स्वर्गाची प्राप्ती
By Admin | Updated: April 4, 2015 18:24 IST2015-04-04T18:24:55+5:302015-04-04T18:24:55+5:30
सय्यद सलीम या तेलुगु भाषेतील आघाडीच्या लेखकाची नवी कादंबरी : राणीची गोष्ट! एका तरुण, आधुनिक हिंदू- मुस्लीम जोडप्याचा सहप्रवास हे या कादंबरीचे मुख्य सूत्र

स्वर्गाची प्राप्ती
मूळ तेलुगु लेखक : सलीम
मराठी अनुवाद : कमलाकर धारप
राणीची गोष्ट : तीन
सय्यद सलीम या तेलुगु भाषेतील आघाडीच्या लेखकाची नवी कादंबरी : राणीची गोष्ट! एका तरुण, आधुनिक हिंदू- मुस्लीम जोडप्याचा सहप्रवास हे या कादंबरीचे मुख्य सूत्र. विवाह कोणत्या पद्धतीने करावा, यावर समंजस मार्ग काढल्यानंतर प्रश्न उभा राहिला, कोणी, कोणत्या धर्माचं आचरण करायचं? त्यासाठी धर्म बदलायचा का?. कसा सुटला हा प्रश्न?. केवळ आचरणाचंच नव्हे, आयुष्याचंच सार सांगणारा या लेखमालेतला हा तिसरा संपादित अंश!
गोले येथून रॉबर्टचाचा आले. माझे पिताजी आणि रॉबर्टचाचा चांगले दोस्त होते.
मी एका ब्राह्मण मुलीशी लग्न केल्याचे समजल्यावर ते मला भेटायला आले. ते खेद व्यक्त करण्यासाठी आले असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
आम्ही दोघं समोर येऊन बसल्यावर चाचांनी बोलायला सुरुवात केली. ‘‘हे बघ पोरी, सैफ मला मुलासारखा आहे. मी आणि मस्तान नबी बालपणचे मित्र आहोत. त्याने शिंपीकाम सुरू केले आणि मी व्यापार करू लागलो. व्यापारात मी खूप प्रगती केली. लाखो रुपये कमावले. पण आमच्या मैत्रीत अतंराव निर्माण झाला नाही. तुला मी जे काही सांगणार आहे त्यासाठी ही पार्श्वभूमी तुला सांगणे मला गरजेचे वाटले. तुमच्या खासगी जीवनात मी हस्तक्षेप करतो आहे असा समज करून घेऊ नकोस.’’
‘‘रॉबर्ट अंकल, मला तुमच्याबद्दल बरेच काही ठाऊक आहे,’’ राणी बोलू लागली. ‘‘मी तुम्हाला माझ्या सासर्यांइतकाच मान देते. तेव्हा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते नि:संकोचपणे सांगा.’’
अंकल म्हणाले, ‘‘तुम्ही दोघांनी एकमेकांच्या पसंतीने लग्न केले आहे, त्यामुळे कुणालाच अडचण झाली नाही की त्राससुद्धा झाला नाही. अडचण ही आहे की तू तुझ्या हिंदू धर्माचे पालन करू इच्छितेस, तर सैफ मुस्लीम धर्मानुसार चालणार आहे. त्यामुळे अनेक अडचणी येतील. केवळ व्यक्तिगत अडचणी नाहीत, तर सामाजिक अडचणीही निर्माण होतील.’’
‘‘बरोबर आहे अंकल,’’ राणी सांगू लागली. ‘‘लग्नानंतर आम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागला. पण आम्ही दोघं एकत्रितपणे त्याना तोंड दिले.’’
‘‘तू ज्या अडचणी सांगते आहेस, त्या व्यक्तिगत आहेत. पण सामाजिक अडचणींचे निराकरण करण्याचा एकच मार्ग आहे, तू आपला धर्म बदल, आणि ईस्लाम धर्माचा स्वीकार कर.’’ - अंकलने स्पष्टपणे सांगितले.
