एलकुंचवारी प्रतिभेस कुनिर्सात

By Admin | Updated: October 4, 2014 19:32 IST2014-10-04T19:32:28+5:302014-10-04T19:32:28+5:30

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची खोल, स्वतंत्र व समृद्ध जीवनदृष्टी वाचकाला स्फुरणदायी तर होतेच; पण जीवनाच्या अर्मयाद अनुभवाचा लाभ करून देत कळत-नकळत त्याचा विकास करते. एलकुंचवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने (९ ऑक्टोबर) या जीवनदृष्टीचा शोध घेण्याचा प्रयास.

Elixine genius | एलकुंचवारी प्रतिभेस कुनिर्सात

एलकुंचवारी प्रतिभेस कुनिर्सात

 डॉ. कमलेश सोमण 

 
 
लेखकाच्या महानतेची खूण म्हणजे त्याची जीवनदृष्टी,’ असे विधान स्वत: महेश एलकुंचवार यांनी ‘प्रिय जी. ए. सन्मान,’ सुनीता देशपांडे यांना प्रदान करण्याच्या सोहळ्यात काढले होते. हे विधान ‘एलकुंचवारी’ साहित्यालाही तितकेच लागू आहे. एकूणच, आत्मशोधातून उमललेली ‘एलकुंचवारी’ नाट्यसृष्टी आहे. या शोधप्रवासाची खरी ताकद त्यांच्या सखोल, समृद्ध आणि स्वतंत्र जीवन-नाट्य दृष्टीत आहे. समकालीन-आधुनिक जीवनातील-मनातील रिक्ततेचे-तुटलेपणाचे दर्शन घडवीत असतानाच, त्याच्या कारणांचाही ते कमालीच्या समंजसपणे-परिपक्वतेने शोध घेण्याचा प्रयत्न करतात. प्रगल्भ-सखोल जीवनदृष्टीबरोबरच प्रत्येक नाटकाच्या अखेरीस व्यक्तिरेखांचा आत्मभानापर्यंत होत जाणारा प्रवास प्रेक्षकांना विलक्षण अंतर्मुख करतो. ही या नाट्यसृष्टीची मोठी जमेची बाजू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, एलकुंचवारी नाट्यसृष्टीतून आविष्कृत होणार्‍या त्यांच्या जीवनदृष्टीचा, त्यांच्या प्रायोगिकतेशी नाळेचा संबंध आहे.
विश्‍वात्मक चैतन्याची आत्मवत्ता लाभलेल्या प्रतिभावंतांची संख्या नेहमीच अत्यल्प असते. इतकेच नव्हे, तर प्रत्येक प्रतिभावंताच्या हृदयाची, जीवाची आंतरिक तहान ही नेहमीच आकाशगामी असते. या प्रतिभावंतात राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज, जी. ए. कुलकर्णी, चि. त्र्यं. खानोलकर, दुर्गा भागवत यांच्यासह मी नाटककार महेश एलकुंचवार यांचा मोठय़ा आदराने उल्लेख करतो. केवळ मराठी रंगमंचावरच नव्हे, तर समकालीन भारतीय रंगमंचावर आपली एक मुद्रा उमटवणारा हा एक मोठा नाटककार आहे. त्यांची मोजकीच; पण दज्रेदार नाट्यसंपदा-ललित लेखन आहे.
कुठल्याही प्रतिभावान कलावंताचे, मोठय़ा लेखकाचे-नाटककाराचे कलाविश्‍व हा त्याचा स्वत:शीच चाललेला संवाद असतो, आत्मशोध असतो, त्यामुळे अशा कलावंताचे समग्र साहित्य आपण जर काळजीपूर्वक आणि बारकाईने वाचले, तर त्या लेखकाचे मन, त्याची सखोल-समृद्ध व स्वतंत्र जीवनदृष्टी, त्या विशिष्ट कलावंताच्या संपूर्ण आत्मिक विकासाचा आलेखच आपल्याला त्यात सापडतो. खरे तर प्रत्येक मोठा कलावंत आपल्या जीवनदृष्टीतून परिवर्तनाच्या, सद्गतीच्या दिशा आपल्या साहित्यातून दर्शवित असतो. ही दिशा आणि दृष्टी पुढील अनेक पिढय़ांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असते. खरे तर सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाला मांगल्य देणारी ही जीवनदृष्टी स्वतंत्र, सखोल तर असतेच; पण सर्वस्पश्रीही असते. एलकुंचवारी नाट्यसृष्टीच्या अनुभवानंतर त्यांची खोल, स्वतंत्र व समृद्ध जीवनदृष्टी वाचकाला स्फुरणदायी तर होतेच; पण जीवनाच्या अर्मयाद अनुभवाचा व दृष्टीचा लाभ करून देत कळत-नकळत त्याचा विकास करते. या दृष्टीने नाटककार महेश एलकुंचवार यांच्या जीवनदृष्टीकडे, नाट्यसृष्टीकडे काळजीपूर्वक पाहायला हवे.
