार वापरतात. त्यांना लिहिलेले पत्र दोघांमधील स्नेह उलगडत-उलगडत लेखिका आणि व्यक्ती म्हणून वनारसेंचे स्थान काय होते हे निश्चित करण्याचा खूपच चांगला प्रयत्न या लेखात आहे. मुळात पत्र हा फॉर्म आणि त्यात तारा यांचा रामदास यांना लाभलेला जिव्हाळा, यामुळे एका वेगळ्याच उंचीवर हा लेख जाऊन उभा राहतो. पुस्तकाच्या शीर्षकाची शब्दामागची हळुवारपणाची आणि ओलाव्याची पूर्ण शक्ती या लेखासह ज्ञानेश्वर नाडकर्ण्ीवरील ‘कलासक्त’ या लेखात अवतरली आहे. या संग्रहातील प्रत्येक लेखाला लाभलेले शीर्षक आणि त्यातून भटकळांनी त्या व्यक्तीला एका शब्दातून पकडण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल. 1) वरदान-तारा वनारसे, 2) कलासक्त- ज्ञानेश्वर नाडकर्णी, 3) वलय- श्री.पु.भागवत, 4) नंदनवन- गंगाधर गाडगीळ, 5) ऊनपावसाच्या शोधात- वसंत कानेटकर, 6) उंच जिथे माथा-दुर्गा भागवत, 7) कविवरा- कुसुमाग्रज, 8) आनंद गोविंद- विंदा करंदीकर, 9) संधिकाल- ग्रेस, 1क्) रणांगण : स्नेहबंधाचं..असे हे दहा लेख आहेत.
श्रीपुंवरील मराठी लेखक-प्रकाशकांचा असणारा स्नेह सर्वपरिचित आहे. त्या एका श्रद्धेयत्वाचा आदर आहे. तोच ‘वलय’मध्येही वाचायला मिळतो; मात्र त्यात प्रकाशक रामदास भटकळ टप्प्या-टप्प्यावर वाचकाला भेटतात. त्यामुळे वरदान आणि कलासक्तचा परिणाम हा लेख साधत नसला तरी ‘वलय’ या शब्दातून प्रतीत होणारी भावना लेखक इथे व्यक्त करीत राहातो. गंगाधर गाडगीळ हे पॉप्युलरचे पहिले लेखक. गाडगीळांची ज्ञानपिपासू आणि व्यवहारी वृत्ती अतिशय विस्ताराने लेखक मांडतो. त्यांच्या व्यक्तिगत जीवनापासून ते सामाजिक आयुष्यार्पयतची सर्वच महत्त्वाची स्थित्यंतरे रामदासांनी पाहिलेली असल्याने लेख फारच माहितीपूर्ण झाला आहे. नवसाहित्याचे त्यातही कथेचे जनक म्हणून मराठी वा्मयात गाडगीळांचे स्थान असामान्य ठरले. याच काळात तिकडे नाटय़क्षेत्रत विजया मेहता आपल्या प्रयोगशीलतेमुळे स्वतंत्र तेजाने तळपत होत्या; मात्र ‘ज्योत्स्ना आणि ज्योती’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलेले हे दोन दिग्गज आणि त्यानंतर गाडगीळांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यातील तणावांमुळे आलेला ताण भटकळांनी स्वच्छपणो लिहिला आहे. या प्रकारामुळे परस्परांच्या मैत्रीत पडलेला मिठाचा खडा जेव्हा लेखक लिहितो, तेव्हा या व्यक्तिचित्रणाचे वेगळे महत्त्व जाणवू लागते.
