शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बंद डोळ्यांनी एव्हरेस्टशी झुंज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 6:00 AM

डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन या दोघा सख्ख्या भावांची एव्हरेस्ट मोहीम अतिशय चित्तथरारक झाली. अनेक खडतर आव्हानं त्यांना पेलावी लागली. जगातल्या सर्वोच्च शिखरावर भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्याच ठिकाणी डॉ. हितेंद्र यांना, तर कॅम्प चारपासून डॉ. महेंद्र यांना डोळ्यांनी काहीच दिसेनासं झालं. तरीही त्याच अवस्थेत आणि जिद्दीनं त्यांनी आपली मोहीम पूर्ण केली !

ठळक मुद्दे‘डेथ झोन’हे असं ठिकाण आहे, जिथून कोणीही तुम्हाला उचलून आणू शकत नाही. हेलिकॉप्टर इथे पोहोचू शकत नाही. तुमची इच्छाशक्ती आणि चालण्याची ताकद असेल तरच इथून तुम्हाला परत येता येतं. कारण तुमचं पाऊल तुम्हालाच उचलावं लागतं. अनेक जण हिंमत हारतात, ती इथेच..

- समीर मराठेतब्बल 29,029 फुटावरचं, जगातील सर्वाधिक उंचीवरचं एव्हरेस्ट शिखर. हे शिखर सर करणं खरंच इतकं सोपं आहे? कोणीही ‘सोम्यागोम्या’ ते सर करू शकतो?.- नुकतीच एव्हरेस्ट मोहीम पूर्ण करून आलेले आणि थेट मृत्यूशी झुंज देऊन परतलेले नाशिकचे सायकलपटू डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र या महाजन बंधूंना याबाबत विचारलं तर ते सांगतील, हो, एव्हरेस्ट शिखर सर करणं आता पूर्वीच्या तुलनेत सोपं झालेलं आहे. पण त्याचवेळी ते तुम्हाला हेही सांगतील, नाही, एव्हरेस्ट सर करणं अजूनही तितकंच अवघड आणि चॅलेंजिंग आहे. कारण एव्हरेस्ट हा शेवटी ‘राजा’ आहे. तिथे जाणार्‍या दर सातपैकी एक मृत्युमुखी पडतो. आजवर अनेक पट्टीच्या गिर्यारोहकांचा एव्हरेस्ट चढाईत मृत्यू झाला आहे. तसाच तो आत्ता, डोनाल्ड (डॉन) कॅश या आमच्या अमेरिकन सहकार्‍याचाही झाला.. डॉ. महाजन बंधू या मोहिमेवर असतानाच एव्हरेस्टवर नेमका ट्रॅफिक जॅम झाला. विविध कारणांनी अनेकांना त्यात आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजनविरहित 29 हजार फूट बर्फाळ कड्यावर जिथे एकेक मिनिट महत्त्वाचा आणि जीवघेणा ठरू शकतो, तिथला थरारक अनुभव नेमका काय होता, हे जाणून घेण्यासाठी महाजन बंधूंची गाठ घेतली.‘पांढरा रंग किती जीवघेणा ठरू शकतो आणि मृत्यूशी त्याचा किती जवळचा संबंध असू शकतो, हे प्रथमच आम्ही इतक्या जवळून पाहिलं’. डॉ. महेंद्र सांगत होते.हा पांढरा रंग अर्थातच बर्फाचा. डोळे दिपवणार्‍या याच चकाकत्या बर्फानं त्यांना ठार आंधळं केलं होतं आणि एक पाऊल चुकलं तर थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाणारं जगातलं हे सर्वोच्च शिखर त्यांना अक्षरश: डोळे बंद करून उतरावं लागलं होतं. या पांढर्‍या रंगाची धग त्यांना अजूनही जाणवते आहे.महाजन बंधूंना बेस कॅम्पपासून कॅम्प एकपर्यंत पोहोचायला सहा तास, कॅम्प एकपासून दोनपर्यंत पुन्हा सहा तास, दोनपासून तीनपर्यंत आठ तास आणि तीनपासून चारपर्यंत पोहोचण्यासाठी (साउथ कोल) आठ तास लागले.  कॅम्प चारची उंची आहे, साधारण आठ हजार मीटर आणि इथून पुढे सुरू होतो तो सगळा ‘डेथ झोन’. डॉ. महेंद्र महाजन यांना कॅम्प चारहून समिटपर्यंत पोहोचायला लागले दहा तास. 22 मेच्या पहाटे 6 वाजता ते समिटवर पोहोचले. इथे येईपर्यंत त्यांच्या गॉगलवर चांगलाच बर्फ साचला होता. नखानं खरवडूनही निघत नव्हता. हा गॉगल कामातून गेला. दुसरा स्की गॉगल त्यांच्याजवळ होता; पण त्यानं अगदी जवळचं, पायाखालचं दिसत नाही. त्यामुळे हा गॉगल काही वेळ घालत, काही वेळ काढत त्यांनी एव्हरेस्ट उतरायला सुरुवात केली. समिटजवळ दोघा भावांची परत एकदा भेट झाली. डॉ. महेंद्र समिटवरून खाली उतरत होते, तर हितेंद्र समिटजवळ पोहोचत होते. साउथ समिट ते समिटपर्यंतचा साधारण तीन-चारशे मीटरचा हा भाग एकदम चिंचोळा. एकावेळी एकच जण जाऊ शकतो. दुसर्‍याला पुढे जायचं असेल तर तिरपं-आडवं होऊन जावं लागतं. कॅम्प चारवर पुन्हा भेटू असं सांगून दोघं भाऊ मार्गस्थ झाले.डॉ. महेंद्र सांगतात, ‘इथे ट्रॅफिक इतकी जॅम होती की कोणालाही तसूभरही पुढे सरकता येत नव्हतं. पुढे जायचंच असेल तर आपल्या सुरक्षेसाठी असलेलं कॅरॅबिनर काढायचं आणि आपल्या पुढच्या गिर्यारोहकाला ओलांडून पुढे जायचं. इथे जर तुम्ही घसरलात, तर थेट दरीत चीरनिद्रा! पण तरीही ती रिस्क घेत मी पुढे सरकत होतो.’डॉ. हितेंद्रही समिटवर पोहोचले. कॅम्प चारपासून इथे पोहोचायला त्यांना तेरा तास लागले. गॉगलवर बर्फ साचलेला होताच. जगातलं हे सर्वोच्च ठिकाण डोळ्यांत साठवून घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी त्यांनी गॉगल डोळ्यांवरून कपाळावर चढवला. काही फोटो काढले. गॉगलवरचा बर्फ निघत नसल्यानं थर्मासमधलं गरम पाणी गॉगलवर ओतलं. पण त्या गरम पाण्याचाही क्षणात बर्फ झाला !.. डॉ. हितेंद्र यांच्याकडेही दोन गॉगल होते. पण एव्हरेस्टवर चढणार्‍या दुसर्‍या एका शेरपाचा गॉगल निकामी झाल्यानं आपल्याकडचा एक गॉगल त्यांनी आधीच त्याला देऊन टाकला होता. गॉगलवरचा निघेल तेवढा बर्फ त्यांनी काढला आणि समिट उतरायला सुरुवात केली. इथपर्यंत सारं काही व्यवस्थित होतं. काही अंतर ते चालूनही गेले. मात्र थोड्याच वेळात डॉ. हितेंद्र यांना अंधुक, भुरकट दिसायला लागलं आणि काही मिनिटांनी तर स्वच्छ सूर्यप्रकाशातही डोळ्यांपुढे मिट्ट काळोख ! नीट पाहिल्याशिवाय एक पाऊल उचलणंही जिथं मुश्कील, तिथे डोळेच गेलेले ! काही क्षणांसाठी ते खचले. बरोबरच्या शेरपालाही सांगितलं, ‘तू जा. मी येतो.’