‘भारता’च्या ‘मुली’

By Admin | Updated: March 8, 2015 17:30 IST2015-03-08T17:27:35+5:302015-03-08T17:30:39+5:30

पाशवी आणि रानटी पुरुषांच्या तावडीतून ‘भारताच्या मुलीं’ची सुटका करणारा एक गोरा, श्रीमंत ‘ग्लोबल’ देवदूत उद्या न्यूयॉर्कमध्ये अवतार घेणार आहे.त्या पार्श्‍वभूमीवर काही ‘भारतीय’ प्रश्न!

'Girls' of 'India' | ‘भारता’च्या ‘मुली’

‘भारता’च्या ‘मुली’

>अपर्णा वेलणकर
 
पाशवी आणि रानटी पुरुषांच्या तावडीतून ‘भारताच्या मुलीं’ची सुटका करणारा एक गोरा, श्रीमंत ‘ग्लोबल’ देवदूत उद्या न्यूयॉर्कमध्ये अवतार घेणार आहे.त्या पार्श्‍वभूमीवर काही ‘भारतीय’ प्रश्न!
---------------
 स्त्रि यांच्या आयुष्यातले अनेक प्रश्न सामाजिक चळवळींच्या/वृत्तीबदलाच्या आधी तंत्रज्ञानानेच हलके केले, असे एक मत आहे. आता  अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या हीतरक्षणाचा मार्गही इंटरनेटरुपी सर्वव्यापी जाळ्यानेच मोकळा केला आहे. भारताने बंदी घालून जगासमोर मोठाच गाजावाजा केलेला ‘इंडियाज डॉटर’ हा माहितीपट त्या  ‘बंदी’मुळे चार दिवस आधीच प्रदर्शित झाला आणि भारतातल्या इच्छुकांनी एव्हाना तो पाहून मनाआडही केला असेल. हा माहितीपट.त्यासाठीच्या परवानग्या.त्या मिळवताना चारलेल्या पैशांचे आरोप.आधी मान्य केलेल्या अटींचे बिनदिक्कत उल्लंघन. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या ‘प्रोजेक्ट’साठी वाहात आलेल्या बेहिशेबी पैशाचे संशयास्पद मार्ग. भारतातले (भयानक) समाजवास्तव दाखवण्याच्या आणि हा ‘मागास, रानटी’ देश सुधारण्याच्या ‘उदात्त’ हेतूपोटी इतका वेळ आणि पैसा खर्च करणे ‘त्यांना’ कसे बरे परवडते यासारखे प्रश्न..
या सार्‍यानेच गेल्या चार-सहा दिवसात भारतातले समाजमन व्यापले आहे.
पण ‘इंडियाज डॉटर’ हे प्रकरण केवळ येथेच, एवढय़ावरच संपत नाही. ही एक सुरुवात आहे. कशाची?
 या माहितीपटाच्या जागतिक प्रदर्शनानंतर उद्या (सोमवारी) न्यू यॉर्क येथे एक मोठा समारंभ होईल. त्यामध्ये ‘इंडियाज डॉटर’ याच नावाने एका जागतिक अभियानाची घोषणा केली जाईल. हॉलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री मेरील स्ट्रीप आणि (आधीची आपलीच) फ्रीडा पिंटो या दोघी त्या अभियानाच्या सदिच्छादूत म्हणून तेथे उपस्थित असतील.
 जगभरात (सर्वत्रच) डोके वर काढणारी ‘बलात्कार संस्कृती’- रेप कल्चरला प्रतिबंध घालण्यासाठी जाणीवजागृतीचे काम करणे, प्रशिक्षण सत्रे-समुपदेशनाचे वर्ग घेणे असे या ‘इंडिया’ज डॉटर अभियानाचे स्वरूप असेल.
 त्यासाठी ‘इंडियाज डॉटर’ हा माहितीपट स्थानिक भाषेत डब करून जगभरात सर्वत्र दाखवला जाईल. त्यासोबत प्रशिक्षण-समुपदेशन असे हे  ‘पॅकेज’ असेल.
 या  ‘ग्लोबल कॅम्पेन’ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमांशी जोडले जावे, यासाठी संयोजक (ते नेमके कोण हे उद्याच समजेल) प्रयत्न करतील.
- भारतामध्ये लिंगसमभावासाठीची लढाई दीर्घकाळ लढणार्‍या कार्यकर्त्यांच्या आणि विचारी नागरिकांच्या मनात या घटनाक्रमाने काही कळीचे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याबद्दल.. 
‘डॉटर्स ऑफ इंडिया’ या ‘जागतिक’ अभियानाच्या विरोधात भारतात विचारले जाणारे संतप्त आणि कळीचे प्रश्न
 
१ बलात्कार, हुंडाबळी, मारहाण अशा सामाजिक (अ)सुरक्षिततेच्या प्रश्नांच्या संदर्भात स्त्रियांचा उल्लेख आया-बहिणी, लेकी-सुना अशा (पुरुषांनी संरक्षण देणे अभिप्रेत असलेल्या) स्री-नात्याचे बिल्ले डकवून करण्याची प्रथा भारतात आहे. येथील सामाजिक आणि सरकारी मानसिकतेत ते रुजलेले आहे. एक व्यक्ती म्हणून स्त्रीला संरक्षित अस्तित्वाचा अधिकार मिळाला पाहिजे; ती आई, बहीण किंवा पत्नी असते म्हणून नव्हे हे प्रगत समाजात मान्य असताना, बलात्काराची ‘संस्कृती’ नष्ट करण्यासाठी उभारण्यात येणारे अभियान मात्र इंडियाज ‘डॉटर’साठी कसे?
 
