कथा रानपिंगळ्याच्या शोधाची
By Admin | Updated: September 13, 2014 15:06 IST2014-09-13T15:06:02+5:302014-09-13T15:06:02+5:30
रानपिंगळा हा घुबडाच्या प्रजातीमधील रात्री नव्हे, तर दिवसा फिरणारा एकमेव पक्षी आहे. जवळपास १00 वर्षे त्याचे अस्तित्व दिसून येत नव्हते. त्यानंतर अलीकडे काही पक्षिप्रेमींनी केलेल्या निरीक्षणात मात्र तो अजूनही जंगलांमध्ये त्याचे अस्तित्व टिकवून असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या शोधाचा हा प्रवास..

कथा रानपिंगळ्याच्या शोधाची
डॉ. जयंत वडतकर
रानपिंगळा, इंग्रजीमध्ये ज्याची ओळख फॉरेस्ट आउलेट अन् शास्त्रीय भाषेमध्ये हेटेरोग्लॉक्स ब्लेविटी आहे. हा पक्षी सध्या देशभरामध्ये चर्चेत असलेल्या काही पक्षी प्रजातींपैकी एक महत्त्वपूर्ण पक्षी आहे. इ. स. १८७२ मध्ये या पक्ष्याला प्रथम शोधल्यापासून हा पक्षी विविध कारणास्तव चर्चेत राहिलेला आहे. पक्षी अभ्यासक एफ. आर. ब्लेविटी यांनी या पक्ष्याचा प्रथम नमुना मिळविला, तो त्या वेळच्या पूर्व मध्य प्रदेशातील बुशना-फुलझन या ठिकाणांहून आजपासून साधारणत: १४२ वर्षांपूर्वी म्हणजेच १४ डिसेंबर १८७२ रोजी. त्यानंतर १८७३ मध्ये प्रसिद्ध पक्षिसंशोधक ए. ओ. ह्यूम यांनी त्यांचे विश्लेषण व वर्गीकरण करून नवीन प्रजाती असल्याचे संशोधन मांडले व हा नमुना मिळविणार्या ब्लेविटी यांचे नावावरूनच त्याचे नाव ठेवले अँथीनी ब्लेविटी. साधारणत: सर्वत्र आढळणार्या पिंगळा या छोट्या घुबड प्रजातीशी साम्य असल्यामुळे त्याला पिंगळ्याच्या पक्षी गटात समाविष्ट केले गेले. या नवीन प्रजातीबद्दल तत्कालीन ब्रिटिश अभ्यासकामध्ये याची माहिती होऊन तो चर्चेत आला व त्यानंतर विविध अभ्यासकांनी या पक्ष्याला देशाच्या विविध भागांमध्ये शोधण्याचे प्रयत्न केले.
त्यानंतर जवळपास पाच वर्षांनी फेब्रुवारी १८७७ मध्येही बेल या अभ्यासकाने या ब्लेविटी आऊलचा दुसरा नमुना पहिल्या ठिकाणापासून दक्षिणेकडे जवळपास १00 कि.मी. अंतरावरील ओरिसा राज्यातील सबलपूर भागातील खारियार या ठिकाणाहून मिळविला. त्यानंतर १८८0 ते ८३ दरम्यान जेम्स डेव्हीडसन यांनी महाराष्ट्रातील खान्देशाच्या पश्चिमेकडील सातपुडाच्या जंगलामध्ये शोधून त्यांचे चार नमुने मिळविले व याच भागातील शहाद्याच्या जवळच्या जंगलामधून एक पक्षिनमुना गोळा केला. त्यानंतर मात्र जवळपास ३१ वर्षे हा पक्षी कुणाला दिसला नाही व बहुधा त्याबद्दल फारशी चर्चाही झाली नाही. या काळामधील या पक्ष्यासंबंधी तशी कुठलीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, १९१४ मध्ये हा पक्षी पुन्हा एकदा चर्चेत आला. कर्नल रिचर्ड्सन यांनी गुजरातमधील मांडवी भागामधूनच पक्ष्याचा नमुना मिळविल्याचा दावा केला. मात्र, यानंतर अनेक वषर्ा्ंनी हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. हा नमुना १८८३ दरम्यान जेम्स डेव्हीडसन यांनी खान्देशातून गोळा केलेला व नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडन येथून हरविलेला असल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच १८८३ नंतर हा पक्षी जवळपास शतकभर कुणालाही सापडला नसल्याचे सिद्ध झाले व तो अज्ञातवासातच राहिला. त्यामुळे १९६४ मध्ये ग्रॅसमन आणि हॅम्लेट यांनी या ब्लेविटी आऊलला दुर्मिळ म्हणून समजले, तर १९७६ला डेव्हीड रिप्ले यांनी त्याला दुर्मिळ पक्षी असे संबोधले. १00 वर्षांत कुणालाही न आढळल्यामुळे पुढे १९८५ नंतर हा पक्षी भारतातून नामशेष झाला असावा, अशी भीती अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली व तो भारतातील नामशेष झालेल्या पक्ष्याच्या यादीमध्ये गणला जाऊ लागला.
