गोल्फ टूरिझम
By Admin | Updated: May 31, 2014 15:54 IST2014-05-31T15:54:25+5:302014-05-31T15:54:25+5:30
टेनिससाठी ‘विंबल्डनने जसे आपले जागतिक स्थान निर्माण केले आहे, तसेच ‘न्यूझीलंड’ हा देश जागतिक स्तरावर गोल्फसाठी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करत आहे. तेथील शासनाने मोकळ्या जागांवर ४00 हिरवीगार मैदाने उभारली आहेत. त्याविषयी..

गोल्फ टूरिझम
कल्याणी गाडगीळ
टूरिझम हा न्यूझीलंडच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहे. येथील सृष्टीसौंदर्याच्या आकर्षणाने जगभरचे प्रवासी येथे कायम येतच असतात. पण आता न्यूझीलंडच्या सरकारने एक नवीन संकल्पना राबवायला घेतली आहे. ती म्हणजे ‘गोल्फ टूरिझम’ म्हणजे जगभरच्या गोल्फ क्रीडाप्रेमींना या देशात खेळायला येण्यासाठी आकर्षित करणे.
गोल्फ या खेळाचा जन्म स्कॉटलंड येथे १४-१५व्या शतकात झाला. जगातले पहिले गोल्फ असोसिएशन सेंट अँण्ड्रय़ूज येथे १७४४ मध्ये निर्माण झाले व १८३४ मध्ये तेच रॉयल अँंड एन्शंट या नावाने चालू राहिले. रॉयल अँंड एन्शंट आणि युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशन यांच्यातर्फे आता या खेळाचे नियम बनविले व राबविले जातात. विसाव्या शतकापर्यंत हा फक्त श्रीमंतांचाच खेळ होता. आता मात्र तो सर्वसामान्य लोकही खेळू शकतात. मेर्जस, ओपन चॅम्पियनशिप, यू. एस. ओपन व पीजीए (ढ¬अ) चॅम्पियनशिप असे चार जागतिक महत्त्वाचे गोल्फचे सामने आता दरवर्षी होतात.
गोल्फचा चेंडू विशिष्ट प्रकारच्या क्लबने (म्हणजे दांडीने) खेळाच्या मैदानावर असलेल्या खड्डय़ांमधे कमीत कमी आघात करून पार करायचा असतो. गोल्फचा चेंडू जास्तीत जास्त ४६ ग्रॅम वजनाचा असून, त्यावर गालावर पडणार्या खळीसारखे खोल गोलवे असतात. ज्यात चेंडू घालवायचा, ते खड्डे मैदानाच्या तुलनेत अगदी छोटे असतात. गोल्फची मैदाने हिरवळीने आच्छादलेली, बाजूला झाडी असलेली उंच-सखल अशी असतात. बहुतेक खेळांत ४ खेळींत ७२ खड्डे पार करायचे असतात. मैदानात विखुरलेले जवळ व लांब अंतरावरील खड्डे नीट निरखून, अंतराचा अचूक अंदाज घेऊन त्यानुसार कमी-जास्त शक्ती वापरून क्लबच्या साह्याने चेंडूवर आघात करून तो खड्डय़ात बरोबर पाडणे हे कौशल्य अचंबित करणारे असते. त्यासाठी टायगर वूडने (जागतिक प्रसिद्ध गोल्फ खेळाडू) मारलेला फटका (टीव्हीवर का होईना) पाहणे जरुरीचे आहे.