त्या दोघांचे बोलणे मी इतकावेळ मुकाटपणे ऐकत होतो. पण आता मला वाटले की आपणही यात बोलायला हवे, नाहीतर राणीला राग येईल.
मी म्हणालो, ‘‘चाचा, आपण हे काय बोलता आहात? तुम्ही राणीविषयी दुजाभाव बाळगत आहात. तुम्ही मला हिंदूधर्म स्वीकारण्यास का सांगत नाही?’’
माझ्या या तर्हेच्या बोलण्याने राणीच्या चेहर्यावर आनंद झळकेल असे मला वाटले होते. पण तिचा निर्विकार चेहरा बघून मी निराश झालो.
‘‘हा प्रश्न राणी करील असे मला वाटले होते. पण आता तूच हा प्रश्न उपस्थित केला आहेस, तर मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक,’’ अंकलनी सांगायला सुरुवात केली, ‘‘ज्यांना धर्मान्तर करायचं आहे त्यांना इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म सहज घेता येतो. पण हिंदू धर्मात प्रवेश करणार्यांचे हिंदू धर्माकडून प्रेमपूर्वक स्वागत करण्यात येत नाही. राणीने इस्लामचा स्वीकार केला तर तिला होणार्या अपत्यांसोबत लग्न करण्यास मुसलमान सहज तयार होतील. पण हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर तुझ्या अपत्यांसोबत लग्न करण्यास कुणी ब्राह्मण तयार होतील का हे तूच विचारून पहा. नक्कीच नाही करणार. म्हणून तुमच्या अपत्यांच्या भल्यासाठी राणीने धर्म बदलणे योग्य होईल असे मला वाटते.’’
‘‘अंकल, कोणतेही धर्मान्तर हे विश्वासावर आधारलेले नसते, तर आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येत असते,’’ राणी बोलू लागली, ‘‘तुम्ही इतिहासाची पाने उलटून पहा म्हणजे तुम्हाला या गोष्टीचे अनेक पुरावे मिळतील. हिंदू धर्म मानणारी दलित व्यक्ती जेव्हा इस्लामचा किंवा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करते तेव्हा त्यामागे कारण असते गरिबी. तसेच त्यांना मिळणारी अस्पृश्यतेची वागणूक. पण आमच्या बाबतीत तशी कोणतीच कारणे नाहीत. आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने आम्ही उभयता समान आहोत. असे असताना मी का धर्मांतर करावे?’’
‘‘नाही पोरी, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. प्रत्येक धर्मात काही प्रथा असतात,’’ अंकल बोलू लागले, ‘‘एकच उदाहरण देतो. हिंदू धर्माचे पालन करणारे लोक मृतदेहाचे दहन करतात, तर मुसलमान मृतदेहाला दफन करतात. ख्रिश्चनलोक मृतदेह पेटीत बंद करून ती पेटी जमिनीत पुरतात व त्यावर समाधी बांधतात.’’
रॉबर्टचाचांनी मृतदेहाचा विषय काढताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तसेही मला नेहमी मृत्यूची भीती वाटत आली आहे. त्यामुळे अंकलना थांबवीत मी म्हणालो, ‘‘अंकल, तुम्ही मृतांचा कशासाठी उल्लेख केला?’’
‘‘त्याची गरज आहे सैफ. आपण मरण पावल्यावर आपला मृतदेह जाळण्यात येईल की त्याचे दफन करण्यात येईल, याचा विचार आतापासून आपण करायला हवा’’ - अंकल म्हणाले.
त्यांनी ‘आपण’ हा शब्द मला आणि राणीला उद्देशून वापरला असावा असा मला आभास झाला. म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘‘चाचाजी, आम्ही इतके काही म्हातारे झालेलो नाही. आमची अजून पंचविशीही उलटली नाही, तेव्हा मृत्यूविषयी विचार करण्याची आम्हाला गरज काय? आम्हाला अगोदर जगण्याचा विचार करु द्या.’’
