भारतीय मजुरांची आखाती छळछावणी
By Admin | Updated: November 22, 2015 17:58 IST2015-11-22T17:58:53+5:302015-11-22T17:58:53+5:30
कामाच्या शोधात आणि पैशाच्या अपेक्षेनं आखाती देशात जाणा:या भारतीयांचं प्रमाण किती असावं? एकटय़ा सौदी अरेबियात जवळपास 28 लाख भारतीय कामगार आहेत. दररोज एक हजार मजूर तिथे जाऊन थडकतात. सुमारे पाच लाख भारतीय मोलकरणी सौदी, कुवेत, कतार, बाहरीन, युनायटेड अरब अमिरात आणि ओमान येथे दिवसरात्र राबून आपला मेहनताना भारतातील कुटुंबीयांना पाठवतात. तिथे काय काय करतात ते? काय होतं त्यांचं? त्याचीच ही थरारक कहाणी.

भारतीय मजुरांची आखाती छळछावणी
>रवींद्र राऊळ
सौदी अरेबियात कामासाठी जाणारे अनेक जण. घरात पडेल ते काम करणा:या अशिक्षित, अल्पशिक्षित महिला मोलकरणींचं त्यातलं प्रमाण लक्षणीय.
कस्तुरी मुनिरथिनम ही 58 वर्षीय अशीच एक भारतीय महिला. तिच्या सौदी मालकिणीनं तिचा उजवा हातच कापून टाकला! नुकत्याच घडलेल्या या घटनेने आखाती देशात होणा:या भारतीय कामगारांचा छळ पुन्हा एकदा प्रकाशात आला आहे.
का कापला तिचा हात?
गेल्या काही महिन्यांपासून होणा:या असह्य छळापासून सुटका करून घेण्यासाठी आपल्या मालकिणीच्या घरातून पळ काढण्याचा प्रयत्न तिनं केला. तिच्या या ‘अपराधा’ची शिक्षा म्हणून कस्तुरीचा थेट हातच कापून टाकण्यात आला.
या घटनेचा निषेध करीत भारत सरकारने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर भारतातून महिला घरेलू कामगार पाठवणं बंद करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र गेली अनेक वर्षे सातत्याने भारतीय मजुरांच्या अनन्वित छळाचे असे अनेक प्रकार आखाती देशांत होऊनही आतार्पयत त्याविरोधात परिणामकारक हालचाल न झाल्याने आता या घटनेनंतरही त्याला आळा बसेल का, याबाबत भारतीय कामगार साशंकच आहेत.
भारतात रोजगाराची संधी नसल्याने हतबल झालेले हजारो कामगार ब:यापैकी कमाई होईल या आशेने नशीब आजमावण्यासाठी परदेशात जातात. उच्चशिक्षित अमेरिका, युरोपमध्ये धाव घेतात, तर अशिक्षित, अर्धशिक्षित कामगार आखाती देश गाठतात. त्यात वेल्डर, फिटरसारखं तांत्रिकी काम करणा:यांपासून ड्रायव्हर, वेटर, हेल्पर, घरेलू कामगार, माळी अशा कुशल - अकुशल कामगारांचा भरणा असतो.
एकटय़ा सौदीमध्येच दररोज सुमारे एक हजार मजूर कामाच्या शोधात जाऊन थडकतात. काही र्वष परदेशात काम करून ब:यापैकी पैसे गाठीशी बांधावेत, या अपेक्षेने गेलेल्या बहुसंख्य कामगारांचा तेथे जाताच मात्र भलताच भ्रमनिरास होतो. ज्या कामासाठी बोलावलेलं असतं अथवा रिक्रूट एजंटने जे आश्वासन दिलेलं असतं ते काम न देता भलतीच कामं गळ्यात मारली जातात. मग कॅफेटेरिया, सुपर मार्केट, बांधकामांची ठिकाणं, गेस्ट हाऊसमध्ये पडेल ते काम अशा कामगारांना करावं लागतं. आपल्याकडे असेल नसेल ते विकून, कर्ज काढून दुस:या देशांत आलेल्यांना परत फिरण्याचा मार्ग असाही बंदच झालेला असतो. ‘पैसा मिळतोय’ याच कारणानं मग ते तिथे राबत राहतात. बहुतांश वेळा जे ‘आमिष’ दाखवलेलं असतं, तेवढा पैसा मिळत नाहीच, मरेस्तोवर राबावं मात्र लागतं.
