एआरआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:04+5:30

‘ए.आर. रहमान यांची मुलाखत? अशक्य.’ - या छातीठोक भाकितापासून  ते चेन्नईतील त्यांच्या भेटीपर्यंतचा  सगळा प्रवास विलक्षण होता. रहमान खरा कोणता? कधीच न कोमेजणारे स्वर ज्याच्या ओंजळीत  अल्लाने टाकले आहेत, असा कलाकार?  हे भाग्य तरुणाईबरोबर वाटून घेणारा सहृदय गुरु?  मुलांना स्वसार्मथ्याची ओळख करून देणारा दर्दी?  जीवघेण्या जखमांवर स्वरांचे उपचार करणारा वैद्य,  की कोणत्याच गुंत्यात न अडकलेला सुफी संत?.

The great Indian composer A. R. Rahman's exclusive interview in Lokmat Deepotsav | एआरआर

एआरआर

Next
ठळक मुद्देयावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं दार उघडताना.. विलक्षण अनुभवांचा वानोळा!

- वंदना अत्ने

भाषेत बोलण्यापेक्षा काही माणसांना कृतीत बोलायलाच अधिक आवडते. ए.आर. रहमान यांनी उभ्या केलेल्या चेन्नईच्या केएम म्युझिक अकादमीमध्ये फिरत असताना आणि त्यापूर्वी खुद्द रहमान यांच्याशी, सरांशी (त्यांच्या तरुण स्टाफने त्यांना दिलेले प्रेमाचे संबोधन) गप्पा मारताना हे वारंवार जाणवत होते. ही कृती आहे, संगीताचा काळजीपूर्वक सांभाळ करणारी आणि त्याच्या भविष्याचा विचार करणारी. तरुणांच्या हातात उत्तम संगीत कसे सोपवता येईल याचा ध्यास असलेली. त्यासाठी जगभरातील संगीत ऐकण्या-शिकण्याची सोय त्यांच्या पुढय़ात उभी करणारी. त्या तीन मजली इमारतीत सर्वत्न दिसत होती अत्यंत तरुण, उत्साही गजबज. वेगवेगळ्या खोल्यांमधून येणार्‍या विविध वाद्यांच्या आवाजाचा एक रंगीबेरंगी कोलाज ऐकताना एखादी रंगीबेरंगी, मऊ गोधडी अंगाभोवती गुरफटून आपण वावरत असल्याची वत्सल भावना मनाला स्पर्श करीत होती.
चेन्नईतल्या पंचथन स्टुडिओमधील ज्या खोलीत ए. आर. रहमान यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या तेथील वातावरण एखाद्या देवघरासारखे होते. उजव्या बाजूला हस्तिदंतात सुंदर कोरीव काम केलेला एक बंद दरवाजा होता. आणि जागोजागी होते छोट्या-मोठय़ा आकाराचे की बोर्ड्स. समोर असलेल्या टीपॉयवर त्याची छोटी मॉडेल्स.
‘सर आ रहे है..’ असे कोणीतरी सांगून जाईपर्यंत मुलाखतीसाठी अनवाणी पायाने रहमान सर खोलीत आले. पहिल्या काही क्षणातच बोलता बोलता समोरचा छोटा की बोर्ड त्यांनी आपल्या मांडीवर घेतला. गप्पा सुरू असताना त्यांची बोटे त्या छोट्या की बोर्डच्या पट्टय़ांवरून पुन्हा पुन्हा प्रेमाने फिरत होती. एखादा मुद्दा मांडताना ते मधेच क्षणभर थांबत आणि एखादे चित्न काढल्याप्रमाणे त्या पट्टय़ांवर बोटे फिरवत.. काय सुरू असावे त्या क्षणी त्यांच्या मनात? ते बघताना मला प्रश्न पडला. मनात रेंगाळत असलेली एखादी अर्धवट धून पुढे नेण्याची वाट त्याक्षणी दिसत असेल? की एखादी अगदी अनवट अशी एखादी स्वराकृती? तीस-पस्तीस मिनिटांच्या त्या भेटीमधून, त्या स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या अनेक लोकांच्या अबोल वावरण्यातून, कुजबुज वाटावी इतक्या हलक्या आवाजात होणार्‍या बोलण्यातून, जागोजागी दिसणारी वेगवेगळी वाद्यं आणि त्यासोबतच्या छोट्या झाडांच्या तजेल्यातून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवत होती, इथे स्वरांची वस्ती आहे आणि तिला जराही धक्का लागू नये यासाठी आस्थेने सांभाळ करणारी माणसं.. खुद्द रहमानसुद्धा गप्पा मारता मारता क्षणभर थांबत असतील ते बहुदा त्याच स्वरांची चाहूल घेण्यासाठी.. 
‘ए.आर. रहमान यांची मुलाखत? अशक्य..’ 
- अनेकांनी केलेल्या या छातीठोक भाकितापासून ते चेन्नईमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीपर्यंतचा सगळा प्रवास आजवरच्या अनुभवांपेक्षा खूप वेगळा. मुलाखतीपूर्वी दडपण आणणारा. आणि मग, हे दडपण का आले असावे, असा प्रश्न पडावा इतकी आस्था व्यक्त करणारा. आणि प्रत्यक्ष ती मुलाखत होते तेव्हा? आपल्याला भेटतो एक असा माणूस ज्याला सौम्य आवाजात कमी बोलायला आवडते. (संगीताच्या आपल्या समृद्ध परंपरेबद्दल बोलताना ते माझे मराठीपण लक्षात घेत  आवर्जून ‘बालगंधर्व’ सिनेमाविषयी बोलतात तेव्हा क्षणभर चकित व्हायलापण होते.!) पण ते बोलत असताना सतत एकच भावना मनात असते, आसपास सतत असलेले स्वर त्यांना या क्षणी दिसत असावे ! त्यांच्या रंग-पोतासह. जगाच्या एखाद्या अज्ञात जंगलातील ढोलाचा नाद यांच्या कानात वाजत असावा. आणि तरीही, हे सगळे घडत असताना, बोलत असलेल्या रहमानकडे दुरून तटस्थपणे बघणारा एक रहमानही आहे याचे भान त्यांना असावे..
रहमान खरा कोणता? कधीच न कोमेजणारे स्वर ज्याच्या ओंजळीत अल्लाने टाकले आहेत, त्याला स्पर्श करण्याचे भाग्य त्याला लाभले आहे असा कलाकार? हे भाग्य तरु ण पिढीबरोबर वाटून घेऊ इच्छिणारा सहृदय गुरु? परिस्थितीने ज्यांच्याकडे पाठ फिरवली आहे अशा मुलांना स्वत:च्या सार्मथ्याची ओळख करून देणारा दर्दी? जगावर अनेक अंगांनी आणि तर्‍हेने होणार्‍या अमानुष घावांच्या जीवघेण्या जखमांवर स्वरांचे उपचार करू बघणारा वैद्य? का या कोणत्याच गुंत्यात ज्याचा पाय अडकला नाहीय असा सुफी संत? 
या प्रश्नाचे उत्तर शोधते आहे.
बघा, तुम्हाला तरी सापडते का, या प्रश्नाचे उत्तर. पण त्यासाठी आधी ‘लोकमत दीपोत्सव’च्या या मैफलीत तुम्हालाही सामील व्हावं लागेल..
vratre@gmail.com
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: The great Indian composer A. R. Rahman's exclusive interview in Lokmat Deepotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.