‘‘अरे बाबा, मरण कुणाला चुकले आहे का? तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभावे असा माझा तुम्हा दोघांना आशीर्वाद आहे. पण केव्हातरी तो प्रसंग येणारच आहे. रितीप्रमाणे योग्यप्रकारे अंत्यसंस्कार झाले नाहीत तर तुम्हाल नरकात पडावे लागेल’’ - रॉर्बटचाचा म्हणाले.
चाचांचे बोलणे ऐकून राणी चिडून जाईल असे मला वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. ती शांतपणे म्हणाली, ‘‘रॉबर्ट अंकल, तुम्ही जे सांगता आहात ते अगदी बरोबर आहे. मरण कुणालाही चुकले नाही. म्हणूनच म्हणतात ‘जातस्य मरणम् ध्रुवम्’ म्हणजे जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस मरणारच आहे. ब्राह्मण समाजात मरणाच्या शिव्या वारंवार येतात. कुणालाही ‘मेल्या’ असं चटकन् म्हटलं जातं. त्याचं कारण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की मरणाचा विचार वारंवार केल्यानं मृत्यूची भीती वाटत नाही. तेव्हा आम्हाला मरणाची भीती वाटत नाही. अकंल, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. माणूस मेल्यावर त्याच्या देहाची विटंबना जरी केली तरी काय फरक पडतो? मी मेल्यावर मला जाळलं की जमिनीत पुरलं याविषयी चिंता करणं व्यर्थच आहे.’’
‘‘तसं नाही पोरी’’ - तिला समजावत अंकल म्हणाले, ‘‘मेल्यानंतर शरीरावर जी क्रिया करण्यात येते त्यावरच त्याच्या आत्म्याला स्वर्गात स्थान मिळणं निश्चित होत असतं.’’
‘‘म्हणजे एखाद्या ख्रिश्चन व्यक्तीचा मृतदेह जर जाळण्यात आला तर तो स्वर्गात जाणार नाही का?’’ -राणीने प्रतिप्रश्न केला.
‘‘नाही जाणार. तो नरकातच जाईल’’ - अंकल म्हणाले.
‘‘अंकल, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, स्वर्ग आणि नरक असतात तरी किती? मुसलमानांचा स्वर्ग, हिंदूंचा स्वर्ग, ख्रिश्चनांचा स्वर्ग - असे निरनिराळे स्वर्ग असतात का? ख्रिश्चन माणसाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले तर तो कोणत्या नरकात जाईल? हिंदूंच्या नरकात की ख्रिश्चन धर्माच्या नरकात?’’ - राणी म्हणाली.
त्यावर अंकलचाचा म्हणाले, ‘‘तुम्हा तरुण मुलांना या गोष्टी बकवास आहेत असंच वाटतं.’’
‘‘बकवास वाटत नाही. पण दु:ख जरूर होतं.’’ राणी म्हणाली, ‘‘दोन निरनिराळ्या धर्माचे स्त्री-पुरुष जेव्हा विवाह करतात तेव्हा त्या धर्माच्या ज्येष्ठ लोकांनी त्यांना त्यांच्यासमोर उपस्थित होणार्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे बळ द्यायला हवे. पण तुम्ही उलट नवीन नवीन प्रश्न त्याच्यासमोर उभे करीत असता. मला याच गोष्टीचे दु:ख होतं.’’ बोलता बोलता तिच्या आवाजात कंपनं निर्माण झाली.
‘‘ठीक आहे, जशी तुमची इच्छा’’ - अंकल म्हणाले.
राणी चाचांना म्हणाली, ‘‘अकंल, आपण कुणाच्या पोटी जन्मावं हे आपल्या हातात नसतं. कोण केव्हा मरणार हे कुणीच सांगू शकत नाही. जन्म आणि मृत्यू यांचा आपल्या जातीधर्माशी कोणताच संबंध नसतो. त्याच्या दृष्टीने सगळेजण सारखेच असतात.’’
