जगज्जेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 06:05 AM2019-08-18T06:05:00+5:302019-08-18T06:05:06+5:30

कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, तर कोणाला बोटं नाहीत! पायच जायबंदी असलेला खेळाडू फ्रंटफूट डिफेन्स कसा करणार? जम्मू-काश्मीरचा वसीम खान हा भारताचा ओपनर बॅट्समन! त्याचा पाय वाकतच नाही. तुषार पॉल हा आपला विकेटकीपर.  त्याला एक पाय नाही. जयपूर फूट लावून खेळतो.  तुषार कसं करत असेल किपिंग? - पण तरीही या मुलांनी अपंगांसाठीचा पहिला क्रिकेट वर्ल्डकप पटकावलाय! त्यांची ही थक्क करणारी कहाणी!

Differently abled Indian cricket team's amazing journey to the T20 world cup.. | जगज्जेते

जगज्जेते

Next
ठळक मुद्देकिमान चाळीस टक्क्यांच्या पुढे अपंगत्व असलेल्या भारतीय खेळाडूंनी  अपंगांसाठीचा पहिला क्रिकेट वर्ल्डकप भारतात आणलाय!  

- समीर मराठे

वन डे वल्र्डकपच्या विजेतेपदाचे दावेदार म्हणून भारतीय क्रिकेट संघ दिमाखात इंग्लंडकडे रवाना होत असताना, भारतात एक महानाट्य घडत होतं.
विजेतेपदाचे दावेदार म्हणून सोडा, वल्र्डकपमध्ये फक्त खेळण्याची आम्हाला परवानगी द्या म्हणून आणखी एक भारतीय संघ इंग्लंडकडे डोळे लावून बसला होता. त्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता.
या संघातले खेळाडू कोणत्याही अर्थानं कमी नव्हते. त्यांच्यात तीच जिद्द होती, तिच ईर्षा होती, काहीही झालं तरी केवळ जिंकण्याचीच आस होती. त्यांची मेहनत तर जगातल्या कोणत्याही क्रिकेटपटूला लाजवेल इतकी अफाट होती. तरीही त्यांना वर्ल्डकपसाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी मिळत नव्हती. हे होते तरी कोण?
कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला बोटं नाहीत, काहींना अवयव तर आहेत, पण त्यांच्यात काही जीवच नाही. असून नसल्यासारखे!.
यातल्या अनेकांनी कधीच देशाबाहेर पाय ठेवला नव्हता. देशातल्या देशात फिरता येईल, खेळता येईल, एवढाही पैसा त्यांच्याकडे नव्हता. साधनं नव्हती. कोणाचे पालक मजुरी करताहेत, तर कोणाचे रिक्षा ड्रायव्हर!. या मुलांकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे मेहनत आणि  जिंकण्याची ऊर्मी!
याच मुलांनी जगातल्या पहिल्या ‘वर्ल्ड डिसअँबिलिटी क्रिकेट सिरीज’मधल्या विश्वविजयाचा चषक काल इंग्लंडच्या भूमीवर उंचावला. भारतीय स्वातंत्र्य दिनाला त्यांची ही कडक सलामी तर होतीच, पण भारताचे पूर्व कर्णधार अजित वाडेकर यांनाही त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला वाहिलेली ही आदरांजली होती. या टीमचं नावही होतं, ‘वाडेकर वॉरिअर्स’! 
- अजित वाडेकर यांच्या तीस वर्षांच्या अथक पर्शिमाला आलेलं हे देखणं फळ होतं. या ‘वाडेकर वॉरिअर्स’चा विजय ताजा असतानाच इंग्लंडमध्ये त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना बोलतं केलं. 
हा लेख आज रविवारी प्रसिद्ध होत असताना या सार्‍या विजयी टीमनंही मुंबईत आपलं पाऊल ठेवलेलं असेल. त्यांच्या डोळ्यांतले आनंदार्शू आत्ताही ताजे असतील.
या संघातला बंगळुरूचा एक खेळाडू. उच्चशिक्षित आहे. एका कंपनीत जॉब करतो. वर्ल्डकपसाठी आपलं सिलेक्शन झालंय हे कळल्यानंतर अत्यानंदानं बॉसकडे रजा मागायला गेला.
बॉस म्हणाला, तुला नोकरी करायचीय की क्रिकेट खेळायचंय हे पहिल्यांदा ठरव. कोणती तरी एकच गोष्ट तुला करता येईल! - या पठ्ठय़ानं नोकरीला लाथ मारली आणि टीममध्ये जॉइन झाला.
