तोडीला तरु फुटे भराने

By Admin | Updated: December 27, 2014 19:33 IST2014-12-27T19:33:10+5:302014-12-27T19:33:10+5:30

वर्ष चुरटकीसरशी संपलं.. कधी कधी एकेक दिवस भरता भरत नाही.. आणि वर्ष संपलं, की वाटतं.. की अरेच्चा! सुरू झालं होतं आत्ताच.. आणि आत्ता संपलंदेखील..

Filled young fur | तोडीला तरु फुटे भराने

तोडीला तरु फुटे भराने

 डॉ. सिसिलिया कार्व्हालो

 
वर्ष चुरटकीसरशी संपलं.. कधी कधी एकेक दिवस भरता भरत नाही.. आणि वर्ष संपलं, की वाटतं.. की अरेच्चा! सुरू झालं होतं आत्ताच.. आणि आत्ता संपलंदेखील.. 
---------
गळालेली, सुकलेली फुले काय कामाची? पण, एखादी व्यक्ती त्या सुकलेल्या, गळालेल्या पाकळ्यांचे अत्तर वा अन्य सुगंधी द्रव्य करून थकलेल्या मनाला ताजेतवाने करू शकते.. आणि आपल्या आयुष्याला उत्सवाचे, उत्साहाचे स्वरूप देऊ शकते.. त्यासाठी माणसाकडे परिपक्वता.. समज असावी लागते. किंबहुना अनुकूल-प्रतिकूल प्रसंगांतूनच अशी समज येत राहते.. शेल सिल्वहरस्टन यांची एक बालकविता वाचनात आली होती. ‘झेब्रा क्वेश्‍चन’ नावाची ही बालकविता आहे. त्यात कवी म्हणतो,
I asked the Zebra
Are you black with white stripes?
or white with black stripes?
And the Zebra asked me
Are you good with bad habits?
or are you bad with good habits?
Are you noisy with quiet times?
or are you quiet with noisy times?
Are you happy with some sad days?
or are you sad with some happy days?
 
