- अविनाश साबापुरे
कॅटॅलिस्ट.... असे नाव आहे या आगळ्या वेगळ्या प्रकल्पाचे. कॅटॅलिस्ट म्हणजे उद्युक्त करणारे, पुढे जाण्यास प्रेरणा देणारे. समाजाच्या नावाने मतांची गोधडी जमा करणाऱ्यांचे सध्या पीकच आले आहे. पण कॅटलिस्ट प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांनी आर्यवैश्य समाजातील गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना अधिक गुणवान, अधिक प्रज्ञावान बनविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यासाठी पदरमोड करण्याची तयारी ठेवली आहे.- कसा आहे हा प्रकल्प?आर्यवैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी शोधायचे, त्यांची विशिष्ट प्रक्रियेतून निवड करायची आणि त्यांना आयएएस, आयपीएस होण्यासाठी सर्वतोपरी मदत करायची... असा हा प्रकल्प आहे. नागपुरातून त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. आर्यवैश्य समाजात शिक्षणाचे प्रमाण उत्तम आहे. पण विशेषत: पदवी किंवा पदव्यूत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले की आर्थिक परिस्थितीमुळे छोटी-मोठी नोकरीच शोधण्याची वेळ गुणवंतांवर येत आहे. घर चालवायचे आहे, या एकाच ध्यासापोटी प्रज्ञावान तरुणांना सरधोपट नोकऱ्या पत्कराव्या लागतात. आयएएस, आयपीएस होण्याची इच्छा आणि पात्रता असूनही त्यांना यूपीएससी, एमपीएससीच्या तयारीसाठी वेळ देता येत नाही. खर्चही करता येत नाही. समाजातील अशा ‘लायक’ विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर पुढे जाण्यास प्रेरणा देण्यासाठी ‘कॅटॅलिस्ट’ प्रकल्प जन्मला आहे. महाराष्ट्रातील आर्यवैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कॅटॅलिस्ट सतत शोध घेते. त्यानंतर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची कोअर कमिटी तयार करून त्यांच्यापुढे या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडते. मुलाखतीत जे आपली पात्रता सिद्ध करू शकतात, अशा विद्यार्थ्यांची कॅटॅलिस्ट प्रकल्पासाठी निवड केली जाते. पुढे एमपीएससी, यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांना मोफत कोचिंग दिले जाते. किंवा कोचिंगचा संपूर्ण खर्च प्रकल्पातर्फे केला जातो. या काळात विद्यार्थ्यांच्या जेवणाची, निवासाची संपूर्ण व्यवस्था कॅटॅलिस्टतर्फे केली जाते. विशेष म्हणजे, हा खर्च करण्यासाठी समाजातीलच दानदाते सरसावले आहेत. कोण आहेत कॅटॅलिस्ट?महाराष्ट्र आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार, उपाध्यक्ष राजू मुक्कावार, महासचिव राजू कुणावार, गजानन कोटावार, प्रशांत झुलकंठीवार, प्रशांत पिंपळवार, सचिन पोशट्टीवार, महेश रतकंठीवार, डॉ. सुरेंद्र कुकडपवार, महेरकुमार झिलपेलवार यांनी ही चळवळ सुरू केली आहे. हे सारेच समाजधुरिण आपापल्या मार्गाने यशस्वी झालेत. शिक्षणात, व्यवसायात त्यांनी भरारी घेतली आहे. कशी सुरू झाली ही चळवळ?महाराष्ट्र आर्यवैश्य समाजाचे महासचिव राजू कुणावार आणि उपाध्यक्ष राजू मुक्कावार यांच्या संकल्पनेतून ही चळवळ सुरू झाली. त्यांनी स्वत: उच्च शिक्षण घेतले आहे. राजू मुक्कावार यांनी तर चक्क लग्न झाल्यावर एमपीएससी परीक्षा दिली. १९९९-२००० मध्ये ते उत्तीर्ण झाले.लग्नानंतर त्यांनी पुण्याच्या गव्हर्मेंट कॉलेजमधून एमई स्ट्रक्चरचे शिक्षण पूर्ण केले. ते स्वत: मेरिट स्टुडंट होते. २००९ ते २०११ या कालावधीत ते आर्यवैश्य युथ क्लबचे अध्यक्ष होते. समाजातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये जाता यावे, यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, हा विचार त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपुढे मांडला. त्याला सर्वांनी साथ दिली अन् जन्मास आली कॅटॅलिस्ट चळवळ. यंदा या विद्यार्थ्यांना मिळाली संधीयावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील कुणाल नार्लावार, घाटंजी येथील संकेत उत्तरवार, बार्शी येथील अमोल देबडवार, नांदेड येथील गणेश गंधेवार, योगेश कोट्टावार, नागपूर येथील पुनम कोट्टावार, चंद्रपूर येथील शुभम पोलशेट्टीवार, गडचिरोलीतील साईनाथ ताटीकोंडवार या विद्यार्थ्यांची कॅटॅलिस्ट प्रकल्पासाठी निवड झाली आहे. त्यांची सर्व व्यवस्था सांभाळण्यासाठी प्रफुल्ल चेपूरवार आणि संजय कोतावार हे प्रयत्नरत आहेत.