फुर्सटक्लास विद्यापीठे.. वर्ल्डक्लास समाज!

By Admin | Updated: October 11, 2014 18:10 IST2014-10-11T18:10:06+5:302014-10-11T18:10:06+5:30

पुन्हा एकदा जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाला जागतिक स्तरावर पहिल्या २00मध्ये जागा मिळविता आलेली नाही. खरोखर भारतीय विद्यापीठे जगाशी स्पर्धा करताना मागे पडताहेत की एका नव्याच तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धतीची गरज निर्माण झाली आहे? शिक्षणक्षेत्रातील एका जाणकार विचारवंताचे हे चिंतन.

Furstclass Universities .. Worldclass society! | फुर्सटक्लास विद्यापीठे.. वर्ल्डक्लास समाज!

फुर्सटक्लास विद्यापीठे.. वर्ल्डक्लास समाज!

- डॉ. राम ताकवले 

 
जागतिक स्तरावर सातत्याने विद्यापीठांचे मूल्यमापन विविध निकषांद्वारे होत असते. त्यामध्ये जे निकष लावले जातात, त्यानुसारच जागतिक स्तरावर विद्यापीठांचे मानांकन ठरविले जाते. नुकत्याच झालेल्या अशाच एका जागतिक स्तरावरच्या सर्वेक्षणानुसार जगातील पहिल्या २00 विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, एकही भारतीय विद्यापीठ नसण्याची कारणे समजून घेत असताना त्यांनी लावलेले निकष आणि त्यांनी ठरवलेली दर्जाची व्याख्या हेदेखील समजून घ्यायला हवे. त्यामुळेच या संदर्भात आपण विचार करायचा झाला, तर भारतीय विद्यापीठांचा दर्जा खरोखर खालावलेला आहे का? जर दर्जा खरोखर खालावला असेल तर तो का? आपली विद्यापीठे जगाच्या विद्यापीठांच्या यादीत नाहीत म्हणजे दज्रेदार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो का? नक्की वस्तुस्थिती काय आहे? आणि जर तसे असेल तर मग आपण नक्की काय करायला हवे? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. 
जेव्हा लोकशाहीकरण होत असते, तेव्हा दर्जा खाली येऊ शकतो. अर्थात, शिक्षणाच्या बाबतीत सुरुवातीपासून काळजी घेतली गेली असती आणि दर्जाशी कोणतीही तडजोड केली नसती, तर सार्वत्रिकीकरण होत असताना दर्जाही टिकून राहिला असता. परंतु, शिक्षणाच्या विस्तारीकरणामध्ये ज्या अनेक र्मयादा येतात, सामाजिक दबाव (सोशल प्रेशर) असतो; त्यामुळे दर्जाशी तडजोड होते. भारतातील शिक्षणाच्या बाबतीतही हेच झाले. 
भारतातील शिक्षण पद्धतीचा जो ढाचा आहे, त्यात पूर्वीची शिक्षणाची परंपरा लक्षात घेतली, तर विद्यार्थिसंख्या र्मयादित होती आणि शिक्षकही ज्ञानवंत, प्रज्ञावंत होते. त्यामुळे शिक्षणासाठी पारंपरिक अशी एक पद्धत आखलेली होती. त्यामुळे सर्वच जण संबंधित विषयाचा अभ्यास अत्यंत खोलात जाऊन करायचे. पुण्यासारख्या शहराला ‘विद्येचे माहेरघर’ का म्हणतात? तर, या शहरात अनेक विद्वान लोक होते. त्यांची त्यांच्या विषयांमध्ये तपश्‍चर्या होती. हे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जायचे. त्यातून विद्यार्थीदेखील समृद्ध होत असे. अशी शिक्षणाची परंपरा होती. कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जायचे, त्याचा शोध घ्यायचा, अभ्यासपूर्णता मिळवायची असा ध्यास या शिक्षणप्रक्रियेमागे होता. परंतु, काळाच्या प्रवाहामध्ये ही शिक्षणाची, विद्वत्तेची परंपरा मागे पडत गेली. ही परंपरा कळत-नकळत खंडीत झाली. