हा कळप टिकणार कसा?
By Admin | Updated: April 4, 2015 18:48 IST2015-04-04T18:48:12+5:302015-04-04T18:48:12+5:30
कळपात राहणार्या प्राण्यांचे सहजीवनाचे काही नियम असतात. कोणी काय भूमिका पार पाडायची, प्राण्यांमध्ये कोणी कुठे चालायचे, कोण दिशा ठरवणार, कुठे थांबायचे, पाणी पिताना कोणत्या क्रमाने आणि कसे प्यायचे याचे नियम असतात. कळप टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो. माणूसही कळपातलाच प्राणी. पण हळूहळू लोप पावत जाणार्या त्यातल्या मुल्यांचं काय?

हा कळप टिकणार कसा?
>- मिलिंद थत्ते
निसर्गात गुंतागुंतीची अनेक चक्रे असतात. एखाद्या प्राण्याचा देह घेतला तरी त्याबत श्वसन, अभिसरण, उत्सर्जन अशा अनेक व्यवस्था असतात. त्या देहाच्या बाहेर पडून पाहिले, तर त्या प्राण्याला पोसणारे आणि मारणारे अनेक घटक असतात. या घटकांचेही आपापसात संबंध असतात. अशा अनेक संबंधांतून एखाद्या जंगलाची परिसर्ग रचना (इकोसिस्टीम) तयार होते. काही प्राण्यांना स्वत:चे अन्न मिळवण्यासाठी तर काहींना स्वसंरक्षणासाठी कळपात राहणे गरजेचे असते. काहींना एकटेच राहणे गरजेचे असते. कळपात राहणार्या प्राण्यांचे सहजीवनाचे काही नियम असतात. मोठय़ा नराला विशिष्ट स्थान असते. लहानांना आणि गर्भवतींना संरक्षण असते. शिकारी प्राण्यांमध्ये शिकारीत कोणी काय भूमिका पार पाडायची याची शिस्त असते, शिकारीतला वाटा कोणाला कशा क्रमाने मिळणार हेही स्पष्ट असते. तृणभक्षी प्राण्यांमध्ये चालताना कोणी कुठे चालायचे, कोण दिशा ठरवणार, कुठे थांबायचे, पाणी पिताना कोणत्या क्र माने आणि कसे प्यायचे या सगळ्याचे नियम असतात. कळपातले प्राणी एकमेकांना सांभाळतात.
माणूसही कळपातला प्राणी आहे. शिकार करतानाही त्याला कळप लागत असे आणि स्वसंरक्षणासाठीही कळप लागत असे. पुढेपुढे माणसांच्या कळपाला टोळी, जात, समाज, देश अशी वेगवेगळी नावे पडली. यांना कळप म्हणून एकत्र राहण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. ती कारणे टिकवण्याचा हे सर्व कळप प्रयत्न करत असतात. कारणे संपली तर कळपाचे नियम ढासळत जातात आणि शेवटी कळप संपतो. त्या कळपातले मनुष्यप्राणी स्वतंत्र जगू शकत नसल्यामुळे पुन्हा एक नवा कळप निर्माण करतात. अशा एका तुलनेने ताज्या कळपाचे नाव आहे अमेरिका.
विविध देशांतून आपापले कळप मोडून किंवा सोडून माणसे त्या अमेरिकेत आली. विविध रंगांचे, संस्कृतींचे संधिशोधू लोक तिथे एकत्र आले. अजूनही येत आहेत. त्यांना या नवीन कळपाचे फक्ते कायदेच नव्हेत, तर संस्कृतीही जन्माला घालावी लागली. अमेरिकन कल्चर हे आलेल्या सर्वांचे मेल्टिंग करून कृत्रिमरीत्या तयार करावे लागले. कळपाला आपली मूल्ये असावी लागतात. 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची मुलेमुली आईवडिलांसोबत राहत असली तर ते बावळटपणाचे मानावे हे एक अमेरिकन मूल्यक आहे. अमेरिकेत आलेल्या लोकांचे तिथल्या निसर्गाशी जैविक नाते नसल्यामुळे निसर्गाचे अधिकाधिक शोषण करावे हे तिथले मूल्य तयार झाले. इतिहासात ज्या घटना झाल्या, त्यांना राष्ट्रीय पावित्र्य देण्याचे काम अमेरिकन धुरिणांना करावे लागले. 4 जुलैचा स्वातंत्र्यदिन हा त्यांचा सण झाला. स्वातंत्र्याचा जाहीरनामा हे पवित्र पुस्तक झाले. समाजाच्या विविध घटकांमध्ये मूळचे काहीच अभिसरण किंवा देवाण-घेवाण नसल्यामुळे त्याही रचना निर्माण कराव्या लागल्या. कळप असल्याशिवाय माणूस जगू शकत नाही हेच यामागचे कारण आहे.
