शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

भयंकर सुंदर भुते

By admin | Updated: August 5, 2016 18:13 IST

अक्षरांची भूतं मानगुटीवर बसलेले ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या झपाटल्या जगात..

संवाद : सोनाली नवांगुळ
 
अक्षराच्या वळणाच्या प्रत्येक फाट्याचं काहीतरी महत्त्व आहे. त्यातून एक भाव निर्माण होतो. विचार न करता काढलेली अक्षरं रडताहेत, ओरडताहेत असं हल्ली मला दिसू लागलं. ती गयावया करून म्हणताहेत, बाबांनो नका करू  माझ्यावर अत्याचार!  ती अक्षरं मेली तर ? त्यांची भुतं होतील.. ही भुतं माझ्या डोक्यावर बसली आणि म्हणाली, का नाही मला नीट काढलं?.. तर?
- ही गंमत मी थोडी सिरीअसली पुढे नेली आणि अक्षरभुतं तयार झाली..
चंद्रमोहन कुलकर्णी. सतत नव्या कल्पनांनी पछाडलेला चित्रकार. या माणसाच्या डोक्यावर सध्या भुतं स्वार झालीत. ही भुतं नाना प्रकारची. अक्षरांचीसुद्धा. अक्षरं मराठी, बंगाली, कन्नड, इंग्रजी अशा कुठल्याही लिपीतली. देवादिकांची वैगेरे चित्रं कशी काढावीत नि नाही यावर हल्ली मर्यादा फार. भुतांच्या विश्वात असं कुठलंच बंधन नाही. बंधनात आणि बंधनाशिवाय दोन्ही ठिकाणी लीलया काम करणाऱ्या या चित्रकाराची भुतं आता पाहणाऱ्यांच्या डोक्यावरही बसताहेत. भुताखेतांविषयीच्या अज्ञात प्रदेशाविषयी भीती बाळगण्यापेक्षा या कल्पनेशी खेळण्यानं नजर उत्सुक व मोकळी राहते असं त्यांचं म्हणणं. चंद्रमोहन यांच्या कल्पनेच्या या मुक्त प्रदेशाविषयी त्यांच्याशी थोड्या गप्पा...
 
ही अक्षरभुतं एकदमच कुठून आली?
- खरं सांगू? फ्रस्ट्रेशनमधून, वैतागातून आली. प्रतिक्षिप्त क्रियेसारखं आलंय हे. मी अलीकडे आजूबाजूला फार विद्रूप व उथळपणानं केलेली कॅलिग्राफी बघतो. एकदोन वर्कशॉप्सना गेलो होतो. तिथे जे काही काम करत होते ते बघून मला असं वाटलं की हे काय चाललंय? मी चांगल्या दर्जाची कॅलिग्राफी पाहिली आहे. त्यात जीव ओतून काम केलेल्या माणसांच्या संगतीत राहिलो आहे. अक्षरांच्या एकेका आरोहा-अवरोहासाठी र. कृ. जोशींसारख्या अनेक माणसांच्या झोपा उडाल्या होत्या. मुकुंद गोखल्यांसारख्या माणसांनी कॅलिग्राफी, टायपोग्राफी, लेटरिंगसाठी जन्म वेचला. अच्युत पालवही त्याच वाटेवरचं महत्त्वाचं नाव. या मंडळींचा अक्षरं काय बोलतात याकडे कान होता. पुढे माणसांनी या कलेचा विचका केला.
लिप्यांना एक व्याकरण असतं, ते सकारण असतं. यातलं काहीही समजून न घेता बेदरकारपणे काढलेली अक्षरं दुखावली जातात, मरतात असं मला वाटतं. त्याचा त्रास होतो.
अक्षराच्या वळणाच्या प्रत्येक फाट्याचं काहीतरी महत्त्व आहे. त्यातून एक भाव निर्माण होतो याचं गांभीर्य कलाकारांमध्ये असलं पाहिजे. ते करताना अक्षराच्या मूळ घराण्यापासून तुटलं पाहिजे असं नाही. हल्ली मला वाटतं, अक्षरांवर बलात्कार चाललाय. अक्षरं मरताहेत. जाडा ब्रश घ्यायचा आणि स्ट्रोक मारायचे. अरे काय चाललंय? कॅलिग्राफी ही जे लिहीलंय त्याच्या आशयाशी संबंधित गोष्ट आहे. तिथं काहीतरी कॅरॅक्टर पाहिजे. पण हल्लीचा जमाना फास्ट. परफॉर्मिंग आर्टला महत्त्व. परफॉर्मन्स जमला, की आशयाला विचारतो कोण?
 