ऊन पावसाच्या शोधात फिरणं आणि नियतीनं फिरायला लावणं यात मोठा फरक आहे; पण हा फरक दाखवणारी सीमारेषा इतकी धूसर आहे, की त्यामुळे अशी आयुष्यं आपण एकत्र करून टाकतो. वसंत कानेटकर नावाचा मराठीतला एक मोठा नाटककार की ज्यांच्या प्राक्तनात ऊन-पाऊस आलेत. ते त्यांच्या शोधात फिरले आणि नियतीनेही त्यांना फिरवलं. अशा दोन्ही बाजू त्यातील धूसर सीमारेषेला ठसठशीत करीत रामदास इथे दाखवतात. एखादा नाटककारही चक्रवर्ती सम्राटाची मिरास मिरवू शकतो हे कानेटकरांनी मराठी नाटय़क्षेत्रला दाखवून दिले; मात्र सम्राटालाही भोग चुकत नाही ते कसे हे रामदासांनी या लेखात दाखवून दिले आहे. हा लेख वाचून करुणोच्या दोन रेघा वाचकाच्या मनात उमटतात. त्यातील एक असते वसंत कानेटकरांबद्दल आणि दुसरी असते त्यांच्या पत्नी सिंधुताईंबद्दल या दोन्ही रेघांमधील मोठी आणि लहान कोणती हे मात्र वाचकपरत्वे बदलू शकेल. एवढे नक्की की कानेटकरांचे रसरशीत व्यक्तिमत्त्व पकडण्यात भटकळांमधील लेखक यशस्वी झाला आहे.
दुर्गा भागवतांचे चैतन्यमूर्ती असणो आणि कुसुमाग्रजांचे श्रद्धेय असणो पुढच्या दोन्ही लेखांत येते. आधीच्या लेखांमधील व्यक्तिगत जीवनप्रणालीचा धागा या दोन्ही दिसत नाही. आनंद-गोविंद हा विंदा करंदीकर यांच्यावरील लेख विंदांचे अभिजात रसिकपण सांगतो. साहित्य-संगीत यात रस घेणारे विंदा पॉप्युलर आणि रामदास यांच्या प्रेमात कसे होते, पुस्तके प्रकाशित होतानाचे लेखकाच्या आयुष्यातील टप्पे कसे असतात यावर प्रकाशझोत टाकत भटकळ विंदांचे विचारवंत, तत्त्वज्ञ असणो अधोरेखित करतात. कलास्वादात आनंद मानणा:या विंदांचे आनंदमूर्ती असणो या लेखात येते.
स्वत:ला दु:खाचा महाकवी म्हणवून घेणारे ग्रेस ‘संधिकाल’ या लेखात येतात. संधिकाल हा जसा समजण्यास गूढ आणि आवाक्यात यायला धूसर असतो तसेच ग्रेसचे व्यक्तिमत्त्व. एक प्रकारचे अनाकलनीयपण भरून घेतलेला हा माणूस रामदासांना हृदयस्थ मानत असे, त्यामुळे ग्रेसच्या काही व्यक्तिगत गोष्टींबरोबरच सामाजिक जगण्याच्या प्रक्रियेवर लेखक इथे प्रकाश टाकतो. ग्र्रेसच्या कौटुंबिक आयुष्यात निर्माण झालेला तणाव ते त्यांच्या प्रतिभासामथ्र्यार्पयतच्या एका विराटपटावर बरोबर असताना आलेले अनुभव या लेखात आहेत. एका मर्यादेनंतर कुणालाही आत प्रवेश करू न देणारे ग्रेस रामदासांबरोबर कसे सगळे शेअर करीत असत हे लेखात वाचकाला मिळते. त्यामुळे कलावंत, कला आणि माणूस याबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरेही त्याला सापडू शकतात. ‘रणांगण : स्नेहबंधाचं हा या मालेतील शेवटचा लेख. मालती बेडेकर, विश्रम बेडेकर, ह.वि. मोटे आणि कृष्णाबाई मोटे या लेखक- प्रकाशक- दाम्पत्यांबरोबर रणांगणच्यानिमित्ताने आलेला संबंध, त्यातील स्नेह ही या पुस्तकाची भैरवी आहे. सर्वच लेखांना असणारा प्रेमाचा भाव, त्या त्या व्यक्तींनी रामदासांना आणि रामदासांनी त्यांना दिलेला भावनिक-मानसिक आधार रामदासांचे आयुष्य उबदार करणारा ठरला आहे. त्या उबेला पकडणारे सुभाष अवचट यांचे मुखपृष्ठ आणि राजहंस प्रकाशनची दिमाखदार निर्मिती पुस्तकाला सुंदर करणारी ठरली आहे.
पुस्तकाचे नाव : जिव्हाळा
लेखक : रामदास भटकळ
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
किंमत: ४०० रुपये