रोजचं काम आनंददायी कसं करता येईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 03:00 IST2018-07-08T03:00:00+5:302018-07-08T03:00:00+5:30

आपले रोजचे कामच आनंददायी झाले की आनंदासाठी अन्य मार्ग शोधायची गरजच राहत नाही. पण असे करणे शक्य आहे का? - हो, आहे!

how can you make everyday work fun | रोजचं काम आनंददायी कसं करता येईल ?

रोजचं काम आनंददायी कसं करता येईल ?

ठळक मुद्देमन वर्तमानात ठेवणे जमू लागले की रोजच्या रस्त्यावर देखील अनेक नवीन गोष्टी दिसू लागतात. विचारात असल्याने रोज त्याकडे आपले लक्षच जात नसते.

डॉ. यश वेलणकर

माइंडफुलनेसचा अभ्यास करताना श्वासाची, संवेदनांची, भावनांची आणि विचारांची सजगता वाढवण्यासाठी टप्याटप्याने प्रयत्न करावे लागतात. हे करत असताना ‘अटेन्शन ट्रेनिंग’ खूप महत्वाचे असते. हेच ‘अटेन्शन ट्रेनिंग’ कृतीमध्ये तन्मय होण्यासाठीदेखील उपयोगी ठरते. माणूस देहभान हरपून एखाद्या कृतीमध्ये एकरूप,तन्मय झालेला असतो त्यावेळी तो काळ त्याच्यासाठी खूप आनंद देणारा असतो. मानसशास्त्नात या अवस्थेला ‘फ्लो’ असे म्हणतात. खेळाडू,गायक,वक्ता या अवस्थेचा अनुभव बर्‍याचदा घेत असतो. कष्टकरी माणूस देखील असा आनंद घेऊ शकतो. एखादे काम करताना अन्य सर्व विचार थांबलेले असतात, त्या कृतीमध्ये पूर्ण एकाग्रता झालेली असते, कोणताही तणाव नसतो, अतिशय सहजतेने सर्व कृती घडत असतात, मेंदूतील सर्व ऊर्जा एकाच दिशेने वाहत असते त्यामुळेच याला ‘फ्लो’ म्हणतात.
हे काम अतिशय आनंद देणारे असते. असा आनंद कोणते काम करताना मिळण्याची शक्यता अधिक असते याचा अभ्यास झाला आहे.
त्या अभ्यासानुसार कौशल्य आणि आव्हान यांचे योग्य प्रमाण जुळून येते त्यावेळी असा तन्मयतेचा, फ्लोचा आनंद मिळण्याची शक्यता अधिक असते. एखादे काम अगदीच नवीन असते त्यावेळी माणूस चुका करीत ते करीत असतो. एखादा माणूस कार ड्रायव्हिंग शिकत असतो त्यावेळी गाडी रस्त्यावर ठेवायची, गिअर बदलायचा, तो बदलताना क्लच योग्य प्रमाणात सोडायचा हे सर्व पटकन जमत नाही. त्यामुळे अनेकवेळा गाडी बंद पडते. ड्रायव्हिंग शिकवणार्‍या ट्रेनरचा ओरडा खावा लागतो. काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद असला तरी तन्मयतेचा आनंद या वेळी मिळत नाही. कारण मनावर हे सर्व योग्य प्रकारे करण्याचा तणाव असतो. कृतीत सहजता नसते, फ्लो नसतो. म्हणजेच आव्हान आहे पण कौशल्य नाही अशावेळी तन्मयतेचा आनंद मिळत नाही.
 हळूहळू ड्रायव्हिंग जमू लागते. ते कौशल्य आत्मसात होते. 
एखादे कौशल्य आत्मसात होते म्हणजे ती कृती सवयीने होऊ लागते. मेंदूतील विचार करणार्‍या उच्च केंद्रांनी ते काम अन्य केंद्रांकडे सोपवलेले असते . ड्रायव्हिंग सवयीचे झाले की ड्रायव्हर बोलत असतो ,विचार करीत असतो, गाणी ऐकत असतो आणि आपोआप गिअर बदलला जातो, सफाईदार वळणे घेतली जातात. आता ज्याला रोजच ड्रायव्हिंग करावे लागते त्यावेळी त्याच्यासाठी ते फारसे आनंदाचे ठरत नाही. रोजचा रस्ता एकच असेल तर ते काम अधिकच कंटाळवाणे होते. तो कंटाळा कमी करण्यासाठीच ड्रायव्हर गुटक्याची पुडी तोंडात सोडू लागतो. म्हणजेच त्या कामात आव्हान नसल्याने, थ्रील नसल्याने तन्मयता साधत नाही, मनात अन्य विचार येत राहतात त्यामुळे त्या कामाचा आनंद मिळत नाही.
कौशल्य आहे पण आव्हान नाही अशा कामातही फ्लोचा आनंद मिळत नाही.
ज्यावेळी कौशल्य आणि आव्हान, नाविन्य यांचे योग्य प्रमाण जुळून येते त्यावेळी कृतीमध्ये तन्मयता होते. महाराष्ट्रातील कुशल ड्रायव्हरला लडाखमध्ये ड्रायव्हिंग करण्याची संधी मिळते त्यावेळी तो या तन्मयतेचा आनंद अनुभवू शकतो. पण लडाखमधील ड्रायव्हरला तेथे ड्रायव्हिंग करताना तसा आनंद मिळण्याची शक्यता कमी असते कारण त्यामध्ये त्याला काही नाविन्य राहिलेले नसते. एखाद्या गायकाचा रोजचा रियाज आहे, गायनाचे कौशल्य चांगले आहे आणि प्रथितयश वादकासोबत प्रथमच जुगलबंदी आहे त्यावेळी तो गायक त्या मैफिलीत पूर्ण तन्मय होतो, त्याच्या गायनात रंगून जातो. फ्लोचा आनंद अनुभवतो.
एखादे काम माणूस तन्मयतेने करीत असतो त्यावेळी त्याला आनंद मिळतच असतो पण त्याची कार्यक्षमता पाच पट वाढते. त्यामुळेच या शतकात ज्या कंपन्या आणि जे देश त्यांच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामात फ्लो अनुभवण्याचे प्रशिक्षण आणि अनुभव देतील तेच यशस्वी ठरतील असे मानले जाते.एखादा माणूस केवळ मिळणार्‍या पैशावर डोळा ठेवून काम करीत असतो, तो लवकर थकतो. त्याला कामाचा तणाव अधिक येतो आणि कामात चुकाही अधिक होतात. हे कमी करायचे असेल तर फक्त पगार वाढीची लालूच उपयोगी ठरत नाही.काम करणार्‍या माणसाला त्या कामाचा आनंद कसा मिळेल याचाही विचार करावा लागतो.
आपण जे काम करतो आहोत त्यातून नक्की काय साधायचे आहे याची जाणीव आणि ते काम करताना काही निर्णय घेण्याचे अधिकार यामुळे जेथे अनेक माणसे एकत्न काम करीत आहेत अशा मोठ्या प्रकल्पातील कर्मचार्‍यांचा कामाचा आनंद वाढतो. कामातील सहकार्यांच्या एकमेकांशी आणि वरिष्ठांशी असलेल्या नातेसंबंधांवर देखील कामाचा आनंद अवलंबून असतो. रोज दहा मिनिटे एकत्न बसून सजगता ध्यान आणि करूणा ध्यान केले तर हे नातेसंबंध सुधारतात हे लक्षात आल्याने सध्या अनेक कंपन्यांमध्ये असे प्रशिक्षण दिले जाते. गुगल,अ‍ॅपल,नायके, जनरल मोटर्स यासारख्या अनेक मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना माइंडफुलनेसचे ट्रेनिंग देत आहेत. 
आपल्या देशातील कार्यक्षमता विकसित करायची असेल तर येथेही असे ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला हवे. आणि वैयक्तिक पातळीवर आपण सर्वानी कोणत्या कामात स्वतर्‍ला आनंद मिळतो,फ्लो अनुभवता येतो याचा शोध घेऊन तशा कामाची संधी शोधायला हवी, आहे ते काम अधिक आनंददायी करण्यासाठी माइंडफुलनेसचा अवलंब करायला हवा.
आपले रोजचे कामच आनंददायी झाले की आनंदासाठी अन्य मार्ग शोधायची गरज राहत नाही.