कविता किती साधी आणि सोपी.. बालकांना आणि वयाने वाढलेल्या ‘बालकांना’देखील सहज समजेल अशी; पण किती मोठा आशय भरलेला आहे या कवितेत. माणसाचं जीवनच अशा सकारात्मक-नकारात्मक गोष्टींनी विणलेलं असतं.. पण त्याचा छानसा गोफ करून जीवनात शोभा आणायची की त्याचा दोर विणून त्याने आपल्याला भूतकाळाच्या दावणीला बांधून ठेवून एकाच ठिकाणी पाय झाडत राहायचं किंवा काय, हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे.
वर्ष चुरटकीसरशी संपलं.. कधी कधी एकेक दिवस भरता भरत नाही.. आणि वर्ष संपलं, की वाटतं.. की अरेच्चा! सुरू झालं होतं आत्ताच.. आणि आत्ता संपलंदेखील.. परमेश्‍वराच्या विश्‍वनियंत्याच्या लेखी अनेक युगं क्षणासारखी असतात म्हणे आणि आपल्याला आपले काही क्षण युगांसारखे वाटतात.. तथापि क्षणाक्षणाला आयुष्य झपाट्यानं पुढे जात चाललंय, याची जाणीवही आपल्याला प्रगल्भ करीत जाते..
याच वर्षी एका कार्यक्रमासाठी नाशिकला गेले होते. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा कार्यक्रम व परतीचा प्रवास कायमचा स्मरणात राहणारा.. मुंबईकडे पोचणारी बस नाशिकहून पकडली.. दुर्दैव असं, की ड्रायव्हर व कंडक्टर दोघेही लेचेपेचे मिळाले आणि सुदैव असं, की मृत्यूच्या दरीतला आमचा प्रवास आम्हाला जीवनाच्या आणि जिवंतपणाच्या किनार्‍यावर घेऊन आला.. मध्यरात्रीचा प्रवास ड्रायव्हर आयत्या वेळी झोपेतून उठवून आणलेला.. त्यामुळे तो डुलक्या देत होता की दारू प्यायल्यामुळे त्यांच्या झोकांड्या जात होत्या ते कळत नव्हते.. समोरून येणार्‍या वाहनांचे चालक, त्यांची बस थांबवून सांगत होते, की ‘ड्रायव्हर सो रहा है’ .. आणि बसमध्ये असलेल्या आम्हा प्रवाशांची झोपच उडालेली.. शिवाय गाडीला फक्त एकच डोळा म्हणजे लाईट होता.. त्यामुळे समोरून येणार्‍याला वाटत होतं, की ते दुचाकीसारखं काही तरी चालत येत असावं.. ती सेमी एशियाड बस मध्येच थांबवून आम्ही चालक-वाहक यांना समज दिली. 
पण, वाहक अतिआत्मविश्‍वासू निघाला.. त्याने चालकाला पुन्हा चाकावर बसवलं आणि रस्त्याचा अंदाज व माहितीही नसलेल्या त्या चालकानं झोकांड्या देत प्रवास सुरू केला.. पहाटे सहा वाजता गाडी बोरिवलीला आली तेव्हा सात्यांनीच नि:श्‍वास सोडला. नाशिक-औरंगाबाद-भिवंडी येथे मी तक्रारी केल्या.. वर्ष संपून गेलं.. परंतु काय कारवाई केली वा झाली, यासंबंधी परिवहन मंडळाच्या लोकांनी काहीच कळवलेलं नाही. तरीही आपण पुन्हा बसचा प्रवास करतो.. अनेक वाहनांना अपघात होतात.. स्फोट होतात.. शहरांत तरीही आपण दररोज घराबाहेर पडतो आणि पुन्हा घरीही येतो.. दररोज रक्त गोठवणार्‍या घटना घडतात. जातिवादाचे भूत अजूनही मानगुटीवर आहेच.. पण असंही वाटतं, की जोवर कुठं तरी आनंदवन फुलत आहे.. जोवर मदर तेरेसांचा निळाई असलेला पदर फडफडत आहे.. जोवर लताचा गंधर्व स्वर अवकाशात घुमत आहे.. जोवर कुठं तरी एखादं बारीकसं सत्कृत्य घडत आहे तोपर्यंत मृत्यूच्या सावटाखाली असलेल्या आपल्या सार्‍यांचाच प्रवास सुखरूप होणार आहे.. कविवर्य गुलजार म्हणतात ते खरंच.. ‘धर्म नावाचं औषध आता कालबाह्य झालंय.. धर्माच्या नावानं चाललेल्या हत्या.. धर्मांतरं.. केवळ सूडबुद्धी म्हणून नुकताच उमललेल्या गुलाबाच्या कोवळ्या फुलांचा ताटवाच रक्तरंजित करावा ही कसली मानवता.. रवींद्रनाथ टागोर म्हणतात.. ‘जोपर्यंत बालक जन्माला येत आहे.. तोपर्यंत परमेश्‍वर जगाविषयी उदासीन झालेला नाहीये..’ खरंय हे! पण जोपर्यंत एखाद्या बालकावर अन्याय, अत्याचार होतोय.. जोपर्यंत एखादं बालक रक्ताच्या थारोळ्यात पडत असेल, तोपर्यंत परमेश्‍वराची विषण्णता.. क्रूरकम्र्यांना अस्वस्थतेच्या व विनाशात गर्तेत लोटील, हेही तितकंच खरं!  बालक मग ते पेशावरमधलं असो वा कोणत्याही देशाच्या वेशीवरलं असो.. त्यांच्या नजरेतलं कारुण्य ज्याला ओळखता येत नाही.. त्याच्या क्रौर्याचं वर्णन करताना शब्दच विराम घेतात.. मती कुंठीत होते.. 
त्या बालकवितेत झेब्य्राला विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आणि झेब्य्रानंही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणेही! की झेब्रा हा काळ्या पट्टय़ांचा आहे की पांढर्‍या पट्टय़ांचा? आणि झेब्राही विचारतो. की तुम्ही तुमच्या वाईट सवयींसह चांगले असता की चांगल्या सवयींसह वाईट असता? तुम्ही तुमच्या गजबजलेल्या क्षणांसह शांत असता की शांत क्षणांसह गजबजलेले असता? आपल्या स्वत:लाच हे ठरवावं लागेल. कारण, एखाद्या झाडाची फांदी तोडली वा झाडांची फांद्या-पानं जर छाटून टाकली.. की ते झाड अधिक बहरतं.. आपल्यावर होणारे आघात.. आपल्याला भविष्यातील संकटं पेलण्यासाठी अधिक मजबूत करतात.. पुन्हा गुलजारांच्याच ओळी आठवतात.
रिश्ते बनते हैं जरा .. धीरेसे बनने देते
कच्चे लम्हों को जरा .. शाख में पकने देते!
अनुभवातील कच्चेपणा शेवटी आपल्याला परिपक्वतेकडे नेत असतो. हे सर्वच भावबंध घरातले अन् उंबरठय़ाबाहेरचे आपल्याला साद घालत असतात.. आपल्याच परिपक्वतेची! 
(लेखिका साहित्यिक आहेत.)

Web Title: Filled young fur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.