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण जसजसे होत गेले, तसा शिक्षणामध्ये सर्वांचा सहभाग वाढत गेला. अर्थात, ही काळाची गरज होती व त्या दिशेने प्रयत्न होणेही आवश्यक होते; पण हे करत असताना गुणवत्ता आणि दर्जाकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. दर्जा कसा राखला जावा, याचे धोरण आखण्याऐवजी आहे त्या ढाच्यामध्येच शिक्षणातील सहभाग वाढवत नेला. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर परिणाम झाला. शिक्षणाची पुढील पद्धत ही प्रामुख्याने आशयावर आधारित राहिली व परीक्षाकेंद्रित होत गेली. त्यामुळे एखाद्या विषयाच्या खोलात शिरून त्याचा अभ्यास करणे, हा प्रकार कमी झाला. पाठांतरकेंद्रित व्यवस्था येत गेली. गुणांसाठी शिकतोय, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजत गेली. तीच खरी विद्वत्ता, असा खोटा समज तयार होत गेला आणि शिक्षकांचीही ज्ञानार्जनाची भावना कमी होऊ लागली. पुस्तक आणि परीक्षा यांचा इतका परस्परसंबंध वाढला, की हेच खरे ज्ञान, असा समज निर्माण झाला. त्यामुळे पदव्यांची खैरात होत गेली आणि ‘पण ज्ञानाचे काय?’ हा प्रश्न उपस्थित होत राहिला. याचा परिणाम असा झाला, की शिक्षणाची उपयुक्तता घसरली. त्यामुळेच आता जर आपल्याला आपल्या विद्यापीठांचा दर्जा खरोखर उंचवायचा असेल, तर शिक्षणाचा हा मूळ ढाचा बदलणे गरजेचे आहे. आशयापासून पद्धतीकडे, कृतीकडे जाणे गरजेचे आहे. आपल्या सुदैवाने आपली नवीन पिढी अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहे; परंतु जोपर्यंत शैक्षणिक व्यवस्था आणि ढाचामध्ये बदल होणार नाहीत, तोपर्यंत हा दर्जाचा प्रश्न कायम राहणार. जेव्हा शिक्षणामध्ये सर्वांचा सहभाग मिळविण्याची गरज होती, तेव्हा ही शिक्षण पद्धती काही प्रमाणात योग्य होती. परंतु, आता मात्र एकविसाव्या शतकात बरेच संदर्भ बदलत आहेत आणि त्या बदलत्या प्रवाहांना लक्षात घेऊन त्या युगात जगायला आपण शिकले पाहिजे.
कोणत्याही युगाचे एक तंत्र असते. त्या युगाचा स्वत:चा असा एक धर्म असतो. विसावे शतक होते ते औद्योगिकीकरणाचे. आताचे हे एकविसावे शतक आहे ते डिजिटल क्रांतीचे युग. इंटेलिजन्सचे युग आहे. त्याच्याशी जुळवून घेतच पुढे जावे लागेल. 
विद्यापीठांचा जागतिक स्तरावर दर्जा ठरविला जात असताना, त्यांचे निकषही जागतिक स्तरावरचेच असतात. विद्यापीठे किती जुनी आहेत, विद्यापीठांनी किती नोबेल लॉरीएट्स दिले या स्वरूपाचे विविध निकष असतात. त्यामुळे भारतातील विद्यापीठांनी स्वत:मध्ये बदल घडवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आता शिक्षणाचा उद्देश बदलतोय. ज्ञानार्जन करण्यापुरता शिक्षणाचा उद्देश र्मयादित राहिलेला नसून त्याचा समाजासाठी तुम्ही किती प्रभावीपणे वापर करता, हे महत्त्वाचे ठरले आहे. आता ज्ञान