एलकुंचवार यांची प्रायोगिकतेची संकल्पना ही समकालीन व पूर्वकालीन नाटककारांपेक्षा अधिक प्रौढ, प्रगल्भ व विस्तारशील आहे. ‘रंगमंचावर महत्त्वाचं असतं, ते नटाचे शरीर आणि ते मानवी मन अभिव्यक्त करण्यासाठी धडपडत असतं! या मनाचा शोध घेणं, हीच खरी प्रायोगिकता. मानवी मन अथांग आहे आणि त्याच्या तडफडीला अंत नाही. त्या मनाचा तळ सतत शोध घेत राहणं, यासाठी प्रायोगिकता राबवावी,’ असे त्यांना वाटते. एलकुंचवार यांचे हे विधानच त्यांच्या संपूर्ण नाट्यसृष्टीचे प्रमुख सूत्र आहे. 
सारांश, नाटक या माध्यमाद्वारे मानवी जीवनाचा, मनाच्या अथांगतेचा, नेणिवेतील (वैयक्तिक व सामूहिक) अंधाराचा-वेदनेचा सातत्याने व प्रांजलतेने शोध घेत राहणे, हेच त्यांच्या नाट्यलेखनाचे सार आहे. एकूणच, एलकुंचवारी नाट्यप्रवास हा बाहय़ संघर्षाकडून आंतरिक संघर्षाकडे, आंतरिक संघर्षाकडून नेणिवेतील अंधाराकडे आणि वैयक्तिक नेणिवेकडून सामूहिक नेणिवेतील उत्सुक व कोवळ्या अंधाराकडे विकसित होताना दिसतो. सारांश, एलकुंचवार आपल्या मोजक्याच एकांकिकेतून-नाटकांतून (होळी, रक्तपुष्प, पार्टी, वाडा चिरेबंदी आणि आत्मकथा) मानवी मनाच्या अथांगतेचा-धडपडीचा (दु:खाचा) अविरत शोध गेले पंचेचाळीस वर्षे घेत आहेत. मी तर त्यांना दु:खाचाच नाटककार म्हणतो.
विदर्भातील एलकुंचवारांना मध्यंतरी विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती’ पुरस्कार मिळाला. नंतर नाट्य परिषदेतर्फे ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ जाहीर केला गेला. त्या अगोदर ‘प्रिय जी. ए. सन्मान पुरस्कार,’ के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे ‘सरस्वती पुरस्कारा’साठी त्यांना सन्मानित करण्यात आले. अलीकडे तर त्यांच्या ‘मौनराग’ या ललित लेखांवर चित्रपटही येऊ घातला आहे. मुख्य म्हणजे या नऊ ऑक्टोबरला ते आपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. याबद्दल वाड्.मयीन नवतेच्या-प्रायोगिक-समांतर रंगभूमीच्या प्रवाहातील मोजक्याच पण दज्रेदार नाट्यनिर्मिती करणार्‍या एलकुंचवारांना हार्दिक अभिवादन करायला हवे.
प्रारंभापासून एलकुंचवारांना अभिजात इंग्रजी साहित्याच्या वाचनाची आणि चित्रपटांची प्रचंड आवड होती. कॉलेजजीवनात असताना, १९५७ ते ६३ या काळात, त्यांनी जवळजवळ पाचशे ते सहाशे इंग्रजी चित्रपट पाहिले होते. एकूणच प्रचंड वाचन, अभिनयाची-दृकश्राव्य माध्यमाची आवड आणि जीवानात पडलेले विविध प्रश्न या सर्वांचा संघात व्यक्तिमत्त्वात रुजलेला असताना एके क्षणी सहजपणे पाहिलेल्या नाटक या घटनेचा (इव्हेंट) परिणाम होऊन एलकुंचवार नाटक या माध्यमाकडे वळले. १९६७ हा एलकुंचवारांच्या नाट्यसृष्टीचा प्रारंभबिंदू आहे, कारण या वर्षी एलकुंचवार यांची पहिली ‘सुलतान’ ही एकांकिका ‘सत्यकथे’त प्रथम प्रकाशित झाली. मग ‘सुलतान’सह ‘झुंबर’, ‘एका म्हातार्‍याचा खून’, ‘एक ओसाड गाव’, ‘यातनाघर’, ‘होळी’, ‘कैफियत’ आणि ‘रक्तपुष्प’ या एकांकिका तर ‘रुद्रवर्षा’, ‘गाबरे’, ‘वासनाकांड’, ‘पार्टी’, ‘प्रतिबिंब’, ‘आत्मकथा’, ‘युगान्त’ (वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त) तसेच ‘वासांसि जीर्णानि’, ‘सोनाटा’, ‘एका नटाचा मृत्यू’ या नाट्यकृती रंगमंचावर आल्या.
