ग्रेट वर्क

By Admin | Updated: April 4, 2015 18:26 IST2015-04-04T18:26:54+5:302015-04-04T18:26:54+5:30

वि. स. खांडेकरांचा फोटो पाहिजे होता, स्केच करता आलं तर पहावं म्हणून, एक दोन पुस्तकांच्या कामासंदर्भात फोटो धुंडाळताना आठवलं. शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकर संग्रहालयात, दलालांनी जलरंगात केलेलं खांडेकरांचं एक लहान आकाराचं पोट्रेट आहे.

Great Work | ग्रेट वर्क

ग्रेट वर्क

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
 
वि. स. खांडेकरांचा फोटो पाहिजे होता, स्केच करता आलं तर पहावं म्हणून, एक दोन पुस्तकांच्या कामासंदर्भात फोटो धुंडाळताना आठवलं. शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकर संग्रहालयात, दलालांनी जलरंगात केलेलं खांडेकरांचं एक लहान आकाराचं पोट्रेट आहे.
 
 
खांडेकरांच्या चेहर्‍यावर खूप पांढरे डाग होते.
अशा व्यक्तीचं पोट्रेट वॉटरकलरमधे करणं म्हणजे मोठी जोखीम.
चेहर्‍यावर ज्या दिशेनं उजेड पडलेला असेल त्या भागातच नेमका डाग पडलेला भाग आला तर, चित्रात तो  डाग पडलेला भाग न वाटता फक्त उजेड पडलेला भाग वाटू शकतो. 
अंधाराच्या भागात डाग पडलेला भाग आला, तर साहजिकच डाग पांढरे असल्यानं ते अंधारात असले तरी पांढरे वाटावेत आणि डाग वाटावेत यासाठी तिथं उजळ छटांचा वापर करावा लागतो. जेमतेम वकुबाचा चित्रकार असेल तर हा भाग डाग पडलेला न वाटता उजेड पडलेला वाटतो. अंधारातली बाजू वाटावी, यासाठी गडद छटा वापरल्या तर डेप्थ मिळते, पण डाग मिळत नाहीत.
बरं, डाग कुठेही असू शकतात. नाकाखाली जनरली गडद छटा वापराव्या लागतात. इथे तसं करून चालत नाही. शेड पडलेल्या, पण पांढर्‍या डागाच्या भागावर पडलेली शेड आणि उजेड पडलेल्या, पण पांढर्‍या डागावर पडलेला उजेड या सगळ्याचं भान ठेवून, जलरंगात खेळणं जोखमीचं. पोट्रेटचं चोंबाळं होऊच शकतं कोणत्याही क्षणी.
पूर्ण भान राखून, फिल्डिंग लावून करावं लागतं सगळं.
शिवाय हे सगळं भान राखून केलंय असा अभिनिवेष चित्रातून पुसटसासुद्धा डोकावू द्यायचा नाही.
बर्‍याच वेळेला कलावंतांना इनडायरेक्टली दाखवावंसं वाटत असतं, बघा, कसं केलंय मी! हैक्कानाय.! 
व्यक्तिमत्त्व दिसायला यायला हवं पोट्रेटमधून. फक्त व्यक्ती नको.
ऐर्‍यागैर्‍याचं काम नोहे हे!
मस्त काम केलंय दलालांनी.
 
सावकारी कलेसाठी आणि दुकानदारी टाईपच्या वॉण्टेड प्रकारात काम करताना, दलालांनी पदर ढळलेल्या उंच उरोजाच्या, टंच सेक्सी बायकांची अमाप चित्रं काढली.
कुणाचं दुकान नाही?
या जगात प्रत्येकाचंच दुकान असतं. ते चालवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी, एवढंच.
तरी त्यांचं लक्षात राहतं, ते हे काम! क्या काम है बॉस.
 
बघा ते चित्र. भारी आहे.
 
वॉटरकलरबद्दल खूप ऐकलेलं असतं आपण. फ्रेशच असावं, डल नको, काळपट नको, फ्लो पाहिजे, स्पीडी पाहिजे, स्केची पाहिजे, स्ट्रोकमधली ताकद दिसली पाहिजे. 
अरे, कशाला? ताकद दिसत नसते, ती जाणवते.
ते चित्र बघाच तुम्ही विद्यापाठात जाऊन.! 
ताकद दिसत नसते, ती जाणवते!
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: Great Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.