डॉ. हितेंद्र सांगतात, याच डेथ झोनवर (चौकट पाहा) आजवर अनेकांनी प्राण सोडले आहेत. इथपर्यंत पोहोचल्यावर अनेकांचं त्राण गेलेलं असतं. अनेकजण ट्रान्स फेजमध्ये गेलेले असतात. एक प्रकारची स्पिरिच्युअँलिटी आलेली असते. आपण परमेश्वराच्या सान्निध्यात, त्याच्याजवळ असल्याची अनुभूती काही जण घेत असतात. तिथल्या मुक्त सौंदर्याची भुरळ पडलेली असते. अशा परिस्थितीत स्वत:ला ‘डिटॅच’ करणं फारसं कठीण नसतं. मरणाची तुम्हाला भीती वाटत नसते. आपल्या नेहेमीच्या कल्पनेतल्या वेदनाही होत नसतात. त्याचवेळी तुमचा मेंदू आणि शरीर यांचा ताळमेळ सुटलेला असतो. एका ‘वास्तव स्वप्नात’ तुम्ही जाता. बुद्धिभ्रम व्हायला लागतो. याला ‘डिलिरियस’ अवस्था म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही एखादी कृती करत असता, समजा तुम्ही चालताहात, बोलताहात; पण तुम्हाला वाटतं, मी हे स्वप्न पाहतोय. स्वप्नात चालतोय, बोलतोय !. अशावेळी तुम्ही मनानं ‘गिव्ह अप’ केलंत, सोडून दिलंत, त्यातून तुम्ही बाहेर आला नाहीत, पडू शकला नाहीत, तर सहजपणे प्राणत्याग होऊ शकतो. काही क्षण डॉ. हितेंद्रही त्या फेजमध्ये गेले होते. त्यावेळचा त्यांचा अनुभव अतिशय विलक्षण आहे. ‘त्यामुळेच मी माझ्याबरोबरच्या शेरपाला सांगितलं होतं, तू जा.. शरीर आणि मन विलग होत असतानाचा तो एक अधांतरी क्षण मीही अनुभवत होतो’, त्या क्षणाचं वर्णन करताना डॉ. हितेंद्र सांगतात, ‘पण क्षणात मी स्वत:ला सावरलं, माझा मुलगा, पत्नी, आमच्या वाटेकडे डोळे लावून असलेले असंख्य हितचिंतक मला आठवले. माझ्या मुलाच्या जन्माचा प्रसंग समोर दिसायला लागला. जन्माला आला त्यावेळी तो अगदी हेल्दी होता. पण जन्मानंतर सहा तासांतच त्याला श्वासाचा भयंकर त्रास होऊ लागला. जगेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तीन दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. मनात विचार आला, सहा तासांचं बाळ जर मृत्यूशी झुंज देऊ शकतं, तर आपण का नाही?.. ‘डिटॅच’ करू पाहणारे मनातले सारे विचार निर्धारानं मी झटकून टाकले आणि पुन्हा जिद्दीनं उभा राहिलो..’‘डोळ्यांनी दिसत नाही’ म्हटल्यावर बरोबरचा शेरपाही बिचकला. वॉकीटॉकीवर आपल्या बॉसशी त्यानं चर्चा केली. डॉ. हितेंद्र यांना त्यानं विचारलं, ‘वापस आना है?’ डॉ. हितेंद्र यांनी सांगितलं, ‘कुछ भी हो, वापस जाना है.’शेरपानं त्यांना पुन्हा विचारलं, ‘मुझपर भरोसा है?.’डॉ. हितेंद्रनं सांगितलं, ‘पुरा भरोसा है.’हा ‘आंधळा’ प्रवास जितका कठीण होता, तितकाच जीवघेणाही. डॉ. हितेंद्र क्षणाक्षणाला धडपडत, ठेचकाळत होते, पडत होते, उभे राहात होते. थंडी आणि बर्फापासून बचाव करणारा त्यांचा डाउन सूटही फाटला. डॉ. हितेंद्र पार थकले होते, शरीरातलं त्राण गेलं होतं; पण आपली हिंमत त्यांनी हारलेली नव्हती. जगातल्या त्या सर्वोच्च शिखरावरचा त्यांचा प्रवास मुंगीच्या पावलांनी सुरू होता. शेरपा त्यांना सांगत होता, डावीकडे पाय टाका, उजवीकडे टाका, इथे दरी आहे, इकडे खडक आहे. ‘हिलरी स्टेप’ हा एव्हरेस्टवरचा सर्वात कठीण टप्पा. जवळपास 80 ते 90 अंशांचा उभा सुळका. डॉ. हितेंद्र यांना चिंता होती ती या हिलरी स्टेपचीच. काही वेळानंतर त्यांनी ‘लकपा’ला (बरोबरचा शेरपा) विचारलं, ‘हिलरी स्टेप हम कैसे उतरेंगे?’, त्यानं सांगितलं, ‘वो तो चला गया!’हे ऐकल्यावर डॉ. हितेंद्र यांची हिंमत आणखी वाढली. अमेरिकेचा उत्कृष्ट गिर्यारोहक आणि महाजन बंधूंशी चांगली मैत्री झालेल्या डॉनचा नेमक्या याच दरम्यान समिटजवळ मृत्यू झाला. जगातली सर्वोच्च सात शिखरं त्याला पादाक्रांत करायची होती. त्यातली सहा त्यानं सर केली होती. हे शेवटचंच होतं आणि याच वेळी मृत्यूनं त्याला गाठलं. डॉनचा मृत्यू झाल्यानं त्याचा शेरपाही मग डॉ. हितेंद्र यांच्या मदतीला आला. एका व्हिएतनामी गिर्यारोहकानेही ताबडतोब आपले दोन शेरपा डॉ. हितेंद्र यांच्या मदतीला पाठवले. या मोहिमेतले पुढचे खडतर टप्पे जिनिव्हा स्पर, यलो बॅँड, लोत्से फेस. या ठिकाणी हार्ड ब्लू आईसची घसरगुंडी आहे. इथून पाय सटकला तर थेट चार हजार फूट खोल दरीत. हे सगळे टप्पे त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. काही तर थेट दरीकडे तोंड करून !कॅम्प चारला डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र या दोन्ही भावांची भेट झाली. 23 मेला पुन्हा त्यांचा एकत्र प्रवास सुरू झाला. कॅम्प चारपासून दोनपर्यंत यायला त्यांना बारा तास लागले. पुढच्या दिवशी सकाळी 24 मे रोजी हेलिकॉप्टरनं त्यांना बेस कॅम्पपर्यंंत आणण्यात आलं. मुंबई ते काठमांडू सायकलनं, तिथून बेसकॅम्पपर्यंत ट्रेकिंग आणि त्यापुढे समिटपर्यंंत माउण्टेनिअरिंग करत ‘सी टू स्काय’ (एसटूएस) ही यशस्वी, थरायक मोहीम आटोपून डॉ. महाजन बंधू आता नाशिकमध्ये परतले आहेत.स्नो ब्लाइंडमुळे गेलेली दोघांचीही दृष्टी हळूहळू परत येते आहे. फ्रॉस्ट बाइटमुळे डॉ. हितेंद्र यांच्या दोन्ही हातांची दहाही बोटं अक्षरश: काळीनिळी झाली आहेत. त्यातली शक्ती कमी झाली आहे; पण त्यांची जिद्द आणि हिंमत अजूनही तशीच आहे. ‘पुढे काय?’ विचारल्यावर हसत हसतच दोघंही सांगतात, आयुष्यात आव्हानच नसेल तर त्या सपक जगण्यातही काय मजा? हे आव्हान आणि हितचिंतक हीच आमच्या जगण्याची ऊर्जा आहे..

