अशोक राणे (लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.) -
मेलोड्रामा कालचा आणि आजचा अशी चर्चा करता येईल, असे काही चित्रपट यंदाच्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहिले. पैकी आजचा मेलोड्रामेटिक चित्रपट कसा आहे, याचे विवेचन याआधीच्या लेखात केले आहे. कालचा मेलोड्रामा कसा होता, हे पाहायला एकच चित्रपट पुरेसा होता आणि तो म्हणजे चीनचा ‘कमिंग होम’! चीनच्या ‘फिफ्त जनरेशन’च्या फळीतील एक प्रमुख दिग्दर्शक झ्याँग इमाऊ याचा हा चित्रपट त्याच्या इथवरच्या कारकिर्दीला साजेसाच होता. मुळातला छायाचित्रकार असलेल्या आणि ‘रेड सोर्गम’ या चित्रपटाने १९८८ मध्ये आपल्या दिग्दर्शिय वाटचालीला आरंभ करणार्या झ्याँग इमाऊने सातत्याने मेलोड्रामा शैलीतले चित्रपट केले. या पहिल्याच चित्रपटाने त्याला जागतिक पातळीवरचा एक महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यामुळे आमच्यासारखे महोत्सवाचे वारकरी महोत्सवाच्या कॅटलॉगमध्ये त्याचा नवा चित्रपट दिसला, की खूण करून ठेवतात आणि आवर्जून पाहतात. आजवरचे त्याचे एकूण एक चित्रपट मी असेच आठवणीने आणि मुख्यत: माझ्या सार्या धावपळीतून वेळ काढून पाहिले. बुसानमध्ये ‘कमिंग होम’ पाहायलाही हे करावं लागलं. कारण तो स्पर्धा विभागात नव्हता. तो होता ‘गाला प्रेझेन्स्टेशन’ या विशेष विभागात! जागतिक पातळीवर सन्मानित झालेल्या दिग्दर्शकांचं हे खास दालन असतं.
वर म्हटल्याप्रमाणं झ्याँग इमाऊ हा मेलोड्रामासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या ‘हिरो’ या एका चित्रपटाचा अपवाद करता बाकी सारे याच पठडीतले आहेत. त्याची त्यावर खाशी अशी हुकूमत आहे; परंतु, ‘रेझ द रेड लँटर्न’, ‘टू लिव्ह’, ‘रेड चिली’, ‘द रोड होम’, ‘द फ्लॉवर्स ऑफ वॉर’मध्ये जसा त्याला संयत मेलोड्रामा जमला, तसा तो ‘कमिंग होम’मध्ये तितकासा नाही जमला. तो बर्याच अंशी बटबटीत वाटला. योगायोग तर खच्चून भरलेला होता.
चीनच्या ‘सांस्कृतिक क्रांती’चा संदर्भ असलेली ही गोष्ट आहे. तत्कालिन व्यवस्थेला संपूर्णत: अमान्य असलेल्या स्वतंत्र वृत्तीच्या प्राध्यापक लू यांशी याला अटक होऊन लेबर कँपमध्ये रवानगी होते. आता बर्याच वर्षांनंतर सुटका होऊन तो घरी परत येतो; परंतु मधल्या काळात घरच्या पातळीवर बरीच मोठी उलथापालथ झालीय. त्याला अटक करून निर्दयपणे फरफटत नेताना पाहिलेल्या त्याच्या पत्नीला फेंग वान्युला त्या वेळी बसलेल्या धक्क्यातून ती कधीच सावरलेली नाही. त्यातून एक विचित्र गोष्ट अशी घडलीय, की काही प्रमाणात ती स्मृतिभ्रंश अवस्थेत पोहोचलीय. म्हणजे नवर्याची ती वर्षानुवर्षे वाट पाहतेय, मात्र तो प्रत्यक्ष समोर येताच ती त्याला ओळखू शकत नाही. हाच या गोष्टीचा मूळ गाभा आहे. तिची तरुण मुलगी दांदन तिला या अवस्थेत मदत करण्याचा प्रयत्न करते. आईवडिलांनी आता एकत्र राहावं आणि आपण आपल्या वाटेनं निघावं, असं तिला तीव्रतेनं वाटतं आहे.