अशी विचार न करता काढलेली अक्षरं रडताहेत, ओरडताहेत, घाबरताहेत असं मला दिसू लागलं. ती गयावया करून म्हणताहेत, की बाबांनो नका करू माझ्यावर अत्याचार! मग ती मेली तर त्यांची भुतं होतील. मग या विचाराचा चाळाच लागला. वाटलं, ही भुतं येऊन माझ्या डोक्यावर बसली तर? आणि म्हणाली की का नाही मला नीट काढलं, तर? ही गंमत मी थोडी सिरीयसली पुढे नेली. आर्टफॉर्ममध्ये बसवता येईल का हे पाहिलं. मग मला खूप शक्यता दिसायला लागल्या. 
मी आजूबाजूला थोडा फिरलो नि भुतांच्या विश्वाविषयी चाळलं. भुतांचे किती प्रकार, त्यात फरक काय? मुंजा, हडळ, जखीण खूप. लहानपणी आजोबा एका झाडापाशी घेऊन जायचे. म्हणायचे, ‘‘मुंजा राहतो इथे!’’ - मला भीती नाही वाटायची. वाटायचं, मला बघायचंय! त्या काळात प्रसिध्द असलेल्या ‘नवल’ या नियतकालिकापासून मिळतील त्या भय, गूढ नि रहस्यकथा वाचायचो. त्यात कुतूहल अधिक असायचं, अजून आहे. तर तत्कालिक कारण अक्षरांवरच्या बुद्धूपणानं केलेल्या अत्याचाराचं असलं तरी गंमत करत हा विषय पुढे नेला. अक्षरांपुरता उरवला नाही.
मग पुढे काय झालं?
- देवाकडे मी गमतीनं पाहतो. माणसांचा केवढा वेळ गुंतलेला असतो यात. भुतांचं जग असंच आहे. त्यातल्या कल्पनाविश्वाला मी फुलवतो आहे. लहानपणी जेवढं डेंजर वाचता, पाहता येईल तेवढं वाचलंय, पाहिलंय. व्हिज्युअल्सचा मोठा प्रभाव आहे. त्यातून मी झटकन झाडावर भूत होऊन बसू शकतो. असा विचार करता करता पाचसहा चित्रं झालीसुद्धा. भारी वाटलं ते. मेलेली अक्षरं किती निरनिराळी भुतं होतील? ती कशी बनवायची? भुतांच्या इमेजेस कोणाच्या मनात पक्क्या नाहीयेत. त्यामुळं मला रान मोकळं आहे. या स्वातंत्र्याची मला कलाकार म्हणून चैन वाटते. वाटलं, ‘सटवाई लिहिते बाळाचं भविष्य’ ही कल्पना केवढी गमतीशीर आहे. मी चित्र काढलं. कदाचित मीच काढलं असेल ते चित्र पहिल्यांदा! 
त्यानंतर भुतांचं कुटुंब डोळ्यांसमोर आलं. बाळभूत कसं दिसेल शोधलं. मला कुणाला घाबरवायचं नाहीये, कारण मीच घाबरत नाही. मग खूप दिसायला लागलं. इंग्लिशकडे वळलो. छोटी लिपी व मोठी लिपी ही जोडभुतं. प्रश्नचिन्हाचं भूत! यात फिलॉसॉफीसुद्धा आहे ना? प्रश्न मानगुटीवर बसले की उतरतात का लवकर? मग उत्तराचं, उद्गारचिन्हाचं भूत. फेसबुकवर माणसं लिहितात तेव्हा ‘लाइक’चं भूत त्यांची पाठ सोडत नाही. कुठल्या भुताचे दुधाचे दात पडायचेत, कुणाची नखं मोठी, कुणाची उगवून वेलांट्या झालेली, डोळे उभे, काटे, भाले, नखं, कवट्या, सेफ्टी पिन्स असं वापरून बनवलेले भुतांचे दागिने, कंटेपररी फॅशनवाली हडळ, ओठाला पिअर्सिंग करणारी, भुवईत दागिना घालणारी, गळ्यात नवऱ्याची कवटी माळणारी. मला भुतांनी इतकं दिलंय की मी त्यांचे आभार मानतो. एखाद्या गोष्टीचं काय करायचं, ही अडचण मी संधी मानली. एखाद्या अक्षराचा काना मग कान होतो, एखाद्या अक्षराची गाठ दाताची जागा होते.
 
अशी चित्रं काढून झाल्यावर काय वाटतं?
- भीतीची गोष्ट सोडून मी कधी पळालो नाही. मला कुतूहल वाटलं, मग इंटरेस्ट वाढला, तो विकसित होत राहिला. कुतूहलाच्या पुढे जाऊन काहीतरी भर मला कलाकार म्हणून टाकावी वाटते. विरूप आणि विद्रूप यातला भेद जाणून कलाकारांनी भावनिष्पत्ती करायला हवी. आत्ता मी त्या प्रदेशात शिरलोय. अजून हे विश्व कितीतरी मोठं आहे. मला या भुतावळीचा ब्लॅक शो करायची इच्छा आहे. 
न्यू आॅर्लियन्समध्ये मेरी लेव्यूचं ‘हाऊस आॅफ वुडू’सारखं दुकान पाहिल्यावर मला मजा वाटली होती. भय किंवा समाजातली अशी कुठलीही चांगलीवाईट गोष्ट अधोरेखित करण्याकरता कलामाध्यम वापरता येतं. आपण यात खूप कमी पडतो. 
मध्ये काही तरुण मुलं भेटली तेव्हा त्यांनी माझ्या भुतांचे मोबाइलमध्ये लावलेले वॉलपेपर दाखवले. एक मुलगी म्हणाली, मला माझ्या घरामध्ये दर्शनी भागात लावायला हडळीचं चित्र करून द्या मोठंसं. ही गंमत मुलांपर्यंत पोहोचतेय याचा मला आनंद आहे. 
भुताखेतांच्या काल्पनिक गोष्टींच्या नादी लागून माणसं आयुष्यातून उठली आहेत, बरबाद झाली आहेत. ते मी पाहतो, पण तो मला विस्तारत न्यावा असा विषय वाटतो. कल्पनेचाच वापर कलात्मकरीत्या करून आपण त्यातली गंमत ओळखावी, त्याच्याशी खेळावं आणि आपलं विधान करावं. या दृष्टीनं मला कुठलाही विषय वर्ज्य नाही. जगण्यातल्या निगेटिव्ह-पॉझिटिव्ह स्पेसशी कसं खेळावं हेच तर मी शिकतो आहे यातून!