सहजच
By Admin | Updated: January 3, 2015 14:58 IST2015-01-03T14:58:15+5:302015-01-03T14:58:15+5:30
अनेक वर्षापूर्वींची आठवण! मी आणि माझे काही मित्र - रिचर्ड, मार्गारेट, बॉब, डिक्सी आम्हाला कुणीतरी सांगितलं, शिकागोमध्ये एक झेन गुरू आले आहेत! आम्ही जायचं ठरवलं

सहजच
धनंजय जोशी
अनेक वर्षापूर्वींची आठवण! मी आणि माझे काही मित्र - रिचर्ड, मार्गारेट, बॉब, डिक्सी आम्हाला कुणीतरी सांगितलं, शिकागोमध्ये एक झेन गुरू आले आहेत! आम्ही जायचं ठरवलं. माझा आणखी एक मित्र डॅनियल आणि त्याची पत्नी पण आली. सान सा निम आम्हाला सांगत होते..
‘‘झेन खूप सोपं आहे. सहज आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हा खावं. जेव्हा झोप येईल तेव्हा झोपावं. समोर भुकेला मनुष्य असेल तेव्हा त्याला खायला द्यावं. आयुष्य म्हणजे आरसा. तुम्ही जे दाखवाल ते दिसेल. फक्त तुमच्यामध्ये बघण्याचं धैर्य हवं!’’ मी ऐकत होतो. अचानक भाषण संपल सान सा निम म्हणाले, ‘‘एनी क्क्वेश्चन्स? काही प्रश्न?’’
आम्ही सगळे गप्पच होतो.
त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं, आणि म्हणाले ‘यू??’ मी बघतच होतो.
‘‘यू विल बी स्टार्टिंग अ झेन सेंटर इन शिकागो.’’ मी म्हणालो ‘ओके!’
तेव्हा मी रॉकवेल इंटरनॅशनलमध्ये काम करीत असे. दोन दिवसानंतर घरी आलो तेव्हा एक सुंदर बुद्धाचा पुतळा माझ्या दारासमोर उभा होता!
सान सा निमनी कोरियाहून पाठवलेला. ‘का?’ म्हणून प्रश्न विचारायचा नव्हता. त्यानंतर अनेक वर्षं अनेक साधकांनी माझ्या घरामध्ये ध्यान शिबिरात भाग घेतला.
लग्न झालं! मुली झाल्या.
‘ब्युटिफुल बेबी..’ माझ्या पहिल्या मुलीच्या वेळी गरोदर पत्नीच्या पोटावरून हात फिरवून सान सा निमनी आशीर्वाद दिला होता. आयुष्य ‘सहजच’ चाललं होतं. माझ्या घरामधलं ‘शिकागो मेडिटेशन सेंटर’ पुढे न्यू मेक्सिकोमध्ये गेलं, पण ती ज्योत विझली नाही. दोन आठवड्यांपूर्वी मार्गारेटचा फोन आला, ‘धनंजय, आपल्याला एक जागा मिळाली आहे, तुझ्या घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर! आपण बुधवारी संध्याकाळी साडेसहा ते आठ आणि रविवारी सकाळी आठ ते बारा बसायचं ध्यानासाठी! वुई ऑल वॉण्ट यू टु जॉइन!’’
-‘येस, मार्गारेट!’
मी म्हणालो. अगदी सहज.
आजपासून हे ‘सहज’.
पुन: एकदा-अगदी तसंच!
(अमेरिकेतील शिकागो या शहरात वास्तव्याला असणारे लेखक झेन साधक/अभ्यासक आहेत.)
(हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होईल.)