हिरॉईन ऑफ मासेस

By Admin | Updated: August 9, 2014 13:55 IST2014-08-09T13:55:50+5:302014-08-09T13:55:50+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतली करिना कपूर अर्थात बेबो.. एकदम चुलबुली आणि धम्माल अभिनेत्री. ‘जब वुई मेट’मधली तिची भूमिका पाहून तर वाटलं, अस्संच जगायला हवं. याच बेबोनं बॉलिवूडमध्ये १५ वर्षे पूर्ण केलीयत. या काळात तिनं अनेक सुपरहिट चित्रपट दिले, तर काही वेळा नायकांसाठी ती लकी ठरली. हीच बेबो आता लग्न करून सैफसोबत स्थिरावलीय. तिच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा..

Heroin of Masses | हिरॉईन ऑफ मासेस

हिरॉईन ऑफ मासेस

- पूजा सामंत

 
*करिना, तुझ्या कारकिर्दीला १५ वर्षं पूर्ण झालीत... कितपत संतुष्ट आहेस तू? 
करीना - मेरी सोच वही हैं, जो औरो की भी होगी... कलाकार कधीही संतुष्ट  नसतो. त्याला सातत्याने नवनवीन भूमिकांचा शोध असतो. याला मी अपवाद नाही! मी समाधानी आहे; पण आत्मसंतुष्ट नक्की नाही... शक्य झाले तर मी वयाच्या ८0व्या वर्षापर्यंत काम करीन. जोहरा सहगल नाही का, १00 वर्षे अभिनयाशी नाळ टिकवून होत्या!
 
*२0१४ सुरू झाल्यापासून तू किमान सहा नव्या चित्रपटांवर पाणी सोडलंस, ते कसं काय? ही ओढ मातृत्वाची का? नेमकं कारण काय?..
- लग्नानंतर लगेच आई बनायलाच हवं का? मला इतक्यात आई व्हायचं नाही. त्याच बरोबरीनं हे सत्य मी नाकारू शकत नाही, की माझं आता लग्नं झालंय. प्रत्येक विवाहित स्त्रीप्रमाणे मलाही माझ्या नवर्‍याला, त्याच्या-माझ्या कुटुंबाला आणि शिवाय मला स्वत:ला वेळ द्यायचाय. गेली अनेक वर्षं मी चित्रपटांमधून सलग काम करतेय, अगदी ब्रेक न घेतादेखील मी काम केलंय. माझे वडील (अभिनेता रणधीर कपूर) आणि आई (बबिता) आता थकलेत. त्यांना वेळ द्यायचाय.  अलीकडेच मी आईसोबत बसून ‘कपिल शर्मा शो’ पाहिला. माझ्या सहवासानं ती खूप सुखावली! कार्यक्रम पाहण्यापेक्षा मी मम्मीचा आनंदलेला चेहराच पाहत राहिले! त्यामुळे आता मला आवडतील, सोयीस्कर वाटतील, असेच चित्रपट मी करेन. अभिनेता म्हणून सैफचं बस्तान पूर्वीच बसलेलं आहे. निर्माता म्हणूनही त्याची कारकीर्द योग्य दिशेनं चाललीयं, त्यादृष्टीनं मला काळजीचं काही कारण नाही.
 
*करण जोहरला तू भाऊ मानतेस, त्याचा आगामी, महत्त्वाकांक्षी ‘शुद्धी’ हा चित्रपट तू कसा काय सोडलास?
- येस... करणशी माझी खूप छान मैत्री आहे. ‘शुद्धी’ हा सिनेमा ज्याचं आरंभीचं कास्टिंग मी आणि हृतिक रोशन असे होते; पण हृतिकनं काही वैयक्तिक कारणांमुळे ‘शुद्धी’ सिनेमाला गुडबाय केला आणि एक प्रोफेशनल एथिक म्हणून मीदेखील सोडला! हृतिकनंतर शाहरुख करणार असल्याची चर्चा झाली, तेही बारगळलं. सध्या ‘शुद्धी’ हा चित्रपट सलमान करणार आहे, असं कळतं. मला हा चित्रपट न केल्याची रुखरुख आहेच; पण त्याहीपेक्षा झोया अख्तर दिग्दर्शित करणार असलेला ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट सोडून दिल्याची खंत अधिक आहे. झोया अतिशय संवेदनशीलतेनं विषय हाताळते. मी तिचा एकही सिनेमा आजतागायत करू शकले नाही. ‘दिल धडकने दो’ सिनेमा करण्याची संधीदेखील सुटली; पण लग्नानंतरचं माझं आयुष्य मजेत सुरू आहे. मला सैफच्या सहवासात राहून वाचनाची, जग फिरण्याची, आयुष्य सुखा-समाधानात घालवण्याची मनापासून इच्छा आहे. want to grow old with saif.. He has certain wonderful lifestyle.. including watching world cinema, world museums, literature, continental food...etc...! आम्हा दोघांना वेळ मिळाला, की आल्प्सच्या बर्फामध्ये जाऊन राहायला आम्हाला आवडतं. मला आता आयुष्य मनमुराद जगायचंय आणि निवडक सिनेमे करायचेत.
 
