मित्र

By admin | Published: August 22, 2015 06:33 PM2015-08-22T18:33:24+5:302015-08-22T18:33:38+5:30

विचारसरणीत फरक पडला, तो आम्ही दोघांनी निवडलेल्या करिअरच्या भिन्न शाखांमुळे. दोन्ही शाखांचे उद्देश भिन्न होते. त्याबद्दल थोडंसं.

Friends | मित्र

मित्र

Next

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
विचारसरणीत फरक पडला, तो आम्ही दोघांनी निवडलेल्या करिअरच्या भिन्न शाखांमुळे. दोन्ही शाखांचे उद्देश भिन्न होते. त्याबद्दल थोडंसं.
कुणीतरी सांगितलं होतं, की अॅप्लाईड आर्टचा कोर्स करा. सेटलमेंट लवकर होऊन पैसेबिसे झटझट मिळत जातात आणि करिअरला लवकर सुरु वात होते. ‘प्रेम म्हणजे सेक्स’ असा अर्थ तोपर्यंत रूढ झालेला नसला, तरी ‘करिअर म्हणजे पैसा’ असा मात्र अर्थ तेव्हाही थोडय़ाफार प्रमाणात होताच. फाईन आर्ट किंवा तत्कालीन भाषेत ड्रॉईंग अॅण्ड पेंटिंगच्या कोर्समध्ये काय शिकवतात याचा बराचसा अंदाज होता, पण ते शिक्षण घेऊन पुढे करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं, याबद्दलची सुतराम कल्पना आम्हाला नव्हती. आर्ट स्कूलच्या शिक्षकांनी आम्हाला ते कधीच सांगितलं नाही. (खरं तर आम्हीही तोंड उघडून कोणाला तसं विचारलंही नाही.) आमच्या आईवडिलांना किंवा नातेवाइकांमधल्या इतर कुणाला ते माहीत असण्याचा काहीच संबंध नव्हता. इकडेतिकडे चौकशी केल्यामुळे अॅप्लाईड आर्ट किंवा तत्कालीन भाषेतल्या कमर्शिअल आर्टबद्दल मात्र ब:यापैकी कल्पना आलेली होती. मी मुख्य चौकशी केली ती म्हणजे कमर्शिअल आर्टच्या कोर्समध्ये चित्रं काढायला मिळतात की नाही, याची. उत्तर, ‘हो’ असं आल्यावर चित्रं काढायला तर मिळतातच शिवाय पैसेही मिळतात, हा दुहेरी फायदा ध्यानात घेऊन तिकडची वाट धरली. 
पराग म्हणाला, ‘‘मला फक्त चित्रं काढायची आहेत. पोर्टेट आणि कंपोङिाशन्स करायची आहेत. कमर्शिअल आर्टला ते तसलं काही शिकवत नाहीत.’’ शिवाय कमर्शिअल आर्ट म्हणजे ‘सावकारी कला’ असं त्यानं कुठंतरी ऐकलं होतं, ते त्याच्या डोक्यात पक्कं बसलं होतं. आणि कमर्शिअल आर्टमध्ये त्याला एकूणच फारसं काही स्वारस्य नव्हतं. आमच्या दोघांच्याही घरच्यांचा याबद्दलचा फारसा काही गंभीर विचार नव्हता. तुम्ही काय ते ठरवा, तुम्हाला ज्यात आनंद वाटेल ते करा असा त्यांचा सूर होता. 
शिवाय फाईन आर्ट करून पुढे आर्ट टीचर डिप्लोमा करून एखाद्या आर्ट स्कूलमध्ये शिकवता येईल असाही त्याचा एक उद्देश होता. मला काही कुणाला चित्रकला शिकवण्यात वगैरे इंटरेस्ट नव्हता. 
शैक्षणिक वाटा जरी वेगळ्या झाल्या नाही, तरी आमच्या शाखा मात्र बदलल्या.
जसजसं आम्ही त्या त्या क्षेत्रतलं शिक्षण घेऊ लागलो, तसतशा कामाच्या अॅप्लिकेशन्सबद्दलच्या कल्पना बदलत गेल्या. अर्थातच हे सगळं अपरिहार्यच होतं. कारण दोन्ही शाखांचे उद्देश वेगवेगळे होते. अभ्यासाच्या दिशा भिन्न झाल्या. मित्रंचं वर्तुळ बदललं नाही, पण वाढलं. कला शाखेतले इंटरेस्टही बदलत गेले, चित्रकलेबद्दलच्या आपापल्या कल्पना निश्चित होऊ लागल्या. कामाचं स्वरूप बदललं. 
