‘इफ्फी’- दृष्टी बदलण्याची संधी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 04:41 PM2019-12-02T16:41:03+5:302019-12-02T16:41:14+5:30

वेगळ्या धाटणीचे चित्नपट बघण्याची  भारतीय प्रेक्षकांना सवय नव्हती. ‘इफ्फी’नं ही संधी भारतीय प्रेक्षकांना दिली. जगाच्या नकाशावरही न दिसणार्‍या  देशांच्या प्रतिमा चित्नपटाच्या कॅनव्हासवर  उमटताना प्रेक्षकांनी पाहिल्या आणि  ‘सिनेमा असाही असतो तर!.’, अशा  विस्मयजनक प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटू लागल्या.  प्रेक्षकांना सुजाण करण्याचं खूप मोठं काम या महोत्सवानं केलं आहे.

'Iffy' - a chance to change perspective. | ‘इफ्फी’- दृष्टी बदलण्याची संधी..

‘इफ्फी’- दृष्टी बदलण्याची संधी..

Next
ठळक मुद्देगोव्यात नुकत्याच झालेल्या  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त..

- मनस्विनी प्रभुणे-नायक

यंदा आंतरराष्ट्रीय चित्नपटमहोत्सवाचं (इफ्फीचे) पन्नासावं वर्षं होतं, तर इफ्फी गोव्यात येऊन स्थिर झाला त्याचं पंधरावं वर्षं होतं. त्यामुळे गोव्यासाठी हा महोत्सव विशेष होता. इफ्फीची कायमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अन्य चित्नपटमहोत्सवांशी तुलना होत असते. साधन- सुविधा, महोत्सवाशी निगडित व्यवहारांबाबत आपण अन्य महोत्सवांशी तुलना करू शकत नाही हे जितकं  खरंय आणि याच गोष्टींवर प्रामुख्याने वारंवार बोट ठेवलं जातं असलं तरी एक चित्नपट रसिक म्हणून जेव्हा या महोत्सवाकडे बघते तेव्हा यावर्षी हाताशी बरंच काही चांगलं लागलंय असं जाणवतं. चित्नपटमहोत्सवावर बोलत असताना यात दाखवण्यात आलेल्या चित्नपटांवर, त्या चित्नपटांच्या दर्जाबाबत, हे चित्नपट ज्या देशातून निवडण्यात आले होते त्या देशाबाबत, तिथल्या चित्नपट संस्कृतीबाबत जाणून घेण्यात, त्यावर बोलण्यात रस घ्यावा आणि बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्या अशीच काहीशी यावर्षी मनाची तयारी केली होती.
यावर्षी त्र्याहत्तर देशातील दोनशे चित्नपटांचा आंतरराष्ट्रीय चित्नपटमहोत्सवात समावेश होता. कॅटलॉग हातात पडताच आठ दिवस आणि दोनशे चित्नपट यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरू होतो. कितीही आटापिटा केला तरी हे गणित चाळीस चित्नपटांच्या वर काही जात नाही आता दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी तर दोनशे चित्नपटांमधून चाळीस चित्नपट निवडण्याचं आव्हान होतं. इथे येणारा चित्नपट रसिक कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त चित्नपट बघण्याच्या प्रयत्नात असतो. तहान-भूक, झोप विसरून तो पडद्यावरील प्रतिमांमध्ये स्वत:ला हरवून बसतो आणि याचसाठी तो इथे दरवर्षी येत असतो. त्याला इथल्या साधन-सुविधेवर होणार्‍या वायफळ चर्चेत अजिबात रस नसतो. जगाच्या पाठीवरचे चित्नपट बघणं हेच त्याचं उद्दिष्ट असतं आणि ते जर बघायला नाही मिळाले तर मात्न हा रसिक वर्ग नाराज होतो. 
नातेसंबंधांवर आधारित चित्नपट
यावर्षीच्या इफ्फीमध्ये बहुसंख्य चित्नपट नातेसंबंध या संकल्पनेवर आधारित होते. आई-मुलगा, वडील- मुलगा या नात्यातील वेगवेगळ्या पातळीवरील भावनिक चढउतार, संघर्ष दाखवणारे हे सारे चित्नपट होते. अगदी उद्घाटनाचा  डिस्पाइट द फॉग हा चित्नपटदेखील याच वळणाने जाणारा होता. महनाज मोहमद्दीचा बहुचर्चित सन अँण्ड मदर या चित्नपटाने इराणमधील धार्मिक कट्टरतेमुळे कुटुंब कशी उद्ध्वस्त होऊ लागलीत आणि पर्यायाने यात लहान मुलांचा कसा बळी जातोय याचं जळजळीत वास्तव बघायला मिळालं. इराणी चित्नपटाच्या नवं प्रवाहातील एक प्रभावी दिग्दर्शिका म्हणून महनाज मोहमद्दीकडे बघितलं जातं. नात्यांमधील गुंतागुंत आणि विशेषत: आई-वडील आणि मुलांच्या नात्यातील गुंतागुंतीचे सगळे कंगोरे या चित्नपटांमधून बघायला मिळाले.
जगभरातलं प्रतिबिंब 