*मान्य; पण तू ‘चमेली’, ‘जब वुई मेट’, ‘ओमकारा’, ‘देव’सारखे अर्थपूर्ण सिनेमे केलेस, ज्यांत तुझ्यातली अभिनेत्री जाणवली, अशा सिनेमांमधून तुझं अस्तित्व जाणवण्याएवजी ‘गोलमाल’, ‘सिंघम्’, ‘रा-वन’मधून करिना सामोरी येतेय.
- ये किसने कहाँ, की ‘गोलमाल’, ‘सिंघम्’ हे सिनेमे सो कॉल्ड अर्थपूर्ण नाहीत? रोहित शेट्टीला मी एकविसाव्या शतकातील मनमोहन देसाई मानते. रोहित शेट्टीने अलीकडच्या काळात जितके सुपरहिट्स दिलेत, ते देणं कुणाला जमलेलं नाही. त्याला प्रेक्षकांची नाडी अचूक सापडलीय. हल्ली तर समांतर सिनेमा आणि व्यावसायिक हा भेद उरलेला नाही. कुणी काही म्हणायचं ते म्हणोत; पण ‘थ्री इडियट्स’, ‘गोलमाल’, ‘सिंघम्’, ‘कभी खुशी कभी गम’ या कर्मशिअल सिनेमांसह मी ‘ओमकारा’, ‘देव’, ‘हिरोईन’सारखे सिनेमे केलेत. मला असं वाटतं, मी जीवनाचा आणि कारकिर्दीचा समतोल राखण्यात यशस्वी ठरलेय. जे इतरांना जमतंच असं नाही. क्या ‘जब वुई मेट’ या ‘ओमकारा’ जैसी फिल्मे रोज-रोज बन सकती हैं भला? मला ‘जब वी मेट’सारखी भूमिका पुन्हा ढीग करायची आहे; पण स्वत: इम्तियाज अली, दिग्दर्शक पुन्हा असा सिनेमा घडवू शकणार नाही. क्लासिक्स हमेशा नहीं बना करती. या सत्याचा स्वीकार करून   मी रोहित शेट्टीच्या सिनेमाच्या प्रेमात पडले.
 
*तू ‘सिंघम्’मध्ये मराठी युवतीची भूमिका केलीस म्हणे... मराठी शिकलीस?
- मला रोहितइतकं मराठी नीट येत नसलं तरी काही वाक्य मी सिनेमापुरती बोललेय खरी. एका प्रसंगात मी चक्क रिक्षा चालवलीय. त्या सीनमध्ये मराठीतल्या काही शेलक्या शिव्या दिल्यायत. त्या मात्र माझ्या पाठ झाल्यायत! मराठी युवती अवनी, जी ड्रेस डिझायनर आहे आणि खूप बडबडी आहे, तिच्याकडूनही मराठी शिकता आलं. अजय देवगण अर्थात बाजीराव सिंघम् हा पोलीस अधिकारी आहे. अजय रुक्ष आहे, फारसा बोलत नाही. मला गंमत वाटते, दीदी-लोलो (करिष्मा कपूर)नं अजयसोबत चित्रपट केलेयत. बहुतेक सिनेमांत लोलो अजयची नायिका होती. मी लोलोला भेटायला सेटवर जात असे, तेव्हा अजय मला लहान मुलीप्रमाणे वागवायचा... बेबो our baby ! म्हणत मला उचलून घेतलंय, त्याची मी पुढे नायिका बनले, याचं मला आणि त्यालाही नवल वाटतं.
 
*शाहरुख ते आमिर, सलमान सगळ्या खान हिरोंची तू लकी नायिका ठरलीस; पण सैफ अली या प्रत्यक्षातल्या खान हिरोसोबतचे तुझे सिनेमे मात्र चालले नाहीत. असं का?
- सिनेमे जोडीवर नाहीत चालत... कथा-पटकथा-दिग्दर्शन यांमुळे चित्रपट चालतो. सैफ आणि माझा ‘टशन’ बर्‍यापैकी चालला होता, कुर्बान मात्र लोकांना नाही आवडला. शाहीद आणि माझा ‘जब वी मेट’ खूप चालला, त्यापुढचा नाही चालला. भविष्यात मी आणि सैफ एकत्र पडद्यावर येऊही; पण दोघांना भावेल अशी सशक्त कथा आणि रोल हवेत. आफ्टर ऑल वुई आर प्रोफेशनल्स! पण एक मात्र खरं, हा पंधरा वर्षांचा काळ सुखद होता. मला लोकांनी आपलं मानलं आणि तो आनंद कायम टिकणारा आहे. 
(लेखिका लोकमत मुंबई आवृत्तीमध्ये ब्युरो चीफ (मनोरंजन) आहेत.)

Web Title: Heroin of Masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.