२ आणि ही ‘डॉटर’ फक्त ‘इंडिया’ची तरी का म्हणून? न्यू यॉर्कमध्ये घोषित होणार्‍या या जागतिक अभियानासंबंधीच्या तपशिलात इतरही (प्रगत) देशातल्या बलात्काराच्या आकडेवारीची चर्चा आहे. असे असताना या अभियानाचे नाव केवळ भारताकडेच बोट रोखणारे का? भारतातल्या पीडित स्त्रिया आणि मुलींना संभाव्य बलात्कारांच्या संकटापासून सोडवणारा कुणी गोरा जागतिक देवदूत जन्म घेत असल्याचे भासवणारे हे एखादे ‘ग्लोबल रेस्क्यू मिशन’ आहे का?
 
३ या जागतिक अभियानाची सदिच्छादूत असलेली ख्यातनाम अभिनेत्री मेरील स्ट्रीप म्हणते, ‘इंडियाज डॉटर या माहितीपटात जी महाभयानक आणि रानटी (पुरुषी) मनोवृत्ती दिसते, तिला आधुनिक, प्रगत जगात (सिव्हिलाईज्ड वर्ल्ड) थारा नाही, हे स्पष्टपणे बजावले गेले पाहिजे.’ - प्रगत असो वा अप्रगत, स्त्री आणि पुरुषांचे सहजीवन असलेल्या सार्‍याच जगात दुर्दैवाने अस्तित्वात असलेले स्त्रियांवरच्या बलात्काराचे भीषण वास्तव पाहता हे कोण कुणाला बजावणार? भारतात बलात्कार होतात म्हणून (केवळ) हा(च) देश ‘मागासलेला’,  ‘जुनाट’ असल्याची लेबले डकवणारे सरसकटीकरण करण्याचा अधिकार काही विशिष्ट गटांना कुणी दिला?
 
४ बलात्कार ही भारताची ‘संस्कृती’ आहे आणि या देशाचे मागासलेपण हे खरे या प्रश्नाचे मूळ आहे असाही सरसकट निष्कर्ष या ‘ग्लोबल’ अभियानाचे पुरस्कर्ते काढतात. भारतातले लैंगिक अत्याचारांचे भीषण गुंते आणि स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्थानातली दरी  ‘वस्र्ट’ असल्याचेही या अभियानाचे म्हणणे आहे. एखाद्या देशातील लैंगिक समभावाचे मोजमाप उत्तम-चांगले-बरे-जेमतेम-वाईट-अत्यंत वाईट अशा पातळ्यांमध्ये करणारी  ही जागतिक मापनव्यवस्था कुणी निश्‍चित केली?
भारतातली अवस्था प्रगत पश्‍चिमी देशांच्या तुलनेत  ‘वस्र्ट’ असली, तरी जगभरातील मागास आणि मुस्लीम राष्ट्रांच्या तुलनेत तरी निदान ‘बेटर’ आहे असे मानून मग भारतानेही नाक मुरडावे का? 
 
५ ‘इंडियाज डॉटर’ या माहितीपटात मुकेश सिंग हा बलात्कारी पुरुष स्त्रियांबद्दल जे आणि ज्या भाषेत बोलतो, त्यावरून सारेच भारतीय पुरुष जणू पाशवी, रानटी मनोवृत्तीचे असल्याचा निष्कर्ष काढणे, या निष्कर्षाभोवती एक जागतिक अभियान उभे करणे हे अत्यंत बेजबाबदार सरसकटीकरण नाही का?
 
६  भारतातल्या बलात्काराच्या घटना, त्याभोवती असलेले जात-धर्म-लिंग-वर्ग-शासन आणि अर्थव्यवस्थेचे गुंते, लैंगिक अत्याचाराविरोधातले कायदे, सुरक्षाव्यवस्था यासंबंधातली भारताची लढाई अत्यंत कठीण आहे. ती या देशात लढली जाते आहे. असे असताना भारतातल्या परिस्थितीवर परस्पर उत्तरे शोधण्याचा आव आणणारे हे ‘जेंडर आऊटसोर्सिंग’ कशासाठी?
 
७ भारताचे नाव गुंफलेल्या 
एका जागतिक अभियानाची आखणी करताना, व्यूहरचना ठरवताना भारतातल्या स्त्री चळवळीने दीर्घकाळ दिलेला लढा, केलेला संघर्ष आणि गाठलेला पल्ला याची दखल 
का घ्यावीशी वाटली नाही?
 
 

Web Title: 'Girls' of 'India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.