झपाटलेलं मांडेगाव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:16+5:30

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मांडेगावचे सरपंच सुधाकर मिरगणे यांना नुकतंच ‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ या मानाच्या राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारानं ...

The haunted Mandegaon .. | झपाटलेलं मांडेगाव..

झपाटलेलं मांडेगाव..

Next

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मांडेगावचे सरपंच
सुधाकर मिरगणे यांना नुकतंच
‘लोकमत सरपंच ऑफ द इयर’ या मानाच्या
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
का मिळाला या गावाला हा पुरस्कार?
कोणकोणती कामं गावात झाली?
लोकांचा सहभाग कसा मोलाचा होता?
प्रत्यक्ष गावात फिरून टिपलेला
या गावाचा बदलत्या विकासाचा हा चेहरा..

मांडेगाव. बार्शी तालुक्यात सर्वाधिक शिक्षक असलेलं आणखी एक गाव. तालुक्यात हे नाव नेहमी राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असतं. पण आता हे चर्चेत आलंय ते आदर्श कामांमुळे. ‘लोकमत सरपंच ऑफ द इअर’ स्पर्धेत या गावाने राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला. चोर, दरोडेखोरांपासून गावची सुरक्षा करताना गावात पाणी, पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्याचं कवच देण्याचं काम ग्रामस्थांनी झपाटल्यागत हाती घेतलंय.
मांडेगावला जाण्यासाठी आम्ही बार्शीतून बाहेर भूम रोडवर आलो. जेएसपीएम कॉलेज चौकाजवळ ताडसौंदणे गावचा रस्ता लागला. ताडसौंदणेच्या पुढं मांडेगाव. गावाजवळ येताच अंगणवाडीच्या रंगीबेरंगी चित्रं रेखाटलेल्या भिंतींनी आमचं लक्ष वेधून घेतलं. गावचे सरपंच सुधाकर मिरगणे, उपसरपंच देवदत्त मिरगणे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद बाबर यांच्यासोबत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात गेलो. दोन वर्षांपूर्वी सुधाकर मिरगणे आणि देवदत्त मिरगणे यांच्याकडे गावाचा कारभार आला. चांदणी नदीच्या तिरावर वसलेल्या या गावानं दुष्काळाची झळ सोसली होती. गावात टँकरनं पाणीपुरवठा सुरू होता. दुष्काळानं झालेले गावाचे हाल टीव्हीवर पोहोचले होते.
सुधाकर मिरगणे सांगू लागले, दुष्काळ म्हटलं की पाणी, चाऱ्याची चिंता असतेच. पण चोºया-माऱ्यांचीही असते. गावात चोºया आणि दरोड्याच्या घटना घडल्या होत्या. त्या रोखण्यासाठी पोलीसपाटील सारिका मिरगणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसुरक्षा दल मजबूत करायचं ठरलं. २५ मुलांचा गट बनवून गस्त घालायची असं सर्वांना बजावून सांगितलं. तरुण रात्री उशिरापर्यंत जागायचे. शिवारात शिट्टी वाजवून इशारा द्यायचे. रात्री काय दिवसाही अनोळखी व्यक्ती जास्त वेळ गावात फिरताना दिसला की त्याला थांबवून विचारपूस करायची. अनोळखी गाड्या दिसल्या की त्यावरही लक्ष ठेवायचं असं नेटानं करण्यात आलं. त्यामुळे एक दिवस चोरी होता होता थांबल्याचं ते आवर्जून सांगतात. इकडे गाव सुरक्षित ठेवताना शाळेत मुलींचीही काळजी घेतल्याचं मुख्याध्यापिका कल्पना शेलार यांनी सांगितलं. शाळेत मुलींनाही कुठे, कोण अनुचित बोलत असेल, चुकीची कृती करायचा प्रयत्न करत असेल तर थेट शिक्षकांना सांगायचं, असं विश्वासात घेऊन मुलींना सांगितलं. एक दोन मुलींनी आम्हाला सावध केलं. आम्ही त्यांचा बंदोबस्त केल्याचं शेलार म्हणाल्या.
ग्रामसुरक्षेत गस्त घालावी लागते. तसं गावाला पर्यावरण, पाण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं. सरपंच झाल्यानंतर पहिल्याच वर्षी आम्ही पानी फाउण्डेशनच्या वॉटरकपमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतल्याचं सुधाकर मिरगणे सांगतात. लोक दिवसा शेतातलं काम संपवून रात्री साडेनऊनंतर पाण्यासाठी राबले.