अनोखं बंधुप्रेम !एव्हरेस्ट समिटपासून कॅम्प चारवर पोहोचायला डॉ. महेंद्र यांना आठ तास लागले. भाऊ डॉ. हितेंद्रची वाट पाहात ते तिथेच थांबले होते. एक तास झाला, दोन तास झाले, बारा-पंधरा तास झाले तरीही भाऊ अजून पोहोचत नाही म्हटल्यावर ते अस्वस्थ झाले. डॉ. हितेंद्र यांना काय प्रॉब्लेम झाला आहे, हे तोपर्यंंत त्यांना माहीत नव्हतं आणि कोणी त्यांना सांगितलंही नव्हतं. अनेकांनी डॉ. महेंद्र यांना सांगितलं, तुम्ही खाली उतरा. इथे थांबणं धोक्याचं आहे, तरीही ते तिथून हलले नाहीत. डॉ. महेंद्र सांगतात, ‘डोक्यात विचारांचं काहुर माजलं. शेरपांचा काय भरवसा? त्यांनी हितेंद्रला सोडलं तर काय, अशीही भीती वाटायला लागली. काहीही झालं तरी आता यापुढचा प्रवास भावासोबतच करायचा हे मी मनाशी पक्कं ठरवलं.’मात्र या वेळपर्यंंत डॉ. महेंद्र यांनाही डोळ्यांचा त्रास होऊ लागला. धूसर दिसायला लागलं. डोळ्यांत जणू मिरची पूड टाकली आहे, इतकी आग व्हायला लागली आणि डोळे एक क्षणही उघडणं अशक्य झालं. तरीही मोठा भाऊ डॉ. हितेंद्रसाठी ते तिथेच थांबले होते. शेवटी समिटपासून कॅम्प चारपर्यंंत 17 तासांचा महाकठीण प्रवास करून डॉ. हितेंद्र कॅम्प चारवर पोहोचले. दोघा भावांची गळाभेट झाली. त्यानंतरच दोघा भावांचा पुढचा प्रवास सुरू झाला. तोही बंद डोळ्यांनी !.