कमर्शिअल आर्ट शिकणा:या विद्याथ्र्याना त्यांच्या क्षमतेपलीकडे काम करावं लागतं, असं त्या शाखेचा अभ्यासक्र म बघून मला आजही वाटतं. तेव्हाही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. वेळ पुरेनासा होतो. माङया कामाचा वेग ब:यापैकी जास्त होता, म्हणून मला कामाचा ताण फारसा कधी वाटला नाही. पण कमी वेगानं काम करणा:या विद्याथ्र्याचा विचार झाला पाहिजे, असं मला वाटतं. बहुतेक मुलं काम करून थकून गेलेली असतात. आपण काय काम करतो आहोत, यापेक्षा काम कसं आणि किती कमी वेळात पूर्ण करतो आहोत, याची स्पर्धा आजही लागलेली दिसते. (पुढे व्यवसायात काम करू लागल्यानंतरही हीच सवय अंगवळणी पडते आणि अर्थात घातकही ठरते.) असंख्य विषय, असाइन्मेंट्सची अतोनात संख्या, सबमिशनचा ताण या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या हातून होणा:या निर्मितीवर होतो आणि  कच्ची मडकी बाहेर पडतात. ‘मार्केटमध्ये काय चालेल, काय चालणार नाही, कोणत्या कलरस्कीम्स पॉप्युलर आहेत वगैरे गोष्टी कमर्शिअल आर्टमध्ये सांगितल्या जात. ते तसं सांगण्यामागचा अभ्यासक्रमाचा उद्देश काहीही असला, तरी मुलांच्या मनावर त्याचा परिणाम थोडासा विपरीतच होत असे. हातून नकळत भडक कलर स्कीम्स केल्या जात. कोणता रंग कोणत्या रंगावर उठून दिसेल, असं एका अर्थानं ‘व्यापारी शिक्षण’ मी घेऊ लागलो. किती अंतरावरून कोणती अक्षरं किती स्पष्ट दिसतील आणि छपाईला सोयीस्कर अशी चित्रं कशी काढावीत, याचेही धडे मी घेऊ लागलो. 
मग या असल्या निकषांवर प्रदर्शनातलं, म्युङिायममधलं एखादं चित्र चांगलं की वाईट यावर आमचे मतभेद होत. वेळप्रसंगी त्याचं पर्यवसान भांडणात होत असे. तुमच्या आयुष्यात फक्त चित्रकला, चित्रकला आणि चित्रकला असाच विषय चोवीस तास घोळत असण्याचे काही दिवस असतात. हा मोठा संवेदनशील आणि नाजूक असा काळ असतो. चित्रकलेबद्दलच्या मतांच्या जागा दुख:या आणि हळव्या असतात. इतरांचं तर जाऊच द्या, पण स्वत:चंसुद्धा नुसतं बोट जरी तिथे लागलं तरी तिथे हुळहुळतं, वेदना होतात. असे बरेच समरप्रसंग आम्ही अनुभवले. कित्येकदा रस्त्यातून जात असताना एखादी जाहिरात, प्रदर्शनात, म्युङिायममधलं एखादं चित्र आमच्या चित्रकलेविषयीच्या शाळकरी कल्पनांना धक्का देत असे. मग संभ्रम निर्माण होऊन भांडणाचा अंत मारामारीत होत असे. तसल्या मुद्दय़ांवर आम्ही दोघं एकमेकांवर चिडून एकमेकांच्या अंगावर धावून जातो आहोत आणि रस्त्यावरच गंभीरपणाने मारामारी करतो आहोत, असे अनेक प्रसंग आणि जागा आजही माङया दृष्टीसमोर तरळतात आणि आठवून हसू येतं, क्वचितप्रसंगी हृदय भरून येतं. डोळे पाणावतात.
शिक्षणाच्या तिस:या-चौथ्या वर्षानंतर पाचव्या वर्षाच्या उंरठय़ावर असताना, गोंधळेकर सरांनी मात्र आम्हाला चांगलंच भानावर आणलं. ‘वर्क ऑफ आर्ट’ आणि ‘आर्ट ऑफ वर्क’ या दोन गोष्टी भिन्न आहेत, त्या कशा भिन्न आहेत आणि त्या गोष्टींमागचा उद्देश त्यांनी एकदा एका लेक्चरमध्ये सांगितला, तो जन्मभर लक्षात राहिला. मग मात्र आम्हा दोघांच्या कामाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन मोठय़ा प्रमाणात बदलला. काम करतानाचा उद्देश सर्वात महत्त्वाचा, ही गोष्ट आमच्या मारामा:यांमधून आम्ही शिकलो. गोंधळेकर मास्तरांना यानिमित्ताने नमस्कार. 
**
शेवटच्या वर्षाची परीक्षा मुंबईला असायची. या परीक्षेच्या पुष्कळ गमती आहेत त्या नंतर कधीतरी. 
सहज म्हणून एकच गोष्ट सांगतो, की कॉपी करणं हा काही तेव्हा(सुद्धा) फारसा गंभीर मामला नव्हता. (कॉपीच्या त्या गमतीजमतीबद्दलही नंतर कधीतरी.)
पेंटिंग आणि कमर्शिअलच्या परीक्षांचं वेळापत्रक साधारण सारखंच असायचं, तेव्हा आम्हा सर्वांचा मुक्काम मुंबईला.