कामाचे कौशल्य
..आणि थोडे नाविन्य!


1. कामाचा आनंद अनुभवायचा असेल तर त्या कामाचें कौशल्य हवे आणि थोडेसे नावीन्य हवे. 
2. एखादे काम रोज करू लागलो की कौशल्य येते पण आपल्या रोजच्या कामात नावीन्य कसे आणायचे? - येथेच माइंडफुलनेसचे ट्रेनिंग उपयोगी ठरते.
3. माइंडफुलनेसच्या अभ्यासाने 
आपण आपले लक्ष, अटेन्शन कोठे असावे हे निवडू शकतो. हेच अटेन्शन आपण करीत असलेल्या कामावर, कृतीवर फोकस करतो, त्यासाठी त्यामध्ये काही नावीन्य शोधतो त्यावेळी फ्लोचा आनंद अनुभवू शकतो.
4. मन वर्तमानात ठेवणे जमू लागले की रोजच्या रस्त्यावर देखील अनेक नवीन गोष्टी दिसू लागतात. विचारात असल्याने रोज त्याकडे आपले लक्षच जात नसते.
5. कृती सहजतेने होतात, सराव असल्याने त्या मुद्दाम कराव्या लागत नाहीत पण मन क्षणस्थ असल्याने त्या कृतीही ते जाणत असते. ते विचारात गुंतलेले नसते. 
6. शरीर आणि मन यांची अशी एकतानता साधली की रोजच्या कामातही ‘फ्लो’ अनुभवता येऊ शकतो. 
काम कंटाळवाणे राहत नाही, आनंददायी होते. 


(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे 
अभ्यासक आहेत.)
 

Web Title: how can you make everyday work fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.