कृपा, माफी आणि मोक्ष!
By Admin | Updated: July 18, 2015 13:45 IST2015-07-18T13:45:58+5:302015-07-18T13:45:58+5:30
रमजानचे 30 दिवस, 30 रोजे म्हणजे संयम, सदाचाराचा प्रशिक्षणवर्गच! अल्लाहपुढे सारे समान आहेतच, पण रोजांच्या निमित्तानं वंचितांशीही जवळीक साधणारा, प्रत्येकाला एकाच पातळीवर आणणारा हा काळ.. हा संपूर्ण कालावधी दहा दिवसांच्या तीन खंडात वाटला आहे.

कृपा, माफी आणि मोक्ष!
>सुफिमैय्या अली
रुक्सानाचाचींच्या घरात सकाळी-सकाळीच लगबग दिसत होती. रविवारचा दिवस साधून स्वच्छता मोहीम सुरू झाली होती. दारा-खिडक्यांचे पडदे निघून स्वच्छ प्रकाश घरात नांदत होता. पडदे, अंथरूण-पांघरूण सगळ्यांची आज धुलाई होणार होती. बिचारे सगळे मुटकुळं होऊन बाथरूमच्या टोकाशी भिजत पडले होते. रूक्सानाचाचींनी हातातला झाडू चाचांकडे सोपवला. चाचांनी खुर्ची, टेबलावरून कसरत करत कानाकोप:यात दडी मारून बसलेल्या सगळ्या जाळ्या-जळमटांना काढून रस्त्यावर आणलं. चाचांच्या नजरेतून सुटलेल्या जाळ्यांवरती चाचींची नजर पडत होती आणि त्यांची हटाई सुरू झाली होती.
मागच्याच वर्षी रंगरंगोटी दिलेल्या भिंतींवर मग भय्या-दीदीनं सफाईचा हात मारायला सुरुवात केली. टेबल, खुच्र्या, कपाट सगळी ठीकठाक झाली. खिडक्यांच्या काचा चकाचक झाल्या. धुळीने मरगळलेल्या दारांवर पाण्याचे सपकारे पडले तशी त्यांच्यातही उत्साहाची ‘जान’ आली. कडीकोयंडे चकचकीत झाले. मदतीला आलेल्या मावशीनं फळ्यांवरच्या भांडय़ांचा ताबा घेतला. एकेका भांडय़ावरून भराभर फिरणारे तिचे हात भांडय़ांना चमकवू लागले. दुसरीकडे चाचींनी धुलाई मोहीम हाती घेतलीच होती. मोठय़ा चादरी, गोधडय़ांना पीळ देऊन पाणी काढण्याची जबाबदारी पुन्हा चाचांची. कामाचं इतकं ओझं होतं, प्रत्येकजण मन लावून काम करीत होता, तरीही घरभर हर्षोल्हास होता. एकाच वेळी सगळ्यांचे हात घरावर फिरत होते. बघता बघता घरात स्वच्छतेचा सुगंध दरवळू लागला.
रमजान महिन्यात रूक्सानाचाचीची धांदल पाहण्यासारखी असते. ती पहाटेच उठून सहरीची (प्रात:काली उपवास सुरू होण्याआधीचे जेवण) तयारी करायला लागते. एकीकडे ही तयारी तर दुसरीकडे घरातील सगळ्यांना जागे करण्याची घाई. रोजा धरण्यासाठी सहरी करणे अनिवार्य.
चाचांनी दस्तरखान अंथरलं की त्यावर सगळे एकत्रित जेवायला बसायचे. तितक्यात माईकवरून मशीदीतील मौलवीसाहेबांची सहरीसाठी 5 मिनिटं राहिल्याची घोषणा व्हायची. चाचा आणि भय्या नमाजपठणासाठी मशीदीकडे गेले की चाची आणि दीदीदेखील घरातच नमाजपठण करायचे.