कामाच्या शोधात आखाती देशांत जाणा:या भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. सुमारे 24 ते 28 लाख भारतीय कामगार एकटय़ा सौदी अरेबियात आहेत. यात महिलांचं प्रमाणही बरंच आहे. जवळपास पाच लाख भारतीय मोलकरणी सौदी, कुवेत, कतार, बाहरीन, युनायटेड अरब अमिरात आणि ओमान येथे दिवसरात्र राबून आपला मेहनताना भारतातील कुटुंबीयांना पाठवतात. तेथे जणू त्यांच्याकडून वेठबिगारीच करून घेतली जाते. बेबी सिटरपासून हाऊसकिपिंगर्पयत सारी कामं सोपवली जातात. नशिबी असं गुलामीचं जिणं आलं की त्या महिला वा पुरुष तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यातून छळचक्र सुरू होतं आणि कस्तुरीवर प्रसंग गुदरला तशा संकटाला तोंड द्यावं लागतं. आज असे हजारो भारतीय महिला आणि पुरुष कामगार प्राण कंठाशी आणून मायदेशी परतण्यासाठी धडपडत असल्याचं दिसून येतं. कामावर रुजू होताच मालक त्या कामगाराचा पासपोर्ट आपल्या ताब्यात घेतो. परतीचे दोर तेथेच कापले जातात. जेव्हा मालकाची मर्जी असेल तेव्हाच आपल्या देशात परतण्यासाठी कामगाराला तो परत केला जातो. या पद्धतीचा फायदा घेऊन कामगारांना राब राब राबवलं जातं. काम पसंत पडलं नाही तरी हाती पासपोर्ट नसल्याने आपल्या देशात परतणार तरी कसं? कारण मालकाने पासपोर्ट आपल्या ताब्यात ठेवलेला असतो. मालकाकडून ‘एक्ङिाट परमिट’ घेतल्याशिवाय मजुरांना तो देश सोडता येत नाही. यातून मालकाला शोषणाचा मार्ग सापडतो. आधीच प्रवासखर्च, रिक्रूट एजंटला पैसे देण्यासाठी कर्ज काढलेलं असतं. ते फिटण्यापुरतं तरी काम करावं म्हणून नाइलाजाने काम स्वीकारलं जातं. त्या मजबुरीचा फायदा घेत मुख्य कामासोबत इतरही कामं करून घेतली जातात. ड्रायव्हर म्हणून कामाला लागलेल्याकडून माळीकामही करून घेतलं जातं. पुरुष कामगारांना तर खुराडय़ासारख्या घरात कोंडून केवळ कामापुरतं बाहेर काढलं जातं.
कामगारांच्या शोषणाचा एकही मार्ग सोडला जात नाही. वेतन, कामाचं स्वरूप, कामाचे तास यातून जमेल तेवढी पिळवणूक होते. अगदी एम्प्लॉयमेंट व्हिसासाठीही भरमसाठ फी आकारली जाते. आजारी असतानाही रजा नाकारून काम करून घेतलं जातं. वैद्यकीय उपचार वगैरे तर दूरच. त्यात महिला वा पुरुष कामगारांमध्ये कुठलाच भेदभाव नाही. मानवी हक्क वगैरे सगळं धाब्यावर.
आखाती देशात असे पिळवटून टाकणारे अनुभव घेऊन भारतात परतलेल्यांच्या कहाण्या हलवून टाकणा:या आहेत.
