मित्र

By Admin | Updated: July 25, 2015 18:13 IST2015-07-25T18:13:19+5:302015-07-25T18:13:19+5:30

त्याला कुठेच स्वस्थ चित्तानं बसायचं नसे. सारखी हालचाल, सदैव अस्वस्थ! त्याचा आवडता शब्द होता- कासावीस! सारखं सारखं, पण हसत म्हणायचा ‘‘कासावीस वाटतंय!’’ एका जागी बसायचा फक्त चित्र काढताना! बारा बारा तास मुंडी खाली. चित्र काढायचाच मुळी तसली. ठिपक्या ठिपक्यांची. एका चित्रत एक कोटी बत्तीस लाख ठिपके!

Friends | मित्र

मित्र

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
 
आपल्या जवळची माणसं जातात. दु:ख होतं. खूप काही गमावतो आपण. 
रक्ताची माणसं गेली की मग तर आतून बाहेरून पूर्ण ढासळतो आपण.
मित्रचं जाणं काय असतं, हे ज्यांचे मित्र गेलेत, ते समजू शकतात; किंवा तेच फक्त समजू शकतात.
 
एक मित्र होता, गेला. फार लवकर.     
गेला तेव्हा असेल बत्तीसतेहतीस वगैरे वर्षांचा.
आठवीपासनं शाळेत एकत्र शिकलो आणि पुढे एका कॉलेजात, अर्थात अभिनव कला विद्यालयात.
पहिलं वर्ष पायाभरणीचं. पुढच्या वर्षी तो गेला फाइन आर्ट्सला नि मी इकडे अॅप्लाईडला.
 
खूप कलंदर चित्रकार असतात. चित्रकार असलं की कलंदर असायला हवं, म्हणूनही खूपजण कलंदर असतात. चित्रकार असलं की कलंदर दिसायला हवं, म्हणूनही खूपजण कलंदर दिसतात.
हा दिसण्यात कलंदर नव्हता. 
अजिबातच नव्हता.
होता मात्र अस्सल.
उंच.
चांगलाच उंच. सडपातळ. 
लांब ढांगा टाकत मान तिरकी ठेवून झपझप चालायचा. लांब सरळ नाक. उभट सावळा चेहरा. पुढे न आलेले पण किंचित मोठे दात, त्यामुळे जबडा किंचित मोठा, मोठी जिवणी. हसला की सगळे दात स्पष्ट दिसत. त्याचं ते विशिष्ट हास्य अजूनही आठवतं.
 आम्हा दोघांची एक कॉमन नावडती गोष्ट कंगवा. त्यामुळे डोक्यावरचे अकाली पांढरे झालेले बेफिकीर केस. उजव्या हातानं कपाळावर आलेले केस पुंजका पकडल्यासारखे एकत्र गोळा करून मागे परतवण्याची लकब.
स्वत:च्या कोणत्याच गोष्टीकडे बिलकुलच लक्ष नसायचं त्याचं. कपडय़ाच्या बाबतीतही तितकाच बेफिकीर.  
हात सदैव मोकळे. 
हातात कधीच एखादी फाईल, पिशवी, शबनम बॅग वगैरे काहीच नसायचं. वर्तमानपत्रत, मासिकात, प्रेसमध्ये चित्र नेऊन द्यायचं असलं की चित्रची गुंडाळी करून शर्टाच्या आत कोंबून ठेवायचा. त्या चित्रच्या गुंडाळीला एखादं रबरबँडसुद्धा लावायचा कंटाळा. 
अक्षरश: रात्रभर जागून केलेलं चित्र प्रेसमध्ये द्यायला म्हणून सकाळी घरातून बाहेर पडायचा. दिवसभर मित्रंकडे, कधी थिएटरमध्ये, हॉटेलात तर कधी कॉलेजमध्येच किंवा एकदम पर्वतीवरच टाइमपास करत करत डोक्यावरचा सूर्य खाली जाऊन संध्याकाळ व्हायची. मग दिवसभर सोबत वागवलेली ती चित्रची गुंडाळी पुन्हा घरी जाऊन टेबलावर टाकून द्यायची. 
कालचं, हे चित्र नेऊन द्यायचं काम दुस:या दिवशी पूर्ण होईलच याची काहीच खात्री नसायची. 
दुस:या दिवशीच काय, तिस:या, चौथ्या, पाचव्या किंवा अगदी नव्या आठवडय़ाच्या पुढच्या कोणत्याच दिवशी ते काम व्हायचं नाही. त्या चित्रची ती गुंडाळी अर्धवट उघडलेल्या अवस्थेत चोच वर करून टेबलावर तिथेच पडलेली दिसायची.
 बहुतेकदा हे चित्र दैनिकासाठी किंवा नियतकालिकांसाठी असायचं. त्यामुळे ते संपादकांच्या हाती नेऊन देऊन पुढे त्याची प्रोसेस होऊन प्रिंटिंगला जाण्यासंबंधीच्या काही वेळा अर्थातच ठरलेल्या असत. त्या वेळा कधीच उलटून जाऊन, संपादक पुढच्या अंकाच्या तयारीला लागलेले असायचे. 
चित्र आपलं टेबलावरच!
बरं, तेव्हा कुणी कुणाला फोनबिन करण्याच्या भानगडीत पडत नसे. संपादकांकडे फोन असले तरी चित्रकारांकडे ते असायला हवेत ना! आणि असले तरी चित्रकारांनी ते करायला हवेत ना!
दोन-तीन आठवडय़ांनी महाराजांना चित्रची आठवण व्हायची. 
घाईघाईत सायकल काढून जोरात पेडल मारत, संपादक ऑफिसमध्ये यायच्या आधीच ऑफिसमधल्या प्यूनच्या हातात घाईघाईनं चित्रची गुंडाळी कोंबून म्हणायचा, 
‘‘साहेब आले की द्या हे त्यांना. मी परत येतो.’’ 
दुस:याच्या वेळेची किंवा आपण केलेल्या कामाची किंमत नाही असा मात्र याचा अर्थ नक्कीच नव्हता, पण त्या गोष्टीचं महत्त्वच त्याच्या लक्षात येत नसे.
 
