Horror of virus attack on humans: Not just today!.. | विषाणूंच्या मानवावरील हल्ल्याची भयकथा : ती आजचीच नव्हे!

विषाणूंच्या मानवावरील हल्ल्याची भयकथा : ती आजचीच नव्हे!

ठळक मुद्देगेल्या काही शतकात दरवर्षी वेगवेगळ्या साथीच्या आजारांनी माणसांवर हल्ला केला आहे आणि त्यात जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दरवेळेस मानवाने त्यावर उपाय शोधण्यासाठी वेळ लावल्याचे दिसून येते.

(संकलन : संदीप आडनाईक)

कोरोनाच्या साथीने यंदा हाहाकार माजवला, पण साथीच्या रोगांनी माणसाचं जगणं अवघड झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक महाभयंकर साथींनी जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला होता... मात्र पूर्वीच्या साथी आणि आताचा कोरोना यांच्यातही अनेक समान धागे आहेत.
गेल्या काही शतकात दरवर्षी वेगवेगळ्या साथीच्या आजारांनी माणसांवर हल्ला केला आहे आणि त्यात जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दरवेळेस मानवाने त्यावर उपाय शोधण्यासाठी वेळ लावल्याचे दिसून येते. इतकी वर्षं लोटली तरी रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संबंधित आजाराची लागण होते, हे त्रिकालाबाधित सत्य मात्र आजही कायम आहे.
साथीचे आजार म्हणजे काय?
एकाच परिसरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना अनेक लोकांना मृत्युमुखी पडावे लागले. वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर मात्र अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साथीचे रोग बहुधा त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात किंवा आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याच्यापासून इतरांना आजार संभवतो आणि रुग्ण वाढत जातात. प्लेग, देेवी, इन्फ्ल्युएन्झा, कांजिण्या, चिकुनगुनिया, टायफॉईड, डांग्या खोकला, डेंग्यू (डेंगी), धनुर्वात, मलेरिया, पटकी (कॉलरा), नारू, पोलिओ, महारोग (कुष्ठरोग), क्षय अशी ही काही वानगीदाखल नावे. जगाच्या इतिहासात ‘येरसिनिया पेस्टिस’ या जीवाणूमुळे (बॅक्टेरिया) उद्भवलेली ‘प्लेगची साथ’ कमी काळात सर्वाधिक बळी घेणारी मोठी साथ आहे.
साथीच्या रोगाचा इतिहास दुसऱ्या शतकापर्यंत
साथीच्या रोगाचा इतिहास दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. युरोपमध्ये या काळात प्लेग उद्भवला, पण त्याचे महाभयंकर स्वरूप सहाव्या शतकात रोमन साम्राज्याच्या विभाजनानंतर निर्माण झालेल्या युरोपातील बायझान्टाईन साम्राज्यात इसवी सन ५४१ मध्ये जस्टिनाईन या सम्राटाच्या काळात पाहायला मिळाले. त्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आताच्या इस्तंबूलमध्ये प्लेग इजिप्तमार्गे पोहोचला. सम्राटाच्या सन्मानार्थ इजिप्तने कॉन्स्टँटिनोपलमध्ये धान्य पाठवले होते. या