माजी क्रिकेटपटू आणि अपंगांच्या या संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी विषण्णपणे सांगत होते, ‘ही आपल्याकडे खळाडूंची कदर आणि असा त्यांचा संघर्ष.’
‘प्रत्येक स्पर्धेसाठी नियम सारखे असतात, असायला हवेत; पण मी इथे वेगळाच प्रकार पाहत होतो’, सुलक्षण कुलकर्णी सांगत होते, ‘इंग्लंडच्या खेळाडूंपैकी कोणी अपंग आहे, हेच लक्षात येत नव्हतं. त्यांचा फिटनेस, त्यांची स्फूर्ती, त्यांची सहजता, त्यांची रनिंग बिटविन द विकेट. कारण त्यांच्यातलं अपंगत्व केवळ 18 टक्के होतं, तर आपल्या प्रत्येक खेळाडूपैकी कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही. प्रत्येक भारतीय खेळाडूचं अपंगत्व किमान चाळीस टक्क्यांच्या पुढे! (अशाच खेळाडूंना संघात जागा मिळाली, कारण त्यांनाच तिकिटांत सूट, सवलती मिळू शकणार होत्या!) अशा परिस्थितीत जागतिक स्पर्धेला तोंड देणं आणि अजिंक्यपद खेचून आणणं किती कर्मकठीण याची कल्पनाही करता येणार नाही.’
भारतीय संघाचं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. इंग्लंडला तर त्यांनी दोनदा हरवलं. 
या संघाच्या जमेच्या बाजू काय, हे विचारल्यावर सुलक्षण कुलकर्णी सांगतात, ‘मुंबई प्रीमिअर लिग’ (एमपीएल) ही धडधाकट खेळाडूंची स्पर्धा. या संपूर्ण स्पर्धेत खेळाडू किमान अर्धा डझन तरी झेल सोडतात; पण बॉल हवेत उडाला की तो झेल टिपलाच जाणार, हे अपंगांच्या या टीमबाबत मात्र मी खात्रीनं सांगू शकतो. यांच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जाही उत्तम. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल नऊ फलंदाजांना रनआउट केलं. त्यातले सात स्ट्रेट थ्रोवर आउट झाले होते. फायनललाही त्यांनी इंग्लंडच्या तीन फलंदांजांना रनआउट केलं!’
सुगणेश महेंद्रन हा खेळाडू इतके उत्तुंग षट्कार मारतो की तोंडात बोटं घालून पाहात राहण्याशिवाय प्रतिस्पर्धी काहीच करू शकत नाही. स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वी शेगाव येथे झालेल्या कोचिंग कॅम्पपासून तर मुख्य स्पर्धेपर्यंत सुगणेशनं किमान 40 ते 50 षट्कार मारले. वर्ल्डकपमध्येही त्यानं किमान दहा-बारा षट्कार ठोकले. इंग्लंडविरुद्धच्या फायनलमध्ये त्यानं 11 चेंडूत 33 धावा काढल्या. त्यात चार उत्तुंग षट्कार होते.
सुदर्शन कुलकर्णी सांगतात, ‘या मुलांना ‘सिम्पथी’ बिलकूल आवडत नाही. ‘बिचारा’ हा शब्द वापरायचाच झाला, तर मी तो इंग्लंडच्या संघाबाबत वापरेन. आपल्या खेळाडूंनी त्यांना इतकं ठोकलं की वाटलं, ‘बिचार्‍यांना’ आता सोडा. मारू नका त्यांना. इंग्लंडच्या कोचकडे यासाठी ‘माय गॉड!’ याशिवाय दुसरा शब्दच नव्हता!
मुख्य प्रश्न होता खेळाडूंच्या कोचिंगचा. इतक्या मोठय़ा प्रमाणात अपंगत्व असलेल्या या खेळाडूंना कोचिंग करणं किती कठीण असेल! 
कुलकर्णी सांगत होते, ‘माझ्यापुढचं ते सर्वात मोठं चॅलेंज होतं. नॉर्मल खेळाडूंना आपण सांगतो, फ्रंटफूट डिफेन्स कर. पण, फ्रंट लेगच डिसेबल असेल तर तो कसा डिफेन्स करणार? जम्मू-काश्मीरचा वसीम खान हा आमचा ओपनर बॅट्समन. त्याच्या एका पायाला अपंगत्व आहे. पाय वाकतच नाही. कसा डिफेन्स करणार? पाकविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्यानं 33 चेंडूत 69 धावा ठोकल्या. काही जणांना एक हातच नाही. तुषार पॉल हा आपला विकेटकीपर. त्याला एक पाय नाही. जयपूर फूट लावून खेळतो. मी स्वत: विकेटकीपर आहे. विकेटकीपरला किती वेळा वाकावं लागतं, किती ऊठबस करावी लागते, किती र्शम पडतात, हे मला माहीत आहे. तुषार कसं करत असेल किपिंग? आपली स्ट्रेंग्थ आणि अँडज्स्टमेंट हे आमच्यासमोरचं मोठं चॅलेंज होतं. आमच्या विकनेसलाच स्ट्रेंग्थ बनविण्याचा प्रय} आम्ही केला.’ विक्रांत केणी हा भारतीय संघाचा गुणी कर्णधार. पालघरचा. विक्रांतला विचारलं, ‘कसा होता तुमचा संघर्ष? काय अडचणी आल्या? त्यावर तुम्ही कशी मात केली?’
