उडतं स्वप्न!
By Admin | Updated: April 4, 2015 18:22 IST2015-04-04T18:22:13+5:302015-04-04T18:22:13+5:30
फुगा! लहान मुलांचं खेळणं! त्याचं काय एवढं मोठं? पण याच फुग्याशी खेळायला जगभरातले हजारो लोक येतात. स्वप्न प्रत्यक्षात जगतात आणि तनमनात हवा भरून जातात!

उडतं स्वप्न!
कल्याणी गाडगीळ , न्यूझीलंड
फुगे म्हणजे लहान मुलांचे खेळणे. पण हॉट एअर बलून म्हणजे मोठय़ा माणसांचे खेळणे. तेही जगभरातल्या माणसांचे. आणि यानिमित्त मोठा उरूस साजरा केला जात असेल तर?
- होय. न्यूझीलंडमधील हेमिल्टनमधे 2003 सालापासून ‘बलून्स ओव्हर वायकाटो फेस्टिव्हल’ साजरा होतोय. देशभरातून तसेच परदेशातूनही हॉट एअर बलून उडविणार्यांचे संघ व हजारो प्रेक्षक यात सहभागी होतात. भारतातसुद्धा जयपूर, दिल्ली, मुंबई वगैरे शहरांत ही सोय आहे.
हेमिल्टनमधे नुकताच हॉट एअर बलूनचा उरूस झाला. सगळीकडे नुसता उत्साह! मैदानावर अर्धवट फुगवून ठेवलेल्या ‘एन्व्हलप’मधे एक डॉलरचे नाणे देऊन जाता येत होते. तिथे मुला-पालकांची बलून आतून पाहण्यासाठी गर्दी होती.
या उत्सवानिमित्त एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली. एका उंच खांबाच्या टोकाला बांधलेली एक हजार डॉलर्सची पिशवी बलूनच्या पायलटने मिळविण्याची! त्यासाठी बलून व पायलटची बास्केट खांबाजवळ जाणे गरजेचे. कारण पायलटने हाताने ती पिशवी खेचायची होती. ते पाहताना दहीहंडी फोडून नोटांची बक्षिसी मिळविणारे आपले ‘गोपाल’ आठवले.
बलूनचे उडणे हवेवर अवलंबून असते. पायलटच्या इच्छेनुसार फुग्यांचे तंतोतंत नियंत्रण शक्य नसते. त्यामुळे यावर्षी एकाही पायलटला ही रक्कम मिळविता आली नाही. त्यांच्यासाठीची दुसरी स्पर्धा होती हवेत गेल्यावर वरून दोन बिल्ले खाली टाकायचे. ते जमिनीवर आखलेल्या त्रिकोणात व १000 डॉलरची थैली बांधलेल्या खांबाच्या अगदी जवळ. कोणाला हे बक्षीस मिळालं? त्याच निकालाची आता सारे वाट पाहताहेत.
याच दिवशी रात्री वायकाटो विद्यापीठाच्या मैदानावर एक मोठा कार्यक्र म होता. संध्याकाळी ६ वाजल्यापासून गायकांचा ताफा स्टेजवरून प्रसिद्ध गाणी गात होता. जमलेले प्रेक्षक मैदानावर बसून वाद्यांच्या तालावर गात, नाचत होते. खाद्यपदार्थांचे स्टॉल, हॉट एअर बलूनच्या प्रतिकृती, रात्री चमचमणारी कानातली-गळ्यातली व हातात धरायचे दांडे विकले जात होते. शहरातील अनेक भागातून बसेस भरभरून प्रेक्षक मैदानावर येत होते. त्यासाठीची सोयही मोफतच होती. अंधार पडल्यावर फुगे फुगवायला सुरुवात झाली व बरोबर रात्री ८ वाजता गाण्याच्या तालावर चमकणारे फुगे स्टेजच्या मागे आलटून पालटून चमकू लागले!
आणि हे सगळे सामूहिक उपक्र म सुरू असतानाच लोकांना हॉट एअर बलूनची प्रत्यक्षात सफर करण्याची संधीही उपलब्ध होतीच. सफरीचा दर - माणशी 300 डॉलर्स (सुमारे पंधरा हजार रुपये) फक्त! सफर साधारणत: एक तासाची व जमिनीवर सुखरूप उतरल्यावर श्ॉँपेनचा ग्लासही मिळत होता. (ही सफर फक्त सकाळच्या वेळीच उपलब्ध होती.)
या उत्सवात येणार्या फुग्यांचे आकार अत्यंत आकर्षक, वैविध्यपूर्ण असतात. दरवर्षीचा एक खास आकाराचा फुगा बनविला जातो. आजवरच्या फुग्यांचे खास आकार म्हणजे मोर, ‘श्रूम’ म्हणजे मश्रूम, केक, मिस्टर ‘बप’ म्हणजे कासव, लाल भोपळा, बीगल कुत्रा, लेडी बग, डार्थ वाडेर. हा ‘स्टार वॉर्स’ मधील खलनायक.
यंदाचे खास दोन फुगे ‘फी२ील्ली ह्र’ िअु४३ उ’४१ अ१‘’ व ‘पेग लेग पीट द पायरेट पॅरट’.