धान्यासोबत काळे उंदीर आणि त्यासोबत प्लेगच्या जीवाणूचा प्रसार करणाऱ्या पिसवादेखील पोहोचल्या. पुढे ही साथ संपूर्ण युरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि अरेबियात पसरली. डिपॉल विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक थॉमस मॉकैटिस यांनी लागण झालेल्या रुग्णांपासून दूर राहणे हाच त्यावर उपाय असल्याचे मत मांडले आहे. ज्या लोकांमध्ये या रोगाची प्रतिकारक्षमता विकसित झाली, ते जगले. बाकीचे मृत्युमुखी पडले, अशी नोंद त्यांनी केली आहे. पुढे आठशे वर्षांनंतर प्लेग पुन्हा युरोपात उद्भवला. ही साथ १३४७ साली पसरली. अवघ्या चार वर्षांत तब्बल २० कोटी लोकांचा मृत्यू झाला. जगातील लोकसंख्येपैकी तब्बल एक-तृतीयांश इतकी ही संख्या होती. हा प्लेग ‘द ब्लॅक डेथ’ नावाने ओळखला जातो.
‘क्वारंटाईन’ची पद्धत चौदाव्या शतकापासून
१४ व्या शतकात व्हेनिस राज्यातील रागुसा या शहराने प्लेगच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी एक उपाय शोधून काढला. इतर बंदरांमधून येणाऱ्या जहाजांना रागुसा बंदरात प्रवेश देण्यापूर्वी ती ३० दिवसांसाठी बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवावी लागत. तोवर जहाजावरील कुणी आजारी पडले नाही, तरच त्या जहाजांना शहरात प्रवेश दिला जाई. अशा प्रकारे ही जहाजे ‘क्वारंटाईन’ केली जात. पुढे व्हेनिस राज्याने ही पद्धत स्वीकारली. नंतर ‘क्वारंटाईन’चा हा काळ ३० ऐवजी ४० दिवस इतका करण्यात आला. ‘क्वारंटाईन’ हा शब्दही इटालियन भाषेतून आला आहे. ‘quaranta giorni’ म्हणजे ४० दिवस. ही पद्धत पुढे युरोपात आणि आता जगभर स्वीकारली गेली. ही साथ १३४८ नंतर पुढे तीनशे वर्षांच्या काळात दर वीसेक वर्षांनंतर डोके वर काढतच होती. या संपूर्ण काळात लंडनमधील तब्बल २० टक्के लोकांचा मृत्यू झाला.
विलगीकरण कायदा
इंग्लंडने सन १५०० च्या सुरुवातीला रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवण्याचा (विलगीकरण) कायदा केला. ज्या घरात प्लेगचे रुग्ण होते, त्यांच्या घराबाहेर तशा खुणा करण्यात आल्या. रुग्णाच्या घरातील लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाताना पांढऱ्या रंगाची काठी सोबत न्यावी लागे.
कुत्री व मांजरांमुळे हा रोग पसरतो, अशी त्या काळी समजूत होती. त्यामुळे लाखो प्राण्यांची एकत्र कत्तल करण्यात आली. १६६५ साली या साथीने अवघ्या सात महिन्यांमध्ये लंडनमध्ये १ लाख लोकांचा मृत्यू झाला. मनोरंजनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांना बळजबरीने त्यांच्या घरात कोंडण्यात येत होते. त्यांच्या घरांवर लाल फुली रंगवण्यात येत असे आणि ‘देवाची आमच्यावर दया आहे’ असे लिहिले जात असे. मृतांचे एकत्रित दफन केले जाई. ही साथ रोखण्याचा हाच एक मार्ग उरला होता, तो हाती घेण्यात आला.


