प्रफुल्लित

By Admin | Updated: July 19, 2014 19:30 IST2014-07-19T19:30:19+5:302014-07-19T19:30:19+5:30

प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत २२ जुलै ते ३ ऑगस्ट २0१४ या दरम्यान होत आहे. डहाणूकरांनी काढलेल्या, परंतु फारशा प्रकाशात न आलेल्या चित्रांसह नामवंतांची व नवोदितांची चित्रे यात असणार आहेत.

Hilarious | प्रफुल्लित

प्रफुल्लित

 शर्मिला फडके

 
प्रफुल्ला डहाणूकर या चित्रकर्तीचं नाव घेतलं की नजरेसमोर येते त्यांची कला, संगीत, नाट्य, अशा अनेक क्षेत्रांमध्ये उत्साहाने वावरणारी प्रतिमा आणि अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी कायम पुढे केलेला मदतीचा हात. त्या असताना आणि काही महिन्यांपूर्वी त्या गेल्या तेव्हा त्यांच्याबद्दल जे काही भरभरून लिहून आलं त्यातही त्यांच्या सामाजिक क्षेत्रातल्या सक्रिय वावरावर, त्यांच्या चित्रकार गायतोंडेपासून हुसेन, रझा, तय्यब मेहता आणि इतरही अनेक नव्या पिढीतल्या चित्रकारांसोबत असलेल्या मैत्रीबद्दल खूप काही लिहिलं गेलं. त्यांची स्वत:ची चित्रकारकीर्द मात्र या सगळय़ात काहीशी दुर्लक्षित राहिली. अर्थात, तेही साहजिकच आहे. कारण प्रफुल्लाताई स्वत:ही त्यांच्या भुलाभाई देसाई इमारतीत असलेल्या स्टुडिओत गायतोंडे कसे आपली चित्रं रंगवायचे किंवा गायतोंडेंना रोलर वापरण्याच्या तंत्राची स्फूर्ती त्यांच्याकडूनच कशी मिळाली, याबद्दल नेहमीच उत्साहाने सांगण्यात रमून जात असत.
प्रफुल्ला डहाणूकर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनी. त्यांची अगदी सुरुवातीच्या काळापासून भरलेली प्रदर्शनेही व्यावसायिकदृष्ट्या अतिशय यशस्वी ठरली होती. पॅरिस येथील अटालिया या मुद्राचित्रणकला शिकवणार्‍या नामवंत संस्थेत मुद्राचित्रणकलेचेही त्यांनी शिक्षण घेतले होते. प्रोगेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपच्या त्या अनौपचारिक सदस्या होत्या. आपल्या सहकारी कलावंतांबद्दल एक खूप आपुलकीची भावना त्यांच्या मनात सदैव होती. आर्टिस्ट सेंटर आणि जहांगीर आर्ट गॅलरीच्या कार्यकारिणीच्या त्या ५0 वर्षे सदस्य होत्या. तिथे भरणार्‍या प्रदर्शनाकरिता कलाकारांची निवड करण्याची कामगिरी पार पाडत होत्या. मास्टर स्ट्रोक या दिवंगत, विस्मृतीत गेलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन दहांहून अधिक वर्षे त्यांनी चित्रकार सुहास बहुळकरांच्या सहकार्याने भरवलं. अशा अनेक गोष्टी.
पण, त्यामुळे झालं काय, की प्रफुल्ला डहाणूकर या स्वत:ही एक उत्तम चित्रकार होत्या, फिगरेटिव्ह, म्युरल्स, अमूर्त अशा अनेक शैलींमधली त्यांची चित्रं नावाजली गेली आहेत. त्या चित्रांमधल्या रंगांतून, पोतांमधून त्यांचं स्वत:चं असं एक वैशिष्ट्य उमटलेलं आहे. त्याबद्दल नंतरच्या काळात फारसं कधीच काही बोललं गेलं नाही. त्या गेल्यावरही प्रफुल्ला डहाणूकरांनी स्वत: काढलेल्या चित्रांपेक्षा गायतोंडेंनी त्याचं काढलेलं स्केचच वर्तमानपत्रांमधून त्यांच्यावर आलेल्या लेखांमध्ये जास्त वेळा छापून आलं. खरंतर प्रफुल्ला डहाणूकरांच्या सुरुवातीच्या काळातल्या चित्रांवर असलेला प्रभाव, पळशीकर, गायतोंडेंच्या प्रभावाखाली काढलेली चित्रे आणि त्यानंतर त्यांनी अमूर्त शैलीकडे वाटचाल करत असतानाच्या काळात केलेला लाल, भगव्या, हिरव्या, निळय़ा रंगांचा अभूतपूर्व वापर, अवकाशाच्या पोकळीत शोषल्या गेलेल्या निसर्गातल्या रंगांचे  शिल्लक तुकडे आणि छटांचे कवडसे कॅन्व्हासवर उमटवण्यातली आगळी संवेदनशीलता अत्यंत मनोवेधक आहे. पण, लोकांपर्यंत प्रफुल्ला डहाणूकरांनी काढलेली चित्रं फारशी कधी पोचलीच नाहीत, ना कोणा चित्रसमीक्षकांनी त्यावर फार काही लिहिलं. एखाद्या चित्रकाराचं त्याच्या चित्रकलेपेक्षा इतरच क्षेत्रातला वावर वरचढ ठरल्याचं उदाहरण विरळाच. प्रफुल्ला डहाणूकरांच्या बाबतीत ते सातत्याने झालं.
मात्र, आता ही उणीव भरून निघेल. प्रफुल्ला डहाणूकरांच्या १९५0 ते २0१४ सालापर्यंतच्या चित्रकारकिर्दीचा प्रवास मुंबईत्या जहांगीर आर्ट गॅलरीत दि. २२ जुलै ते ३ ऑगस्ट २0१४ या कालावधीत भरत असलेल्या रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शनातून रसिकांना पाहायला मिळेल. डहाणूकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत हे प्रदर्शन भरवले जाईल. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात त्यांची स्वत:ची चित्रे असतीलच, शिवाय डहाणूकर ट्रस्टकडे असलेली भारतातील अनेक नामवंत चित्रकारांची चित्रेही कलादालनात याच वेळी प्रदर्शित होतील. 
सुझा, हुसेन, रझा, आरा, हेब्बर, रामकुमार, शक्ती बर्मन, सोहम काद्री, तय्यब मेहता, अकबर पदमसी, बद्री नारायण, बी. विठ्ठल, बी. प्रभा, जोगेन चौधरी, अंजोली इला मेनन, नलिनी मलानी, सोहन काद्री, गिव्ह पटेलपासून ते पुढील पिढीतील सुभाष अवचट, सुनील पडवळ, रियाझ कोमू, शमशाद हुसेन, नंदन पुरकायस्थ, रुखसाना पठाण, सुमन रॉय, बिकाश पोद्दार अशा अनेकांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रं पाहायला मिळतील.
प्रफुल्ला डहाणूकरांचा नवोदित चित्रकारांच्या मदतीकरिता कायमच पुढे असणारा हात अजूनही त्यांच्या निधनानंतरही तसाच राहण्याची काळजी डहाणूकर आर्ट फाउंडेशनने मुंबईतली आणखी एक आर्ट गॅलरी, गॅलरी सेव्हनच्या सहकार्याने घेतली आहे. दर वर्षी एका नवोदित, तरुण चित्रकाराचे प्रदर्शन भरवण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. 
(लेखिका चित्रकार आहेत.)

Web Title: Hilarious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.