न्यूझीलंड ही गोल्फ खेळण्यासाठी जगातील सर्वांत उत्तम जागा आहे. कारण येथे जगातील कोणत्याही स्वतंत्र देशापेक्षा, गोल्फ मैदानांची संख्या सर्वांत जास्त आहे. अर्थात या देशाची लोकसंख्याही खूपच कमी आहे व देशही छोटाच आहे. पण एवढय़ाशा देशात गोल्फची सुमारे ४00 मैदाने असून, ती अत्यंत उच्च प्रतीची आहेत व त्यांची देखभालही नियमितपणे केली जाते. तिथवर पोचणे, तिथे राहणे सुलभ असून, जागतिक तुलनेत राहण्या-खेळण्याचा खर्चही खूपच कमी आहे. क्लबमधे खेळाचे सर्व सामान, ते वाहून नेण्यासाठीच्या चाके असलेल्या चामडी पिशव्या, चेंडू, क्लब इत्यादी भाड्याने मिळते. जागोजागी गोल्फ प्रशिक्षणाचे वर्गही चालू असतात. येथील हवामान वर्षभर गोल्फ खेळण्याजोगे असून, ऑक्टोबर ते एप्रिल हा त्यासाठीचा सर्वांत उत्तम काळ असतो. या देशात राहण्याच्या सोयी अत्यंत उत्तम आहेत. देशभरातील गोल्फ मैदानांपैकी १२ क्लब जागतिक दर्जाच्या खेळाडूंसाठी मुद्दाम राखून ठेवण्यात आलेले आहेत. या सर्व सोयींमुळेच न्यूझीलंडला ‘गोल्फर्स पॅराडाइज’ म्हणतात. आता न्यूझीलंडच्या ‘टूरिझम एन. झेड’ने गोल्फ टूरिझमची संकल्पना राबवायचा निर्णय घेतला आहे. या संकल्पनेखाली जगभरच्या गोल्फ खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांचा वापर केला जाईल. विविध गोल्फ क्लब, निवासी हॉटेल, टूर व ट्रॅव्हल एजन्सी, एअरलाइन्स यांनी एकत्रितपणे विविध योजना जाहीर करून संकेतस्थळांचा वापर करून खेळाडूंना त्वरित आरक्षण करणे अगदी सोपे होईल. जगभरातील गोल्फ खेळाडूंच्या खर्च करण्याच्या अनुभवाचा अभ्यास सरकारने केला असून, त्यानुसार गोल्फचे खेळाडू उत्तम प्रवासी असतात व प्रवासावर भरपूर पैसे खर्च करतात. खेळाबरोबरच वाइनरीजना भेट देणे, मासेमारी, नदी-समुद्रात सेलिंग करणे, बंजि जंपिंगसारखे साहसी खेळ खेळणे, बर्फात स्केटिंग करणे असल्या गोष्टींचाही ते जरूर आस्वाद घेतात. त्यांच्या या खर्च करण्याच्या कुवतीचा आर्थिक फायदा या देशातील हॉटेल, निवासी सोयी, विविध रेस्टॉरंट, करमणुकीचे व साहसी खेळांचे आयोजन करणार्या संस्था, वाहनसंस्था या सर्वांनाच होईल.
टेनिससाठी ‘विंबल्डन’ने जसे आपले जागतिक स्थान निर्माण केले आहे, तसेच जागतिक स्थान म्हणून गोल्फ खेळासाठी न्यूझीलंड देश तयार करणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. देश करणे, मुळात असलेले देशाचे नैसर्गिक सौंदर्य जाणून व ते अबाधित राखून गोल्फची हिरवीगार मैदाने जागोजागी निर्माण करून त्याचा वापर जगभरातील खेळाडूंना आकर्षित करणे, ही कल्पनाच नावीन्यपूर्ण आहे. जोन की या न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी ही संकल्पना या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा टीव्हीवर प्रथमत: सांगितली, तेव्हाच या आगळ्या कल्पनेचे कौतुक वाटले. गोल्फ व्हेकेशन्स न्यूझीलंडसारख्या संस्थेच्या वेबसाइटवर लहान-मोठय़ा ग्रुपसाठी असलेल्या विविध सोयींची माहिती मिळू शकते. मुख्यत: या खेळाची जाहिरात करताना जोन की यांच्या अमेरिकाभेटीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांबरोबर गोल्फ खेळत असल्याच्या बातम्या सारख्या दाखवीत होते. याखेरीज सुट्टीच्या वेळी जोन की अमुक एका गोल्फ मैदानावर कसे खेळले व त्या मैदानावर कसे खूष झाले, असल्या बातम्याही दूरदर्शनवर वारंवार दाखवितात. त्यामुळे भारतात जसे ‘क्रिकेट’चे वेड निर्माण झाले आहे, तशीच या खेळाची देशांतर्गत जाहिरात होत आहे. ऑलिम्पिक सामन्यांचे यजमानपद मिळविण्याची स्पर्धा करीत बसण्याऐवजी देशाला कायमचे एक जागतिक स्थान निर्माण करण्याचे न्यूझीलंड सरकारचे लक्ष्य अधिक दूरदृष्टीचे वाटते. सरकारही अशी सर्जनशील कामे करू शकते तर!
(लेखिका न्यूझीलंडस्थित गृहिणी आहेत.)