दर शंभर वर्षांनी येते आहे जगावर महामारीचे संकट
१७२० : प्लेग

१९७० मध्ये बुबोनिक प्लेगची साथ जगभर पसरलेली होती. याला ग्रेट प्लेग ऑफ मार्सिले असेही म्हटले जाते. मार्सिले हे फ्रान्समधील एक शहर होते. तेथे प्लेगमुळे एक लाखाहून अधिक लोकांचा म्हणजेच त्यावेळच्या लोकसंख्येच्या २० टक्के लोकांचा मृत्यू झाला. प्लेग पसरताच काही महिन्यातच ५० हजार लोकांचा बळी गेला तर उर्वरित ५० हजार लोकांचा पुढील दोन वर्षात मृत्यू झाला होता. पर्शिया, आफ्रिका आणि इजिप्तमध्ये या साथीच्या आजाराला मोठा फटका बसला. इतिहासकारांच्या मते यामुळे युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील सात कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. भारतात याचा प्रभाव एकोणिसाव्या शतकापर्यंत होता. या प्लेगला ताउन, ब्लॅक डेथ, पेस्ट या नावानेही ओळखले जाते.


१८२० : कॉलरा
१८२० मध्ये ग्रेट प्लेग ऑफ मार्सिलेनंतर शंभर वर्षानंतर आशियाई देशांत कॉलरा (द फस्ट कॉलरा) म्हणजेच पटकीची साथ आली. जपान, अरब देश, भारत, बँकाक, मनीला, जावा, चीन आणि मॉरिशससारखे देशांमध्ये ही साथ पसरली आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला. थायलंड, इंडोनेशिया आणि फिलापाईन्समध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. एकट्या जावा बेटावरील १ लाख लोक मृत्यू पावले. १९१० ते १९११ यादरम्यान भारतासह मध्य पूर्व, आफ्रिका आणि पूर्व युरोप व रशियापर्यंत ही साथ पसरली व सुमारे ८ लाख लोकांचा मृत्यू झाला. कॉलरा विब्रियो कॉलरा नावाच्या बॅक्टेरियामुळे होत होता. शरीरातील संपूर्ण पाणी निघून गेल्याने रुग्णाचा काही तासांतच मृत्यू होत होता. बांगला देशातून सर्वप्रथम ही साथ पसरली होती.
१९२० : स्पॅनिश फ्ल्यू
साल १९२० मध्ये म्हणजेच काॅलराच्या साथीनंतर शंभर वर्षांनी पुन्हा एकदा मृत्यूने थैमान मांडले. यावेळी स्पॅनिश फ्ल्यू हे त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. याचा फैलाव १९१८ मध्येच झाला होता, परंतु त्याचे भयंकर परिणाम १९२० मध्ये पाहायला मिळाले. या फ्ल्यूमुळेच जगभरातील दोन ते पाचशे कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते, ही संख्या जगाच्या एकतृतीयांश इतकी होती. सर्वात प्रथम या साथीने युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील काही भागाला विळखा घातला होता. हा विषाणू एच१एन१ फ्ल्यूचा भाग होता आणि शिंकण्यामुळे तो पसरत होता. शिंकताना ड्राॅपलेटसच्या संपर्कातून हा पसरत होता. स्पेनमध्ये याने मोठे थैमान घातले म्हणून याला स्पॅनिश फ्ल्यू असे नाव दिले गेले. एकट्या भारतातच जवळपास २ कोटी लोकांचा
बळी गेला आहे.
२०२० : कोरोना
स्पॅनिश फ्ल्यूच्या बरोबर शंभर वर्षानंतर म्हणजे २०२० मध्ये पुन्हा मानवी जीवन संकटात आले आहे. यावेळी ही महामारी कोरोनाच्या रूपाने आली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच चीनमधून पसरलेला हा विषाणू जगभर पसरला. अवघे जग या कोरोनाच्या विळख्यात आले असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
 

संदर्भ – पेन्डॅमिक दॅट चेंज्ड हिस्टरी ; हाऊ ५ ऑफ हिस्टरीज् वर्स्ट पेन्डॅमिक फायनली एन्डेड
 

फोटोओळी- 

१) १९१८ मध्ये स्पॅनिश फ्ल्यूने आजारी असलेल्या रुग्णांची देखभाल करताना डॉक्टर आणि नर्स.

२) मिसुरी येथे स्पॅनिश फ्ल्यूने बाधित रुग्णांना उपचारासाठी नेताना मास्क घातलेले अमेरिकन रेडक्रॉसचे मदतनीस.

३) स्पॅनिश फ्ल्यूने इतका हाहाकार माजवला होता, की या काळात ऑफिसमध्ये काम करणाऱ्या टायपिस्ट मास्कशिवाय काम करत नव्हत्या. १६ ऑक्टोबर १९१८ चे हे छायाचित्र

Web Title: Horror of virus attack on humans: Not just today!..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.