कुणी मित्र घरी आला की एखादा बोळा हातात घेतल्यासारखा घाईघाईनं शर्ट हातात घेऊन कसाबसा अंगात घालत पँटीत कोंबत खोचत खोचत आणि दरवाजाच्या दिशेला जात म्हणायचा,
 ‘‘चल’’.
घराच्या बाहेर पडता पडता हातानंच भांग पाडल्यासारखं करून घाईघाईत चालायला सुरुवात! 
मी म्हणायचो, ‘‘अरे, अरे, थांब! कसली घाई आहे एवढी? आणि कुठे जायचंय आपण? इथंच बसू ना घरात!’’
का, कोण जाणो, पण त्याला कुठेच स्वस्थ चित्तानं बसायचं नसायचं.  सारखी हालचाल, सदैव अस्वस्थ. 
त्याचा आवडता शब्द होता- कासावीस! 
सारखं सारखं, पण हसत हसत म्हणायचा, ‘‘कासावीस वाटतंय!’’
स्वस्थ, एका जागी बसायचा, ते फक्त चित्र काढताना! अजिबात मान वर होणार नाही, तासन्तास!!
बारा बारा तास मुंडी खाली. चित्र काढायचाच मुळी तसली. असंख्य रेघारेघांची नाहीतर असंख्य ठिपक्या-ठिपक्यांची. 
काय रसायन होतं रक्तात त्याच्या, त्याचं तोच जाणो. 
एकदा एखादं चित्र ठिपक्या-ठिपक्यानं काढायचं ठरवलं की त्या चित्रत एक लाख किंवा एक कोटी बत्तीस लाख ठिपके काढायची वेळ आली तरी बेहत्तर! काढणारच!! 
मी म्हणायचो, ‘‘अरे, काही गरज आहे का हे एवढे कष्ट करायची? तुला काय वेडबीड लागलंय का?’’
त्याचे ते कोटय़ानकोटी ठिपके बघून एखाद्याला घेरी यायची! मला तर ती एक प्रकारची डिसऑर्डरच वाटायची. 
त्याला तसं बोलून दाखवल्यावर तो हसायचा आणि म्हणायचा, ‘‘बरोबर आहे - तसंही असेल.’’
म्हणजे, समजा, चित्रत एखादं झाड काढायचं असेल, आणि झाडाखाली एखादा साधू आणि त्याच्याबरोबर एखादं कुत्रं वगैरे असं असेल आणि झाडापेक्षा साधूला, कुत्र्याला महत्त्व द्यायचं असेल तर, तरीसुद्धा दुस:या कोणत्याही मार्गाने झाडाचं सजेशन वगैरे प्रायोगिक गोष्टी न करता, झाडाचे सगळे पार्ट म्हणजे खोड, फांद्या, पानं, फळं, फुलं हे सगळं तपशीलवार ठिपक्या-ठिपक्यानं, पण मुद्दाम ठळक दिसेल असं न काढता, काढत राहायचा.
 ही मात्र त्याची एक खासियत होती. इतके सगळे तपशील करूनही बघणा:याचं लक्ष चित्रतल्या मुख्य घटकाकडेच म्हणजेच उदाहरणार्थ साधू आणि कुत्र्याकडेच जाईल, लक्ष राहील अशी योजना तो बेमालूमपणो करत असे.
झाडाकडे निर्देश करून मी म्हणायचो, ‘‘स्वत:चं नाव नाही काढलं?’’
तो म्हणायचा, ‘‘म्हणजे?’’     
‘‘पराग. एवढं सगळं काढलंच आहेस तर फुलांमधले परागकणसुद्धा काढ की!’’
रागवायचा कधीच नाही, हसायचा, म्हणायचा,  ‘‘बरोबरे तुझं.’’ 
..खाली एकीकडे ठिपके द्यायचं काम सुरूच!
 