डोक्याभोवती ओढणी लपेटून काम करतानाही ओठांनी पुटपुटत नामस्मरण करणा:या चाचींची मुद्रा लोभस दिसायची. दिवसभराच्या प्रार्थना आणि कुराणपठणात संध्याकाळ व्हायची. चाची स्वयंपाकघराचा ताबा घ्यायची. इफ्तारीसाठी तिने गुलगुल्यांचे पीठ, कधी भज्याचे पीठ, तर कधी कोफ्त्यांची तयारी केलेली असायची. कामावरून आल्या आल्या चाचा सायंकाळची नमाज अदा करायचे, अन् फळं कापायला घ्यायचे. भय्या आणि दीदी दोघांच्याही कामाच्या वेळा अडनिडय़ा असल्यानं ते इफ्तारीसाठी छोटे डबे नेत. आजकाल कामाच्या वेळा, घरापासूनचे अंतर या सगळ्या गडबडघाईतही कित्येकजण ऑफिसातच इफ्तारी करतात. भय्या, दीदीही ऑफिसातच रोजा सोडायचे. चाचा-चाची घरात इफ्तारी करून रात्रीचे जेवण उरकायचे आणि रात्रीच्या विशेष नमाजमध्ये दोघेही व्यग्र व्हायचे. या संपूर्ण महिन्यात तर चाचींच्या घरात टीव्हीसुद्धा आराम करायचा. कधीतरी फक्त बातम्या पाहिल्या जायच्या, नाहीतर पूर्ण वेळ टीव्हीला निवांत बंद पडून राहण्याची मुभा असायची.
रमजान ईद येणार म्हटलं की मुस्लीम घराघरांत हाच उत्साह दिसायला लागतो. चैतन्याचं वातावरण पसरतं. लहान-मोठा, श्रीमंत-वंचित सगळेच अल्लाहपुढे समान आहेतच, पण ती जाणीव करून देणारा हा महिना. आपल्या तहान, भुकेचे महत्त्व आणि वंचिताच्या उपासमारीची जाण रोजा/उपवासातून घडते. उपवासाच्या पातळीवर आल्यानंतर घराघरांतील व्यक्ती एकाच पातळीवर येतात.
आमचे शेजारी रफीकचाचांना तंबाखूचे भारी वेड. तोंडात तंबाखू भरल्याशिवाय त्यांना गाद्या बनवताच येत नाहीत, तर रमीजाखालालाही सगळं घरकाम उरकेर्पयत मशेरी तोंडात धरून बसायला फार आवडतं. काम झाल्यावरच ती चूळ भरते. पण रमजान महिना म्हटलं की, त्याच्या आठ दिवस अगोदरपासूनच रफीकचाचा तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करतात अन् अख्खा महिना तर त्या पुडीकडे पाहतही नाहीत. खालासुद्धा मशेरीशिवायच सगळी कामं छान उत्साहाने करते. धूम्रपान निषिद्ध असल्याची जाण दोघांनाही आहे, त्यामुळे तात्पुरता का होईना हा संयम दोघेही बाळगतात. काहीजणांना हा संयमाचा धडा आयुष्यभरासाठी मिळतो. कित्येकजण या महिन्यानंतरही खरोखर व्यसनांकडे वळत नाहीत. इतकेच नव्हे तर तोंडात मिरची असल्यासारखं चूरचूर तिखट बोलणारी हीच खाला आपल्या जिभेवरही ताबा ठेवायची. त्यामुळेच रमजानचे 30 दिवस, 30 रोजे म्हणजे संयम, सदाचाराचे प्रशिक्षणवर्गच!
