संशोधनाची आदर्श विद्या
By Admin | Updated: September 20, 2014 19:56 IST2014-09-20T19:56:35+5:302014-09-20T19:56:35+5:30
वाचन, चिंतन, मनन करून पदवी मिळवण्याचे दिवस संपले. आता सगळा इन्स्टंटचा जमाना आहे. ज्ञानसंपादनासाठी, स्वत:ला अद्ययावत करण्यासाठी पदवी हा उद्देश बाजूला पडला आहे. पगारात वाढ व्हावी, पदोन्नती लवकर मिळावी, समाजात प्रतिष्ठा मिळावी, यासाठी वाटेल त्या लबाड्या करून पदवी मिळवण्याचे दिवस आले आहेत. वरचे आवरण देखणे, आत मात्र सगळा गाळच!

संशोधनाची आदर्श विद्या
प्रा. डॉ. द. ता. भोसले
चर्चासत्राच्या निमित्ताने एका नामवंत महाविद्यालयाला भेट देण्याचा योग आला. भोजनाच्या सुट्टीत जेवण घेताघेता कॉलेजचे प्राचार्य मला माहिती देताना म्हणाले, ‘‘आमच्या स्टाफमध्ये २८ प्राध्यापकांनी पीएच.डी. संपादन केली आहे अन् १८ प्राध्यापक एम. फिल. पदवीचे मानकरी आहेत. तेही आता पीएच.डी.चे संशोधन करीत आहेत.’’ प्राध्यापकांच्या विद्वत्तेचा हा उत्तुंग आलेख पाहून मी चकित झालो. थोडासा गारठूनही गेलो. मागेही एकदा अशाच एका महाविद्यालयातील दोन-तीन अपवाद वगळता सारेच या पीएच.डी.ने विभूषित झालेले पाहावयास मिळाले होते. संशोधन, व्यासंग, अध्यापन यात पूर्णत: रममाण झालेली ही मंडळी पाहून मी त्या सर्वांना मनोमन नमस्कार केला. मागच्या पिढीतील हाताच्या बोटांवर मोजता येणारे पीएच.डी.धारक पाहिल्यावर ती मंडळी आळशी होती, की आजचे प्राध्यापक विद्याप्रेमी-विद्येचे उपासक आहेत, याचा गुंता सोडविता येईना.
पुढील कार्यक्रमाला थोडासा वेळ आहे म्हटल्यावर स्वत: प्राचार्यांनीच हा गुंता सोडविण्यास मदत केली. त्यांच्या बर्याच उच्चविभूषित प्राध्यापकांची माझ्याशी ओळख करून दिली. त्या ओळखीत मी प्रत्येकाला त्याचा पीएच.डी.चा विषय विचारून घेत असे. एकाने सांगितले, ‘‘या तालुक्यातील सहकारी बँकांचे प्रशासन आणि आर्थिक स्थिती.’’ त्याच्या अभ्यासासाठी तालुक्यात बँका होत्या सहा. दुसर्यानं सांगितलं, ‘‘सहकारी दूधसंकलनातील शेतकर्याचे योगदान.’’ म्हणजे किती शेतकर्यांनी दूध घातले. किती लिटर घातले नि कोणत्या दराने घातले यांचा ताळेबंद. खरेतर शेतकर्याशिवाय दुसरं कोण दूध घालणार?
काहींनी सहकारी साखर कारखाने, काहींनी सहकारी मजूर सोसायट्या, काहींनी वीज मंडळाचा अभ्यास, काहींनी परराज्यांतून आलेल्या शेतमजुरांचा सर्व्हे, काहींनी परिसरातील ग्रामदैवतांची ओळख, दोनच संग्रह असलेल्या कवीच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास, परिसरातील ऐतिहासिक घडामोडी व स्थळे, दोन लेखकांची तुलना, काहींनी या परिसरातील भौगोलिक स्थितीचा सर्वांगीण परिचय, आता ‘सर्वांगीण’ म्हणजे नेमका कसा, हे काही मी विचारले नाही. तर काहींनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील एक छोटासा कालखंड घेऊन आणि त्यातलाही छोटासा पैलू घेऊन आपली पीएच.डी. पूर्ण केली होती. काही दिवसांनी काही मंडळी दोन अपत्ये असलेल्या विधवांचा अभ्यास, अपत्य नसलेल्या विधवांची प्रेम प्रकरणे, शहरातून मोकाट फिरणार्या श्वानांचा अभ्यास, शहरातल्या एका पेठेतील घरांच्या दरवाजांची दिशा आणि दशा, दाढी वाढविलेल्या माणसांचा चिकित्सक अभ्यास, तुकारामांच्या अभंगातील भूतकालीन क्रियापदे अशासारखे काही ‘मौलिक’ विषय घेऊन पीएच.डी.ची उच्चतम पदवी प्राप्त करून घेतील, यात शंकाच नाही. ज्ञान आणि संशोधनाची केवढी ही लालसा म्हणायची!