रात्री कशाला काम करता असं तहसीलदारांनी येऊन विचारलंही. दिवसा शेत सोडता येत नाही. रात्री झोपेला मुरड घालू; पण गावासाठी झटू असं लोकांनी बोलून दाखवलं. गावच्या हापशाचं पुनर्भरण केलं. वनराई बंधारे बांधले. चांदणी नदीच्या पात्रात दीड किलोमीटर खोलीकरण अन् रुंदीकरण करून घेतलं. वरच्या भागात बंधारे बांधले. मागच्या वर्षी काम करूनही पाऊस आला नाही. पाणी मुरलं नाही. यंदा पाऊस धो धो कोसळला. बंधाºयात अजून पाणी आहे. बोअरवेल चार्ज झाल्या आहेत. विहिरी समाधानी आहेत.
‘आमच्या शाळा’
पाण्याचं काम सुरू असताना गावच्या शाळा, अंगणवाडीकडं लक्ष दिलं. शेजारच्या गावात एक चित्रकार राहतो. त्याच्याकडून अंगणवाडीच्या भिंती रंगवून घेतल्या. मुलांसाठी खेळणी आणली. फरशांवर मॅटिंग करून घेतलं. स्वयंपाकाची, स्वच्छतागृहाची सोय केली. शाळेत डिजिटल शिक्षणसाठी एलईडी बसवले. मुलांचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी कपाटं आणली. पालकांमध्ये उत्साह आला. शाळा सुधारणेसाठी लोकवर्गणी काढायचा निर्णय झाला तेव्हा लोकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. त्यातून अगदी चप्पल ठेवायच्या स्टॅण्डपासून इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यात आल्याचं सरपंच मिरगणे सांगतात. पुढाऱ्यांनी शाळेला सजवलं. गुणवत्ता राखून मुलांना कलागुणांत पुढे आणण्यासाठी मुख्याध्यापिका कल्पना शेलार, शिक्षक तानाजी आरगडे, अनुराधा धुमाळ, रत्नप्रभा जाधव, किरण मिरगणे, सुहास भोसले ही टीम सरसावली. तालुकास्तरावर होणाºया टॅलेट हंट परीक्षा देण्यासाठी मुलांना प्रवृत्त केलं. मुलांना जनरल नॉलेजचे धडे दिले.
गावात डी.एड. झालेले तरुण आहेत. त्यांनी पुढे येऊन शाळेत ‘मॅथ्स कॉर्नर’, ‘सायन्स कॉर्नर’ तयार केले. दुपारच्या सुटीनंतर शिक्षक मुलांच्या हातात मोबाइल देतात. यू ट्यूबवरून आपण आपला विषय शोधायचा. सर्वांनी तो एलईडीवर पाहायचा. अगदी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही आता शिक्षकांनी प्रात्यक्षिक करून दाखवायची गरज नाही. मुलं टीव्ही पाहून प्रॅक्टिस करतात, असं मुख्याध्यापिका शेलार सांगतात.
पर्यावरण रक्षणाचे धडे
गावच्या सुरक्षेसाठी झटताना ग्रामस्थांनी मुलांना शाळेत पर्यावरण रक्षणाचे धडे दिले. शाळेच्या आवारात एका मोकळ्या जागेत तीन हजार रोपांची लागवड केली. त्यासाठी पिशव्या, बिया आणि माती टाकण्याचं काम मुलांनीच केलं. तयार झालेली रोपं मुलांनाच दिली. ज्याचं रोप वाढेल त्याला बक्षीस जाहीर केलं. शाळेच्या आवारात लावलेली बरीच रोपं जगली आहेत. हे माझं झाड, हे तुझं झाड असं मुलं एकमेकांना सांगत आहेत.
एक कर्तव्य असंही
सामाजिक सुरक्षेबाबत गाव आदर्श निर्माण करीत आहे. गावातील अरुण मिरगणे, अनिल मिरगणे यांच्या शिवमंगल प्रतिष्ठानची स्थापना झालीय. शिवप्रतिष्ठानचे सदस्य वर्षाला एक हजार रुपयांची वर्गणी भरतात. गावातील इतर लोक आपल्या परीनं पैसे जमा करतात. गावात एखाद्या घरी मुलीचं लग्न असेल तर त्या घरी दहा हजार रुपयांची मदत दिली जाते. गेल्या वर्षभरात गावातील नऊ मुलींची लग्नं झाली. सहा कुटुंबांना अशी मदत करण्यात आली आहे. तीन सधन कुटुंबांनी ही मदत नम्रपणे नाकारून गरजवंतांना मदत पोहोचावी यासाठी प्रयत्न केले.

(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

नीताताई
‘लोकमत’तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘सरपंच ऑफ द इयर’ या राज्यस्तरावरील पुरस्काराच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी नीता रामेश्वर पाटील (पहूर पेठ, जि. जळगाव) यांच्या कामाविषयीचा लेख वाचा येत्या मंगळवारी, २१ जानेवारी रोजी ‘लोकमत’च्या ‘सखी’ पुरवणीत..

Web Title: The haunted Mandegaon ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.