एलकुंचवार यांच्या नाटकांतील नाट्यानुभवाचे स्वरूप हे दुसर्‍यापासून भिन्न आहे. प्रत्येक नाटकाची अनुभवशैली वेगवेगळी आहे. त्यांचे एक नाटक दुसर्‍यासारखे नाही. विषय, आशय व घाट या तिन्ही स्तरांवर ही भिन्नता आहे. ‘गाबरे’ हे नाटक अँब्सर्ड आहे. ‘वासनाकांड’ इंप्रेशनिझमच्या जवळ जाते, तर ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक पूर्णपणे वास्तववादी आहे.
‘होळी’ या एकांकिकेत आंधळी भीती आणि आंधळी आक्रमकवृत्ती या परस्परविरोधी प्रेरणांतून कॉलेजमधील विद्यार्थी आत्मघाताकडे कसे वळतात, हे नाटककाराने दाखवले आहे. यातही या विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा नेमकेपणाने वेध घेता यावा, यासाठी रिक्रिएशन रूम, कँटीनचा तसेच व्याख्यानाचा हॉल या स्थानांचा कलात्मक वापर त्यांनी केला आहे, त्यामुळे जाणिवेचा, जागृतीचा पहारा नेणिवेकडून चुकवला गेला आणि विद्यार्थ्यांच्या अर्धजाणीव-नेणिव यांतील अंधारावर नाटककाराला नेमका स्पर्श करता आला. महत्त्वाचे म्हणजे, ‘होळी’च्या निमित्ताने भेदक वास्तवाला प्रखरपणे सामोरे जाणारे जीवनदर्शन एलकुंचवारांनी यातून घडविले.
‘पार्टी’ या नाटकातील व्यक्तिरेखा या जसजसे नाटक पुढे जाऊ लागते, तशा समजू लागतात. ही जी जाणिवेची प्रक्रिया आहे, ती खूपच अंतर्मुख करणारी आहे आणि ती मला फार महत्त्वाची वाटते,’ असे अमोल पालेकर यांनी म्हटले आहे.
एलकुंचवार हे पूर्णपणे जीवनवादी आहेत. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ‘कला हे जीवन जगत असताना निर्माण झालेले जीवनाचे बायप्रॉडक्ट आहे. जगत असताना कुठं दुखलं, खुपलं, कुठं आनंद झाला, तर आपण हुंकार देतो. तो हुंकार म्हणजेच कला.’ ते पुढे असेही म्हणतात, की ‘लेखन हा माझ्या अंतर्गाभ्याचा प्रतिध्वनी आहे. यातही, हा मानवी गाभा जास्त शाश्‍वत, अर्मत्य, गहन असा आहे.’
‘युगान्त’चे नाते आजच्या काळाशीच
सतत बदलत्या कालप्रवाहाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या परीने व परंपरेने प्रत्यक्ष जगत असताना मानवी जीवनात कोणकोणत्या घडामोडी घडतात, गुंतागुंती होतात, यांचा सूक्ष्मतर वेध एलकुंचवार ‘वाडा चिरेबंदी’त घेतात. यातही चार पिढय़ांचा संदर्भ घेऊन त्यांची प्रत्यक्ष जीवनगती, बदलती मनोवृत्ती व संबंध तसेच बदलते पर्यावरण यांना एका चिरेबंदी वाड्याच्या कक्षेत नाटककाराने आणून सोडलेले आहे. एकूणच, समाजमनाचे ते एक वास्तव दर्शन आहे. मराठी नाट्यसृष्टीत बहुधा हे प्रथमच घडत असावे. थोडक्यात, भौतिक परंपरेने प्राप्त झालेल्या एका खेड्यातील जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न नाटककार करताना दिसतो. मध्ययुगीन संस्कृतीत, परंपरेत 
 