या चर्चासत्रासाठी बाहेरून आलेले एक प्राचार्य माझ्या शेजारी बसलेले होते. पीएच.डी.चा हा सारा माहोल ऐकल्यानंतर थोड्याशा नाराजीनेच म्हणाले, ‘‘खरं सांगू का? हे सारे उपद्व्याप निरलस ज्ञानसंपादनासाठी होतच नाहीत. मी ‘उपद्व्याप’ म्हणतोय; ‘संशोधन’ म्हणतच नाही. माझ्या पगारात भरघोस वाढ व्हावी, मला लवकर प्रमोशन मिळावे. उद्या एखादी प्राचार्याची जागा निघाली, तर तिथे घुसता यावे आणि समाजात आपणास प्रतिष्ठा व्हावी, या व्यवहारी वृत्तीतून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. काल एम. ए. झालेला प्राध्यापक उद्या एम. फिल. होतो नि लगेच दोन वर्षांत पीएच.डी. पदवी मिळवतो. नुकताच एम. ए. झालेल्या प्राध्यापकाचे कितीसे वाचन असते? पूरक विषयाचा किती व्यासंग असतो? संशोधनाची शास्त्रशुद्ध पद्धत तरी त्याला किती ज्ञात असते? खरे तर प्रत्येकाने आपल्या विषयाबरोबरच त्याच्याशी निगडित असलेल्या इतर विषयांचा अभ्यास करायला हवा. सामाजिक परिस्थितीचे आकलन, घटना-प्रसंगाचा अन्वयार्थ लावण्याची क्षमता, चिकित्सक दृष्टी, सखोल चिंतन आणि वेगळे काहीतरी शोधण्याची ऊर्मी असल्याशिवाय कुणाचाही प्रबंध दज्रेदार होत नाही. या सांगितलेल्या गोष्टी कसोट्या म्हणून लावल्या, तर किती प्रबंध त्या कसोट्यांना उतरतील? फार कमी लोक सापडतील. समाधान इतकेच, की कुठल्या का कारणाने होईना, ही तरुण प्राध्यापक मंडळी हातात ग्रंथ घेऊन वावरतात. काहीतरी धडपड करतात. इतर अशैक्षणिक धंदे करणार्या किंवा तोंडावर पांघरुण घेऊन दिवसभर झोपणार्या मंडळीपेक्षा ग्रंथाशी खेळणारे हे प्राध्यापक कितीतरी पटीने चांगलेच म्हटले पाहिजेत. आज ना उद्या यांच्या हातूनच काही मौलिक संशोधन होऊ शकेल, असे मला वाटते.’’
नंतर आम्ही चर्चासत्रासाठी उठलो. तिथेही अनेक प्राध्यापक आपापला संशोधनपर पेपर वाचण्यासाठी उपस्थित होते. त्यावर नंतर थोडीफार चर्चाही व्हायची. या संशोधनपर निबंधामध्येही तसा फारसा उत्तम दर्जा जाणवला नाही. जवळजवळ सार्याच निबंधामध्ये संशोधन कमी आणि विवेचन अधिक आढळले. चिंतन कमी आणि वर्णन अधिक आढळले. ‘अमूक असा म्हणतो - तमूक असा म्हणतो,’ या वाक्याने सुरुवात करून कुठल्या तरी लेखकाच्या प्रसिद्ध ग्रंथातील पानेच्या पाने आपल्या शोधनिबंधात घालायची, अशी एक प्रतिष्ठित पद्धतच जाणवली. म्हणजे स्वत:च्या लेखनात इतरांचे लेखन जास्ती व याचे स्वत:चे कमी. पतंगाला शेपटी जोडावे तसे आग्रहाने भोजनाला बोलावलेल्या एखाद्या व्यक्तीच्या गच्च भरलेल्या ताटात सर्व पदार्थ मागून आणलेले आणि यजमानाची फक्त कोशिंबीर असावी, असला प्रकार तेथे जाणवला. बरे, त्यावर होणार्या चर्चेतही फारसा दम दिसला नाही. फार थोडा वेळ वरवरची चर्चा व्हायची. गुडघाभर पाण्यात कशी तरी घाईने आंघोळ उरकावी, तसा तो चर्चेचा सोहळा उरकला जायचा. अनेकदा मनात यायचे लहान मुले जशी खेळण्यातील भांडीकुंडी घेऊन संसाराचा खेळ मांडतात आणि एखादा सोहळा खोटा- खोटा साजरा करतात आणि नंतर तो खेळ संपवितात, तसा हा शोधनिबंध वाचनाचा प्रकार जाणवला. पेपर वाचताना फोटो काढला व परत जाताना प्रशस्तिपत्रक मिळाले की संपले. कोण विचारतो काय वाचले नि काय दर्जा असलेले वाचले?
चर्चासत्राची परिषद संपल्यानंतर दुसर्या दिवशी मी आणि माझ्या सोबत असलेले प्राचार्य परतीच्या प्रवासाला निघताना या प्राचार्यांचा इथेच प्राध्यापक म्हणून नोकरीस असलेला सत्शिष्य आम्हाला निरोप द्यायला आला. न राहवून तो म्हणाला, ‘‘सर तुमची सारी चर्चा मी ऐकली. आता पीएच.डी. करणार्या प्राध्यापकांनी अधिक प्रगती केली आहे. आता ते स्वत: प्रबंध लिहीतच नाहीत. कुणाकडून तरी लिहून घेतात. लिहून देणारेही भरघोस बिदागी घेतात. यासाठीही स्वत: मार्गदर्शकही लिहायला तयार असतात. अन् ही सारी मंडळी जुना एखादा प्रबंध घेऊन स्वत:चा म्हणून सादर करतात. फक्त वरचे नाव बदलतात किंवा किरकोळ दुरुस्ती करतात. यांचे कष्ट कोणते! शीर्षक बदलून नव्याने बायडिंग करून घेतलेला प्रबंध. आम्ही दोघेही म्हणालो, ‘‘हे सारे प्रबंध म्हणजे सत्त्व, चव आणि भरणपोषण मूल्य नसलेल्या रंगीत पाण्याने भरलेले देखणे ग्लास आहेत. आतला द्रव बघायचा नाही. फक्त ग्लासावरील आकर्षक डिझाइन बघून खूश व्हायचे!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून,
मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक
व नवृत्त प्राचार्य आहेत.)