सांजवेळची पूर्वतयारी

By Admin | Updated: April 18, 2015 16:16 IST2015-04-18T16:16:49+5:302015-04-18T16:16:49+5:30

खाजगी आणि सरकारी नोकरीतून निवृत्तीला आलेल्या कर्मचा:यांना उत्तरायुष्यातल्या प्रश्नांचा (आणि अर्थातच उत्तरांचाही) वेळीच अंदाज यावा, यासाठी अमेरिकेत एक उत्तम पध्दत आहे. - रिटायरमेण्ट सेमिनार्स! म्हणजे आयुष्याच्या गोरजवेळेत प्रवेश करण्याआधीच आर्थिक नियोजनापासून शारीरिक स्वास्थ्यार्पयत आणि निवासाच्या व्यवस्थेपासून थेट कायदेशीर निरवानिरवीर्पयतची पूर्ण पूर्वतयारी!

Evening preparations | सांजवेळची पूर्वतयारी

सांजवेळची पूर्वतयारी

>- दिलीप वि. चित्रे
 
अमेरिकन सरकारचं एक बरं आहे. सरकारी कर्मचा:यांची काळजी तरी किती करायची! रिटायरमेंट सेमिनार्स सक्तीचे. म्हणजे तुमच्या गोरजवेळेची तुमच्यापेक्षा सरकारलाच अधिक काळजी. मग वेळ मिळेल तसे जाऊन बसतात एकेक जण सेमिनार्सच्या क्लासला. असाच एकदा सेमिनार चालू असताना, नेहमीप्रमाणो उशिराच सर्गे आला वॉकर घेऊन आपला तोल सावरत. हा 89 वर्षाचा. मी म्हणालो, 
 ‘‘माय गॉड, हा आता सेमिनार घेतोय, म्हणजे याची रिटायर व्हायची काही लाईन दिसत नाही.’’ सगळे हसले आणि सर्गेनं माङयाकडे ‘‘बाहेर निघ, मग दाखवतो तुला’’ - अशा अर्थाचा कटाक्ष टाकला तेव्हा पुन्हा सगळे हसले.
सर्गेवरून मला आमच्या वसंतरावांची आठवण झाली. त्यांना एकदा कुणीतरी विचारलं,
‘काय वसंतराव, कसं काय चाललंय?’
‘कसं चालणार? रेटतो आहे गाडा. मुलींसाठी स्थळं शोधतो आहे. अन् स्थळं सापडली तरी पुढले प्रश्न आहेतच’.
जवळजवळ 5क् वर्षापूर्वीच्या भारतात कानावर पडणारे हे संवाद. कदाचित काळाप्रमाणो यात बदल झालाही असेल. मुलं-मुली स्वतंत्र झाली आहेत. नोक:या करून पैसे मिळवत आहेत. वडिलांच्या शिरावर आता कर्जाचा भार उरला नसेल. गरजा वाढल्या असल्या तरी वाढलेल्या गरजा पुरवण्याचं बळ अंगी आलं असेल. वसंतरावांना निवृत्तीचे वेध लागले असतील. पण वेध लागले असले तरी निवृत्तीचे विचार मात्र भेडसावत असतीलच. दर महिन्याच्या एक तारखेला हाती येणारी पगाराची रक्कम थांबली की, आयुष्यभराच्या कष्टाची, एकरकमी फंडाची मिळकत हाती येते खरी, पण त्या रकमेच्या खर्चाला अगोदरच तोंडं फुटलेली असतात. मग ती संपल्यावर करायचं काय?
करायचं तरी काय?
फंडाच्या रकमेचं काय?
निवृत्तीनंतर उद्योग नसल्यानं निर्माण होणा:या पोकळीचं काय?
प्रकृतीच्या प्रश्नांचं काय?
मित्र-मंडळींचं काय? नातेवाईकांचं काय?
ह्याचं काय, अन् त्याचं काय?
प्रश्न. प्रश्न. आणि नुसते प्रश्नच! उत्तरं नसलेले.
पण असतात, उत्तरं असतात - पण ती शोधावी लागतात.
आता हेच पहा ना, सगळ्या प्रश्नांना जरी उत्तरं नसली तरी ती शोधण्याचा निदान प्रयत्न करायला नको? नुसतंच आपलं- ‘‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’’ - काय कामाचं?
पण हे झालं पन्नास वर्षापूर्वीचं. आता तसं नाही. आता प्रत्येक वसंतरावाला आपला भविष्यकाळ-गोरजवेळ खुणावू लागली आहे. निदान ह्या प्रातिनिधिक वसंतरावांचे डोळे तरी तिकडे लागलेले असायला हवेत. म्हणजे- ‘लागले नेत्र रे पैलतीरी’ असा त्याचा अर्थ नव्हे. उलट पैलतीरावरची दृश्यं, सौंदर्य हे धूसर न दिसता चांगलं स्पष्ट दिसायला हवं आणि ते स्पष्ट दिसण्यासाठी डोळ्यांवर पूर्वग्रहदूषित काळ्या काचेचा चष्मा नसायला हवा.
