सजग आणि क्षणस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 06:05 IST2018-12-30T06:04:00+5:302018-12-30T06:05:08+5:30
सजगतेच्या नियमित सरावाने जाणीव आणि आकलन यात फरक साधतो. माझ्या मनात आलेला विचार हाच अंतिम सत्य आहे असे वाटणे कमी होते. ही एक शक्यता आहे हे भान येते, त्यामुळे दुराग्रह कमी होतो, अनेक पर्याय सुचू शकतात.

सजग आणि क्षणस्थ
- डॉ. यश वेलणकर
गेले वर्षभर आपण माइण्डफुलनेसची माहिती घेत आहोत. त्याचे मेंदूत आणि पेशी पातळीवर होणारे परिणाम समजून घेत आहोत. मात्र हे परिणाम प्रत्यक्ष अनुभवायचे असतील तर केवळ माहिती पुरेशी नाही. त्याचा सराव अधिकाधिक वेळ करायला हवा. आपण असा सराव करतो त्यावेळी मन कसे काम करते ते साक्षीभावाने अनुभवत असतो.
जाणीव आणि आकलन या दोन वेगवेगळ्या घटना असतात. आपण एखादा आवाज ऐकतो ती जाणीव असते आणि तो आवाज या पक्ष्याचा, या गाडीचा किंवा या माणसाचा आहे हे ओळखतो ते आकलन असते. असे आकलन होते, त्याचा परिणाम म्हणून विचार जन्म घेतात. सजगतेच्या नियमित सरावाने जाणीव आणि आकलन यामध्ये फरक करता येतो. त्यामुळे विचारांची लवचिकता वाढते. म्हणजे माझ्या मनात आलेला विचार हाच अंतिम सत्य आहे असे वाटणे कमी होते. हा विचार ही एक शक्यता आहे हे भान येते, त्यामुळे दुराग्रह कमी होतो, एका गोष्टीचा विविधांगांनी विचार शक्य होतो, अनेक पर्याय सुचू शकतात. विचारांची लवचिकता नवनिर्मितीला, सर्जनशक्तीला मदत करते. मात्र हे शक्य होण्यासाठी जाणीव आणि आकलन यामध्ये फरक करता यायला हवा, तो माइण्डफुलनेसच्या प्रत्यक्ष सरावानेच शक्य होतो.
माइण्डफुलनेस हे अटेन्शन ट्रेनिंग आहे. हिप्नोथेरपी, संमोहन चिकित्सेमध्येही अटेन्शन महत्त्वाचे असते. हिप्नोथेरपीमध्ये एकाग्रता, फोकस्ड अटेन्शन आवश्यक असते. याउलट माइण्डफुलनेसमध्ये ओपन अटेन्शन, ग्रहणशील ध्यान जास्त वेळ अपेक्षित असते. संमोहन चिकित्सेमध्ये चिकित्सा देणाऱ्या व्यक्तीने किंवा स्वत:च स्वत:ला दिलेल्या सूचनांवर मन एकाग्र करायचे असते. माणूस खºया अर्थाने संमोहित होतो त्यावेळी त्याच्या मनातील अन्य सर्व विचार थांबतात आणि या सूचनांवर मन एकाग्र असते. याउलट माइण्डफुलनेसमध्ये शरीर मनाकडे साक्षीभावाने पाहण्याचे कौशल्य विकसित करायचे असते. हे कौशल्य समाजातील नव्वद टक्के व्यक्ती विकसित करू शकतात. स्कीझोफे्रनिया, औदासीन्य असे आजार तीव्र असतील त्यावेळी किंवा मतिमंद मुलांना आणि दहा वर्षांपेक्षा लहान मुलांना आपले अटेन्शन वेगवेगळ्या ठिकाणी नेता येणे शक्य होत नाही. त्यांना माइण्डफुलनेस थेरपीचा उपयोग होत नाही.
संमोहित अवस्था ही मनाची ट्रान्स अवस्था असते, त्यावेळी बाह्य जगाचे भान असत नाही. याउलट माइण्डफुलनेसमध्ये पूर्ण भान अपेक्षित असते. आवाज, दृश्य, गंध याद्वारे मिळणारी बाह्य जगाची माहिती आणि त्यावर मेंदूत प्रक्रि या होऊन होणारे आकलन, त्यामुळे निर्माण होणारे विचार, भावना आणि शरीरातील संवेदना या सर्वांचा एकमेकांवर होणारा परिणाम, त्यामध्ये होणारे बदल साक्षीभावाने पाहाणे म्हणजेच सजगता. असे करत असताना लक्ष वर्तमान क्षणात आणायचे असल्याने याला क्षणसाक्षित्व म्हणता येईल, ही ट्रान्स अवस्था नसते, अधिक जागृत अवस्था असते. त्यामुळे मनाच्या जागृततेच्या एका टोकाला संमोहन आहे आणि दुसºया टोकाला सजगता आहे असे आपण म्हणू शकतो.