यावर्षीचा इफ्फी सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून विशेष होताच; पण दरवर्षीच्या चित्नपटांच्या विभागांमध्ये यावर्षी बरंच काही नवं होतं. त्यात जगभरातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या  व्हेनिस,  बर्लिन,  टोरांटो,  भुसान,  सनदन्स,  लोकेर्नो इथल्या आंतरराष्ट्रीय चित्नपटमहोत्सवात नावाजले गेलेले, पुरस्कारप्राप्त असे चित्नपट यावर्षी इफ्फीमध्ये बघायला मिळाले.
फिल्म बाजार आणि युवापिढी 
आंतरराष्ट्रीय चित्नपटमहोत्सवाच्या निमित्ताने एनएफडीसीकडून जो फिल्ममहोत्सव भरवला जातो ज्याच्या माध्यमातून अनेक चित्नपटांना चांगला मार्गदर्शक मंच उपलब्ध झाला आहे. युवा, हरहुन्नरी दिग्दर्शकांना आपल्या नव्या चित्नपटांना या माध्यमातून जगातील निर्मात्यापर्यंत पोहचणं आणि आपल्या चित्नपटाला जगभरात घेऊन जाणं सोप्प झालंय. 2007 पासून फिल्म बाजारला सुरुवात झाली आणि भारतातल्या अनेक युवापिढीतल्या दिग्दर्शकांना एक सकारात्मक दिशा मिळाली. अक्षय इंडीकर या युवा दिग्दर्शकाचे नवे प्रोजेक्ट गेली दोन वर्ष येथे निवडले गेलेत. मूळचा सोलापूरचा असलेल्या अक्षय इंडीकरने पुण्याच्या एफटीआयआयमधून चित्नपट दिग्दर्शनाचं शिक्षण घेतलं असून, गेल्या वर्षी त्याच्या त्रिज्या या चित्नपटाच्या पटकथेची फिल्म लॅबसाठी निवडली गेली होती. जी आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्मात्यांपुढे त्याला ठेवता आली. याच त्रिज्या चित्नपटाची नुकतीच इस्टोनिया फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली. यावर्षी अक्षयच्या  स्थलपुराण या चित्नपटाची निवड फिल्म बाजारात झाली होती.  
सोल ऑफ आशिया 
इफ्फीहा पहिला आंतरराष्ट्रीय चित्नपटमहोत्सव आहे जिथे आशिया खंडातील छोट्या मोठय़ा सर्व देशांच्या कलाकृती बघायला मिळतात. पहिल्या इफ्फीपासून आशियातील चित्नपटांचा समावेश होता आणि युरोपीय देशातून येणार्‍या डेलिगेट्सना आशियाई चित्नपटांचं आकर्षण असायचं. यंदाही चीन, जपान, तैवान, कोरिया, र्शीलंका, सिंगापूर आदी देशांतील चित्नपटांची निवड या विभागात करण्यात आली होती. नव्या दमाच्या दिग्दर्शकांना यात संधी देऊन त्यांच्या माध्यमातून आशियाई खंडातील घडामोडींचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न या विभागाच्या माध्यमातून केला गेला. टेन इयर्स जपान  आणि टेन इयर्स तैवान ही चित्नपट मालिका होती जी त्या त्या देशांकडे, आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्नण या दोन्ही देशातील युवा दिग्दर्शक कसे करतात याचं दर्शन घडवते. यात चिनी चित्नपटांचा विशेष उल्लेख करावा असा आहे. आशय, विषय आणि मांडणी यात चिनी चित्नपट आपला प्रभाव सोडून जातात. बलून हा चित्नपट चीनच्या लोकसंख्या नियंत्नण योजनेवर भाष्य करणारा ठरला. याच चित्नपटाला इफ्फीमध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला.
जागतिक चित्नपट आपल्या नेहमीच्या निकषांपेक्षा अगदी वेगळा असतो. कोणताही मसाला नसलेला, जळजळीत वास्तव दाखवणारा तो असतो. भारतीय प्रेक्षकांना असे चित्नपट बघण्याची सवय नव्हती. इफ्फीमुळे इथल्या प्रेक्षकांना चित्नपटांप्रति आपली दृष्टी बदलण्याची संधी मिळाली. चित्नपटाच्या कॅनव्हासवर जगाच्या नकाशावरही न दिसणार्‍या देशांच्या प्रतिमा उमटल्या आणि त्या पाहताना सिनेमा असाही असतो !. अशा विस्मयजनक प्रतिक्रियाही उमटू लागल्या. चित्नपट रसिक स्वत:च्या खर्चाने फक्त चित्नपट बघण्यासाठी गोव्यात येतात हे बघून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. पण तो प्रारंभ होता. या संपन्न अनुभवातूनच इथला प्रेक्षकवर्ग घडत गेला. मागच्या पंधरा वर्षाचा प्रवास तेच तर सांगतोय..
manaswinirajunayak@gmail.com
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: 'Iffy' - a chance to change perspective.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.