मी अमेरिकन सरकारी नोकरी पंचवीस वर्ष करून काही वर्षापूर्वीच निवृत्त झालो. या पंचवीस वर्षाच्या काळात निदान 3 ते 4 वेळा तरी आम्हाला रिटायरमेंट सेमिनार्स घेण्याची सक्ती असायची. तीन-चार वेळा अशासाठी की, तेवढय़ा काळात सरकारी नियम बदलतात. तुमची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती बदलते आणि त्या बदलत्या परिस्थितीशी झुंजण्याची किंवा तिच्याशी हातमिळवणी करण्याची, तोंडओळख करून घेण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते. 
यात अमेरिकन सरकारचा हेतू निश्चितच निर्मळ हे मान्य करायला हवे. कारण कर्मचा:यांना, नागरिकांना त्यांच्या गोरजवेळेचं स्पष्ट दर्शन घडवून त्या काळात-भविष्यात-पुढे येणा:या खाचखळग्यांची किंवा त्या पायवाटांवरून अंथरलेल्या पायघडय़ांची जाणीव आधीच करून देऊन आपापल्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची क्षमता निर्माण करणो हाच मुख्य हेतू. प्रत्येक व्यक्तीची कौटुंबिक जबाबदारी वेगळी, त्यानुसार आर्थिक परिस्थिती वेगळी. त्याप्रमाणो जीवनात घडत जाणारी मानसिकता वेगळी आणि या वेगवेगळ्या गोष्टींना हाताळण्याची किंवा त्यांच्याशी झुंजण्याची जिद्दसुद्धा वेगळीच. हे सगळं ध्यानात ठेवूनच या रिटायरमेंट सेमिनार्सची अभ्यासपूर्ण योजना करण्यात आली.
सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा विचार करण्यात येतो तो असा, की इथे रिटायरमेंटचं सक्तीचं वय नाही. हात-पाय-डोकं आणि बुद्धी शाबूत असलेली कुठलीही व्यक्ती स्वेच्छेनं निवृत्त झाल्याशिवाय तिला सक्तीनं निवृत्त केलं जात नाही. हो, अर्थात त्या व्यक्तीची कार्यशक्ती मजबूत असायला हवी. त्यात टंगळमंगळ चालतच नाही. नाहीतर लगेच पाश्र्वभागावर लाथ बसण्याची शक्यता असते. ही दुनियाच मुळी हायर-फायर या तत्त्वावर चालते.
पण कार्यशक्ती मजबूत असायला नुसतं शारीरिक बळच असायला हवं असं नाही, तर डोकंही ठिकाणावर असायला हवं. वयोमानाप्रमाणं येणारं विस्मरण, अल्झायमर्स, डिमेन्शिया या गोष्टींशी मैत्री झाली की संपलंच!
हे रिटायरमेंट सेमिनार्स महत्त्वाचे खरेच. 
एकंदर तीन दिवसांच्या या सेमिनार्सला तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणावं हेही आवजरून सांगितलं जातं. या तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या विषयांमधल्या 8 ते 1क् तज्ज्ञांकडून भविष्याच्या तरतुदीची, प्रश्नांची, त्यांच्या उत्तरांची वगैरे अनेक गोष्टींची माहिती दिली जाते. त्या तज्ज्ञांमध्ये डॉक्टर्स, वकील, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, कलावंत, संगीतज्ञ इत्यादींना पाचारण करण्यात येऊन मृत्यूपासून ते घटस्फोटार्पयत, पॉवर ऑफ अॅटर्नीपासून ते हेल्थकेअर प्रॉक्सीर्पयत अनेक गोष्टींची माहिती दिली जाते. ती सर्व माहिती तुमच्या डोक्यात अथवा गळी उतरली आहे की नाही याची एक छोटीशी चाचणीही घेतली जाते. 
केवळ अशा छोटय़ाशा चाचणीतच काय, पण या विषयातल्या अत्यंत अवघड परीक्षेतसुद्धा मी उच्च क्रमांकानं उत्तीर्ण झालो असतो. शाळा-कॉलेजातल्या परीक्षांमध्येच हे का जमलं नाही कुणास ठाऊक!
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)

Web Title: Evening preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.