‘फी२ील्ली’ या रंग विकणार्या कंपनीचा बलून ‘नोहाज आर्क’ या बायबलमधील कथेवर आधारित आहे. जलप्रलयाने पृथ्वीचा नाश होणार म्हटल्यावर नोहाने एका होडीत काही प्राण्यांना घालून संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश थांबविला. या 30 मीटर लांब, 25 मीटर उंच व 16 मीटर रुंद होडीच्या आकाराच्या फुग्यात गेंड्यापासून ते झेब्रापर्यंतचे 28 प्राणी होते. दुसरा तसाच आकर्षक रंगाचा बलून पोपटाच्या रंगाचा व आकाराचा - 25 मीटर उंच व 200 किलोपेक्षा जास्त वजनाचा. ‘सिंबा - द लायन किंग’ हा सिंहाच्या चेहर्याचा फुगाही लोकांना फार आवडत होता. लाल फुग्यावर मोठे काळे ठिपके असलेला ‘डॉट’ नावाचा, 25 शाळांतील लहान मुलांनी काढलेली चित्रे असलेला ‘ळं्र३४ल्लॅ ङ्र२ि १ं८’ नावाचा तैवानचा फुगा, र्जद पिवळे-लाल रंगाचा ‘वायकाटो सनराइज’ नावाचा, सप्तरंगी चट्टय़ापट्टय़ांचा ‘व्हिस्की’ नावाचा फुगा, इंद्रधनुष्याचे रंग दाखविणारा ‘हेमिल्टन’ नावाचा. यादी केवढीतरी होईल.
गंमत म्हणजे या फुग्यांना स्वत:ची खास नावे असतात. या उत्सवासाठी वेगवेगळ्या देशांतून पायलट आपापले फुगे घेऊन येतात. पायलटना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ते विविध क्षेत्रांत काम करणारे असल्याचे समजले. आय.टी. कंपनीचे कर्मचारी, शेतकरी, फायनान्स कंपनीचा मॅनेजर, रिटायर्ड पायलट, इंजिनिअर, डॉमिनो पिझ्झा स्टोअरचा पार्टनर, रिटायर्ड फायरमन, बिल्डर, माळी, नर्स.. समाजाच्या विविध थरातले लोक. बलूनिंगचा अनुभव थोडक्यात सांगा म्हटल्यावर एकाने सांगितले. ‘स्वप्न प्रत्यक्षात जगण्याचा हा अनुभव आहे.’ दुसरी महिला पायलट म्हणाली, ‘कधीही न संपणारी ही चटक आहे.’
खरंच आहे ते! स्वत: चव घेतल्याशिवाय त्याची चटक कळणार नाही!
माणसासह कसा
उडतो बलून?हॉट एअर बलून म्हणजे १00 ते २00 फुटी प्रचंड मोठा फुगा असतो. फुग्याला ‘एन्व्हलप’ म्हणतात. जमिनीवर तो पसरून त्यात मशीनच्या सहाय्याने गरम हवा भरतात. हवा भरली जाऊ लागली की फुगा फुगू लागतो व हळूहळू जमिनीवर उभा राहू लागतो. फुग्याच्या खाली दोराच्या सहाय्याने ‘गोंडोला’ अथवा ‘बास्केट’ बांधलेली असते. त्यात लोकांना उभे राहण्याची सोय असते. गरम हवेची घनता थंड हवेच्या घनतेपेक्षा कमी असल्याने गरम हवा भरलेला फुगा हलका होऊन आकाशात उडू लागतो. फुगा पूर्ण भरला की हवेत उड्डाण घेतो. लोकांनी फुग्याच्या बास्केटमधे पटकन उडी मारून उभे राहायचे असते. बास्केटमधून सफर करताना आपण चक्क हवेत उडत चालल्याचा अनुभव येतो. झाडांच्या शेंड्यांवरून, नदी किंवा तळ्यावरून, शहरावरून खाली पाहिले की शहरातील रस्ते, वाहने, माणसे इटुकली पिटुकली दिसतात. काही हजार फूट उंचीवर हे फुगे पोचू शकतात. आजवरची फुग्याने गाठलेली कमाल उंची २१0७ मीटर्स एवढी आहे.
करायचंय
बलून उड्डाण?
बलून उड्डाणाचे शिक्षण देणार्या खास संस्था देशोदेशी आहेत. अभ्यासक्रम साधारण नऊ महिन्यांचा. वयोर्मयादा किमान १६ वर्षे. स्वत:ची हौस म्हणून फुगे उडविणारे श्रीमंत लोक फुगे विकत घेतात. त्यांच्या किमती पंधरा हजार डॉलर्सपासून ते एक-दीड लाख डॉलरपर्यंत! लहान फुग्याला गॅस सिलिंडर पेटवून गरम हवा भरायचा खर्च ताशी तीनशे डॉलर्सपर्यंत येतो. सिव्हिल एव्हिएशनतर्फे सुरक्षेचे नियम, अपघात झाल्यास काय करायचे या गोष्टींचे नियंत्रण केले जाते. पायलट्सना दृष्टी, मानसिक संतुलन, शारीरिक क्षमता यासंबंधीचे लायसेन्स घ्यावे लागते व त्याचे नूतनीकरण करणेही आवश्यक असते. फुगा उंच न्यायचा असेल तर गरम हवा भरायची, खाली उतरवायचा तेव्हा फुग्यातील गरम हवा कमी करायची एवढे नियंत्रण. बाकी सर्व हवामान, वारे यांवर अवलंबून. म्हणून व्यावसायिक कंपन्या पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान वेधशाळेकडून हवेची खात्री करून घेतात व मगच पर्यटकांना नेतात.
(लेखिका ऑकलंड, न्यूझीलंड येथे वास्तव्यास आहेत.)