एक बाटली भरायला एक तास, अश्रूंचंही बर्फ !एव्हरेस्टवर जाताना बेस कॅम्पनंतर फक्त कॅम्प दोनवरच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. बेस कॅम्प एक, तीन आणि चारदरम्यान रस्त्यातील बर्फाचे खडे बर्नरवर गरम करून, ते पाणी थर्मासमध्ये घालूनच पाणी प्यावं लागतं. बर्फ वितळवून अध्र्या लिटरचा थर्मास भरायला वेळ लागतो, तो तब्बल एक तास ! तीन बाटल्या भरायला तीन तास ! या बाटल्या भरतानाही त्यांचं झाकण व्यवस्थित पुसलं नाही तर पाण्याच्या थेंबांचं बर्फ होतं आणि बाटली काही केल्या उघडता येत नाही. पाणी हातात असूनही तहानलेले ! तोंडाला लावलेल्या मास्कमध्ये श्वासोच्छ्वासामुळे आलेली ओल ओघळून अंगातल्या ड्रेसच्या झिपवर ओघळते. त्याचा बर्फ होतो. झिप उघडत नाही. जवळचं पॅकेट फूड जर अगदी शरीराजवळ ठेवलं नाही तर त्याचाही ‘दगड’ होऊन ते खाता येत नाही. नाकातून पाणी निघालं तर ओठावर, मिशीजवळ त्याचा बर्फ ! अश्रू आले तर पापण्याही बर्फाच्या !