फिगर ड्रॉईंगवर अक्षरश: हुकमत. हाडाचा मांसाचा रक्ताचाच चित्रकार होता तो. कोणत्याही देशातला माणूसप्राणीपक्षीझाडवाहनइमारतशस्त्र. का ही ही..! बघितलेलं  सहज काढायचा, न बघितलेलं कुठूनतरी बघून यायचा मासिकातनं, पुस्तकातनं, सिनेमातनं. 
 
शिकण्याची आमची आमची एक पद्धत शोधून काढली होती.
समजा एखादा माणूस धावतोय, असं चित्र काढायचंय. 
मग आम्ही एकमेकांसमोर स्लोमोशनमध्ये धावायचो. पुन्हा पुन्हा निरीक्षण करायचो. धावताना कोणता हात पुढे जातो, कोणता मागे जातो, कोणता पाय पुढे जातो, पावलांच्या पोङिाशन्स कशा होतात वगैरे. 
(फोटो काढून ठेवण्याचा पर्याय उपलब्धच नव्हता. आणि समोर फोटो ठेवून बघून काढण्याचं मनातही यायचं नाही, कारण ते फक्त कॉपीवर्क व्हायचं, त्यात अभ्यास व्हायचा नाही. त्यामुळेच की काय, विशेष कारण असल्याशिवाय फोटो समोर ठेवून त्यावरून चित्र काढण्याच्या प्रकाराबद्दलची नकारात्मकता माङया मनात आजही शिल्लक आहे.)
 निरीक्षणांती एखादी पोङिाशन पक्की ठरवली जाऊन पळणा:या माणसाचं कागदावर आरेखन व्हायचं. पेननं, थेट काळ्या शाईत. बहुतेकदा प्रथम केलेलं आरेखन आवडायचं नाही. एखादा हात किंवा एखादा पाय चुकल्यासारखा वाटायचा. 
आता? 
त्या आरेखनावरच मग दुस:या आरेखनाचं आरोपण व्हायचं. 
पहिलं खोडायचं नाही, कारण काय चुकलंय हे कळायला हवं. 
मग दुसरं केलेलंही आवडायचं नाही, किंवा पटायचं नाही. 
मग तिसरं आरेखन, त्याच्यावरच. 
जणू पळणारा माणूस काचेचा आहे. 
सगळं मिळून मग ते चित्र अॅनिमेशनसाठी चित्र करताना केलेल्या इन-बिटविन्ससारखं दिसू लागायचं. डोळे किलकिले करून त्यातल्या आपल्याला हव्या असलेल्या पोङिाशनकडे फोकस करून बाकीच्या पोङिाशन्स मनानंच खोडायच्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुन्हा दुसरा कागद घेऊन हवी ती पोङिाशन चितारायची.
असा अभ्यास!!                             
(पूर्वार्ध)
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.