आणि विकास हे खूप जवळ आले आहेत. त्यामध्ये सध्याची आपली शैक्षणिक व्यवस्था कमी पडते आहे. जर आपण त्या दृष्टीने शिक्षणात बदल घडवले आणि दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा थेट समाजाला उपयोग होऊन समाज उन्नत झाला, तर आपली विद्यापीठे जागतिक दर्जाची असतील की नाही यापेक्षा जर त्याद्वारे समाज ‘वर्ल्डक्लास’, ‘फस्र्टक्लास’ झाला, तर त्याचे खरे समाधान विद्यापीठांना असेल. किंबहुना, आपली विकासाची दिशा ही या दिशेने असायला हवी. जर आपण समाजाचा दर्जा उन्नत करू शकलो, तर मग विद्यापीठांना जग लावत असलेले अन्य ‘पॅरामीटर’ गौण ठरतील. कारण, मुळातच ते त्यांनी त्यांच्या सोयीने केलेले असतात. जर आपल्या नव्या शिक्षणव्यवस्थेतून समाजाचा दर्जा उंचावत असेल, तर ती गोष्ट जगालाही अनुकरणीय ठरेल, यात शंका नाही. अर्थात, हे करीत असताना जागतिक स्तरावरच्या विद्यापीठांमध्ये जे-जे चांगले असेल, ते आपण घ्यायलाच हवे, यात अजिबात शंका नाही. सध्या ग्रॉस एन्रोलमेंट रेशो (जीईआर) जो आहे, त्याचे प्रमाण जेमतेम २0 आहे; जे विकसित देशांत ८0पर्यंत आहे. ते निश्‍चितच वाढायला हवे. त्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. 
हे सारे साधायचे असेल, तर जुन्या पद्धतीने शिक्षण देऊन आता चालणार नाही. नवीन शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावाच लागेल. जगभरात सध्या मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस (मूस)चा ट्रेंड आहे. डिस्ट्रीब्युटेड क्लासरूमसारख्या संकल्पना रुजताहेत. जगभरातून लाख-दीड लाख मुले एकाच परीक्षेला बसताहेत. ही सारी नव्या तंत्रज्ञानाची किमया आहे. उत्कृष्ट शिक्षणव्यवस्थेसाठी आपल्याला त्याचा अंगीकार करावाच लागेल. अर्थात, नवी शिक्षण पद्धती स्वीकारत असताना आणि जागतिक विद्यापीठांतील चांगल्या गोष्टी घेत असताना आपण आपली विद्यापीठे बंद करणार का? तर, अजिबात नाही. हे ज्ञानार्जन आहे. जे-जे चांगले आहे, ते घेऊन आपण आपल्या विद्यापीठांचा आणि पर्यायाने आपल्या समाजाचा विकास साधायला हवा. 
विचार, आचार आणि सुधार या शिक्षणाच्या प्रक्रिया आहेत, हे लक्षात घेऊन आपण परिवर्तनशील शिक्षणाचा अंगीकार जर केला, तर पुढील दहा-वीस वर्षांत आपण जगात टॉपवर नक्की जाऊ. जगाचे ज्ञान घ्या आणि तुमच्या पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवा, हा आधुनिक शिक्षणाचा खरा मंत्र आहे. त्यामुळे शिक्षणातून आता आपण प्रत्यक्ष निर्मिती कशी करतो, जागतिक दर्जावर जाऊन प्रश्नांची उकल कशी करतो, यांवर आपल्या विद्यापीठांची गुणवत्ता आणि दर्जा ठरणार आहे. हे करताना डिजिटल तंत्रज्ञानाची कास ही धरायलाच हवी. वर्ल्डक्लास समाजासाठी. आजच्या शिक्षणाची हीच तर हाक आहे. 
(लेखक ज्येष्ठ शैक्षणिक विचारवंत असून, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
(शब्दांकन : पराग पोतदार)
 

Web Title: Furstclass Universities .. Worldclass society!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.