 
वाढलेल्या एका खानदानी; पण ग्रामीण परिसरातील एका खेड्याचे, धरणगावकर देशपांडे कुटुंब प्रतिनिधित्व करते. या भारतीय मध्ययुगीन जीवनाला, पर्यायाने त्या कुटुंबाला अंतर्बाहय़ स्तरांवर आलेले फुटीपण, पडझड, त्यातील मानसिक बदल नाटककार काळजीपूर्वक टिपताना दिसतो. या अंधारी वातावरणात काही क्षण एकत्र आलेल्या व्यक्तीमनांचा, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियाचा, अवतीभोवतीच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक पर्यावरणाचा तसेच आधुनिकतेच्या स्पर्शाने स्त्री-पुरुषाच्या मानसिकतेत, नातेसंबंधात होणार्‍या बदलांचा एलकुंचवारांनी घेतलेला शोध म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक!
२0 व्या शतकाच्या मरणघडीतून संपूर्ण शतकाकडे, भारतीय समाजजीवनाकडे व अस्तित्व जाणिवेपासून तुटत चाललेल्या एकांगी, जड व निर्जीव होत चाललेल्या माणसांकडे आत्मशोधक वृत्तीने पाहणे ‘युगान्त’ने एलकुंचवारांना भाग पाडले असावे. या शोधातून त्यांना संपूर्ण समाजच्या समाज काहीसा स्थितीशील, चैतन्यहीन अवस्थेत जाणवला असावा! अशा या सर्व स्तरांवरच्या अवर्षणाचेच प्रतीकात्मक दर्शन ‘युगान्त’मध्ये घडते. अखेर अवर्षण म्हणजे तरी काय, दु:ख-वेदनेचे अंतिम टोकच! 
 