एका वाक्यात त्याचं उत्तर होतं, ‘आम्ही एकत्र आलो. संघ म्हणून खेळलो. सगळ्यांनी आपलं सर्वोत्तम दिलं. सारे प्रॉब्लेम्स संपले. जिंकलो!’
अपंगांच्या क्रिकेटला मान्यता मिळावी, त्यांच्या अडचणी सुटाव्यात यासाठी गेली तीस वर्षं माजी भारतीय कर्णधार अजित वाडेकर प्रय} करीत होते. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी त्यांचं निधन झालं. आपल्या या प्रय}ांत त्यांनी नंतर टी. पी. मिरजकर, अशोक वाडेकर, उमेश कुलकर्णी, कर्सन घावरी, अनिल जोगळेकर, विनोद देशपांडे यांच्यासारख्या अनेकांना सहभागी करून घेतलं. अपंगांची संघटना स्थापन केली. ‘ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज्ड’ (एआयसीएपीसी) या संस्थेची धुरा आज अशोक वाडेकर यांच्यासह अनेक जण सांभाळतात.
इंग्लंडहून बोलताना ते सांगत होते, ‘हा वर्ल्डकप म्हणजे आमच्या तीस वर्षांच्या अविरत संघर्षाचा पहिला टप्पा आहे. मुख्य काम होतं आधी सगळ्या संघटनांना एकत्र, एका छत्राखाली आणण्याचं. ते आम्ही सगळ्यांनी केलं. त्यामुळेच भारतीय संघ वर्ल्डकपला जाऊ शकला; पण तरीही आम्ही ‘मान्यताप्राप्त’ नाही. ‘बीसीसीआय’कडून मान्यता मिळाली ती केवळ अपंगांचा हा संघ वर्ल्डकपला पाठविण्यापुरती आणि संघात ‘भारतीय’ या शब्दाचा समावेश करण्यापुरती. संघाला अजूनही बीसीसीआयचा लोगो वापरायला परवानगी नाही. त्यांच्याकडून एक पैसाही मिळत नाही. क्रिकेटचं साहित्य, कोच, सामने यासाठी आजही स्पॉन्सर्स मिळविण्याकरता झगडावं लागतंय. अजितचे मित्र अनिल जोगळेकर, विनोद देशपांडे यांच्यासारख्यांनी ही धुरा आपल्या शिरावर घेतली. कोच सुलक्षण कुलकर्णी, सीलेक्टर्स उमेश कुलकर्णी, प्रसाद देसाई, दीपक जाधव, ब्रिजेश सोलकर, रोहित झलानी, मुकेश आर्य. सगळे जण आपापला वेळ आणि पैसा खर्च करून त्यासाठी योगदान देतात, म्हणून आम्ही इथवर पोहोचलो.’ 
1 एप्रिल हा अजित वाडेकर यांचा जन्मदिन. यंदा याच दिवशी अपंगांच्या टीमला वर्ल्डकपसाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी मिळाली. 15 ऑगस्ट हा त्यांचा स्मृतिदिन. याच्या एक दिवस आधीच भारतीय खेळाडूंनी वर्ल्डकप पटकावला. हा निव्वळ ‘योगायोग’ नाही असं अशोक वाडेकर यांना वाटतं.
अपंगांचा पुढचा क्रिकेट वर्ल्डकप भारतात व्हावा आणि लहान मुलांसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करायची ही जिद्द आता ते बाळगून आहेत. पण आधी ते वाट पाहताहेत संस्थेला बीसीसीआयची ‘मान्यता’ मिळण्याची. लवकरच ती मिळेल आणि निदान आर्थिक प्रश्न तरी सुटेल अशी त्यांना आशा आहे. विश्वचषक पटकावणारे खेळाडू, कोच, सीलेक्टर यांच्याशी बोलत असताना अंगावर शहारे येतात. अपंगांच्या क्रिकेटची ही कहाणी नुसतीच संघर्षमय आणि रोमांचक नाही, प्रत्येकानं त्यासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. अविरत झुंज घेतली आहे. हा संघर्ष अजून संपलेला नाही. आपली दखल मात्र त्यांनी अख्ख्या जगाला घ्यायला लावली आहे. इंग्लंडहून भारतीय क्रिकेटपटू आज मुंबईत, मायदेशी परततील, तेव्हा हा सारा इतिहास त्यांच्याही डोळ्यांपुढे तरळत असेल आणि नव्या स्वप्नांनी जन्म घेतला असेल.