‘सौदीत माङयाकडून अन्नपाण्यावाचून दिवसातील 18 तास काम करून घेतलं जाई. पाणी पिण्यासाठी काम थांबवलं तरी घरमालक अथवा त्याचे कुटुंबीय मारहाण करीत. अनेकदा महिलांचं लैंगिक शोषणही केलं जातं. मात्र जिवाच्या भीतीने कुणीही तेथे साधी तक्रार करण्याचा विचारही करीत नाही.’
- भारतात परतलेल्या एका मोलकरणीने सांगितलेली ही कहाणी तेथील घरेलू कामगारांची वस्तुस्थिती दर्शविणारी आहे.
रियाधमधील एका हॉस्पिटलमध्ये सलग नऊ महिने साफसफाईचं काम करूनही पगार न मिळालेल्या अकरा महिलांनाही मदतीसाठी भारतीय दूतावासाकडे तक्रार करावी लागली. केरळमधील या महिला एका कंत्रटी कंपनीमार्फत या हॉस्पिटलमध्ये अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कामाला होत्या. मात्र काम करूनही महिनाअखेरीस त्यांच्या हाती पगार पडत नसे. त्याचवेळी अडीच वर्षाचा करार संपेर्पयत सुटी अथवा रजा घेता येणार नाही, अशी सक्तीही त्यांना करण्यात आली. याबाबत भारतीय दूतावासाकडे तक्रार करूनही काहीच परिणाम झाला नसल्याची तक्रार मणियम्मा विलासिनी या महिलेने केली. त्याचवेळी आपण कामगार, कंपनी आणि सौदी प्रशासनातील अधिका:यांच्या संपर्कात असून, महिलांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा भारतीय दूतावासातील अधिकारी करीत होते. सौदी अरेबियात अन्य देशातील कामगारांना वेळेवर पगार दिला जातो, तर भारतीय कामगारांसोबतच अधिक अन्याय केला जातो, अशीही तक्रार विलासिनीने केली.
नोकरी मिळवण्याच्या नियमांमुळे नोकरी मिळत नसेल तर महिलांच्या असहाय्यतेचा, गरिबीचा मॅनपॉवर एजंटकडून अधिकच गैरफायदा घेतला जातो. घरमालक दिवसरात्र काम करून घेत असल्याने बाहरीन येथेही जुलै 2013 मध्ये एका भारतीय आणि दोन इंडोनेशियन महिलांनी बाल्कनीतून उडय़ा मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तिघीही जखमी झाल्या. कागदोपत्री भारतीय महिलेचं नाव अनुषा आणि वय 35 असल्याचा उल्लेख होता. प्रत्यक्षात ती 19 वर्षाची असल्याचं चौकशीत उघडकीस आलं. तिचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला होता. घरच्या गरिबीमुळे बाहरीनमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपडणा:या आंध्र प्रदेशातील अनुषाला मॅनपॉवर एजंटने बनावट व्हिसावर बेकायदेशीररीत्या तेथे पाठवलं होतं. तेथील मायग्रंट वर्कर्स प्रोटेक्शन सोसायटीने केलेल्या मदतीने ती कशीबशी भारतात परतली.
कामाच्या ठिकाणी छळ असह्य होतो तेव्हा घरेलू काम करणा:या महिला भारतीय दूतावासाने तयार केलेल्या सेफ्टी होमचा आश्रय घेतात. पण अशा सेफ्टी होमर्पयत पोहोचणंही सौदी अरेबियासारख्या देशात पीडित महिलांसाठी सोपं नसतं. कारण भारतीय दूतावासाने केवळ रियाध आणि जेद्दाह येथे सेफ्टी होम सुरू केलेत. मालकाने केलेल्या खोटय़ा तक्रारीवरून पोलीस पकडण्याची शक्यता असताना, दूरचा प्रवास करून देशाच्या एका भागातून दुस:या भागात पोहोचणंही या महिलांसाठी कठीण असतं.