देशाच्या चार कोपर्यांत नेऊन ठेवलेली धामे, पीठे, बारा ठिकाणी पसरलेली लिंगे या सर्वांच्या यात्रा करताना समाजातल्या अनेक घटकांचा एकमेकांशी सहज संबंध येत होता. परस्परांवर अवलंबणे असल्यामुळे कळप म्हणून आपण एकत्र होतो. ‘सामाजिक कर्तव्य’ या आधुनिक सं™ोला जे अजूनही नीटसे जमलेले नाही, तेच ‘दानधर्म’ या कल्पनेत काही शतके जमले होते. पण आपण आता आधुनिक झालो आहोत! ते धर्म, पुण्य, देशभक्ती वगैरे मागासलेल्या कल्पना झाल्या! आता ग्लोबल सगळं एकच आहे. आपल्याकडे आणि अमेरिकेत मॅकडॉनल्डच्या बर्गरची चव एकच लागते. व्हॉट्स अँपपण सगळ्या जगात एकच आहे. आता जग एकच आहे. फरक एवढाच की, वसुधा हे एक कुटुंब व्हायच्याऐवजी जग हा एक बाजार झाला आहे. त्यामुळे आम्हाला पुण्य करावेसे वाटत नाही. पण एक पोकळी जाणवते. दर वीकएण्डला मॉलमध्ये पैसे खर्चून, वेगवेगळ्या क्लबांमध्ये सोशलाइज्ड होऊन, उंची मद्य घेऊनसुद्धा ती पोकळी जाणवते. आपल्याला आणखी आणखी आणखी असे कितीही पैसे कमावता येतात हे कळल्यानंतर पैशाची नशाही चढेनाशी होते आणि ही पोकळी अजूनच जाणवते.
हे पोकळपण कळपापासून तुटल्याचे आहे. मी मेल्यानंतर मला कोणी उचलायलाच आले नाही तर तीही व्यवस्था पैसे देऊन आउटसोर्स करणारे लोक या पोकळीदार वर्गात आहेत. इतके खचलेपण कळपापासून तुटल्यामुळे आले आहे. नाथ महाराजांच्या प्रसिद्ध भारुडात भवानीआईला रोडगा वाहीन म्हणणारी बया शेवटी म्हणते, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे अन् एकटीच राहू दे मला! तसे आपल्या समाजातल्या तथाकथित प्रगत वर्गाचे झाले आहे. आणि त्यांना प्रगत मानल्यामुळे बाकीचेही सगळे याच दिशेला चालले आहेत.
कळपात राहण्याचा, समाजाच्या आधाराचा आनंद पुन्हा घ्यायचा तर डोळसपणे प्रयत्न करावे लागतील. असे प्रयत्न अनेक लोक करतही आहेत. पण ते डोळसपणे आणि स्वत:चे पदरचे काही पणाला लावून केले तरच हा आनंद अंतरंगी सखोल सकळ जाऊ शकतो. मेळघाटात ‘मैत्री’ काम करते. यात अनेक वैद्यकीय व्यावसायिक आपल्या कौशल्यासह सहभागी होतात. अशीच गरज इतरही व्यावसायिकांनी सहभागी होण्याची आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना पोकळीतून वाचवण्यासाठी सबॅटिकल सुट्टी देण्याची पद्धत सुरू केली आहे. एसबीआय आणि इतर काही फेलोशिप यासाठी उपलब्ध आहेत. दिखाऊ समाजसेवेतून लिपस्टिक आनंद मिळवण्यापेक्षा भरपूर वेळ आणि तनमन झोकून हे काम केले तर आनंदही तसाच टिकाऊ आणि सखोल मिळतो. असे काम करू इच्छिणार्या तरुण व्यावसायिकांसाठी बीइंग व्हॉलंटिअर आणि यूथ फॉर सेवा सारखे उत्तम मंचही आहेत. यातून आपल्या समाजाचा प्रगत वर्ग सावरेल आणि त्यांच्या मागे चालणारा इतर समाजही वाचेल. आपला देश म्हणजे बाजार नव्हे आणि देश म्हणजे सरकारही नव्हे. त्यामुळे आपल्या समाजाचा जिवंतपणा टिकवण्याची जबाबदारी मार्केट फोर्सेस आणि सरकार यांच्यावर सोडायची नाही. ती आपली सर्वांची जबाबदारी आणि गरज दोन्ही आहे.
(लेखक ‘वयम्’ या समावेशक विकासाच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)