दुसर्या दिवशी रॉबर्टचाचा जायला निघाले तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी परवा बिझिनेससाठी केनियाला जात आहे. तेथून एका आठवड्याने परतेन. तोपर्यंत तुम्ही माझ्या म्हणण्याचा विचार करून ठेवा.’’
एका आठवड्याने ओंगोलेहून पिताजींचा फोन आला. ‘‘रॉबर्टचाचांच्या विमानाला अपघात झाला आहे. रॉबर्टचा थोरला मुलगा जॉन्सन हैदराबादला येत आहे. तुम्ही रॉबर्टचाचांचा मृतदेह ओंगोलेला आणा.’’
तो हैदराबादला आल्यावर आम्ही दोघं मुंबईला गेलो. कोळसा झालेले ते मृतदेह आम्ही बघितले.
‘‘या मृतांच्या ढिगार्यातून आपल्या बाबूजींना मी ओळखू तरी कसा’’ असे म्हणून जॉन्सन रडू लागला.
‘‘माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह शवपेटीत बंद करून मगच त्याचे दफन करण्यात यावे, अन्यथा मला नरकात पडावे लागेल असं ते नेहमी म्हणायचे’’ - जॉन्सन सांगू लागला.
‘‘मृतदेहांची ओळख पटली नाही तर या मृतदेहांचे तुम्ही काय कराल?’’ - मी एका कर्मचार्याला विचारले.
‘‘असे सगळे मृतदेह आम्ही जमिनीत पुरून टाकू’’ - तो कर्मचारी म्हणाला.
‘‘अरेरे ! या मृतदेहांमध्ये हिंदू असतील तर त्यांच्या देहांचे काय करणार?’’ - रॉबर्ट अंकलचा विचार करतानाच माझ्या तोंडून सहज शब्द निघाले.
तो कर्मचारी विरक्त भावनेने म्हणाला, ‘‘ही माती धर्माधर्मात भेदभाव करीत नाही. ती हिंदूंचे मृतदेहदेखील अत्यंत प्रेमाने आपल्यात सामावून घेईल.’’
हैदराबादला परत आल्यावर जॉन्सनचं समाधान करण्याच्या हेतूने राणी म्हणाली, ‘‘अंकल नक्कीच स्वर्गात गेले असतील.’’
‘‘नाही सिस्टर, त्यांची अंत्ययात्रा ख्रिश्चन पद्धतीनुसार निघाली नव्हती’’ - रडत रडत जॉन्सन म्हणाला.
‘‘म्हणून काय झालं’’ - राणी जॉन्सला म्हणाली, ‘‘आपण इतरांवर किती प्रेम करतो, लोकांच्या दु:खात आपण किती मदत करतो यावरच आपल्याला स्वर्गात स्थान मिळत असते. त्यांचं क्रियाकर्म कोणत्या पद्धतीने करण्यात येतं या गोष्टींना तसा काहीच अर्थ नसतो. प्रत्येक धर्माने आपले वेगळेपण जपण्यासाठी या तर्हेचे बदल केले आहेत.’’
‘‘तुला असं वाटतं का?’’ -जॉन्सन म्हणाला.
‘‘होय. तुझे वडील सच्चे ख्रिश्चन होते. त्यांचा आपल्या तत्त्वांवर विश्वास होता. त्या तत्त्वांचे जो आचरण करतो आणि स्वत: निवडलेल्या मार्गावर जो निर्धारपूर्वक चालतो त्याला नक्कीच स्वर्गाची प्राप्ती होत असते.’’ - राणीने जॉन्सनचे सांत्वन केले त्यामुळे जॉन्सन समाधानाने स्वत:च्या घराकडे परतला. (क्रमश:)
(क्रमश:)
(लेखक नागपूर येथे संयुक्त आयकर आयुक्त या पदावर कार्यरत असून, तेलुगु भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मान्यवर साहित्यिक आहेत)