‘जितके ही आयेंगे’..
ल्ल अपंगांच्या क्रिकेटचा वर्ल्डकप पटकावलेल्या या सार्‍याच गरीब खेळांडूपुढे अनंत अडचणी होत्या. भाषेचा प्रश्न होताच; पण यातले बहुसंख्य खेळाडू पहिल्यांदाच परदेशात जात होते. ‘तिथे कसं वागायचं, लोकांशी संवाद कसा साधायचा’ ही त्यांच्यापुढची प्रमुख समस्या होती. 
ल्ल कन्सल्टिंग सायकॉलॉजिस्ट आणि कॉर्पोरेट ट्रेनर गीता कॅस्टलिनो यांनी खेळाडूंची ही समस्या सोडविण्यासाठी मदत केली. खेळाडूंशी त्या एकरूप होऊ शकल्या, याचं कारण त्या स्वत:ही अपंग आहेत.
ल्लगीता कॅस्टलिनो सांगतात, संघात निवड झालेले 16 आणि राखीव चार अशा वीस जणांची ही टीम. वीसपैकी फक्त पाच जणांना इंग्रजी येत होतं. हैदराबादच्या एका खेळाडूला तर हिंदी, इंग्रजी यातली एकही भाषा येत नव्हती. आपल्याला ‘बोलता’ येत नाही, संवाद साधता येत नाही, याचाच ताण त्यांच्या मनावर होता. त्यामुळे आत्मविश्वास ढासळून खेळावर परिणाम होऊ शकतो. मी त्यांना सांगितलं, तुमचा खेळ हीच तुमची स्ट्रेंग्थ. भाषा वगैरे इतर सार्‍या गोष्टी दुय्यम. त्याचा त्यांना उपयोग झाला.’
ल्ल याशिवाय लोकांशी संपर्क कसा साधायचा, परदेशी वावराचे एटिकेट्स, मॅनर्स, किमान दोन-चार वाक्यं इंग्रजीत कशी बोलायची, न बिचकता लोकांना कसं सामोरं जायचं, स्वत:ला मोटिव्हेट कसं करायचं यासारख्या अनेक बारीकसारीक गोष्टी गीता यांनी खेळाडूंना समजावून सांगितल्या. 
ल्ल गीता सांगतात, ‘त्यांचं हे छोटेखानी ट्रेनिंग संपलं, तेव्हा त्यांच्यातला गंड संपलेला दिसत होता, ‘हम जितके ही वापस आयेंगे’ हे शब्दांपेक्षा त्यांच्यातली बॉडी लॅँग्वेजच जास्त आक्रमकपणे सांगत होती.’

भारतीय ‘आक्रमण’
विक्रांत केणी (कर्णधार), तुषार पॉल (यष्टिरक्षक), सुगणेश महेंद्रन, कुणाल फणसे, वसीम खान, रवींद्र संते, देबब्रत रॉय, अनीष राजन, अन्शुल, रमेश नायडू, नरेंद्र मंगोरे, जिथेंद्र नागार्जू, गुरुदास राऊत, गुर्जन्त सिंग, मनदीप सिंग सरन आणि आमीर राथेर.
राखीव - अब्दुल खालेक, सनी गोयत, असीतकुमार जयस्वार, अवनीश कुमार

sameer.marathe@lokmat.com
(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्त संपादक आहेत.)

छाया : दिनेश पाटील, मुंबई

Web Title: Differently abled Indian cricket team's amazing journey to the T20 world cup..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.