‘मनाच्या पंखाची’ भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 11:37 PM2019-11-30T23:37:31+5:302019-11-30T23:44:13+5:30

हल्ली पुरोगामीत्वाचे पोवाडे गाणारी आमची जीवनशैली जिने आम्हाला कोठून कोठे आणून ठेवले हे सिंहावलोकन केल्यानंतरच कळते.

Flying of the ' mind of wings' | ‘मनाच्या पंखाची’ भरारी

‘मनाच्या पंखाची’ भरारी

googlenewsNext
  • विद्या बनाफर

हल्ली पुरोगामीत्वाचे पोवाडे गाणारी आमची जीवनशैली जिने आम्हाला कोठून कोठे आणून ठेवले हे सिंहावलोकन केल्यानंतरच कळते. पूर्वी मर्यादित गरजा होत्या, मर्यादित इच्छा व अपेक्षा होत्या, अन् जोडलेली खूप माणसे होती, रक्ताची नाती दृढ होती. एकमेकांना हृदयात जागा होती. संयुक्त कुटुंबे होती. आज त्यांची जागा अमर्याद गरजा व इच्छा-अपेक्षांनी घेतली आहे. घरात आज चार माणसे, मोबाइल आठ, गाड्या, मोठा बंगला आहे. मुले पाळणाघरात, कुत्रे बंगल्यात आणि घरची कामे सर्व यंत्र करीत आहेत. आई-बाबा मुलांच्या वाट्याला क्वचितच येतात. आयुष्य उधळण्याची, धावण्याची स्पर्धा जणू सुरू आहे आणि आम्ही म्हणत आहोत की आम्ही जगतोय. शर्यतीमध्ये मागे पडला तो आत्मघात करीत आहे. कुणी शिक्षणात यशस्वी झालं नाही म्हणून तर कुणी कर्जबाजारी झालं म्हणून. अपयश पचवण्याची क्षमता आपल्यात उरलेली नाही. एखादी मुलगी प्रेमाला नकार देत असेल तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पुरुषार्थ मानला जात आहे. परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या तर कुणी वासनांध देह एक वर्षाच्या बालिकेवरसुद्धा बलात्कार करून आपल्या देहाची आग विझवण्यात धन्यता मानत आहे. कधी पालकांनी मागितले ते दिले नाही म्हणून तरुणाई आत्महत्येकडे वळत आहे. रोजच्या वर्तमानपत्रातून या घटना किरकोळ झाल्या आहेत. शासन-प्रशासन ही या घटनेची निंदा केली, समित्या बनविल्या, न्याय मिळेल यासारखी आश्वासने देऊन मोकळी होते व होळीची बोंब चार दिवस नंतर घटना जुनी होते. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपमुळे संवाद सुसंवाद संपुष्टात आले त्यांची जागा हताशपणा, निराशपणा, डिप्रेशनसारखे आजार अनेक मेंदूवर कब्जा करून घेत आहेत. त्यात शेतकरी आत्महत्या हा विदर्भातील संवेदनशील विषय विदर्भातीलच. कारंजा जवळ एक गाव आहे तेथे शेतकरी आत्महत्यामुळे झालेल्या दीडशे ते दोनशे विधवा आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्यामुळे विदर्भाला विधवांचे वृंदावन म्हटले जाते. जेव्हा माणूस, व्यक्ती, स्त्री-पुरुष कोणीही बाहेरून, शासन-प्रशासन, नाते, आप्तस्वकीय यांच्याकडून सुधारणा, सुख सुविधा व मदत किंवा सहकार्याची अपेक्षा करतो तेव्हा तो परावलंबी असतो. जसे अंड्याला बाहेरून दाब दिला तर एक जीवन संपते. हाच दाब जेव्हा आतून दिला जातो तेव्हा एक नवीन जीव जन्माला येतो. तसंच माणसाचं आहे, नेमके हेच तत्त्व आपल्या जीवनाला लागू पडते. बाहेरून दाब दिला गेला तर अपेक्षा पूर्ण न होता कदाचित नुकसान होईल; पण आतून दिल्या गेला तर काहीतरी मोठा यशाचा मार्ग किंवा एक वेगळा विचार समोर येऊ शकतो जो अपयश, आत्महत्यासारख्या निराशावादी मार्गापेक्षा फार प्रशस्त असतो.
प्रत्येक व्यक्तीकडे एक न दिसणारा म्हणजेच अदृश्य अवयव असतो. तो त्याला माहिती नसतो आणि त्याचा शोध घेण्यासाठी आतून दाब यावा लागतो. ‘मी’चा शोध घ्यावा लागतो. आपल्या मनाच्या शक्तीचा शोध आणि तो अवयव म्हणजे पंख!! मनाचे पंख! या पंखाचा शोध लावता आला तर समोर एक मोठे आकाश असते व त्यात कितीही उंच भरारी घेता येते. पुरुषासारखा पुरुष फक्त निसर्गावर अवलंबून राहून, अस्मानी संकटाने खचून आत्महत्या करतो. उरते मागे स्त्री ती जगाच्या दृष्टीने बिचारी असते. चार चिल्ले पिल्ले घेऊन हलाखीचे जीवन कंठते. निसर्गाचा असहकार, शासन प्रशासनाचे भिकार दस्तऐवज, कायदे, औपचारिकता, त्यानंतर टाकलेला तुकडा याने परिवाराची भूक भागत नाही. समस्या मिटत नाहीत. अशा स्थितीत पर्यायी मार्ग, वेगळा विचार, तज्ज्ञांचे सहकार्य, जीवनाशी निष्ठा असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते. विद्यार्थी शिक्षणाच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये तरुण वयात आत्महत्या करताहेत. अपयशामुळे खचून जाताहेत. खरं म्हणजे विनर तो नसतो जो शर्यत शिंकला. ज्याने शर्यत पूर्ण केली तो जिंकलेलाच असतो. समस्या लिहा, मांडा, कोणाला तरी सांगा. जगात मदत करणारे अनेक लोकही आहेत. आपण त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचत नाही. समस्या योग्य रीतीने मांडली म्हणजे अर्धी समस्या सोडविल्यासारखे असते. आपल्या दुर्बलतेवर नव्हे, आपल्यातील सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. धाडस केले, धोके पत्करले तर यश तुमचेच असते.
‘हारा वह जो मैदान में उतरा ही नहीं।
जो खेला वही जीता है’

Web Title: Flying of the ' mind of wings'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.