लोकव्यवहाराचा संशोधनव्रती भाष्यकार

By admin | Published: December 18, 2014 11:10 PM2014-12-18T23:10:58+5:302014-12-18T23:10:58+5:30

साहित्य’ या संकल्पनेची व्याख्या करायला जावे, तर अतिव्याप्ती आणि अव्याप्ती या दोन्ही धोक्यांपासून स्वत:ला वाचवणे जवळपास अशक्य होऊन बसते.

Fictional commentary on public affairs | लोकव्यवहाराचा संशोधनव्रती भाष्यकार

लोकव्यवहाराचा संशोधनव्रती भाष्यकार

Next

 अभय टिळक (लेखक अर्थतज्ज्ञ व संतसाहित्याचे 

अभ्यासक आहेत.)
 
साहित्य’ या संकल्पनेची व्याख्या करायला जावे, तर अतिव्याप्ती आणि अव्याप्ती या दोन्ही धोक्यांपासून स्वत:ला वाचवणे जवळपास अशक्य होऊन बसते. कारण, केवळ ललित साहित्याचाच समावेश ‘साहित्य’ या संकल्पनेच्या कक्षेत होतो अथवा केला जावा, अशी भूमिका मांडणार्‍या डॉ. अशोक केळकर यांच्यापासून ते साहित्य हा प्रचलित सामाजिक वास्तवाचा आरसा असतो, असे प्रतिपादन करणार्‍या लालजी पेंडसे यांच्या भूमिकेपर्यंत ‘साहित्य’ या संकल्पनेच्या व्याख्येचा पैस विस्तारलेला दिसतो. या विविध भूमिकांचा ‘लसावि’ काढायचे धाडस करायचे ठरवलेच, तर साहित्य हे एकंदर लोकव्यवहाराचे अविभाज्य अंग असल्याने साहित्य आणि लोकव्यवहार यांचे नाते हे केवळ जैविकच नव्हे, तर परस्परजीवी आणि परस्परपोषक आहे, असे नक्कीच म्हणता येईल. कारण, अखेर लोकव्यवहाराच्या विशाल पटलावर स्थलकालव्यक्तीपरत्वे साकारणार्‍या अगणित अनुभवांचे शब्दरूप साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असते; मग त्या शब्दरूपाचे बाह्यांग ललित असो वा वैचारिक. या अर्थाने लोकव्यवहार हे कोणत्याही माध्यमातील साहित्याविष्काराचे मूलद्रव्य ठरते. घुमान येथे येत्या एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकव्यवहाराचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची निवड होणे, ही त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब ठरते.
लोकव्यवहार हे मुळातच बहुआयामी वास्तव होय. या लोकव्यवहाराचे आणि त्यात सतत घडून येत असलेल्या बदलांच्या स्थूल व सूक्ष्म प्रवाह-अंत:प्रवाहांचे आकलन करून घेण्यासाठी लोकव्यवहाराचा अभ्यासक हा संशोधनाची आंतरविद्याशाखीय दृष्टी कमावलेला असावा हे गरजेचे नव्हे, तर अनिवार्यच ठरते. अध्ययन-संशोधनाची अशी अत्यंत सघन आणि आगळी आंतरविद्याशाखीय अभ्यासदृष्टी व संशोधनपद्धती विकसित करणे, हे डॉ. मोरे यांच्या आजवरच्या अवघ्या अध्ययन-संशोधन-लेखन व्यवहाराचे गाभावैशिष्ट्य ठरते. त्यांच्या अशा बहुविद्याशाखीय अध्ययन दृष्टीमधून प्रसवलेले त्यांचे लेखन यथार्थपणे समजावून घेण्यासाठी मुळात वाचकालाही काही एक पूर्वतयारी करावी लागते. त्यामुळे डॉ. मोरे यांचा साहित्यव्यवहार हा दुसर्‍या बाजूने वाचकनिर्मितीचाही व्यवहार ठरतो.