‘ते माङया आयुष्यातील फार कठीण दिवस होते. माझा सतत अपमान आणि छळ होत होता. त्यातून माझं मानसिक संतुलन ढासळेल असं माङया लक्षात येताच मी तेथून पळ काढला. मी जिवंतपणो माङया घरी पोहोचले हेच माझं नशीब’ - दोन वर्षे कुवेत येथे मोलकरणीचं काम करून परतलेल्या आंध्र प्रदेशातील महिलेचा हा अनुभव तिला आयुष्यभर अस्वस्थ करणारा होता.
क्लेशकारक अनुभव टाळण्यासाठी नोकरीची पूर्ण माहिती, हमी आणि मान्यताप्राप्त मॅनपॉवर एजंटमार्फत आलेलीच नोकरी स्वीकारा, असं आवाहन भारत सरकार करतं. पण विपन्नावस्थेतून येणा:या अगतिकतेमुळे भल्याबु:या मार्गाने कामगारांचे लोंढे आखाती देशांत जातच आहेत. या सा:याला जबाबदार नेमकं कोण, हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो.
4कायदे कागदावरच!
भारतीय मजुरांची सेवा घेण्याआधी संबंधिताने भारतीय दूतावासात अडीच हजार डॉलर्सची बँक गॅरंटी द्यावी, असा समझोता 2007 साली भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात झाला होता. मात्र आजतागायत ही अट पाळण्यात आलेली नाही.
वर्षभराच्या वाटाघाटीनंतर गेल्यावर्षी सौदी आणि भारतात एक नवा करार करण्यात आला. त्यानुसार किमान वेतन निश्चित करण्यात आलं. ते दरमहा कामगाराच्या बँकखात्यात जमा झालं पाहिजे. त्याचबरोबर काम देणा:या आस्थापनेने मोफत अन्न, निवारा आणि दरवर्षी भारतात येण्याजाण्यासाठी विमानप्रवासाचं भाडं द्यावं, अशीही तरतूद आहे. हा करार करण्यात आला असला तरी तो व्यापक नाही. त्यातून आपलाच फायदा कसा होईल, याचीच पुरेपूर दक्षता सौदी अरेबियाने घेतली आहे. उदाहरणार्थ, त्यात कामाचे कमाल तास निश्चित करण्यात आलेले नाहीत. सध्या सौदी कायद्यानुसार कामगाराने दररोज आठ तास विश्रंती घेण्याची मुभा आहे. याचाच दुसरा अर्थ त्याने दररोज 16 तासांर्पयत काम करावं, असा होतो. कामाच्या वेळेव्यतिरिक्त कामगाराला संचारस्वातंत्र्याची परवानगी नाही. आपल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुठेही संपर्क साधण्याची सुविधा दिलेली नाही. भारत सरकार भारतीय कामगारांच्या सुरक्षेसाठी आपल्या परीने प्रयत्न करतंय. पण बहुतेक नियम कागदोपत्रीच राहतात आणि शोषण काही थांबत नाही, अशी कामगारांची खंत आहे. अशा प्रकरणात संबंधित देशांवर पुरेसा दबाव आणून ही सुरक्षा मिळवून देण्यापुरती अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून अपेक्षित आहेत.
4जिवंत दफन!
गेल्यावर्षी सौदी अरेबिया न्यायालयात तिघा आरोपींनी दिलेला कबुलीजबाब अंगावर शहारे आणणारा आहे. चार वर्षापूर्वी आपण पाच भारतीय मजुरांचा अनन्वित छळ करून त्यांना सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतातील साफवा येथील एका शेतात जिवंत गाडून टाकल्याचं त्यांनी या जबानीत सांगितलं. सौदी महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप करीत आरोपींनी त्या पाच भारतीय मजुरांना बेशुद्ध होईर्पयत बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांचे हातपाय दोरखंड आणि अॅडेसिव्ह टेपने बांधून त्यांना पुरलं होतं. या हत्त्या करताना सर्व आरोपी हशीश आणि अल्कोहोलच्या अमलाखाली होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या शेतात खोदकाम करून पाचही मृतांचे सापळे बाहेर काढले तेव्हा त्यांच्या हातापायांना बांधलेले दोरखंड आणि अॅडेसिव्ह टेपही सापडल्या. त्या प्रकरणात नंतर एकूण 25 जणांना अटक करण्यात आली.