मृत्यूला हाका  मारणारा ‘डेथ झोन’ !एव्हरेस्टचं समिट आहे 8848 मीटर (29,029 फूट) उंचीवर; पण आठ हजार मीटरनंतर, कॅम्प चारपासून पुढचा सारा परिसर ‘डेथ झोन’ या नावानं ओळखला जातो. हे असं ठिकाण आहे, जिथून कोणीही तुम्हाला उचलून आणू शकत नाही. हेलिकॉप्टर इथे पोहोचू शकत नाही. तुमची इच्छाशक्ती आणि चालण्याची ताकद असेल तरच इथून तुम्हाला परत येता येतं. कारण तुमचं पाऊल तुम्हालाच उचलावं लागतं. अनेक जण हिंमत हारतात, ती इथेच. या ठिकाणी जर त्या गिर्यारोहकानं सांगितलं, मी चालू शकत नाही किंवा त्याला चालता आलं नाही, तर बरोबरच्या शेरपांनाही त्याला तिथेच सोडून परत जावं लागतं. कारण त्यांच्याही जिवाचा प्रश्न असतो. हवामान क्षणाक्षणी बदलत असतं. ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवायची असतात. नाहीतर त्यांचाही मृत्यू अटळ!

शेरपा हाच ‘बॉस’!1.    आपला शेरपा हाच आपला ‘बॉस’ असतो. त्याचा ‘अनुभव’ अतिशय महत्त्वाचा. त्यानी सांगितलं, परत फिरा, तर काहीही न बोलता परत फिरायचं.2.     शारीरिक, मानसिक कणखरता, मोठय़ा शिखरांवर चढाईचा पुर्वानुभव अत्यावश्यक.3.     एजन्सी चांगली आणि त्यांच्याकडचे शेरपाही उत्तम हवेत.4.     जास्त ऑक्सिजन सिलिंडर्स आणि दोन शेरपा सोबत घेता आले तर उत्तम.5.     शेरपांशी आणि सहकार्‍यांशी चुकूनही वाद घालू नका.6.     आपली क्षमता ओळखा आणि परत फिरण्याची हिंमत ठेवा.7.     शरीर-मनाचे संकेत ओळखा आणि थांबा.

 - समीर मराठे

sameer.marathe@lokmt.com(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)