लहानपणापासून आईच्या या अशा भ्रमिष्टपणाला कंटाळलेली आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगण्यासाठी आसुसलेली ती एका कोंडीत सापडलेल्या अवस्थेत वावरते आहे. ही तिघंही अशी तिढय़ात सापडली आहेत. दांदन तिच्या परीने हा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करते आहे. यातच या कथेचा एक कंगोरा असा आहे, की स्वत:पुरतंच पाहते, असा आईचा लेकीविषयी ग्रह झालेला आणि म्हणून मायलेकीच्या नात्यात एकप्रकारचा ताण आहे. एकीकडे बर्याच वर्षांनी परतलेला लू यांशी, फेंग त्याला ओळखत नाही म्हणून तो घरी राहू शकत नाही, आईने त्याला ओळखावं म्हणून दांदने केलेले नाना प्रयत्न, असा हा सारा संघर्ष आहे. फेंगने नवर्याला ओळखावं म्हणून पुन्हा पुन्हा जे प्रयत्न केले जातात, त्यामुळे मेलोड्रामाचा संयम हलके हलके सुटत जातो आणि चित्रपट ‘घडवलेला’ वाटतो. मेलोड्रामासाठी हा मोठा कठीण क्षण असतो. आजवर इतके चांगले, दज्रेदार मेलोड्रामा करणार्या झ्याँग इमाऊला या चित्रपटात मात्र त्यावर नेहमीच्या उत्स्फूर्त कौशल्याने मात करता आलेली नाही. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या आणि कायम स्मरणात राहिलेल्या त्याच्या उत्तमोत्तम मेलोड्रामाच्या पंक्तीत ‘कमिंग होम’ बसू शकत नाही. त्याच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत असणारी गोंग ली इथेही मध्यवर्ती भूमिकेत आहे.
‘व्हॉट्स द टाइम इन युवर वर्ल्ड’ या इराणी चित्रपटातील नायिका वीस वर्षांनी आपल्या गावात, आपल्या देशात येते. तिच्या सार्या स्मृतीच हरवल्यात आणि त्याच शोधायला ती इतक्या वर्षांनी इराणच्या उत्तरेकडील रश्त या प्रदेशातील आपल्या गावात येते. हे गाव आपलं आहे, इथं आपल्या आयुष्याच्या आरंभीची काही वर्षं आपण घालविली आहेत. एवढेच तिला- गोलीला आठवते. बाकी काही नाही. ती गावात येताच, आपण जुने मित्र आहोत, असं सांगत सर्वप्रथम फरहाद तिला भेटतो. एखाद्या अनोळखी माणसाकडे बाईने ज्या सावधपणे पाहावं, तशी ती त्याच्याकडे पाहते. तिच्या अवतीभवती वावरणार्या, त्याच्याशी ती एक अंतर ठेवून राहते. अलिप्तपणे म्हणण्यापेक्षा तुटकपणेच त्याच्याशी वागते आणि दुसरीकडे गावातल्या विविध ठिकाणांना भेटी देत ती आपल्या आठवणी जागविण्याचा, त्या परत मिळविण्याचा प्रयत्न करते. फरहाद हा फ्रेममेकर आहे. एखादं चित्र फ्रेममध्ये ठेवून त्याला त्याचं सौंदर्य, त्याची अर्थपूर्णता प्राप्त करून देणं, हे त्यांचं अंगभूत कसब आहे. त्याची पॅशन आहे. तिच्याच आधारे तो गोलीला तिच्या विस्मृतीत गेलेल्या आणि आता काहीशा विखुरलेल्या अवस्थेत हाताला लागणार्या आठवणींना फ्रेममध्ये पकडण्याचा प्रयत्न करीत तिच्या भूतकाळाचं स्पष्ट चित्र तिच्यासमोर मांडतो.
इराणी चित्रपटातून जगभर नावाजली गेलेली, लैला हतामी हिने गोलीची भूमिका सुरेख वठवत संस्मरणीय केली आहे. कसलाही लहानमोठा नाट्यमय संघर्ष नसलेली, जवळपास एका सरळ रेषेत जाणारी ही गोष्ट लेखक-दिग्दर्शक सफी याझदानियन अशा काही कौशल्याने आणि कलात्मकरीत्या सादर केली आहे, की प्रेक्षक त्यात पार गुंगून जातो. गोलीच्या सोबतीनं तिच्या भूतकाळाचा धांडोळा घेता घेता काळाचा एक मोठा पट, त्याचा बदलता पोत पाहत राहतो. या चित्रपटाचं सार्मथ्य आणखी एका गोष्टीत आहे आणि ते म्हणजे ही गोष्ट सहजपणे नॉस्टेल्जियाच्या-स्मरणरंजनाच्या वाटेने गेली असती आणि त्यातली सहजता, तरलता हमखास हरवली असती. परंतु तसं इथं होत नाही. गोष्टीचं वेगळेपण त्याच्या सादरीकरणातही साधलं गेलं आहे. रुढार्थाने ज्याला आपण गोष्ट म्हणतो, तशी गोष्ट नसताना हा परिणाम साधणं म्हणूनच कौतुकास्पद आहे. आमच्या फीप्रेसी ज्युरीने - चित्रपट समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीने - ‘व्हॉट्स द टाइम इन युवर वर्ल्ड’ला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला.