मानसोपचारामध्ये वापरल्या जाणाºया विवेकनिष्ठ मानसोपचार, बोधन चिकित्सा, पॉझिटिव्ह थिंकिंग यामध्ये आणि माइण्डफुलनेस थेरपीमध्ये काही समान गोष्टी असल्या तरी दोन महत्त्वाचे फरक आहेत. या सर्व थेरपींमध्ये विचारप्रक्रि येला महत्त्व दिले जाते आणि मनातील विचार, भावना बदलण्याचा प्रयत्न असतो. मात्र त्यामध्ये शरीराला फारसे महत्त्व दिलेले नसते. या उलट माइण्डफुलनेसमध्ये शरीर आणि मन यांचा समन्वय अपेक्षित असतो, मन विचारात न ठेवता पुन:पुन्हा शरीरावर नेणे अपेक्षित असते आणि काहीही बदलण्याचा प्रयत्न न करता जे काही होत आहे ते साक्षीभावाने जाणत राहाणे अपेक्षित असते. असे पाहात राहिल्याने त्यामध्ये निसर्गत: जे बदल होतात ते अनुभवत राहिल्याने मेंदूत रचनात्मक बदल होतात आणि तेच माइण्डफुलनेस थेरपीच्या यशाचे रहस्य आहे.
शरीराकडे लक्ष देतो त्यावेळी मेंदूतील इन्सुलासारखे अवयव सक्रि य होतात आणि मनात विचार असताना सक्रिय असणारा डिफॉल्ट मोड नेटवर्क शांत होतो. दिवसभर जागे असताना भान येईल त्यावेळी सजग आणि क्षणस्थ होऊन लक्ष शरीरावर नेणे आणि जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार करणे हा माइण्डफुलनेस थेरपीमध्ये महत्त्वाचा भाग असतो.
योग थेरपीमधील आसने, प्राणायाम आणि माइण्डफुलनेस थेरपीमध्ये महत्त्वाचा फरक हा त्यामागील भूमिकेमध्ये आहे. आसने, प्राणायाम आपण करीत असतो, त्यामुळे त्यामध्ये आपण कर्ता असतो. अष्टांग योगातील मुख्यत: प्रत्याहार, धारणा आणि ध्यान या अंगांचा समावेश माइण्डफुलनेस थेरपीमध्ये असतो. त्यामध्ये काहीही करणे अपेक्षित नसते, साक्षीभाव विकसित करणे आवश्यक असते. त्यामुळे योगातील पहिल्या क्रि या काहीवेळा उपयुक्त ठरत असल्या तरी हा फरक समजून घेणे आवश्यक आहे.
योग थेरपी ही फिजिओथेरपीसारखीच आपण दिवसातून ठरावीक वेळ करू शकतो. माइण्डफुलनेसमध्ये मात्र मनाची सजग स्थिती अपेक्षित असल्याने तिला वेळेचे बंधन नाही, जागे झाल्यापासून झोप लागेपर्यंत स्मरण होईल त्यावेळी आपण आपले लक्ष वर्तमानात आणू शकतो, क्षणसाक्षी होऊ शकतो.
सध्या मानसिक तणाव आणि त्रास वेगाने वाढत आहेत. ते टाळायचे किंवा बरे करायचे असतील तर माइण्डफुलनेस थेरपी हा एक परिणामकारक मार्ग आहे. त्याचा अभ्यास आणि सराव सतत करत राहायचा संकल्प करून इथे थांबूया! (सदर समाप्त)
...ही विपश्यना नव्हे !
१. माइण्डफुलनेस थेरपीमध्ये वापरली जाणारी बरीचशी तंत्रे विपश्यनासदृश आहेत. महत्त्वाचा फरक उद्देशामध्ये आहे.
२. विपश्यना हा निर्वाण प्राप्तीचा मार्ग आहे,
ती शिकून घेण्यासाठी सुरुवातीला दहा दिवसाचे शिबिर करावे लागते. मानसिक
त्रास असलेल्या व्यक्तीला असे शिबिर पूर्ण करणे कठीण जाते.
३. माइण्डफुलनेस थेरपी मात्र अशा व्यक्तींसाठीही उपयोगी आहे. कारण येथे त्यांच्या क्षमतेनुसार मेंदूचे व्यायाम करून घेतले जातात. अर्धा मिनिट, एक मिनिट
लक्ष श्वासावर आणणे, शरीरावर आणणे, त्याक्षणी परिसरात जे काही जाणवते
आहे त्यावर आणणे असे छोटे छोटे उपाय सुचवले जातात.
४. या थेरपीमध्ये त्या व्यक्तीला महत्त्वाची वाटणारी मूल्ये विचारात घेतली जातात, भविष्याची दिशा ठरवली जाते, माइण्डफुलनेस थेरपिस्ट सोबत समुपदेशन होत असते.
५. माइण्डफुलनेस थेरपिस्ट होणे हे एक
करिअर आहे, मानसोपचारतज्ज्ञ हा व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे, या उलट विपश्यना शिबिरे मोफत असतात. त्याचा सर्व खर्च दानावर चालतो कारण तो आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
manthan@lokmat.com