 
 
अशा अवर्षणाच्या वेळी द्रष्टा कलावंत हा आपल्या दुरावलेल्या मातृकोशरूपी संज्ञागर्भाशी नाते जोडण्याची धडपड करीत असतो. या निकडीतूनच तळे, भूमी व स्त्री (माता) या आदिम प्रतिमांचे अवतरण म्हणजेच सामूहिक नेणिवेचे आविष्करण ‘युगान्त’मध्ये घडलेले आहे, त्यामुळे रुद्ध समाजचैतन्य पुन्हा एकदा खुले झाले, मुक्त झाले. अखेर चिरेबंदी वाडा म्हणजे तरी काय, मातृकोशच! हा मातृकोशच बदलत्या कालप्रवाहात लोप होऊ पाहत आहे, नष्ट होऊ पाहत आहे. नाटककार यातील व्यथा-वेदना टिपताना दिसतो. एखादी राजवट येणे आणि जाणे, यापेक्षा संपूर्ण मूल्यभ्रंश होणं व नवीन मूल्ये दृष्टीपथात न येणे, हा युगान्तच आहे. असो.
एलकुंचवार यांच्या संपूर्ण नाट्यसृष्टीचा समग्रतेने-साकल्याने विचार केला, तर आपल्या तळहातावर काही मूल्यव्यूह-संकेतव्यूह उरतात, ते अभ्यासण्यासारखे आहेत. ‘एलकुंचवारी’ जीवनदृष्टी आपल्याला हेच सुचविते, की कालप्रवाहातून पृथ्वीतलावरील काळोखात काही क्षण उगवलेला व २१ व्या शतकाच्या तुकड्यावर जगणारा माणूस हा तळे (आपले घर, गाव, देश), स्त्री (माता), कालप्रवाह आणि अगदी स्वत:पासून हळूहळू पूर्णपणे तुटत चाललेला आहे. या विलक्षण तुटलेपणासह जगत असताना, व्यक्तीच्या भागधेयात, जीवघेणा एकटेपणा, वाढता काळोख, मृत्यूची अटळता, दु:ख-वेदना, भूतकाळाचे जोखड तसेच अंधारमय भविष्यकाळ- या घटकांची भर पडते. या सर्व घटकांचा संघात व्यक्तीचा  वर्तमानकाळ दूषित करतोच; पण त्याच्या पदरात विलक्षण रिक्तता शिल्लक ठेवतो. या रिक्ततेवर मात करण्यासाठी पार्टी, यश (व्यापक अर्थाने) याकडे पाठ फिरवत संपूर्ण जीवन चहूबाजूंनी मोठय़ा करुणेने-वात्सल्याने समजून घेत, ‘जे आहे’ त्या समवेत आवडनिवडशून्यतेत सहज कृतीत जगणे आवश्यक आहे. खरे तर हीच खरी जीवनाची गुणवत्ता आहे आणि ती व्यक्तीला, जन्मजात बुद्धीला अधिकाधिक परिपक्व करीत आत्मज्ञानाप्रत घेऊन जाते. एकूणच, ‘स्व’कडून ‘स्वे’तरांकडे, विकृतीकडून आत्मज्ञानाकडे, संकुचित यातनाघरातून यातनांनी तडफडणार्‍या जगाकडे तसेच दु:खाच्या-एकटेपणाच्या कैदेतून करुणेने-औदार्याने भरलेल्या मनाकडे जाणे गरजेचे आहे. अखेरीस तळे, भूमी, माता आणि कालप्रवाह यांच्याशी तुटलेली नाळ आपल्या बाजूने जोडत कृतार्थ मनाने (आसक्तीला समजून घेत) व प्रेमाने या जीवनाचा निरोप घेत, त्या चिरंतन काळोखात विसजिर्त होण्याची अपेक्षा, एलकुंचवार आपल्या नाट्यसृष्टीतून (व्यक्तिरेखेकडून) बाळगतात. सारांश, आत्मज्ञानाप्रत जाणार्‍या या व्यक्तिरेखा व नाटककाराची सखोल, समृद्ध व स्वतंत्र जीवनदृष्टी प्रेक्षकांच्या मनावर दगडावर कोरलेल्या रेघेसारखा परिणाम करतात. त्याला विलक्षण अंतर्मुख करीत आध्यात्मिक जागरणाची आवश्यकता प्रतिपादन करतात.
(लेखक आहेत.

Web Title: Elixine genius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.