एका लढाईची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 06:00 AM2019-07-28T06:00:00+5:302019-07-28T06:00:05+5:30

कुठलाही लढा, तो लढा लढणार्‍या संघटनेच्या  सामुदायिक निर्धाराचे प्रतीक असतो.  अनेक कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनतीमधून  तो लढा उभा राहत असतो, असे  डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणत असत.  ‘विवेकाच्या वाटेवर’ हे पुस्तकदेखील  अशाच लढाईची गोष्ट आहे.

Dr Hamid Dabholkar expresses his views about his book 'Vivekachya Vatevar'.. | एका लढाईची गोष्ट.

एका लढाईची गोष्ट.

Next
ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकी समाजनिर्मितीचा रस्ता मानसिक आरोग्याच्या प्रश्नाला बाजूला ठेवून पुढे जाऊ शकत नाही ह्या विचाराने परिवर्तनचे काम सुरू झाले होते. त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या पुस्तकात केलेला आहे.

- डॉ. हमीद दाभोलकर
‘प्रश्न मनाचे’ हे माझे पहिले पुस्तक. मी आणि माझे वडील डॉक्टर नरेंद्र दाभोलकर; आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिले होते. मानसिक आरोग्य आणि अंधर्शद्धा याविषयी प्रश्न-उत्तरे स्वरूपात लिहिलेले हे पुस्तक होते. राजहंस प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले होते. हे पुस्तक लिहिण्यासाठीची प्रेरणा आणि आग्रह बाबांचाच होता. त्यांच्या आत्यंतिक व्यस्त दिनक्र मातून त्यांचा भाग त्यांनी माझ्याआधी लिहून काढला होता. माझे लिहिणे रेंगाळल्यामुळे पुस्तक प्रकाशित करायला थोडा उशीर झाला होता. त्या वेळी आपले दुसरे पुस्तक बाबांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेले असेल असे स्वप्नातदेखील येणे शक्य नव्हते. पण ‘विवेकच्या वाटेवर’ ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ते घडले आहे. 
डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाच्या नंतर गेल्या पाच वर्षात मी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. बाबांच्या खुनाच्या नंतर पहिले तीन महिने मी एकही शब्द लिहू शकलो नव्हतो. अनेक वेळा त्यांच्या विषयी लिहिण्यासाठी मला विचारण्यात आले; पण मला ते जमणार नाही असे सांगून मी ते नाकारले होते. जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाल्यावर, ‘‘कायदा झाला डॉक्टर..’’ हा लेख मी एकटाकी लिहिला होता. त्यानंतर मात्न लिहिण्यातून व्यक्त होणे हे माझ्या आयुष्यात भावनिक संतुलन राखण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट बनून गेली. डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचे सूत्नधार अजून जरी सापडले नसले तरी त्यांनी चालवलेली सर्व कामे आज त्याच निर्धाराने चालू आहेत. कोर्टातील आणि रस्त्यावरील लढाईतून डॉक्टर  दाभोलकरांच्या खुनाच्या मागचा कट आणि त्या मधील व्यक्ती, संघटना समाजाच्या पुढे आल्या आहेत. धर्माच्या नावावर केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात उन्मादी वातावरण पसरवले जात असल्याच्या कालखंडात निर्धाराने चालू राहिलेल्या लढय़ाची ही गोष्ट आहे.
ह्या पुस्तकात चार भाग आहेत. ‘बाबांना आठवताना’ या भागात माझ्या आणि बाबांच्या नात्याविषयीचे लेख आहेत. माझे नाव हमीद का ठेवले? हा प्रश्न अजूनही मला अनेकदा विचारला जातो. ‘माझ्या हमीद असण्याचा अर्थ’ ह्या लेखात मी त्या विषयी लिहिले आहे. ज्या हमीद दलवाईंची स्मृती म्हणून माझे नाव हमीद ठेवले गेले त्यांनी उभ्या केलेल्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या सध्याच्या कामाविषयी तसेच हमीद दलवाई यांनी चालू केलेली, तिहेरी तलाक विरोधी लढाई होती त्या संबंधात प्रस्तावित कायद्याविषयी भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझे आणि बाबांचे नाते आईच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे तिच्या विषयीचा लेखदेखील ह्याच भागात घेतला आहे. दुसर्‍या ‘अंनिसच्या आघाडीवर.’ भागात महाराष्ट्र अंनिसच्या कामाच्या अनुषंगाने मी लिहिलेले लेख आहेत. मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मातील अंधर्शद्धांविषयी  ह्या भागात मांडणी आहे. शनिशिंगणापूरचा लढा, फटाकेमुक्त दिवाळी ह्यासारख्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लढायांना, त्यांच्या निर्घृण खुनाच्या नंतर आलेले यश आणि त्या विषयीचे विवेचन ह्या भागात आहे. जादूटोणाविरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा ह्याविषयीदेखील लढलेल्या लढाईचे वर्णन ह्या भागात आहे. 
तिसरा ‘मारेकर्‍यांच्या शोधात.’ भाग हा डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास आणि त्या निमित्ताने झालेल्या संघर्षाचा आहे. गेल्या सहा वर्षात आम्हा कुटुंबीयांना तपास यंत्नणा आणि न्यायालय यांच्या संदर्भात आलेल्या अनुभवाच्या विषयी ह्या भागात मी लिहिले आहे. न्याय मिळायला वेळ लागला तरी आपली लढाई संविधानिक मार्गाने लढण्याविषयी आम्ही आग्रही राहिलो त्या मागची भूमिका आणि त्या मार्गाने चालताना येणारे अडथळे तसेच अनपेक्षितरीत्या समाजीतील चांगुलपणाचे आलेले अनुभव ह्यामध्ये आहेत. ह्याच भागात डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाच्या नंतर आम्ही चालवलेल्या ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ ह्या अभियानच्या अनुषंगाने एकुणात हिंसेच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कार्याच्या कृती कार्यक्र मांची मांडणी करणारे लेख आहेत.
हिंसाचार एखाद्या संसर्गजन्य आजारासारखा पसरत असलेल्या कालखंडात मानवी मनातील हिंसेच्या भावनेला आपण कसे सामोरे जाऊ शकतो ह्या विषयीची मते मी मांडली आहेत, तर चौथ्या भागात साधना आणि परिवर्तन ह्या दोन संस्थांच्या कामाविषयीचे लेख आहेत. 
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे नाव प्रामुख्याने अंधर्शद्धा निर्मूलनाच्या कामाशी जोडले असले तरी साधना साप्ताहिक आणि साधना ट्रस्टच्या कामाची धुरा ते जवळजवळ दीड दशक सांभाळत होते. आम्ही कासवाचे बळ आणले आहे ह्या लेखात डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाच्या नंतरच्या साधनाच्या वाटचालीविषयी लिहिलेले आहे. मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्नात डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांनी सुरू केलेले काम गेल्या सहा वर्षात कसे विस्तारले याचा आलेख ‘परिवर्तनची पंचविशी’ ह्या लेखात मांडला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकी समाजनिर्मितीचा रस्ता मानसिक आरोग्याच्या प्रश्नाला बाजूला ठेवून पुढे जाऊ शकत नाही ह्या विचाराने परिवर्तनचे काम सुरू झाले होते. त्याची मांडणीदेखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कुठलाही लढा, तो लढा लढणार्‍या संघटनेच्या सामुदायिक निर्धाराचे प्रतीक असतो. अनेक कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनतीमधून तो लढा उभा राहत असतो असे नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणत असत. विवेकाच्या वाटेवर हे पुस्तकदेखील अशाच लढाईची गोष्ट आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनतीमधून ही लढाई लढली गेली आहे. मी ती शब्दबद्ध केली इतकेच. 

विवेकाच्या वाटेवर - डॉ. हमीद दाभोलकर
राजहंस प्रकाशन

hamid.dabholkar@gmail.com
(लेखक महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Dr Hamid Dabholkar expresses his views about his book 'Vivekachya Vatevar'..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.