अशी आंतरविद्याशाखीय दृष्टी व वृत्ती प्रयत्नपूर्वक विकसित केलेली असल्यामुळेच संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक म्हणून संशोधन-लेखनविश्‍वात प्रारंभी प्रतिष्ठित झालेले डॉ. मोरे त्या आणि तेवढय़ाच परिघात बंदिस्त होऊन पडले नाहीत. या लौकिक-भौतिक जगात जगत असताना प्रतिक्षणी येणार्‍या अनुभवांतूनच संतांचे विचारधन प्रसृत होत राहिल्याने त्या साहित्याला निव्वळ अध्यात्मविचाराच्या चौकटीत डांबून ठेवणे केवळ अन्यायकारकच नव्हे, तर एका अर्थाने आत्मघातकीपणाचे ठरेल, ही दृष्टी डॉ. मोरे यांच्या ठायी निर्माण होण्यात त्यांचे तीर्थरूप श्रीधरबुवा मोरे यांचा वाटा अतिशय मोठा आहे. संतांच्या साहित्यातून व्यक्त होणारा त्यांचा जीवनानुभव हे अखेर तत्कालीन समाजजीवनाचे आणि त्यात सतत साकारत असणार्‍या लोकव्यवहाराच्या अखंड प्रवाहाचे अपत्य असते, ही जाणीव वैचारिक जडणघडणीच्या प्रारंभ काळातच मनीमानसी सखोल ठसल्यामुळेच संतबोधाच्या जन्मजात वारशाचे आकलन करून घेण्याची एक नवदृष्टीच जणू डॉ. मोरे यांना लाभली. गुणसूत्रांच्या माध्यमातून ज्या भागवत धर्माची परंपरा डॉ. मोरे यांच्यापर्यंत सलग १८ पिढय़ा वाहत आलेली आहे, त्या परंपरेने मांडलेली ‘संत’ या पदाची व्याख्या समाजसापेक्ष आहे. समाजाला वगळून संतत्वाचा विचार करणे, हे भागवत धर्माच्या पायाभूत विचारांशी सपशेल विसंगतच आहे. किंबहुना समाजरूपी सहाणेवर उगाळून बघितल्याखेरीज संतत्वाचा कस मुदलात सिद्धच होत नाही, हे भागवत धर्मविचाराचे गाभाप्रमेयच होय. साहजिकच संत, संतविचार आणि ते विचार अक्षरबद्ध झालेले संतसाहित्य यांचे आकलन आपल्याला समाजव्यवहारांच्या पार्श्‍वपटलावरच करून घ्यावे लागते, ही अध्ययनदृष्टी जोपासल्यामुळे डॉ. मोरे यांचे संतपर व संतसाहित्यपर लेखन-संशोधन हे संतांच्या विचारधनाकडे पठडीबद्ध चष्म्यांतून पाहणार्‍या समीक्षक साहित्यिकांपेक्षा पूर्णत: आगळ्या मुशीतून निपजलेले आहे.
किंबहुना, संतसाहित्य हे एकंदर मराठी साहित्यविश्‍वातील एक दालन अथवा शाखा आहे, ही पारंपरिक, ठोकळेबाज भूमिकाही डॉ. मोरे नाकारतात, ते त्यापायीच. कारण, या वर्गीकरणाच्या मुळाशी परंपरा आणि नवता यांच्या दरम्यानचे कल्पित द्वंद्व फोफावलेले आणि पोसलेले आहे. ज्याला रूढार्थाने मराठी साहित्याचा आधुनिक प्रवाह मानले जाते, त्याचा उगम मराठी साहित्यविश्‍वात १९व्या शतकात झाला, असे साहित्येतिहासकारांचे कथन सांगते. मराठी साहित्याचा आजचा मुख्य प्रवाह हे त्याच आधुनिक साहित्याचे विस्तारित रूप मानले जाते. साहजिकच, त्या आधीच्या काळात निर्माण झालेले यच्चयावत साहित्य पारंपरिक वा (अगदी प्राचीन जरी नाही तरी) मध्ययुगीन गटात मोडले जाते. या न्यायाने संतसाहित्याचे संपूर्ण विश्‍व आधुनिकपूर्व साहित्य व्यवहाराचे अवशेष ठरतात. ही संपूर्ण विभागणी आणि तिच्या मुळाशी असणार्‍या तर्कशास्त्राबाबतच डॉ. मोरे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. भाषा हे तर कोणत्याही साहित्यव्यवहाराचे मूलद्रव्य. ज्या मराठी भाषेत उत्कांतिप्रवण कुशीमधून आधुनिक साहित्याचा धुमारा अंकुरला, त्या मराठी भाषेची जडणघडणच मुळात संतांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून केलेली असल्याने संतसाहित्य हाच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह ठरतो, असे डॉ. मोरे यांचे बिनतोड आणि ठणठणीत प्रतिपादन आहे. २0१२ सालातील फेब्रुवारी महिन्यात नाशिक येथे भरलेल्या पहिल्यावहिल्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे यांनी हा प्रमेयवजा सिद्धांत विस्ताराने व सोदाहरण विशद केला.