4सलमाची व्यथा
हैदराबादेतील पस्तीस वर्षीय सलमा बिजोमने अनुभवलेलं छळसत्रही सुन्न करून टाकणारं आहे. बाहरीनमधील मोलकरीण म्हणून काम करताना दीड महिना मालकिणीने तिचा अतोनात छळ केला. किरकोळ कारणांनी लाथाबुक्क्यांनी होणारी मारहाण तर नेहमीचीच. घराची नीट सफाई केली नाही, कारपेटवर बसली, थंड पाणी प्यायली ही कारणं त्यासाठी पुरेशी असत. वर पगार आणि खाणंही नाही. एके दिवशी तिला झाडलोट करण्यास बजावण्यात आलं. मारहाणीमुळे हात दुखत असल्याने तिला ते अशक्य होतं. तेवढय़ावरून तिला लोखंडी रॉडने मारहाण झाली. एके दिवशी तिने पळून जायचं ठरवलं. एका ड्रायव्हरने तिला लिफ्ट देऊन पोलीस ठाण्यात पोहोचवलं. तिच्या शरीरावरील जखमा पाहून पोलिसांनी मारहाणीची दखल तरी घेतली. मात्र मालकिणीने ती चोरी करून पळत असताना जखमी झाल्याची तक्रार केली. सध्या सलमा आपल्यावरील खटला संपून कधी हैदराबादला परतू, या प्रतीक्षेत आहे.
4कस्तुरीची कहाणी
कस्तुरी मुनिरथिनम ही मूळची तामिळनाडूतील वेलोरे येथील मूनगिलेरी गावची रहिवाशी. घरच्या गरिबीमुळे तीन मुलींची लगAं करणं तिच्या आवाक्याबाहेर होतं. म्हणून वृद्धावस्थेतही दरमहा 23 हजार रुपयांच्या पगारावर मोलकरीण म्हणून ती सौदीत गेली. तिथे काम करून घेतल्यावरही मालकीण खाणंपिणं देत नसे. नाइलाजाने तामिळनाडूत परतण्यासाठी तिने दोन महिन्यांच्या पगाराची मागणी केली. पण पगार देण्याऐवजी तिचा छळ सुरूच राहिला. त्याला कंटाळून तिने कापडाची शिडी तयार करून तिस:या मजल्यावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या मालकिणीने तिचा हात कापला. आता सौदीतील सरकारी अधिकारी मात्र कस्तुरी पळून जाण्याच्या प्रयत्नात पडून जखमी झाल्याचा कांगावा करीत आहेत. भारत सरकारने निषेध नोंदवत या प्रकाराची निष्पक्षपाती चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर कस्तुरीवर योग्य उपचार करून आरोपी महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन सौदी सरकारने दिलं आहे.
4भारतीय दूतावासाच्या सूचना
=महिला घरेलू कामगाराचं वय 30 वर्षापेक्षा कमी असता कामा नये.
=कामाबाबतचा करार हा स्पॉन्सर आणि कामगार यांच्यात व्हावा आणि त्याची भारतीय दूतावासाकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे.
=भारतीय घरेलू महिला कामगारांना काम देणा:या आस्थापनेने अथवा मालकाने भारतीय दूतावासाकडे 2500 अमेरिकन डॉलर्स इतकी बँक गॅरंटी द्यावी.
=घरेलू कामगाराला प्रीपेड मोबाइल फोन द्यावा.
=घरेलू महिला कामगारांना किमान वेतन द्यावे.
=अन्याय, स्थलांतर आणि इतर बाबींसाठी दूतावासातर्फे 24 तास हेल्पलाइनची सोय.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत
मुख्य वार्ताहर आहेत.)ravirawool@gmail.com