‘(सेक्स) अपिल’ हा अतिशय वेगळ्या धर्तीचा कायमचा स्मरणात राहण्याजोगा तैवानचा चित्रपट विशेष नजरेत भरला. त्याचं शीर्षक असंच आहे. म्हणजे कंसात सेक्स आहे. अपिल कंसाबाहेर आहे. हेतुत: ते तसं आहे. हिहुया या संगीत शिकायला आलेल्या तरुण मुलीवर तिचा मध्यमवयीन प्राध्यापक बलात्कार करतो. ती पोलिसात तक्रार करते. खटला उभा राहतो. दुसर्या एका प्राध्यापकबाई तिला वकील देतात. खुद्द आरोपी प्राध्यापकाची पत्नी नवर्याचं वकीलपत्र घेते. तिच्या मनाशी एक अपराधी भाव आहे. आपण नवर्याच्या करिअरच्या आड कायम आलोय, असं तिला अलीकडच्या काळात वाटत आलंय आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी ती हिरीरीने कोर्टात नवर्याच्या बाजूने लढते आहे. चित्रपटाचा बराचसा भाग कोर्टात घडतो आहे आणि या दरम्यान सर्व संबंधितांच्या मनात काय काय चाललं आहे, ते मुख्यत: समोर येतं आहे. आत एक, बाहेर दुसरंच काही तरी. आरोपीने गुन्हा केलेला आहे, हे स्पष्टच आहे; परंतु कोर्टात आपण असलं काही केलेलंच नाही, असं शपथेवर सांगणारा तो आपल्याला ‘आतून’ ही दिसतो आहे. त्याला हे असलं काही करायचं नव्हतं. कायम संगीताच्या, सुरांच्या जगात वावरणारा एक अतिशय पॅशनेट, शिस्तप्रिय, सुसंस्कृत शिक्षक असा त्याचा लौकिक आहे; परंतु या मुलीला पाहिलं आणि त्याचा विश्वामित्र झालाय. त्याला घडल्या प्रकारची खंत आहे. त्याहीपेक्षा आपली बाजू घेऊन भांडणार्या बायकोलाही आपला प्रमाद माहीत आहे, याची जाण आहे, त्याचं न झेपणारं ओझं तनमनावर आहे.
दुसरीकडे बलात्काराचा खटला दाखल करणार्या पीडित तरुणीच्या अंतर्मनात हळूहळू एक वेगळंच द्वंद्व उभं राहत आहे. कोर्टातील संघर्ष एकीकडे चढत्या क्रमाने पुढे जात असताना तिच्या मनाशी वेगळंच काही तरी चाललं आहे.. कदाचित आपलं प्राध्यापकावर प्रेम असावं.. हे काही तरी अघटितच आहे; परंतु तिच्या मनाशी ते सतत येत राहतं. कारण बलात्कार एकदा घडलेला नाही. पुढेही अनेक वेळा त्यांचा संबंध घडून आलाय. त्याच्याकडून जबरदस्तीही झालीय. आपल्या अधिकाराचा वापरही झालाय.. आणि तशातच तिने त्याच्यावर खटला भरलाय. हे सगळंच भलतंच गुंतागुंतीचं होऊन जातं. एक खटला, तोही बलात्काराचा खटला आणि मग त्यातून तमाम संबंधितांच्या अंतर्मनातलं बाहेर येत जातं. वांग वी मिंग हा तरुण दिग्दर्शक आपल्या या पहिल्याच चित्रपटात ही सारी गुंतागुंत अतिशय प्रभावीपणे दाखवतो. अर्थातच तो कुठेही बलात्काराचं वा करणार्याचं सर्मथन करीत नाही. खरंखोटं सिद्ध करणं हे तितकंसं सोपं नाही. त्यामागे अनेक गोष्टी असतात. दिग्दर्शक तिथेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. या सर्व चित्रपटांतून एक गोष्ट सातत्याने दिसते आणि ती म्हणजे ही सर्व तरुण दिग्दर्शक मंडळी चाकोरीबाह्य विषय सहजपणाने हाताळतात. त्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि मुख्य म्हणजे त्यात एक प्रगल्भ समज जाणवते. वेगळा विषय मांडण्यासाठी तसा वेगळा आणि सखोल जाण असलेला दृष्टिकोनही हवाच!
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)
Web Title: A different subject is deep knowledge
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.