शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

अस्वस्थ उणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 07:15 IST

आजच्या खाऊजा संस्कृतीने माणसाचे मूल्य कमी करून पैशांचे मूल्य वाढवले आहे. मी, माझे घर, माझे कुटुंब या पलीकडे पाहायला कुणाकडेच वेळ नाही. 

लक्ष्मीकांत देशमुख - बडोदे येथे आयोजित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष

साहित्याने मला काही महत्त्वाचे दिले असेल तर तटस्थ दृष्टी! त्या दृष्टीच्या बळावर मी माझे व्यक्तिगत आयुष्य आणि समाजातीलही अधिक-उण्याचा नेमका हिशेब करू शकलो. आयुष्याच्या या वळणावर मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून उभा आहे... इथून मागे नजर वळवतो तर मानवतावादी समाज नजरेस पडतो. इथून पुढे बघतो तेव्हा मात्र हा मानवतावादी समाज आता व्यवहारवादी झालाय याची वेदनादायी प्रचिती येते. हे अधिक-उण्याचे स्थित्यंतर मला इतक्या प्रकर्षाने कसे जाणवते याच्या खोलात जायचे असेल तर मला थेट माझ्या बालपणापर्यंत मागे जावे लागेल.

मी मूळचा मराठवाड्याचा. वडिलांच्या नोकरीमुळे उत्तर महाराष्ट्र, तेलंगणा अशी भ्रमंती होत राहिली. चौथीपर्यंतचे शिक्षण भालकी, बिदर या कानडी भागात झाले. येथील मुस्लीम वस्तीच्या जवळ माझे घर होते. बिदरला गुरुद्वारा होता. तिथला लंगर, सेवा मी त्या नकळत्या वयात खूप जवळून पाहिली. अनुभवली. या वातावरणाने माझ्यात धर्मनिरपेक्षतेची बीजे पेरली. पुढे आईमुळे वाचनाची गोडी लागली.माझ्यातील लेखक घडविण्याचे श्रेय जाते ते नरहर कुरंदकर यांना! हे माझ्या दृष्टीने चालते-बोलते विद्यापीठ होते. नांदेडातील वास्तव्यात त्यांच्या सहवासाने मला वैचारिक दृष्टीने समृद्ध केले. त्यांच्यासोबतच्या चर्चेतून समाजरचना समजून घेण्याची उत्सुकता वाढत गेली. मी पहिली कादंबरी वाचली ती रणजित देसार्इंची श्रीमानयोगी. समाज समजून घेण्याच्या ध्यासात वाचनाची भूक दिवसागणिक वाढत होती. या प्रवासात केव्हातरी नेमाडेंची कोसला हाती पडली. या कादंबरीने वाचनाची दिशाच बदलवून टाकली. त्याही पुढे अरुण साधूंच्या सिंहासन, मुंबई दिनांक या कांदब-या हातात पडल्या आणि त्यांनी माझ्यात लेखनाची बीजे पेरली.