भारतातून नामशेष झालेल्या पिंक हेडेड डक , माउन्टेन क्वेल, र्जडन्स् कोर्सर व फॉरेस्ट आऊलेट या चार पक्ष्यांना शोधण्यासाठी भारतातील थोर पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलिम अली व त्यांचे सहकारी एस. धिल्लन रिप्ले यांनी विशेष प्रयत्न केले. डॉ. सलिम अलींना ‘या पक्ष्यांना तर योग्य पद्धतीने शोधले गेले, तर ते सापडू शकतील,’ असा विश्वास होता. त्यानुसारच त्यांनी फॉरेस्ट आऊलेटलाही त्या यापूर्वीच्या ठिकाणाच्या आसपास शोधण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी ते सातपुड्यात व मेळघाटातसुद्धा येऊन गेले होते. परंतु, त्यांना हा पक्षी त्या वेळी मात्र सापडू शकला नाही. या पक्ष्याच्या शेवटच्या अस्तित्वाच्या पुराव्यानंतर तब्बल ११३ वर्षांनी अमेरिकन पक्षी संशोधक बेन किंग यांनी हा पक्षी भारतामध्ये पुन्हा सापडू शकेल, हा आशावाद ठेवून त्याला शोधण्याचे ठरविले. ब्रिटिश म्युझियममध्ये जतन केल्या गेलेल्या सात नमुन्यांच्या व ते गोळा केलेल्या ठिकाणांचा सखोल अभ्यास व माहिती घेऊन रानपिंगळ्याच्या शोधाची मोहीम आखली. दि. १३ ते २७ नोव्हेंबर १९९७ दरम्यान बेन किंग यांनी त्यांचे सहकारी पामेला रासमुसेन व डेव्हीड अबॉट यांच्यासमवेत दि. १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान मध्य प्रदेशातील गोर्मधा वन्यजीव अभयारण्यात, १६ ते १७ दरम्यान ओरिसा व १८ ते २२ दरम्यान मध्य प्रदेशातील चुराभाटी व शिरपूर या ठिकाणांवर पक्ष्याचा शोध घेतला. त्यानंतर १९ व्या शतकात सर्वांत जास्त ५ नमुने ज्या ठिकाणाहून गोळा केले होते, त्या महाराष्ट्राच्या खान्देश भागातील सातपुड्याजवळ जंगलामध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शतकभरापूर्वी त्या ठिकाणाचा अंदाज घेत ही शोधमोहीम सुरूअसतानाच दि. २५ नोव्हेंबर १९९७ला सकाळी ८.३0 वा., सध्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील शहराच्या उत्तरेकडील जंगलामधे रानपिंगळा पुन्हा एकदा सापडला. पुढचे दोन दिवस त्यांचे सखोल निरीक्षण, त्याच्या आवाजाचा अभ्यास इ. वरून तो रानपिंगळा अर्थात फॉरेस्ट आऊलेट असल्याचे बेन किंग व रासमुसेन यांची खात्री झाली व जवळपास ११३ वर्षे अज्ञातवासात राहिलेल्या रानपिंगळय़ाचा पुनशरेध लागला. रानपिंगळा पुन्हा एकदा जगासमोर आला, बातमी जगभर पसरली. पुढे त्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी अनेक स्थानिक पक्षिअभ्यासक, स्थानिक तसेच देशातील विविध संस्थांनी शोधप्रकल्प राबविले व त्याच्या अस्तित्वावर प्रकाश टाकला. त्याच्या पूर्वीच्या ठिकाणापासून, ओरिसा व पूर्व मध्य प्रदेश ठिकाणी तो सापडू शकला नाही. मात्र, सातपुड्याच्या पर्वतराजीनी अजूनही सांभाळलेल्या जंगलामुळे तो सातपुड्याच्या पश्चिम भागातील नंदुरबारजवळील तळोदा शहाद्याच्या राखीव जंगलामध्ये, खान्देशातील यावल अभयारण्यांमध्ये, तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात व त्यालगतच्या मध्य प्रदेशातील बुरानपूर व खांडवा जिल्ह्यातील राखीव जंगलामध्ये मात्र पुन्हा आढळून आला आहे. त्याच्या सवयीचा, आवाजाचा, सहसंबंधाचा व अधिवासाचा सखोल अभ्यास व संशोधनही सुरू असून, हा पक्षी इतर घुबडांप्रमाणे रात्रींचर नसून दिवसा वावरणारा भारतातील एकमेव घुबड आहे. मध्यंतरी त्याच्या वेगळेपणावरून त्यांचे पूर्वीचे कूळ अँथीनी बदलून हेटेरोग्लॉक्स असे झाले. त्याचा वापर असलेल्या सातपुड्यातील अनेक ठिकाणी सध्या जंगलतोड, चराई आदी करणार्यांमुळे त्याच्या अस्तित्वावरसुद्धा आज सातपुड्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मेळघाटात मात्र त्याच्यासाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध आहेत. सातपुड्यातील रानपिंगळ्याच्या अस्तित्वाची ठिकाणे टिकविणे आज मोठे आव्हान आहे.
(लेखक मानद वन्यजीव रक्षक व वाईल्ड लाईफ एन्व्हायर्नमेंट कंझर्व्हेशन सोसायटीचे सचिव आहेत.)