संतसाहित्य अभ्यासकाच्या भूमिकेमधून लोकव्यवहाराभ्यासकाच्या बहुमिती भूमिकेमध्ये डॉ. मोरे लीलया संक्रमण करते झाले, ते ‘भाषा-साहित्य-लोकव्यवहार’ या त्रयीदरम्यान नांदणार्‍या निसर्गदत्त आणि जैविक नात्याच्या नेमक्या आकलनामुळेच. संतांनी निर्माण केलेले साहित्य ज्याप्रमाणे संत आणि तत्कालीन लोकव्यहार यांच्या दरम्यानच्या नात्याच्या मुशीमधून प्रसवलेले असते, त्याचप्रमाणे संत, त्यांचे साहित्य आणि त्या साहित्यामधून प्रसवणारा मूल्यविचार यांना काळप्रवाहातील निरनिराळ्या टप्प्यांवर समाजमनाकडून दिला जाणारा प्रतिसाद हाही तत्कालीन लोकव्यवहार घडवणार्‍या धारणा-समजुती-संकेत-श्रद्धाविश्‍व-इतिहासदृष्टी यांसारख्या अनंत घटकांनी भारित असतो, हे अचूक टिपण्यात डॉ. मोरे यांच्या ठायीची प्रगल्भ संवेदनशीलता प्रतीत होते. १९९७मध्ये प्रकाशित झालेला ‘तुकारामदर्शन’ हा ग्रंथ, २00७मध्ये प्रकाशित झालेला ‘लोकमान्य ते महात्मा’ हा बृहद्ग्रंथ आणि २0१३मध्ये प्रकाशित झालेला ‘गर्जा महाराष्ट्र’ हा विवेचक ग्रंथ -या तीन वैचारिक साहित्यकृती म्हणजे डॉ. मोरे यांच्या त्याच संवेदनशील संशोधनदृष्टीतून साकारलेली तीन अक्षरशिल्पे होत.
लोकव्यवहाराच्या अभ्यासाचा हा वसा मनोभावे जपणारा अभ्यासक लोकाभिमुख असावा, हे वेगळे सांगायलाच नको. विविध विद्याशाखांतील अभ्यासकांच्या समूहवृत्तीने अनेक वर्षे एकत्र राबण्यातून संभवणारे संशोधनविश्‍व एकट्याच्या निरलस ज्ञानतपस्येच्या बळावर साकारणार्‍या डॉ. मोरे यांना लोकसंपर्काचे वावडे नसणे हाही भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या इहवादी आणि लोकसंग्राहक भक्तिविचाराचा तुकोबांपासून त्यांच्यापर्यंत चालत आलेल्या वारशाचा पुरावाच मानायला हवा. घरी असताना लेखणी आणि पायाला भिंगरी लावून गावोगावच्या व्याख्याने-चर्चासत्रे-परिसंवादांमधून घेतलेल्या सहभागाद्वारे स्रवणारी वाणी अशा उभय माध्यमांतून ‘शहाणे करुनी सोडावे सकळ जन’ ही बांधिलकी जपणार्‍या डॉ. मोरे यांनी ‘लोकाभिमुख विद्वान’ या संकल्पनेमध्ये अध्याहृत असणार्‍या गर्भित वदतोव्याघाताचे पुरते उच्चाटण घडवलेले आहे.
बांधिलकीच्या त्याच भावनेते प्रेरित होऊन ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।। असा पुकारा करीत पंढरीच्या वाळवंटात ज्ञानप्रसाराचे मुक्तपीठ १३व्या शतकात खोलले आमच्या नामदेवरायांनी. तेच त्या विद्यापीठाचे कुलपती आणि कुलगुरूही! यथावकाश, त्या मुक्त ज्ञानपीठाची कक्षा त्यांनी विस्तारली थेट पंजाबातील घुमानपर्यंत. संपूर्ण उत्तर भारतात लोकाभिमुख भक्तिशास्त्राचा वीणा तेव्हापासून अखंड झंकारतो आहे. त्या झंकारात सूर मिळवण्यासाठी मराठी सारस्वतांचा मेळा दिंडी घेऊन पुन्हा एकवार त्याच घुमानला निघालेला आहे. त्या दिंडीचे विणेकरी आहेत डॉ. मोरे. लोकसंग्रहाद्वारे लोकशिक्षणाची परंपरा जपायला नको का..!
 

Web Title: Fictional commentary on public affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.