मी तसा विज्ञानाचा विद्यार्थी. पण, समाज, राज्यशास्त्र हे विषय मला आकर्षित करायचे. बालपणातील सभोवतालच्या वातावरणाचा हा प्रभाव असेल कदाचित. या वाचनातून पुढची दिशा आणि भूमिका स्पष्ट झाली. समाजातील नाही रे वर्गासाठी आपण लिहिले पाहिजे अशी साद माझे मन मला घालू लागले. यातूनच माझी पहिली कथा प्रकाशित झाली. तिचे नाव हुंडाबळी. अशा कथांनी दीर्घ लेखनाची ऊर्जा दिली. त्यातून सलोमी नावाची पहिली कादंबरी मी लिहिली. एका मुस्लीम तरुणीची अगतिकता मी यातून मांडली. दुसºया कादंबरीत दलितांच्या जीवनाचे चित्रण होते.समाजातले धगधगते वास्तव माझ्या लिखाणातून असे अभिव्यक्त व्हायला लागले होते. पुरोगामी लेखकांची समृद्ध क्रमावली मला खुणावत होती. साहीर लुधीयानवी, कैफी आझमी यांच्या रचना-लेखनाने धर्माची तर्कसंगत चिकित्सा करायला शिकवले. नास्तिकता हाच जीवनाचा पाया हवा, या निष्कर्षाप्रत मी पोहोचलो. अधिक-उण्यातील अंतर आणखी प्रकर्षाने जाणवू लागले.तो काळ रंजनवादी साहित्याचे कथित सिंहासन कोसळण्याचा होता. नामदेव ढसाळांसारख्या लेखकांची लेखणी प्रतिगाम्यांवर प्रहार करीत सुटली होती. औरंगाबादेत दलित साहित्याच्या चळवळीने जोर धरला होता. तिकडे डॉ. गंगाधर पाणतावणे सरांचे ‘अस्मितादर्श’ नव्या पिढीला एका वास्तववादी मार्गावर चालण्याचे आवाहन करीत होते. जे अभिजनांच्या आनंदासाठी लिहितात ते बौद्धिक भांडवलदार असतात, असा एक मतप्रवाह सर्वमान्य होत चालला होता.ग्रामीण साहित्यातूनही नाही रे वर्गाच्या वेदना आणि दारिद्र्य मांडले जात होते. मराठवाडा हा दुष्काळी पट्टा असल्याने या ग्रामीण साहित्याने मला गावगाड्याची जाणीव करून दिली.याच काळात आणखी एक क्रांतिकारी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. साधना मासिकाने मला समाजवादी चळवळीच्या जवळ नेले. कॉलेजमध्ये शिकत असताना देशात आणीबाणी लागली आणि या आणीबाणीने आमच्या पिढीतील तरुणाईला विद्रोह शिकवला.माझ्यातला लेखक-कार्यकर्ता असा घडत असताना पोटासाठी नोकरी करणेही गरजेचे होते. त्यासाठी आधी बँकेत नोकरी धरली.पण, मन काही रमेना. माझा पिंड बहिर्मुख असल्याने प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. १९८३ साली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत आलो. साहित्याच्या संस्काराने ज्या गोष्टी शिकवल्या होत्या त्यांच्या आधारे अंत्योदयाचे स्वप्न पाठीशी घेऊन काम सुरू केले.मी प्रशासकीय सेवेत असताना चित्र फारसे समाधानकारक नव्हते. उद्यमशीलतेचा अभाव होता. नुसते कागदी घोडे नाचवले जायचे. चांगल्या कामाला विरोध ठरलेलाच असायचा. मी काही नवीन प्रयोग करायला गेलो की सहकारी-मित्र लगेच मला मी कसा आदर्शवादी, भाबडा आहे याची जाणीव करून द्यायचे. भविष्यातील प्रगतीसाठी वरिष्ठांना खूश ठेवण्यातच अनेक जण धन्यता मानायचे. अर्थात यातही काही सन्मानजनक अपवाद होते, ज्यांनी कधीच तडजोड स्वीकारली नाही. पण, अशा लोकांची संख्या फार कमी होती. आज निवृत्तीनंतर मी पाहतो तर मला जाणवते की चित्र फार सकारात्मक झाले आहे. आधी केवळ उच्चवर्णीयच मोठ्या पदावर असायचे. शिक्षणाची गंगा घराघरांत पोहोचल्यामुळे दलित, मागासलेल्या समाजातले तरुण उच्चशिक्षण घेऊन अधिकारी पदावर यायला लागले. त्यांनी गरिबी जवळून पाहिली असल्याने विधायक शासकीय योजनांच्या क्रियान्वयाची गती वाढली. विशेष म्हणजे, प्रशासनातील पारदर्शकता वाढली. याचे मोठे श्रेय सोशल मीडिया आणि माहितीच्या अधिकाराला आहे. हे काही अधिक झाले, तसे उणेही अस्वस्थ करते. आजच्या खाऊजा संस्कृतीने माणसाचे मूल्य कमी करून पैशांचे मूल्य वाढवले आहे. तरुणाई प्रचंड आत्मकेंद्रित झाली आहे. पाश्चिमात्यांचा प्रभाव या तरुणाईला आकर्षित करतोय. हे आकर्षण अर्थातच खासगी आहे. मी, माझे घर, माझे कुटुंब या पलीकडे पाहायला कुणाकडेच वेळ नाही. समाजहितासाठी झटणाºया चळवळी आज उरल्या नाहीत. त्याचाही मोठा फटका सामाजिक औदार्याच्या परंपरेला बसला आहे. देशाची प्रगती होत असली तरी सामाजिक संघर्ष वाढतो. धर्माधर्मातील तेढ आणखी गंभीर रूप धारण करते आहे. परिणामी मानवी उत्कर्षाचा आलेख वेगाने खाली येताना दिसतो.स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरच्या दोन-तीन दशकांपर्यंतचे नेते महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित होते. न्याय, बंधुत्वाचा पुरस्कार करणारे राजकारण हे समाजहिताचे माध्यम समजले जात असे. परंतु जागतिकीकरणाने राजकारणाचे चित्र बदलून टाकले. राजकारण जे समाजकारणाचे माध्यम ठरायला हवे होते ते दुर्दैवाने सत्ताकारणाचे माध्यम होऊन बसले.१९७० नंतर राजकारणातला ध्येयवाद जवळपास संपुष्टात आला. आता तर राजकारण हा अविश्वासाचा विषय झाला आहे, जिथे प्रामाणिकपणा आणि निष्ठेला अजिबात वाव नाही. परिणामी लोकांना प्रगतीचा आश्वस्त मार्ग राजकीय व्यवस्था दाखवू शकेल, यावर विश्वास राहिलेला नाही. पण, म्हणून आपण निराश होऊन स्वत:ला बंदिस्त करून घेणे चूक ठरेल.माध्यम कुठलेही असो, प्रत्येकाने मुक्तपणे व्यक्त झाले पाहिजे. मुक्त अभिव्यक्ती हाच भविष्याचा मार्ग आहे, असे मला दिसते.

‘तसे’ लेखक नाहीत...रंजनवादी साहित्याला आधी दलित, ग्रामीण आणि स्त्री साहित्याने तडा दिला. आता त्यापेक्षा अधिक वास्तववादी साहित्य जन्माला येत आहे. अनेक दमदार लेखक, कवी आपल्या शब्दकृतीतून चुकीच्या गोष्टींवर प्रहार करीत आहेत. साहित्यातील प्रस्थापित चौकटी या लिखाणाने मोडून काढल्या आहेत. लिखाणाच्या शैलीतही अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. परंतु तरीही एक गोष्ट खेदाने नमुद करावीशी वाटते ती म्हणजे देसाई, खांडेकर, नेमाडे यांच्या तोलाचे एका अख्ख्या पिढीला प्रभावित करणारे लेखन आज दिसत नाही.शब्दांकन - शफी पठाण