परीक्षेच्या काळात पेपर देणारे, पेपर वाटणारे सुपरवायझर्स असतात. त्यांना काही चित्रकलेबद्दलचं ज्ञान असतंच असं नाही. पण एकाच प्रकारचं काम वर्षानुवर्षं करून चांगली, बरी, वाईट चित्रं कोणती याचा साधारण अंदाज त्यांना आलेला असतो. पोट्र्रेटच्या बाबतीत तर ‘चित्र समजलं नाही’ असं काही संभवतच नाही. समोर बसलेल्या मॉडेलचं चित्र हुबेहूब आलंय की नाही हे समजायला चित्रकलेतलं फार मोठं ज्ञान असावं लागत नाही. 
परीक्षेमध्ये परागनं धमाल उडवली होती. त्यानं अतिशय उच्च दर्जाचं पोट्र्रेट केलं होतं. त्याचं आकलन होतंच तेवढं जबरदस्त! लाखात एक अशी त्याची प्रतिभा होती. आजूबाजूचे, गावोगावहून आलेले परीक्षार्थी, जे.जे.मधले शिक्षक तर अचंबित झालेच; पण सुपरवायझरही ते काम बघून थक्क झाले. त्याचे कॉम्पोङिाशन, स्टील लाइफ वगैरे जे काही असतील नसतील ते प्रॅक्टिकलचे इतर विषय त्यानं झकास केलेले होते. प्रॉब्लेम उपस्थित झाला, तो दिवस होता हिस्ट्री ऑफ आर्टच्या थिअरीचा, लेखी परीक्षेचा. 
कधीच काहीच अभ्यास न केल्यानं, महाराज स्वस्थ बसून राहिले. अर्धाएक तास गेल्यानंतर सुपरवायझरच्यासुद्धा ते लक्षात यावं इतक्या थंडपणानं हा बसून राहिला. त्यांनी चौकशी केल्यावर, प्रश्नपत्रिकेतल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही, हे त्यानं त्या बाईंना सांगितलं. बाईंचा विश्वास बसेना. बाई हतबल झाल्या. पोट्र्रेट आणि इतर पेपर त्यानं कसे सोडवलेत, हे त्यांनी प्रत्यक्ष ‘त्याचि देही त्याचि डोळा’ पाहिलं होतं. आत्ताचा हिस्ट्री ऑफ आर्टचा पेपर कोरा देण्याचं मनोगत त्यानं बोलून दाखवलं होतं. बाई हवालदिल झाल्या. न राहवून शेवटी म्हणाल्या, ‘‘बघून लिहा. मी परवानगी देते अनऑफिशिअली. पस्तीस मार्काएवढं पास होण्यापुरतं तरी लिहा.’’ बाई मोठीच रिस्क घेत होत्या. पण त्याच्या कामापुढे नियमांनी लोळण घेतली होती. पराग म्हणाला, ‘‘नको! कॉपी करून पास होणं माङया तत्त्वात बसत नाही. नाहीतर मी कधीच केली असती. हे सगळं बोलायची तुमच्यावर वेळ आली नसती. मी कॉपी करणार नाही. पुढच्या वर्षी नीट अभ्यास करून पुन्हा परीक्षेला बसेन.’’ जास्त बोलण्याची ती वेळही नव्हती आणि प्रसंगही नव्हता. बाईंनी आडवळणांनी जाऊन त्याला परवानगी देऊ केली होती. पण त्यानं ती ऑफर नाकारली होती. त्याची सद्सद्विवेकबुद्धी अचानकच जागी झाली होती.
कुणाचं वागणं योग्य - अयोग्य हे मला आजही ठरवता आलेलं नाही. एरवी हा कसा वागला असता हेही मला तेव्हाही सांगता येत नव्हतं. 
कॉपी करायचीच नाही, इतका काही तो निष्ठावान नव्हता, हे मात्र मी नक्की सांगू शकतो. वेडंवाकडं वागतच नव्हता, असं काही नाही. आमच्यापैकी कुणीच तसं नव्हतं. पण तो प्रचंड मनस्वी मात्र होता, हे नि:संशय! कोणत्या वेळेस कोणता निर्णय घेईल, याची काहीच खात्री नसायची. आणि एकदा का त्याचा निर्णय ठरला, की त्यात बदल होण्याची शक्यता शून्य टक्के! त्याप्रमाणो त्याला त्यावेळी आपण कॉपी करू नये, असं वाटलं असणार; आणि त्याप्रमाणो त्यावेळेला त्याला जसं वाटलं तसं तो वागला. 
पराग नापास झाला होता.
पुढल्या वर्षी महाराष्ट्रातून पहिल्या पाचात आला.
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
chandramohan.kulkarni@gmail.com
 

Web Title: Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.