रमजानच्या महिन्यात मुस्लीम घरात, मोहल्ल्यातील वातावरणच हर्षदायी असते. सायंकाळच्या वेळेस मोहल्ल्यांना खाऊगल्लीचे स्वरूप येते. रोषणाई आणि इफ्तारीसाठी निरनिराळ्या पदार्थांची लज्जत. यामुळे आनंददायी वातावरण तयार होते. या पदाथार्ंचा आनंद घेण्यासाठी मुस्लीमच नव्हे, तर मुस्लिमेतरही गर्दी करतात. शिवाय मशीदींमध्ये रोज इफ्तारीसाठी जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणो फळ-फळं, जेवणाचे आयोजन करतो. सधन लोक आपल्या संपत्तीच्या प्रमाणात दान, देणग्या देतात. त्यामुळे गरीब-वंचितांच्या घरांमध्येही ईदचा आनंद दिसायला लागतो. रोजे, नमाज, दानधर्मात घराघरांतील आबालवृद्ध गढून जातात. या महिन्यातील 27वी रात्र ही सर्वात मोठी रात्र म्हटली जाते. ही रात्र म्हणजे ‘लैलुतल कद्र’. या रात्री जागून मोठय़ा भक्तिभावाने अल्लाहची प्रार्थना करतात.
या महिन्याचे शेवटचे 8-10 रोजे उरले की, घराघरांतील उत्साह दुणावतो. ईदसाठी नव्या कपडय़ांची खरेदी; नवनव्या वस्तूंची खरेदी, शिरखुरमाची तयारी याचा आनंद आणि उल्हास प्रत्येकाच्या चेह:यावर विलसत राहतो.
रमजान ईदसाठी चंद्रदर्शन करण्याची ही मजाच और असते. पहिल्याच दिवसाचा चंद्र असल्याने खूप थोडावेळ आकाशात तो असतो. त्यामुळे कोणाला प्रथम चंद्र दिसणार, यात चढाओढ सुरू होते. मुळात इस्लामचे कॅलेंडर हे चंद्रावर आधारभूत आहे. त्यामुळे एका महिन्यात 29 किंवा 30 दिवस असतात. त्यामुळेच काहीवेळा रमजानचा महिना 29 दिवसांचा तर काहीवेळा 30 दिवसांचा असतो. त्यामुळे 29व्या दिवशी जर चंद्रदर्शन झाले, तर त्याच्या दुस:या दिवशी ईद असणार असते. अशावेळी प्रत्येकजण एकमेकांना चंद्र पाहिला का, म्हणून विचारणा करतात. फोनाफोनी करतात. अशावेळी बंद पडलेला टीव्ही सुरू होतो. बातम्यांमध्ये काही सांगितलं जातं का, याकडे लक्ष लागतं. शेवटी शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ईद साजरी केली जाते. ईद म्हणजे आनंद. रोजा करण्यासाठी, आराधना करण्यासाठी, अल्लाहने दिलेल्या शक्तीसाठी अभिवादन म्हणून नमाज अदा केली जाते आणि ‘ईद मुबारक’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. घराघरांत शिरखुरमाच्या आस्वादासाठी एकमेकांना आमंत्रित करून ईदचा आनंद द्विगुणीत केला जातो.
ईद-उल-फितर
मुस्लीम धर्मियांमध्ये ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद हा मोठा आनंदाचा सण मानला जातो. मुळातच इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजानचा महिना उलटल्यानंतर येणा:या शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद साजरी केली जाते. त्यामुळे त्या आधी येणा:या रमजान महिन्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ अल्लाहची स्तुती, प्रार्थना करायची आणि गोर-गरीब, वंचितांकडे दुर्लक्ष करायचे ही गोष्ट अल्लाहने अप्रिय ठरवली आहे. त्यामुळेच या महिन्यात दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. आपल्यातील साधनसंपत्तीतील काही अंश जकातीच्या स्वरूपात वंचितांनाही द्यावा, त्यांचीही झोळी ईदच्या पूर्वी आनंदाने भरावी, याची खास तजवीज करण्यात आली आहे. शिवाय रमजानचा महिना हा दहा दिवसांच्या तीन खंडात वाटला आहे. पहिला कृपा, दुसरा माफी अन् तिसरा मोक्ष. मुस्लीम बांधव या तिन्ही गोष्टींच्या प्राप्तीसाठी या महिन्यात विशेष मेहनत घेतात. स्त्री-पुरुष दोघांनाही हे आचारण समान ठरविण्यात आले आहेत. आपापल्या परीने याचे आचरण सुरू असते.